जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी

१० एप्रिल २०२०

वाचन वेळ : १२ मिनिटं


कोरोनाच्या संकटानं साऱ्या जगाचा धंदा मंदावलाय. अशा संकटातही एका माणसाची घसघशीत कमाई सुरू आहे. डी-मार्टच्या राधाकिशन दमानींच्या कमाईचे आकडे अंबानी, अदानींनाही तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. दमानींच्या कमाईत पाच टक्क्यांनी वाढ झालीय. ग्राहकांनी घसघशीत डिस्काऊंट देऊन दमानींनी हे यश कसं मिळवलं?

कोरोनाने सगळ्यांना हादरवलं. पण कोरोनाला हादरवलं ते राधाकिशन दमानी यांनी. लॉकडाऊनमधे फायद्यात असणारं राधाकिशन दमानींच्या डी-मार्टचं बिझनेस मॉडेल भारी आहे. अंबानी, अदानी, बिर्ला, कोटक यांच्यासारख्या देशातील अनेक बड्या उद्योगतींना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. कारण अर्थातच कोरोना. भविष्यात हे नुकसान भरुन काढण्याचं मोठं आव्हान या सगळ्यांसमोर आहे.

पण या सगळ्यात एका अवलियाचा मात्र फायदा झालाय. या अवलियाचं नाव आहे राधाकिशन दमानी. डी-मार्टचे मालक असलेल्या दमानी यांच्या कमाईचे जे आकडे समोर आलेत, ते अंबानी, अदानींना धक्का लावणारे आहेत. दमानी यांच्या संपत्तीत नुसती घसघशीत वाढ झाली नाहीय, तर त्यांचा धंदा लॉकडाऊनमधेही तेजीत आहे.

कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रांचं नुकसान झालंय. एकही क्षेत्र यातून सुटलेलं नाही. पण रिटेल स्टोअर म्हणून प्रसिद्ध असणारं डी-मार्ट फायद्यात आहे. ते का, हे वेगळं सांगायला नको. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत, या भीतीने अनेकांनी डी-मार्टच्या बाहेर रांगा लावल्या. ही गर्दी काही फक्त लॉकडाऊनपुरती मर्यादित नाही, हे लक्षात घ्या. कधीही जा, डी-मार्टमधे गर्दी दिसतेच. कोणत्या वेळेला गेलं की डी-मार्टमधे गर्दी नसते, याचं गॉसिपींग होतं, हेच डी-मार्टचं मोठं यश आहे.

स्वस्त मिळतो म्हणून बायका किराणा घेतात, तर थम्पअप, स्प्राईटवर भरघोस डिस्काऊंट मिळतं म्हणून बिलाच्या लाईनमधे बराचवेळ उभे राहणारेही तुम्ही पाहिले असतीलच. स्वस्त ते मस्त हे काही कुठं शिकवायला लागत नाही. तो मानवी स्वभावच आहे. पण डी-मार्ट स्वस्तात का विकतं? त्याचा डी-मार्टला काय फायदा होतो? कुठून आलीय ही कॉन्सेप्ट? बिग बाजार, रिलायन्स फ्रेश, फ्युचर बाजार सारख्या तगड्या स्पर्धकांवर डी-मार्टने कशी मात केली? ही स्टोरी तर इंटरेस्टिंग आहेच. पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग आहे, डी-मार्टला जन्म देणाऱ्या राधाकिशन दमानी यांची गोष्ट.

हेही वाचा : कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

शेअर बाजारातला कसलेला खेळाडू

राधाकिशन दमानी हा अतिशय सर्वसामान्य मुलगा. अभ्यासात काही हुश्शार वगैरे तर अजिबात नाही. अगदी सामान्य आणि अगदी किरकोळ. मुंबईत वन रुम किचनमधे राधाकिशन लहानाचा मोठा झाला. कशी बशी एचएससी पास केली आणि बीकॉमला  एडमिशन घेतलं. पण बीकॉमच्या पहिल्या वर्षातच ड्रॉपआऊट. शिक्षण अर्धवट सोडून वडलांसोबत राधाकिशन काम करु लागले. वडील बॉल बेअरिंगचा धंदा करायचे. वयाची तिशी ओलांडल्यानंतर राधाकिशन यांना शेअर मार्केट खुणावू लागलं. मुंबई शेअर बाजारात त्यांनी पैसे गुंतवण्यास सुरवात केली. यावेळी त्यांचं वय होतं ३२ वर्ष.

शेअर बाजाराचं गणित आजही अनेकांना कळत नाही. मात्र अल्पावधीतच बीकॉमच्या पहिल्या वर्षात नापास झालेल्या राधाकिशन यांनी शेअर बाजाराचा असा काही अभ्यास केला की कुठं गुंतवणूक करायची, कधी गुंतवणूक करायची आणि कधी शेअर विकायचा, यात ते एकदम माहीर झाले. कमी वेळात त्यांनी शेअर बाजारातून चांगली कमाई केली. पण अचानक काय झालं कुणास ठाऊक. शेअर बाजारातला एकदम अस्सल खेळाडू म्हणून ओळख मिळवलेला हा गडी अचानक गायब झाला. 

वयाच्या ४२व्या वर्षी राधाकिशन यांनी आंत्रप्रिनर व्हायचं ठरवून टाकलं. एका यशस्वी स्टॉक ब्रोकरने आपल्या करीअरच्या एकदम फॉर्मात असताना शेअर बाजाराचा नाद सोडला. या निर्णयामुळे अनेकांनी त्यांना तेव्हा मूर्खातही काढलं असावं. कारण, १९९५ मधे राधाकिशन दमानी यांच्याकडे एचडीएफसी बँकेचे सगळ्यात जास्त शेअर्स होते, अशी माहिती ब्लूमबर्गवरच्या एका लेखात सापडते. पुढच्या ५ वर्षातच मात्र या माणसाचा शेअर बाजारातून रस का निघून जातो, हे कुणालाच कळत नाही. २००० मधे शेअर मार्केट सोडून राधाकिशन यांनी लॉन्ग टर्म इनवेस्टमेन्ट करण्याचं मनाशी पक्क केलं. एक अशी गुंतवणूक दमानी यांना करायची होती, जी कधीच तोट्यात जाणार नाही. नेहमी फायद्यातच राहील. यातूनच जन्माला आली डी-मार्टची संकल्पना.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या पोरासाठी झटणाऱ्या पंजाबरावांचा वारसदार विदर्भाला कधी मिळणार?

डी-मार्टच्या जन्माची गोष्ट

ते वर्ष होतं २००२. मुंबईच्या पवई भागात राधाकृष्ण यांनी एक जागा विकत घेतली. या जागेत पहिलं डी-मार्ट उभं राहिलं. किराणा, ग्रोसरी, कपडे, जगण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असं सगळं इथं विकायला ठेवलं. हे तर अगदी सामान्य होतं. यात वेगळेपण ते काय, बिझनेस असा कसा चालेल? असा प्रश्न राधाकिशन यांना विचारला जायचा. हा धंदा काही चालत नाही, असं हिणवलं जायचं.

डीमार्टच्या तुलनेत तेव्हा आलेले सुपरमार्केट जास्त आकर्षक होते. तिथे असणारी मांडणी, विकायला असणारे सेल्स एक्झिकेटिव हे सगळं डी-मार्टच्या तुलनेत अधिक उजवं होतं. सामान्य वाटणारं डी-मार्ट स्पर्धेत टिकणारच नाही, असं तेव्हा कुणीही सांगितलं असतं. मग तरीही डी-मार्ट का चाललं? कसं काय फायद्यात आलं? डी-मार्टचं बिझनेस मॉडेल आहे तरी काय?

हेही वाचा : कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस

थेट लाभाचं बिझनेस मॉडेल

डी-मार्टचं बिझनेस मॉडेल इतर सुपर मार्केटच्या तुलनेत एकदम खास आहे. इतर सुपरमार्केटच्या शाखा पटापट उघडत गेल्या. पण डी-मार्ट मात्र कासवाच्या गतीनं आपल्या शाखा सुरु करतंय. असं का, हे समजून घेण्यासाठी डी-मार्टचं बिझनेस मॉडेल अगदी बारीकपणे पाहायला हवं. डी-मार्ट हे वेंडरला म्हणजेच उत्पादकाला आणि बायरला म्हणजेच ग्राहकाला दोघांनाही फायदा करुन देतं.

जवळपास ९९.९९ टक्के गोष्टीत डिस्काऊंट मिळतो. म्हणून ग्राहक पुन्हा पुन्हा डी-मार्टकडे वळतो. म्हणजेच काय तर लॉयल ग्राहक तयार करण्यात डी-मार्टला यश मिळतं. ग्राहक पुढच्यावेळीही नक्की येणार आहे, ही खात्री डी-मार्टमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाबद्दल देता येऊ शकते. ग्राहकांचा फायदा तर होतो, पण उत्पादकाचाही कसा काय फायदा?

वेंडर म्हणजेच उत्पादकाला आपला माल जास्तीत जास्त प्रमाणात विकायचा असतो. जितका जास्त माल विकणार, तितका जास्त पैसा. माल विकण्यासाठी लागतात ग्राहक. डी-मार्टकडे होते लॉयल ग्राहक. लॉयल ग्राहकांची संख्या जास्त असल्यानं माल विकला जाणार, याची खात्री वेंडरला असतेच. त्यामुळे जितके जास्त ग्राहक, तितका जास्त माल विकला जाण्याची शक्यताही बळावते.

दुसरी गोष्ट म्हणजे उप्तादकाचं पेमेंट ही डी-मार्टमधे दोन आठवड्यांच्या आत केलं जातं. इतर अनेक सुपर मार्केटमधे वेंडर पेमेंट व्हायला महिना किंवा त्यापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागते. या दोन महत्त्वाच्या गोष्टी उत्तमपणे हाताळल्यानं डी-मार्टला मोठं यश मिळालं.

हेही वाचा : २६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाणी

विस्तार कासव गतीनं का होतोय?

राधाकिशन दमानी हा दूरदृष्टी असणारा उद्योजक आहे. तात्काळ मिळणारा नफा तात्पुरत्या काळासाठी टिकतो, हे या माणसाला ठाऊक झालं होतं. त्यात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचाही दांडगा अनुभव पाठीशी होता. त्यात एका मध्यमवर्गीय कष्टकरी घरातून आल्यामुळे त्यांना रिस्क न घेता लाँगटर्म रिटन्स देईल, असाच व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्यांनी २००२ मधे भाड्याच्या जागेत डी-मार्ट उभं न करता आधी स्वतःची जागा घेण्याला प्राधान्य दिलं. याचाच त्यांना मोठा फायदा झाला. 

पण तुम्ही इतर सुपर मार्केटच्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास कराल, तर असं लक्षात येतं, की डी-मार्टच्या तुलनेत इतरांच्या शाखा पटापट उभ्या राहिल्या. डी-मार्ट मात्र अतिशय संथपणे सुरु होतं. शांतपणे सुरु होतं. राधाकिशन पटापट शाखा उभ्या करु शकले नाहीत, त्यालाही एक कारण आहे.

अति घाई, संकटात नेई, हे राधाकिशन जाणून होते. गुंतवणूकदार असल्यानं त्यांनी कुठे गुंतवणूक करायची नाही, हे आधी हेरलं. डी-मार्टमधे कधी गेला असाल, तर एकदा डी-मार्ट आतून कसं दिसतं, हे एकदा डोळ्यासमोर आणा. ते एखाद्या शो-रुम सारखं तर अजिबात दिसत नाही. वाण्याच्या दुकानात आल्यानंतर जो फिल येतो तोच डी-मार्टच्या आतमधे गेल्यावर येतो. वाण्याचं एसी दुकान डी-मार्टला म्हणता येऊ शकेल. तिथे काही आकर्षकपणा नाही. दिखाऊपणा तर अजिबात नाही. सामान्य ते अतिसामान्य गोष्टी इथे विकायला असतात. इथली ट्रॉली आणि बास्केटचा दर्जादेखील नावापुरता ठीकठाक आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

महाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनानं नाही, तर आपले मजूर लॉकडाऊनमुळे मरतील?

कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

स्वतःच्या जागेचा आग्रह

अवास्तव पैसे खर्च करायचे नाहीत, हे दमानी यांचं धोरण आहे. बेसिक गोष्टींवर काम चालवायचं. किमान कर्मचारी वर्गात कमाल काम करुन घ्यायचं. तिथे नोकरीवर ठेवण्यात आलेल्या माणसांचा युनिफॉर्म पाहा, तो देखील किरकोळ आहे. किंमतींचे प्रिन्ट, स्टिकर्स, यात कुठेही ग्रेट डिझाईन आहे, असा साधा आर्विभावही नाही. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम डी-मार्टचा जग कोणता असेल, तर तो हाच आहे. खर्च कमी ठेवायचा. याशिवाय राधाकिशन यांचा आणखी एक आग्रह होता. डी-मार्ट जिथे उभं करणार ती जागा स्वतःच्या मालकीची असली पाहिजे. म्हणजे दर महिन्याला भाडं किंवा लीजवर जागा घेऊन पैसे देण्याची भानगडच उरत नाही. त्यामुळे थेट नफा होणारच आहे, हे निश्चित. 

२००२ मधे पहिलं डी-मार्ट पवईत सुरु झालं. त्यातून जो नफा आला, त्यातून डीमार्टने दुसरी जागा घेतली आणि तिथे नवं डीमार्ट उभं केलं. स्वाभाविक आहे, एकाचे दोन व्हायला जर का तीन वर्ष लागत असतील, तर दोनाचे तीन व्हायला दीड वर्ष लागेल. अशा प्रकारे तीन, चार करता करता डी-मार्टने शाखा वाढवण्यासाठी जेव्हा गिअर टाकला, तेव्हा २००७ साल उजाडलं होतं.

मधल्या काळात बिग बाजार, फ्युचर रिटेल, आदित्य बिर्ला फॅशन असे सगळे सुपरमार्केट तुलनेने वेगात आपल्या शाखा उघडत होते. पण त्यातील किती शाखा टिकल्या, हा चिंतनाचा विषय आहे. मात्र डी-मार्टची पवईची पहिली शाखा ते काल परवा उघडलेलं बेलापूरचं नवीन डी-मार्ट या सगळ्याच ठिकाणी दमानी यांचा धंदा तेजीत सुरु आहे. आतापर्यंत देशातल्या फक्त १२ राज्यांमधेच डी-मार्ट आहे. या १२ राज्यांतल्या वेगवेगळ्या शहरांत डी मार्टच्या फक्त १८१ इतक्याच शाखा सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे ८० टक्के शाखा या डी-मार्टच्या स्वतःच्या जागेवरच उभ्या आहेत.

हेही वाचा : पॅथॉलॉजीविषयी ४ : ब्लड बँकमुळे जीवन आणि पोस्टमॉर्टममुळे मृत्यू समजतो

ग्राहक, वेंडर दोघांनाही खूश ठेवण्याचं डोकं

राधाकृष्ण दमानी यांनी आणखी एक गोष्ट केली. सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त डिस्काऊंट मिळत राहिलं पाहिजे, हा डी-मार्टचा अजेंडा त्यांनी यशस्वीपणे राबवत नेला. डिस्काऊंट किती मिळतंय, यावरुनच लोक डी-मार्टमधे पुन्हा पुन्हा येतील, हे राधाकिशन यांनी हेरलं होतं. पण फक्त ग्राहकाला खूश ठेवून चालणार नव्हतं. डी-मार्ट संकल्पना यशस्वी करायची असेल, तर वेंडरलाही खूश ठेवावं लागणार होतं. त्यासाठी राधाकिशन यांनी जे डोकं लावलं, ते कमाल आहे.

डी-मार्ट सुरु करण्याआधी राधाकृष्ण दमानी यांनी नवी मुंबईच्या नेरुळमधे अपना बाजारचं दुकान चालवलं होतं. यातून त्यांना अनेक खाचखळगे कळत गेले. विकता तर येईल. पण विकण्यासाठी माल लागतो. साठा लागतो. तो नियमितपणे येत राहिल, याची सोय करणंही तितकंच गरजेचंय, हे अपना बाजार चालवताना त्यांच्या लक्षात आलं. या अनुभवातून त्यांनी डी-मार्ट सुरू करताना स्लॉटिंग फी नावाची एक कल्पना राबवली.

स्लॉटींग फी म्हणजे वेंडरने त्याचा माल विकण्यासाठी एक विशिष्ट फी भरायची. याला एन्ट्री फीदेखील म्हणता येऊ शकेल. या स्लॉटिंग फीच्या माध्यमातूनच डी-मार्ट भरघोस डिस्काऊंट देते, ज्याचा फायदा ग्राहकांना तर होतोच, शिवाय वेंडरलाही होतो. हे आपण आता एका उदाहरणासह समजून घेऊ.

उदाहरणार्थ, 
एका पेन बॉक्सचा एमआरपी आहे १०० रुपये. असे दहा पेन बॉक्स डी मार्टजवळ वेंडरने विकण्यासाठी दिले.

१० पेन बॉक्स X १०० = १ हजार रुपये एमआरपी

आता १० पेनबॉक्स विकायला देण्यासाठी पेन बॉक्सच्या वेंडरला स्लॉटिंग फी भरावी लागेल. असं समजा की स्लॉटिंग फी आहे १०० रुपये. आता वेंडर रिटेलरला म्हणजेच डीमार्टला १० पेन बॉक्स एकत्र विकण्यास देणार, तेव्हा त्यात आधीच डिस्काऊंट असणार. असं समजा १ हजारचे पेन बॉक्स डीमार्टला ८०० रुपयाला पडले. त्यात स्लॉटिंग फी आली १०० रुपये. म्हणजे 

८०० - १०० = ७०० रुपये झाली पेन बॉक्सची डी मार्टला पडलेली किंमत.

याचाच अर्थ डी मार्टला एक पेन बॉक्स पडला ७० रुपयांना. तर अशा प्रकारे आता डीमार्ट पेन बॉक्सवर तुम्हाला २० टक्के डिस्काऊंट देतं. आणि १०० रुपयांचा पेन बॉक्स ८० रुपयांना विकतं.  ज्यातून डी-मार्टला फक्त १० रुपयांचा नफा होत असला तरी ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही होणाऱ्या नफ्यामुळे डी-मार्ट १० रुपयांच्या पैशांसोबत ज्याची किंमत करता येणार नाही असा विश्वास वेंडर आणि ग्राहक दोघांमधे तयार करण्यात यशस्वी झाले.

हेही वाचा : कोरोनानं कांद्याचा बाजार बंद झाला, मग शेअर बाजार बंद का होत नाही?

छोट्या गोष्टीतला मोठा बदल

भारतातील मध्यमवर्ग सुपरमार्केटमधे एसीमधे खरेदीला जातो, तेव्हा त्याला थोडसं प्रतिष्ठीतही वाटतं. वाण्याकडे जाण्यापेक्षा एकाच ठिकाणी सगळं मिळत असेल, तर कुणाला नकोय. खाण्यापासून पिण्यापर्यंतच्या गोष्टी तर डी-मार्टमधे मिळतातच, पण केसांपासून कंडोमपर्यंतही जे जे माणसाला लागतं, ते ते सगळं एका छताखाली घ्यायला मिळणं, हे मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणासासाठी नवीनच होतं. यात राधाकिशन यांनी केलेली एक गोष्ट दुर्लक्षित करुन चालणारच नाही. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा बदल घडवतात, तशातलीच ही गोष्ट आहे रिजनल टूलची.

प्रत्येक ठिकाणच्या सणाप्रमाणे डी-मार्टमधे तुम्हाला रिजनल टूल दिसतील. दिवाळीत दिवे, फराळासाठी विशेष डिस्काऊंट, रक्षाबंधनच्या वेळी राखी, होळीला पिचकाऱ्या, गणपतीला मोदक, असं प्रत्येकवेळी काहीना काही दिसतंच. इतकंच काय तर लोकल गोष्टी विकण्यावरही त्यांचा भर असतो. तुम्ही डी-मार्टमधे गुलाबजाम आणि लोणच्याचे जर का प्रकार पाहिलेत,  तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल.

कमी किंमतीत घ्यायचं आणि स्वस्तात विकायचं, हे धोरण डी-मार्टमधे राबवल्याचा परिणाम आज सगळीकडे दिसतोय. डी-मार्टची चेन आता हळूहळू वेग पकडतेय. आता ती वेगानं गुणाकार करायला लागेल. कासवाच्या गतीनं चालायचं, पण कोणतीही शाखा बंद पडता कामा नये, याची काळजी घेतच पुढे जायचं, हे दमानी यांनी केलं.

शेअर मार्केटमधे सगळे धक्के खातात आणि दमानी,

वादळ येतं तेव्हा ते मोठमोठ्या झाडांनाही आपल्या कवेत घेतलं. अशावेळी वटवृक्षासारखं डी-मार्ट दिमाखात उभं राहिलेलं दिसतं. कोरोनाच्या महामारीत अंबानी, अदानी, बिर्ला, फ्युचर रिटेल यांना नुकसान झालंय. पण राधाकिशन दमानी यांची एव्हेन्यू रिटेल ही कंपनी डी-मार्टच्या जोरावर दिमाखात उभी आहे. नुसती उभी नाहीये, तर वादळाचा जोरकसपणे सामना करते आहे. नफा कमावते आहे. 

जिथे मुकेश अंबनींच्या संतत्तीत तब्बल २८ टक्के घट नोंदवण्यात येते, तिथे राधाकिशन दमानी यांच्या वाढ झालेल्या कमाईने जगाला संदेश दिलाय. जेव्हा कोरोनाने सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडलाय, तेव्हा राधाकिशन दमानी यांच्या संपत्तीत तब्बल ५ टक्के इतकी वाढ झालीय, असं इकॉनॉमिकल टाईम्सच्या बातमीत म्हटलंय. तर सध्या राधाकिशन दमानी १०.२ अरब डॉलर इतक्या संपत्तीचे मालक आहेत.

शेअर मार्केटची उलथापालथ कोरोनाच्या प्रकोपात सगळ्यांनाच धक्के देतेय. अशाही परिस्थितीत दमानी यांच्या कंपनीच्या शेअर्स तब्बल १८ टक्क्यांनी वधारल्याची बातमी बिझनेस स्टँडर्डनं दिलीय. याचा अर्थ स्पष्ट, २१ दिवसांच्या या लॉकडाऊनचाही डी-मार्ट स्टोअर्सला मोठा फायदाच झालाय.

हेही वाचा : लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

#COVID19Pandemic | Radhakishan Damani contributes Rs 100 cr to #PMCARES Fund & Rs 55 cr to various state relief funds through Bright Star Investments#StayHome pic.twitter.com/cq08gbBdjl

— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) April 4, 2020

कुणी साधं कॉपीही करू शकत नाही

१ जानेवारी, १९५६ला राधाकृष्ण दमानी यांचा जन्म झाला. मुंबईतील वन रुम किचनमधे लहानाचा मोठा झालेला हा मुलगा डिग्री कॉलेजच्या पहिल्याच वर्षात ड्रॉप आऊट होतो. मधेच हा मुलगा शेअर बाजारात नाव कमवायला जातो. तेही अर्थवट सोडून दुसरंच काहीतरी खूळ डोक्यात घालून घेतो. पण हाच मुलगा आज देशातल्या दुसऱ्या क्रमाकांचा सगळ्यात श्रीमंत माणूस बनतो, तेव्हा लोकांना त्याने कमावलेले कित्येक अब्ज डॉलर दिसतात. फोर्ब्ज सारख्या संस्थेलाही वन रुम किचनमधे राहिलेला मुलगा आपली दखल घ्यायला दमानी भाग पाडतो, हे प्रचंड मोठं यश आहे.

ट्विटर आणि फेसबूकवर दमानी नाहीत. माध्यमांसमोरही ते कधी आल्याचं दिसत नाही. जिंकायच्या गोळ्या विकणारा त्यांचा साधा एक विडीओही आपल्याला यूट्यूबवर सापडणार नाही. आहेत तर फक्त काही फोटो. श्रीमंती आली की ग्लॅमर आपोआप येतं. पण या माणसाने पहिल्यापासूनच मीडिया आणि ग्लॅमर या दोघांनाही चार हात लांबच ठेवलं.

प्रचार कमी आणि प्रसार जास्त, या धोरणावर राधाकिशन दमानी यांनी काम केलं. वयाच्या ४२व्या वर्षी एक माणूस धंदा सुरु करतो. तो यशस्वी करुन दाखवतो. यात सगळ्यांचा फायदाच झाला पाहिजे, हा मुख्य संदेश असतो. पैसे कमवायचे, पण कुणाचं नुकसान करुन कमवायचे नाहीत, हे दमानी यांनी केलं. त्यामुळेच ते एक असा धंदा उभा करु शकले, ज्याच्याशी स्पर्धा करणं तर सोडाच, त्याची कॉपी करणंही कुणाला जमत नाही आहे.

हेही वाचा : 

एखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

पंतप्रधान कोरोना पॅकेजनंतरही गरीब फाटकाच राहणार आहे

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी