झारखंडमधे नरेंद्र मोदींच्या सभेला लाखोंची गर्दी, पण

१६ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


झारखंड विधानसभेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलीय. आज शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला. भाजपने झारखंड मुक्ती मोर्चाच्या बालेकिल्ल्यातच  पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेतली. नदीचा प्रवाह वाहावा तसं रस्त्यावरून लोकांची गर्दी वाहत असल्यासारखं चित्र होतं. त्या सभेचा हा लाईव रिपोर्ट

झारखंडची उपराजधानी आणि संताल संस्थानची राजधानी दुमका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी थंडीच्या कडाक्यात सकाळपासूनच नटूनधटून सजली होती. भाजप कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहत होता. हत्तीचं बळ घेऊन कार्यकर्ते दुचाकी, चारचाकी गाड्यांवर भाजपचे झेंडे लावून शहरभर फिरत होते.

नदीसारखा रस्त्यांवर माणसांचा प्रवाह

सकाळी आठपासूनच आजूबाजूच्या मतदारसंघातूनही भाजपचे झेंडे लावलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांतून लोक दुमकाच्या दिशेने निघाले होते. दुमकापासून ८० किलोमीटरवर असलेल्या जामताराहून गाड्या भरून लोक दुमकाकडे येत होते. कार्यकर्ते आपली ताकद दाखवण्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी आपल्या ग्रुपची जमावजमव करत होते.

दुमका शहरातही ठिकठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज लावून सभेला येणाऱ्यांच स्वागत करण्यात आलं. रस्त्यावर ठिकठिकाणी रिक्षा, सायकलवरून सभेला येण्याचं आवाहन करण्यात येत होतं.

सभास्थळापासून चारेक किलोमीटर अंतरावरून बघेल तिकडे स्वेटर घातलेल्या माणसांचे जत्थेच्या जत्थे दिसत होते. एखाद्या नदीसारखा माणसांचा प्रवाह रस्त्यावरून वाहत होता. नजर जाईल तिथवर माणसंच माणसं दिसत होती. तरुणांपासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत साऱ्याच वयोगटाचे लोक रस्त्यावर होते.

मोदींनी बघण्याची उत्सुकता

पंतप्रधानांची सभा असल्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे विमानतळ मैदानापासून दोनेक किलोमीटर दूरच सगळ्यांना आपल्या गाड्या सोडून पायपीट करत सभास्थळ गाठावं लागलं. सभा संपल्यावर ट्रॅफीकमधे फसण्याची वेळ येऊ नये म्हणून काही जण तर सभास्थळापासून चारेक किलोमीटर लांब आपल्या गाड्या पार्क करून पायी चालत होते.

आपल्या आवडत्या नेत्याला, पंतप्रधानाला ‘याचि देही याची डोळा’ बघण्यासाठी, ऐकण्यासाठी लोक मोठ्या लगबगीने मैदानाकडे जात होते. महाराष्ट्रात कधी मोदींच्या सभेला असा प्रतिसाद बघायला मिळाला नाही. तेवढं कौतुक इथं लोकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं. काही जणांनी आपली ही उत्सुकता बोलूनही दाखवली.

'देशाला पहिल्यांदाच एवढा चांगला नेता मिळालाय. याआधी कोण पंतप्रधान होतं, ते कुठं जायचे, काय करायचे हे काहीच कळायचं नाही. मोदीजींमुळे जगभरात भारताचं नाव झालंय. घरातही आईवडील मोदीजींच्या कामाबद्दल सांगतात. मोदीजी खूप चांगलं भाषण करतात. एवढे दिवस रेंगाळलेला राम मंदिराचा मुद्दाही आता मोदीजींमुळे निकालात निघालाय. कलम 370 हटवलं,' असे एक ना अनेक मुद्दे लोकांच्या बोलण्यातून पुढे आले. हवा कुणाची आहे, असं विचारल्यावर एकाने आजच्या सभेनंतर ते कळेल, असं उत्तर दिलं.

हेही वाचा : आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन

हेलिकॉप्टरचा चकवा

सभा दुपारी दोन वाजता होती. पण एक वाजताच मैदान खचाखच भरून गेलं होतं. पंतप्रधान मोदींचं भाषण ऐकण्यासाठी लाखाहून अधिक लोक मैदानावर, मैदानाबाहेर जमले होते.

दोन वाजले तसं एक हेलीकॉप्टर मैदानावर घिरट्या घालू लागलं. मैदानाबाहेरच्या लोकांमधे चलबिचल सुरू झाली. पण मंचावरची भाषण सुरूच असल्याचं बघून लोकांनी अजून मोदीजी आले नसल्याचा अंदाज बांधला. आणि पुन्हा साऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. एखाद दुसरं भाषण संपल्यावर पुन्हा आकाशातून आवाज आला.

एकापाठोपाठ दोन हेलिकॉप्टर आले. नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात स्टेजवर येतील, अशी घोषणा झाली. ही घोषणा होताच मैदानाबाहेरचे लोक मैदानात घुसण्यासाठी मिळेल तिथून वाट काढू लागले. मी कशीबशी वाट काढत शेवटच्या रांगेत गेलो.

हेही वाचा : झारखंडच्या निवडणुकीत काय सुरू आहे?

आणि मोदींचा चेहरा स्क्रीनवर झळकला

पंतप्रधान मोदी स्टेजवर येत असल्याचं बघून भाषण देणाऱ्या थांबवून सुत्रसंचालकाने माईक आपल्या ताब्यात घेतला. 'नरेंद्र मोदी जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. गर्दीतूनही जिंदाबादचे नारे लागले. मोदींचा चेहरा मैदानावरच्या स्क्रीनवर झळकला तसं लोकांच्या चेहऱ्यावर ‘याचसाठी केला होता, एवढा अट्टाहास’ अशी भरून पावल्याची भावना दिसत होती.

सत्कार बित्कार आटोपल्यावर माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय आदिवासी मंत्री अर्जून मुंडा, मुख्यमंत्री रघुवर दास यांची भाषणा झाली. दोघांची भाषण सुरू असताना लोकांची आपापसात चर्चा सुरू होती. शेवटी अडीचच्या ठोक्याला नरेंद्र मोदी भाषण द्यायला उठले.मोदींनी संथाली भाषेत नमस्कार चमत्कार केला. आदिवासींच्या अस्मितेला हात घालत वीर महात्म्यांना संथाली भाषेतच अभिवादन केलं. संथाली भाषेत भाषणाची सुरवात करून मोदींनी मॅच सुरू होण्याआधीच सिक्सर ठोकला होता. कारण लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसत होते. अनेकजण आपआपसात ही भावना बोलूनही दाखवत होते.

टॉर्च दाखवून अभिवादन

गर्दीने मोबाईलच्या टॉर्चचा उजेड पाडून मोदींचं स्वागत केलं. तोच धागा पकडत मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच सभेला जमलेल्या प्रचंड गर्दीचा उल्लेख केला. नजर जाईल तिथवर लोकच लोक दिसताहेत. मोबाईलच्या टॉर्चमुळे सभेला कुठवर लोक जमलेत याचा मला थोडाफार अंदाज आला, असं मोदी म्हणाले.

झारखंडमधे भाजपला, कमळाच्या फुलाला आपल्या सगळ्यांचा विशेषतः आदिवासी भावा बहिणींचा मोठा पाठिंबा मिळतोय, हीच गोष्ट आजच्या गर्दीतून अधोरेखित होते, असं सांगत मोदींनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

सभा सुरू होऊन पाचेक मिनिट झाले असतानाच बाजूच्या एकाने मोबाईलवर मोदींचं लाईव भाषण लावलं. आजूबाजूचे लोकही त्याच्या मोबाईलकडे बघू लागले.

हेही वाचा : झारखंडचं भविष्य महिला ठरवणार, तिकीट देताना प्राधान्य मात्र पुरुषांना

झामुमोच्या घरात जाऊन आव्हान

मोदींच्या या सभेला संताल प्रदेशातल्या नऊ मतदारसंघांतून लोक जमवण्यासाठी भाजपने सारी ताकद लावली. दुमका, जामताडा, नाला, शिकारीपाडा, जरमुंडी, पोडैवाहाट, महेशपूर आणि सारठ या मतदारसंघातून लोकांना जमवण्यात आलं. या मतदारसंघातले उमेदवारही मंचावर होते.

चौथ्या टप्प्याचा प्रचार काल थांबल्यावर आज अंतिम टप्प्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसलीय. ८१ पैकी शेवटच्या १६ जागांसाठी येत्या २० डिसेंबरला मतदान होणार आहे. संथाल परगणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात आदिवासी मतांवरच साऱ्या पक्षांची भिस्त आहे. हा भाग झारखंड मुक्ती मोर्चा अर्थात झामुमोचा गड आहे. 

इथेच नरेंद्र मोदी यांच्या दोन सभांचं आयोजन करून भाजपने झामुमोला त्यांच्या गडातच घेरण्याचं नियोजन केलंय. निव्वळ घेरण्याचा नाही तर झामुमोच्या अंगणातच पंतप्रधानांच्या सभा आयोजित केल्यात.

झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन दुमकातून निवडणूक लढवत आहेत. गेल्यावेळी सोरेन यांचा पराभव करणाऱ्या मंत्री डॉ. लुईस मरांडी यांनाच भाजपने पुन्हा एकदा तिकीट दिलंय. सोरेन यांचा गेल्यावेळी इथून पराभव झाला असला तरी त्यांच्यासाठी ही सगळ्यात सुरक्षित सीट म्हणून ओळखली जाते.

साहेबगंज जिल्ह्याच्या बरहेट इथेही 17 डिसेंबरला मोदींची सभा होणार आहे. हीदेखील सोरेन यांच्यासाठी सुरक्षित सीट आहे. पण भाजपने इथेच मोदींच्या सभांचं आयोजन करून झामुमोच्या त्यांच्या घरातच मात देण्याची रणनिती आखलीय.

हेही वाचा : महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!

विरोधकांवर हल्लाबोल

आपल्या सभेमधे मोदींनी झारखंडशी आणि आदिवासींसोबत आपलं जुनं नातं असल्याचं सांगितलं. 'आतापर्यंत झारखंडच्या आदिवासींनी ज्यांच्यावर विश्वास व्यक्त केला, मान सन्मान दिला, डोक्यावर घेतलं, तेच लोक सत्तेवर आल्यावर आदिवासींना विसरले. स्वतःचं भलं केलं,' असा शब्दांत मोदींनी आपल्या विरोधकांवर हल्लाबोल केला.

'झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसकडे ना कुठला विकासाचा रोडमॅप आहे, ना त्यांनी भूतकाळात कधी काही केलंय,' असा आरोप केला.

'काँग्रेसला तर एकच गोष्ट माहीत आहे. संधी मिळेल तिथे भाजपला विरोध करायचा. मोदींना शिव्या द्यायच्या. जिथे जातील तिथे मोदींनी दिवसरात्र शिव्या देणं सुरूच असतं. भाजपचा विरोध करता करता या लोकांना देशाला विरोध करण्याची सवय लागलीय. काँग्रेसला समजत नाही की ते भाजपचा विरोध करताहेत की भारताचा,' अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर देशविरोधी असल्याचा सनसनाटी आरोप केला.

हेही वाचा : झारखंडमधे किंग नाही तर किंगमेकर होण्यासाठी ताकद पणाला

आणि हवा पालटली

नरेंद्र मोदींचं भाषण सुरू होऊन दहाऐक मिनिटं झाले असतानाच लोक मैदानातून बाहेर जाऊ लागले. बाजूच्याच एकाने चला मोबाईलवर ऐकू असं सांगत आपल्या सोबतच्यांना बाहेर नेलं. खचाखच भरलेल्या मैदानावर मागच्या बाजूचे लोक भाषण ऐकण्यासाठी आपल्या सोयीच्या ठिकाणी जाऊ लागले. मैदानावर बसण्यासाठी खुर्च्या ठेवण्यात आल्याचंही मागच्यांना दिसू लागलं. तेवढ्यात हवा पालटावी तशी खुर्च्यांवरचे लोकही उठून जाऊ लागले.

चाळीस मिनिटांच्या आपल्या भाषणात मोदींनी गल्लीपासून ते लंडनपर्यंतच्या साऱ्या मुद्यांना हात घातला. कलम 370, राम मंदिरचा मुद्दाही उपस्थित केला. केंद्रासोबतच पुन्हा एकदा राज्यातही भाजपचं सरकार आणून डबल इंजिनच्या स्पीडने राज्याच्या विकासाला हातभार लावण्याचं आवाहन केलं.

मोदींनी आपल्या भाषणातच आजच्या वातावरणाचाही उल्लेख केला. आज तर वातावरणही सकाळपासूनच थोडा गारठा आहे. दुपार झालीय तरीही सूर्य उगवला नाही, असा उल्लेख करण्याच्या काही मिनिटांपूर्वीच ढगात दडून बसलेल्या सूर्याने सगळ्यांना दर्शन दिलं. ढगाळ वातावरणामुळे सभेवर पावसाचं सावट होतं. हे सावट घेऊनच सभा सुरू झाली. निवडणुकीची हवा कुण्या दिशेने वाहतेय त्यापेक्षा निसर्गाच्या लहरीपणाचीच चर्चा अधिक झाली.

बोलकं उत्तर!

लोक मोठ्या उत्सुकतेनं सभेला आले. पण मोदी बोलायला लागल्यावर काही मिनिटांतच उठून जाऊ लागले. असं का झालं, असा प्रश्न मी परतीच्या प्रवासात एका रिक्षावाल्याला विचारला. यावर त्याने दिलेलं उत्तर खूप बोलकं आहे,

'पहले तो चार, पाँच साल बाद मोदीजी आते थे. अब बार बार आते हैं. तो लोग भी कितना सुनेंगें. कितना देखेंगे. टीवीपर तो रोज सुनते हैं.'

हेही वाचा : 

राजकारणाची भाषा आणि भाषेचं राजकारण

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारसाठी धडा काय?

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्यावर यशवंतराव चव्हाण काय म्हणाले होते?