डाटाची माती करुया चला!

२२ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वापरून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो.

गेल्या महिन्यात २० वर्षाच्या झालेल्या गुगलने आपल्याला सर्व बाजूंनी गुरफटून टाकलंय. आपल्या म्हणजे आपल्याविषयीच्या माहितीला. आपल्या `डाटा`ला. कोणती माहिती? तर टेक्नॉलॉजीमुळे आपल्याबद्दलची जी काही माहिती मिळवता येते, साठवता येते आणि त्याच्यावर प्रक्रिया करता येते, अशी सगळीच माहिती. उदा. आपल्या हातातल्या बहुतांश स्मार्टफोनना अँड्रॉइड फोन म्हणतात. कारण अँड्रॉइड नावाची मोबाईलमधली प्रणाली आपला फोन चालवते. त्या मुख्य प्रणालीमधूनच आपण मोबाईलसाठी लागणारे बाकीचे अ‍ॅप्लिकेशन्स डाऊनलोड करुन वापरतो. 

या अँड्रॉइड कंपनीचा मूळ मालक आहे गुगल. हे स्मार्टफोन वापरण्यासाठी आपलं जीमेलवर अकाऊंट असावं लागतं. ते जीमेल ही गुगलचंच. या सर्वांवर कडी म्हणजे गुगल सर्च. बिंग, याहू, इन अशी बाकीची सर्च इंजिन असली तरी आपण इंटरनेटवर सर्च करतो तो गुगलवरुनच. जणू काही शोधणे या शब्दाला गुगल हा प्रतिशब्द झालाय. थोडक्यात काय तर, आपण डिजिटल जगात जे काही करतो ते १००% या गुगलच्या माध्यमातून करतो. म्हणजे बस, ट्रेन किंवा विमानाचं तिकीट काढण्यासापासून, या विकेंडला रात्री कोणत्या हॉटेलात जेवायला जायचंय ते निवडण्यापर्यंत. आपल्या या सर्व कृतींची नोंद गुगल त्याच्याकडे ठेवत जातं. हा झाला आपला डाटा www.google.com/takeout या लिंकवर जाऊन तपासलंत तर आपल्याविषयी किती बारीकसारीक माहिती गुगलकडे आहे, हे आपल्याला सहज कळू शकेल. 

फेसबूक वेगळ काय करतंय?

जी गोष्ट गुगलची, तीच गोष्ट फेसबूकची. आपण फेसबूक वर जे काही लिहितो, चेक इन करतो, कोणाला लाइक करतो, कोणावर कमेंट करतो, कोणते फोटो टाकतो, या सगळ्यांची नोंद फेसबूक तयार करतं. आपण साधारणतः गेली १५ वर्षं गुगल आणि १० वर्षं फेसबूक वापरत आहोत. या काळात या माध्यमांवरील आपल्या प्रत्येक हालचालीची नोंद त्यांच्याकडे आहे. शिवाय ऑनलाईन खरेदीसाठी वापरतो त्या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा आपल्या मोबाईल कंपन्या अ‍ॅपल, सॅमसंग किंवा ओपो असोत. या सर्वच कंपन्या आपली माहिती सतत साठवत राहतात. या सगळ्यातून जी तयार होते ती असते आपल्या प्रत्येकाची डिजिटल फूटप्रिंट.

जगातल्या प्रत्येक माणसाची एवढी अवाढव्य माहिती साठवून ठेवणं नवीन तंत्रज्ञानामुळे सहज शक्य आहे. इतकंच नव्हे तर आता या डाटावर वेगवेगळ्या प्रकारचं प्रोसेसिंग करायची सोय आणि क्षमतासुद्धा सहज उपलब्ध आहे. ती वापरुन या कच्च्या डाटा मधून अनेक निष्कर्ष काढता येतात. आपल्याला काय खायला प्यायला आवडतं? आपण कुठे जातो? आपलं लग्न झालंय का? आपली विचारसरणी काय आहे? हे सर्व निष्कर्ष सतत काढले जात असतात. त्याचा वापर आपण लगेच प्रभावित होऊ अशा जाहिराती दाखवण्यासाठी केला जातो. मग आज साबण कोणता विकत घ्यावा इथपासून कोणाला मतदान करावं इथपर्यंतच्या सर्व वैयक्तिक निर्णयांवर प्रभाव पाडायचा प्रयत्न केला जातो. कारण या सगळ्या कंपनांच्या प्रमुख व्यवसाय हा जाहिरात आणि इन्फल्युएनसिंग हाच आहे. या सर्व जाहिरातींच्या कंपन्या आहेत. जितकी उत्तम जाहिरात ते दाखवतील आणि जितके जास्त लोक त्या जाहिरातींना भुलुन निर्णय घेतील तितका त्यांचा फायदा जास्त. 

एव्हाना आपल्या सर्वांना याची जाणीव झाली असेल की या जगात फुकट नसतं. पण आपणतर फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक पैसाही देत नाह. गुगलसाठीही नाही. तरीही इतकं उत्तम तंत्रज्ञान आपल्याला फुकट मिळतं. मग हे बनवायला आणि सांभाळायला येणारा अफाट खर्च कुठून निघतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, आपण त्यांचे गिऱ्हाईकच नाही आहोत. उलट आपण त्यांचं खरं उत्पादन आहोत. आपल्या माहितीच्या स्वरुपात आपली विक्री करुन ते त्यावर पैसे कमावतात. जाहिरातदार आणि इन्फल्युन्सर हे त्यांचे खरे गिर्‍हाईक आहेत, जे त्यांना आपल्या माहितीचे बक्कळ पैसे देतात.

उदाहरण द्यायचे झाले, तर आपल्या फूटप्रिंटमुळे फेसबूक किंवा गुगलला जाणवतं की आपल्याला नवीन कपडे घ्यायचेत. ते लगेच आपल्या आवडीच्या कपड्यांची जाहिरात सुरु करतात. ती पाहुन आपण पाघळतो आणि फ्लिपकार्टवरुन कपडे खरेदी करतो. त्याचवेळी फ्लिपकार्ट आपल्याच पैशातले थोडेसे फेसबूक किंवा गुगलला देतं. थोडक्यात माहिती हे नव्या जगाचं सर्वात मोठं चलनी नाणं झालंय.

त्यामुळेच `डाटा इन न्यू ऑईल` ही नवी म्हण रूढ झालीय. आज एकविसाव्या शतकात जग बदलायची ताकद डाटाकडे आहे, तीच ताकद गेल्या शतकात खनिज तेलाकडे होती. ज्याच्याकडे जास्त खनिज तेल, तो जगावर राज्य करत होता. तो खरा महासत्ता होता. जगातल्या सर्व माणसांचं आयुष्य अप्रत्यक्षपणे तेलावर अवलंबून होतं. आज हेच सर्व डाटाबद्दल घडतंय. म्हणजे काय तर आजच्या सर्व लढाया या डाटासाठी आणि डाटा वापरून खेळल्या जातात. आजच्या जगाच्या नव्या महासत्ता हा कोणता देश नसून त्या गुगल आणि फेसबूक आहेत. 

डाटा आणि ऑईलमधला सारखा गुण

आज सर्वाधिक प्रभावी पाच कंपन्या या गुगल, फेसबूक, अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि अँपल या आहेत आणि पाचही कंपन्यांचे मूळ हे डाटा मध्ये आहे. शिवाय डाटा आणि ऑईलमधे आणखी एक साम्य आहे. फक्त खनिज तेलाचा काही उपयोग नाही, पण त्यावर प्रोसेसिंग करून अगदी ग्रीसपासून विमानाच्या इंधनापर्यंत हजारो उत्पादनं निघू शकतात. तसंच नुसत्या डाटाचा उपयोग नाही. पण त्यावर प्रोसेसिंग म्हणजे डाटा अ‍ॅनॅलिटिक्स किंवा विज्युअलायझेशनचा वापर केला तर डाटामधूनही वेगवेगळी शेकडो उत्पादनं तयार होतात. 

यासाठी फेसबूक, गुगल किंवा आधारपासून पळून काहीच होणार नाही. तसं ठरवलं तर अश्मयुगात जाऊन राहावं लागेल. आपलं जगणंच डिजिटल झालंय. प्रत्येक ठिकाणी डाटा तयार होतो आणि प्रत्येक ठिकाणी त्यावर लक्ष ठेऊन त्याचा गैरवापर करता येतो. त्यामुळे कुढत बसण्यापेक्षा नव्या जगात आपली वैयक्तिक माहिती ही वैयक्तिक नाही आणि तिचा कोठेही वापर होऊ शकतो हे वास्तव मान्य करून पुढे जाऊया ना! त्याने जास्त प्रॅक्टिकल होऊन या नव्या प्रश्नाला भिडता येईल.

मग उपाय समोर येतो तो कॉन्शिअस डाटा शेअरिंगचा. म्हणजे काय तर सजगपणे आपला डाटा या कंपन्यांना वापरायला देणं. कंपन्यांना आपली माहितीच वापरू न देण्याऐवजी ती वापरू द्यावी. पण ती का आणि कशासाठी वापरत आहात हे आपल्याला इत्यंभूत कळू देणं. हे कळलं की प्रत्येकजण ही माहिती वापरण्याविषयी सजग राहू शकतो. त्यांच्या जाहिरातीचा स्वतःवर परिणाम न होता निर्णय घेऊ शकतो.  उदाहरणार्थ जिथे सीसीटीवी लागलेला असल्याचं आपल्याला कळतं आणि नकळत आपलं वागणं बदलतं. तसं काहीसं डाटाच्या बाबतीत व्हायला हवं. आता तर आमची माहिती वापरून पैसा कमावताय तर आम्हाला त्यातला वाटा मिळू द्या, अशाही मागण्या होऊ लागल्यात.

शेवटी विश्वास ही गुंतवणूक 

फेसबूक आपली माहिती वापरते, हे गेल्या कित्येक वर्षांपासून उघड गुपित आहे. त्यासाठीच त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपमधून शून्य रुपये मिळत असताना १९ बिलियन डॉलर मोजले. ते व्हॉट्सअ‍ॅपमधून आपली माहिती मिळावी म्हणूनच. फेसबूकलाही कळलंत आपल्याला दीर्घकाळ आपल्यासोबत राहायचं असेल तर त्याचा विश्वास हीच खरी गुंतवणूक आहे. गुगलनेसुद्धा अँड्रॉइड फोनवर आपला काय काय डाटा वापरला जातो यांच्या परमिशन्स अगदी ठळकपणे मागायला सुरवात केलीय. हे सगळे या ट्रस्ट इकॉनॉमी चे निर्देशक आहेत. फेसबूक चा झुकरबर्ग असो वा गुगलचा लॅरी पेज, हे सगळी चाळीशीच्या आतले तरुण आहेत. एवढ्या कमी वयात त्यांच्याकडे महासत्तेच्या चाव्या आल्या. त्यांना त्यासोबत येणारी जबाबदारी आता जाणवत आहे, आणि त्याप्रमाणे ते बदलत आहेत, जे स्वागतार्ह आहे. 

डाटा हा जसा ऑइल आहे तसा तो सॉइलपण आहे. मातीत पेराल ते उगवतं. तसंच या महितीचंही आहे. माहितीच्या पायावर जे पाहिजे ते उभं करता येतं. त्यासाठी हवा एक चांगला माळी अर्थात क्युरेटर. माहिती नीट क्युरेट केली तर त्यातून असाध्य आजारांवर उपचार निघतात आणि चुकीच्या पद्धतीने वापरला तर त्त्यातुन केम्ब्रिज अ‍ॅनालिटीका पण तयार होते. शेवटी ते एक टूल आहे आणि सुदैवाने ते प्रत्येकाला उपलब्ध आहे.

आपल्याकडच्या या माहितीची ताकद आपण ओळ्खली आहे का? फेसबूक आणि गुगल अ‍ॅनालिटिक्स वापरून जगावर राज्य करत आहेत. तीच टूल आपण आपल्या डाटासाठी का वापरत नाही? डाटा हा फक्त फेसबूक वा गुगलच तयार करते असे नाही. आपल्या सर्वांकडे खूप माहिती पूर्वीपासून होती आणि आहे. बदल इतकाच झालाय की त्याचं पृथक्करण करायची वेगवेगळी साधनं नव्याने तयार झालीत. उदा. हेच डाटा अ‍ॅनालिटिक्स वापरून कॅन्सर खूप आधी डिटेक्ट करायचं तंत्रज्ञान शोधून काढण्यात आलंय. शेतकर्‍यांकडची वर्षानुवर्षाची माहिती गोळा करुन त्यानुसार सस्टेनेबल फार्मिंगचं मॉडेल याच डाटातून निघालंय. अशी एक ना अनेक चांगली उदाहरणे या डाटाच्या पॉझिटिव वापराची देता येतील. आता आपण ही ताकद समजून घेऊन तिचा भल्यासाठी वापर करायची वेळ आलीय. आपल्याकडची माहिती इंटरनेटवर आणायला हवाय. त्याच फूटप्रिंटचं विश्लेषण करून त्यातून आपल्यासाठीच नवी पावलं टाकण्याच्या दिशा ठरवायला हव्यात.

(लेखक हे आयटी तज्ज्ञ, उद्योजक आहेत.)