एक्झिट पोलचा महाराष्ट्रापुरता साधासरळ अर्थ असा आहे

२० मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


लोकसभा निवडणुकीसाठी आज १९ मेला सातव्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर न्यूज चॅनेलवर एक्झिट पोलचं वादळ आलंय. जवळपास सगळ्याच पोल्सवाल्यांनी फिर एक बार मोदी सरकारचा नारा दिलाय. पण या पोलमधून महाराष्ट्राला इशारा मिळालाय. हा इशारा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस आघाडीने मनावर न घेतल्यास त्यांना त्यांची फळं भोगायला मिळू शकतात.

महाराष्ट्रातला निवडणूक कलही देशासारखाच दिसतो. गेल्यावेळी आठ जागांवर समाधान मानावं लागणाऱ्या काँग्रेस आघाडीला यंदाही म्हणावं तसं यश येताना दिसत नाही. मात्र आतापर्यंत आलेल्या सगळ्याच एक्झिट पोलमधे भाजप आघाडीच्या जागांमधे घट होतेय. भाजप आघाडीच्या सात-आठ जागा कमीत होताना दिसताहेत. त्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थापन करण्यात अडचण येणार नाही.

पण सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागांमधली ही घट भाजपसाठी चिंतेची बाब आहे. कारण यंदा काँग्रेस आघाडीने त्यांचा प्रचार, नियोजनात विस्कळीतपणा असला तरी स्थानिक मुद्द्यांच्या आधारे चांगली फाईट दिलीय. ही गोष्ट भाजपची डोकेदुखी वाढवणारी आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार?

लोकसभेत असा पोल, तर विधानसभेत काय? 

लोकसभेच्या जागांनुसार महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. गेल्यावेळी महाराष्ट्रात ४८ पैकी ४२ जागा भाजप, शिवसेना आघाडीला मिळाल्या होत्या. मोदी लाटेने काँग्रेस, राष्ट्रवादीला चारीमुंड्या चीत केले होते. यात राष्ट्रवादीला चार, तर काँग्रेसला कशाबशा दोन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जे काही गमावण्यासारखं आहे, सारं भाजप आघाडीकडेच आहे.

यंदाच्या पोलमधे काँग्रेस आघाडीच्या जागांमधे वाढ होताना दिसतेय. ही वाढ किरकोळ असली तरी भाजपसाठी धोक्याची आहे. कारण आता भाजपने मोदींच्या नावावर मतदान मागितलं. त्याला चांगला रिस्पॉन्सही मिळाला. काहीवेळा तर लोकांनी आपलं मत मोदींनाच हे सांगण्यासाठी बेरोजगाराच्या मुद्द्याकडेही कानाडोळा करण्याची भूमिका घेतली. पण राज्यातल्या भाजप सरकारकडे स्वतःचा असा कुठला करिश्मा नाही.

सहा महिन्यांआधी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधे तिथल्या भाजप सरकारला लोकांच्या नाराजीचा फटका बसला. राजस्थानमधे तर मोदी तुझसे बैर नही, वसुंधरा तेरी खैर नही असं लोक उघडउघड बोलत होते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून काऊबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तिन्ही राज्यांमधे भाजपची सत्ता गेली. काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न बघणाऱ्या भाजपला बाजूला सारून लोकांनी काँग्रेसला सत्तेवर बसवलं.

हेही वाचाः आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका

फडणवीस सरकारलाही इशारा

देवेंद्र फडणवीस सरकारविरोधातही लोकांमधे नाराजी आहे. आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांतून हे आपल्याला दिसलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न तर सरकारच्या गळ्यात एखाद्या हाडासारखा अडकून बसलाय. दुष्काळही पाचवीला पुजल्यासारखा सरकारच्या नशीबाला येऊन बसलाय. मोदी सरकारलाही फेस कराव्या लागलेल्या दलित आणि मुस्लिम समाजाच्या नाराजीचाही मुद्दा आहे. याकडे लोकसभा निवडणुकीसारखं दुर्लक्ष करून चालणार नाही.

दुसरीकडे कल चाचण्यांमधे वंचित बहुजन आघाडीच्या हाती भोपळाच येतोय. या आघाडीमुळे काँग्रेसचं खूप मोठं नुकसान केल्याचं स्पष्ट दिसतंय. पण लोकसभा निवडणुकीतला करिश्मा जागांमधे परावर्तीत करण्याचं प्रचंड मोठं आव्हान वंचित आघाडीपुढे आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, जागाच मिळणार नसतील तर सरकारविरोधी मत वंचित आघाडीला कशाला द्यायचं हा मुद्दा विधानसभेत महत्त्वाचा ठरणार आहे.

कारण सरकारविरोधी मत देणाऱ्या आपलं मतं कुणाला दिलं पाहिजे, याचा अंदाज या निवडणुकीने आलाय. मतदारांना आलेला हा अंदाज वंचितसाठी अडचणीचा ठरू शकतो.

दुसरीकडे नेटवर्क १८ लोकमतच्या पोलची आकडेवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची झोप उडवणारी आहे. या पोलमधे दोन्ही पक्षांना सहा ते आठ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास दोन्ही पक्षांना विधानसभेसाठी नवी रणनीती ठरवावी लागेल.

हेही वाचाः महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा?

महाराष्ट्रात इतरांना दिलेल्या जागा कोणाच्या? 

आज आलेल्या सगळ्या एक्झिट पोलमधे साम टीवीचा अंदाज भाजपवाल्यांचा झोप उडवणारा आहे. कारण या पोलमधे भाजप आघाडीच्या जागा ४२ वरून थेट २९ वर घसरतोय. १३ जागांचं नुकसान होतंय. याउलट काँग्रेस आघाडी सहावरून १६ वर झेप घेतेय. तसंच इतरांनाही तीन जागा मिळताना दिसताहेत. यात भाजपला १९, शिवसेनाला १०, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी आठ जागा मिळू शकतात.

इतरांना दिलेल्या तीन जागा नेमक्या कुणाच्या हे काही पोलमधे स्पष्ट झालं नाही. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशा तीन विभागांमधे या जागांची विभागणी झालीय. त्यावरून कोकणातली एक जागा नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पार्टीची असावी. उरलेल्या दोन जागांवर कोण विजयी होईल हे स्पष्ट सांगता येत नाही. विदर्भातल्या जागेवर अकोल्यात प्रकाश आंबेडकर किंवा अमरावतीत नवनीत राणांचा नंबर लागू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात सोलापुरात प्रकाश आंबेडकर किंवा सांगलीत गोपीनाथ पडळकर किंवा विशाल पाटील किंवा हातकणंगलेत राजू शेट्टी यांना ती जागा दिलेली असावी.

सामचा पोल २३ तारखेच्या निकालातही प्रत्यक्षात उतरल्यास मात्र भाजपची डोकेदुखी आणखी वाढेल. विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवणं भाजपसाठी खूप कठीण होऊन बसेल. पण सध्या तरी साम टीवीच्या पोलने भाजपवर देव पाण्यात ठेऊन बसण्याची वेळ आणलीय.

हेही वाचाः सगळ्या पक्षांना विस्कळीतपणाचा फटका बसणार

असे आहेत एक्झिट पोलचे महाराष्ट्रासाठीचे कल

इंडिया टुडे

भाजप आघाडी ३८-४२

काँग्रेस आघाडी ६-१०
 
टाईम्स नाऊ वीएमआर

भाजप आघाडी ३८

काँग्रेस आघाडी १०

सुदर्शन न्यूज

भाजप आघाडी ३९

काँग्रेस आघाडी ८ 

रिपब्लिक भारत- जन की बात

भाजप आघाडी ३४-३९

काँग्रेस आघाडी ८-१२

रिपब्लिक सी वोटर

भाजप आघाडी ३४

काँग्रेस आघाडी १४

न्यूज १८-आयपीएसओएस

भाजप : ४२-४५,
काँग्रेस : ४-६

एबीपी नेल्सन

भाजप १७

शिवसेना १७

काँग्रेस ४

राष्ट्रवादी काँग्रेस ९

साम टीवी

भाजप १९

शिवसेना १०

काँग्रेस ०८

राष्ट्रवादी ०८

इतर ०३

हेही वाचाः 

कोण जिंकणार, निवडणूक अंदाज मांडणाऱ्या देशातल्या सगळ्यात विश्वासार्ह संस्थेच्या प्रमुखाचा अंदाज

भाजप २५०+, एनडीए २८०, पंतप्रधानपदी मोदी!