शीला दीक्षितः काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं

२० जुलै २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


दोन चिमणी पोरं पदरात टाकून वयाच्या अवघ्या चाळीशीत कर्तृत्ववान नवरा जग सोडून गेला. दुसरं कुणी असतं तर पार कोलमडून गेलं असतं. पण ती शीला दीक्षित नावाची वाघिण होती. त्यांनी राजकारणातल्या सगळ्या चढउतारांवर स्वार होऊन सलग पंधरा वर्षं दिल्लीचं मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम केला. आज त्यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी सर्वपक्षीय आदर व्यक्त होतोय, तो उगाच नाही.

२५ सप्टेंबर १९८५ ला पंजाब विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. प्रचाराचा शेवटचा दिवस होता. शेवटची प्रचारसभा नुकतीच संपली होती. पंजाबमधलं एक शहर बाटला इथून एक कार अमृतसरच्या दिशेने निघाली होती. ती कार होती बिहारमधल्या एका खासदाराची. त्यांच्या सोबत आणखी एक नव्याने लोकसभेत निवडून आलेल्या खासदार होत्या, शीला दीक्षित.

दुपारचे एक वाजले होते. ड्रायवर कटकट करत होता की अमृतसरला पोचेपर्यंत खूप उशीर होईल. आधी जेऊन घेऊया. रेस्टॉरंटजवळ गाडी थांबवली. ऑर्डर दिली. अचानक जोरात स्फोट झाला. कारच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. तिथे कारजवळ खेळणारी दोन मुलं दगावली. ड्रायवरचं ऐकलं नसतं तर त्या कारमधल्या शीला दीक्षितांच्याही अशाच चिंधड्या उडाल्या असत्या.

पोलिटिशियन रिटायर होत नसतात

पोलिसांनी सांगितलं, खलिस्तानी अतिरेक्यांनी कारमधे टाईमबॉम्ब लावला होता. शीला दीक्षित यांचं प्रसिद्ध आत्मचरित्र `सिटिझन दिल्ली, माय टाईम्स, माय लाईफ` हा प्रसंग वाचताना अंगावर काटा उभा राहतो. हे घडलं तेव्हा शीला दीक्षितांचं वय होतं अवघं ४७. त्यानंतर तेरा चौदा वर्षांतच त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आणि सलग पंधरा वर्षं त्या पदावर राहून इतिहास रचला. इतकी वर्षं कुणीच दिल्ली सरकारच्या गादीवर बसू शकलेलं नाही.

चाळीशीत मृत्यू इतक्या जवळून पाहिलेल्या शीला दीक्षितांनी आज ८१व्या वर्षी एक समृद्ध आयुष्य जगल्याचं समाधान घेऊन जग सोडलं असेल. वयानुसार, आजारपणामुळे त्या थकल्या होत्या. पण आजही त्या थांबल्या नव्हत्या. रिटायर्ड झाल्या नव्हत्या. गेल्याच वर्षी ऐन लोकसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेस अध्यक्ष बनलेल्या राहुल गांधींनी त्यांना दिल्लीचं प्रदेशाध्यक्ष बनवलं तेव्हा त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं, `पोलिटिशियन कधी रिटायर होत नसतात.` लोकसभा निवडणुकांमधे पराभव पचवूनही त्यांनी हार मानली नाही. आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्या मिटिंगा घेत होत्या.

हेही वाचा : निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, खरंच?

१० नंबर बसचा कपूर ते दीक्षित प्रवास

त्यांचा जन्म पंजाबमधल्या कपूरथला संस्थानातला. जन्म ३१ मार्च १९३८. पण जडणघडण बरीचशी दिल्लीतच झाली. दिल्ली युनिवर्सिटीत इतिहासात एमए करताना त्यांची ओळख विनोद दीक्षितांशी झाली. विनोद त्यांना घरी सोडायला फिरोजशाह रोडला जायचे. १० नंबरची डीटीसी म्हणजे दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस ठरलेली होती.

एक दिवशी असंच बोलता बोलता बसमधेच विनोद यांनी प्रपोज केलं, `आज मी माझ्या आईला सांगणार आहे की जिच्याशी लग्न करायचंच ती मुलगी मला भेटलीय.` शीलानी विचारलं, `त्या मुलीला विचारलं तरी आहेस का?` उत्तर आलं, `अजून नाही. पण ती माझ्या शेजारीच तर बसलीय.`

विनोद यांचे वडील उमाशंकर दीक्षित हे तेव्हाच्या काँग्रेसमधलं एक बडं प्रस्थ. स्वातंत्र्यलढ्यापासून पंडित नेहरूंच्या जवळचे मानले गेलेले. देशाने पद्मविभूषण म्हणून गौरवलं, इतकं मोठं योगदान. पण त्यांना मुलाचं लग्न मान्य नव्हतं. कारण शीला ब्राह्मण नव्हत्या. त्या कपूर म्हणजे पंजाबी खत्री. पण विनोद यूपीएससी पास झाले. नववं रँकिंग मिळवलं. उत्तर प्रदेश केडरचे आयएएस बनले. त्यानंतर सगळं सुरळीत झालं.

सासऱ्यांनी दिला राजकारणाचा वारसा

१९६९ला काँग्रेसमधल्या बड्या धेंडांनी इंदिरा गांधींना पक्षातून काढून टाकलं, तेव्हा उमाशंकर यांनी इंदिराबाईंची साथ दिली. त्याचं फळ त्यांना मिळालं. ७४ला ते गृहमंत्री बनले. नंतर संजय गांधींच्या काळात सगळ्या बुजुर्गांबरोबर त्यांना राज्यपाल बनवलं. तेव्हा दिल्लीतली त्यांची जागा घेतली ती त्यांच्या सुनेने. नव्या पिढीच्या गांधींशी जुळवून घेतलं. महिलांच्या हक्कांसाठी आंदोलनं केलं. वर्किंग विमनसाठी दोन हॉस्टेल बनवण्यात यश मिळवलं. 

ऐंशीच्या दशकात विनोद यांचं हार्ट अटॅकने निधन झालं. दोन लहान मुलं होती. मोठा धक्का होता. बाई मोठी धीराची. वाघिणीसारख्या तडफेसाठी ती ओळखली जायचीच. इंदिरा गांधींना तिचं कौतुक पूर्वीपासूनच होतं. शीला दीक्षितांनी सासऱ्यांचा राजकारणाचा वारसा सुरू ठेवला. त्या सासऱ्यांचं ऑफिस सांभाळायच्या. पुढे अधिक सक्रिय झाल्या.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

विमानातली गांधीनिष्ठा कामाला आली

इंदिरा गांधी यांची दिल्लीत हत्या झाली. तेव्हा राजीव गांधी बंगालमधे होते आणि उमाशंकर दीक्षित पश्चिम बंगालचे राज्यपाल. हत्या झाल्याचं बंगालमधे सर्वात आधी त्यांनाच कळलं. राजीवना घेऊन कोलकात्यावरून दिल्लीला विमान उडालं, त्यात प्रणव मुखर्जींबरोबरच उमाशंकर आणि शीला दीक्षितही होते.

बीबीसीचे ज्येष्ठ पत्रकार रेहान फझल यांना शीला दीक्षितांनी एक जबरदस्त इंटरव्यू दिलाय. त्यात त्या सांगतात, `राजीवनी विचारलं, अशा परिस्थितीत नेमक्या काय तरतुदी आहेत. त्यावर प्रणव मुखर्जी म्हणाले, अशा वेळेस सर्वात ज्येष्ठ मंत्र्याला हंगामी पंतप्रधान बनवून नंतर कायमस्वरूपी पंतप्रधानांची निवडप्रक्रिया पूर्ण करतात.` तेव्हा सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या मुखर्जींना या सल्ल्यामुळे मंत्रिमंडळातूनच नाही तर काँग्रेसमधूनही बाहेर जावं लागलं. पण दीक्षित कुटुंब मात्र कायमचं गांधीनिष्ठ बनलं.

खासदार आणि मंत्रीपदाने ओळख दिली

त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या शोकसभा लाटेत शीला दीक्षित सासुरवाडीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातल्या कन्नौज मतदारसंघातून खासदार बनल्या. दोनच वर्षांत राज्यमंत्री बनल्या. संसदीय कार्य आणि पीएमओ ही खाती बघत असल्यामुळे त्यांचं सर्वच पक्षातल्या राजकारण्यांच्या नव्या पिढीशी प्रेमादराचे संबंध बनले. स्वतःचा आब राखून कणखरपणे नेतृत्व राबवण्याचा इंदिरांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्यानुसार वागून त्यांनी दिल्लीच्या सत्तावर्तुळात कायम आदराचं स्थान मिळवलं.

पुढच्याच निवडणुकीत लाट उलट झाली होती. बोफोर्सच्या गदारोळात त्या हरल्या. त्या काळातल्या शीला दीक्षित यांच्या राजकारणाविषयी द लल्लनटॉप या हिंदी वेबसाईटचे संपादक सौरभ द्विवेदी यांनी एका लेखात नोंद केलीय, ती अशी, `या पराभवानंतर शीला दीक्षित यांनी यूपीकडे वळूनही पाहिलं नाही. पती आधीच वारले होते. ९१ला सासरेही गेले. शीला आपल्या पंजाबी मुळांकडे परतल्या. दिल्लीत राहू लागल्या. फार सक्रिय नव्हत्या. कारण नरसिंह राव यांचा काळ होता. गांधी कुटुंबाच्या निष्ठावंतांना कुणी विचारत नव्हतं. पण १९९८मधे परिस्थिती पालटली. सोनिया गांधी परतल्या आणि त्यांचे सगळे निष्ठावंतही.`

दिल्लीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मुख्यमंत्री

१९९८मधे शीला दिक्षितांकडे दिल्ली काँग्रेसचं अध्यक्षपद आलं. त्याच वर्षी त्या लोकसभेची निवडणूक पुन्हा हरल्या. पण विधानसभेची निवडणूक जवळ आली होती. भाजपच्या सुषमा स्वराज मुख्यमंत्री होत्या. शीला दीक्षितांनी आपला सगळा अनुभव पणाला लावून हल्लाबोल केला. काँग्रेसने अनपेक्षित मोठा विजय मिळवला. त्यानंतर त्या सलग पंधरा वर्षं दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या. याच काळात त्या सलग चौदा पंधरा वर्षं दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षही होत्या. 

तुलनेने छोट्याशा राज्यात मुख्यमंत्र्यांची प्रतिमा कायम महत्त्वाची ठरते. त्या प्रशासक म्हणून उत्तम होत्याच. ठरवलेलं काहीही करून राबवण्यात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्या दिल्लीत मेट्रो सुरू करू शकल्या. सगळ्या रिक्षा आणि बस सीएनजी करू शकल्या. रस्ते मोठे केले. फ्लायओवर बांधले. राजधानीचा चेहरामोहरा बदलवला. हे सारं त्यांनी शांतपणे केलं. प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडलं नाही. अधिकार नसल्याची बोंब केली नाही. आज त्यांच्या निधनानंतर त्यांचं हे योगदान सर्वांनाच नावाजावं लागतंय.

हेही वाचा : शाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला

दिल्लीवर त्यांनी प्रेम केलं. दिल्लीतल्या लोकांशी त्यांनी वैयक्तिक संबंध जोडले होते. अत्यंत मायाळूपणे त्या लोकांना आपलंसं करत. त्यांनी कधी विरोधकांवर डूख धरला नाही. उलट पक्ष न पाहता लोकांची कामं केलं. त्यामुळेच त्या दिल्ली या भाजपच्या बालेकिल्ल्यावर वर्षानुवर्षं राज्य करू शकल्या. प्रॉपर्टी एजंट आणि बिल्डर असणाऱ्या भाजपच्या नेतृत्वाला त्यांनी नेस्तनाबूत केलं.

केजरीवालना कधीच माफ केलं नाही

फार नंतर राष्ट्रकुल घोटाळा, निर्भया प्रकरण आणि जेसिका लाल हत्याकांड प्रकरणातला प्रमुख आरोपी मनू शर्मा याला पॅरोल देण्यावरून विरोधकांनी काँग्रेसविरोधात गदारोळ उडवला. शहरातल्या काँग्रेसच्या नव्या जुन्या नेतृत्वाशीही त्यांचा कनेक्ट तुटला होता. त्यात आपल्या पायाखालची जमीनच सरकलीय, याचा अंदाज शीला दीक्षितांना आला नाही. अरविंद केजरीवालांच्या अव्वाच्या सव्वा आश्वासनांची भर पडली. केजरीवालांनी शीला दीक्षितांसमोर निवडणूक लढवून हरवलं.

त्या केजरीवाल यांच्यासोबत काही कार्यक्रमांत दिसल्या. पण त्यांनी केजरीवालना माफ केलं नाही. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होणार, हे ठरलं होतंच. पण ती शीला दीक्षितांनी होऊ दिली नाही. स्वबळावर निवडणूक लढवली. स्वतःही उभ्या राहिल्या. सगळे भाजपचे खासदार जिंकून आले. पण दिल्ली राज्यात आपपेक्षा काँग्रेसला जास्त मतं मिळवून दिली.

आता दिल्लीत काँग्रेसकडे शीला दीक्षितांसारखं दुसरं नेतृत्व नाही. असलेले सगळे पर्याय फारच खुजे असल्याचं आधीच सिद्ध झालंय. आता पुढे काय? असा प्रश्न दिल्लीतल्या काँग्रेससमोर आहे. पण थोड्याबहुत फरकाने हेच चित्र सगळ्या देशभर आहे. शीला दीक्षितांचं जाणं हे काँग्रेसमधल्या एका कर्तृत्ववान पिढीचं जाणं आहे. त्यामुळे आधीच हादरलेली काँग्रेस त्यांच्या निधनाने आणखीच धास्तावलेली दिसतेय.

हेही वाचा :

कवीच्या जाण्याने काय गेलं, काय उरलं?

जगभर लोकशाहीची जागा टोळीवाद घेतोय

महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

अशोक गेहलोतः हारकर जितनेवाले को जादूगर कहते हैं 

गोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं

महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?