बहुजनांच्या पहिल्या वृत्तपत्राचा वारसा धुळीला

०२ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ९ मिनिटं


ज्यांना मुख्य प्रवाहातल्या मीडियामधे स्थानच नव्हतं अशा कोट्यवधी लोकांना सोशल मीडियाने आवाज दिलाय. तेच काम एकोणिसाव्या शतकात दीनबंधू या वर्तमानपत्राने केलं होतं. तोपर्यंत मराठी वर्तमानपत्रं पांढरपेशी अभिजनांच्याच हातात होती. महात्मा जोतीराव फुलेंच्या प्रेरणेने १ जानेवारी १८७७ला सुरू झालेलं दीनबंधू हे कष्टकरी बहुजनांचं पहिलं नियतकालिक होतं. आज १४२ वर्षांनी त्या बंडखोर पत्राच्या पुण्यातल्या दुर्लक्षित अवशेषांचा घेतलेला शोध. 

वेळ दुपारी तीन वाजताची. रास्ता पेठेत जुन्या गाड्या, त्यांचे स्पेअरपार्ट, हार्डवेअर यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. अपोलो चौकात १६ जणांना दीनबंधू प्रेसचा पत्ता विचारला. त्यातले सगळ्यात जास्त वयाचे एक आजोबा म्हणाले, हे नाव माहीत आहे. तरीही त्या गिचमिडीत दीनबंधू चौक सापडला. त्याच नावाचा वाडाही. त्या वाड्याच्या समोर गाडी दुरुस्तीचं दुकान आहे. तिथेही कोणाला दीनबंधू नावाचं काही इथे असल्याचं माहिती नाही.

आज दीनबंधू हे फक्त एका दुर्लक्षित चौकाचं आणि इमारतीचं नाव आहे. आता दीनबंधू हे साप्ताहिक निघत नाही. त्याला कारण भाऊबंदकी आणि ट्रस्टच्या मालकीवरून झालेला वाद, अशी माहिती ७३ वर्षांचे शरद जयसिंगराव नवले देतात. याच शरदरावांचे आजोबा विठ्ठलराव मारुतराव नवले यांनी १९२७मधे पुण्यात दीनबंधू सुरू केला. महात्मा जोतीराव फुलेंच्या प्रेरणेने सुरू झालेलं हे साप्ताहिक बंद पडू नये, ही कळकळ त्यामागे होती. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ऐंशीच्या दशकापर्यंत हे साप्ताहिक आपल्या परीने सुरू ठेवलं.

दीनबंधू ही क्रांती होती

महात्मा जोतिबा फुले हे क्रांतिकारक विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी भारताच्या विचार करण्याच्या पारंपरिक पद्धतीलाच आव्हान दिलं. बहुजन समाज तेव्हाच्या वैचारिक विश्वाच्या खिजगणतीतच नसायचा. अशावेळेस जोतिबांनी बहुजन समाजाला नवविचारांच्या, समाज आणि धर्मसुधारणांच्या अजेंड्यावर आणून बसवलं. त्यातून अनेक नव्या गोष्टी घडू लागल्या. त्यातलीच एक म्हणजे दीनबंधू. 

जोतिबांनी शूद्रातिशूद्रांसाठी वर्तमानपत्रांच्या गरजेविषयी लिहिलं होतं, `एकंदर सर्व भट वर्तमानपत्रकर्त्यांची आणि शूद्र अतिशुद्रांची जन्मातून एकदासुद्धा अशा कामी गाठ पडत नाही. त्यातून बहुतेक अतिशुद्रांस तर वर्तमानपत्र म्हणजे काय, कोल्हा का कुत्रा का माकड, हे काहीच समजत नाही. तर मग अशा अनोळखी अतिशुद्रांची मते या सर्व सोवळ्या वर्तमानपत्रांस कोठून आणि कशी कळणार?`

जोतिबा सांगताहेत ती परिस्थिती नेमकी कशी होती, हे मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या पुस्तकात रा. के. लेले यांनी नोंदवून ठेवलंय. ते लिहितात, `तोवर वृत्तपत्रं चालवणारे जवळजवळ सर्व लोक पांढरपेशा आणि त्यातही प्रामुख्याने ब्राह्मण वर्गातले होते. पांढरपेशा वर्गापलीकडे जो मोठ्या संख्येने बहुजनसमाज होता, त्यांच्यापर्यंत या पत्रांतील विचार पोहोचू शकत नव्हते… त्याचवेळी बहुजन समाजात महात्मा जोतिबा फुले यांनी आपले कार्य सुरू केले होते. समाजात उद्बोधनाच्या एका नव्या प्रवाहाचा स्रोत वाहू लागला होता. हा प्रवाह खालच्या थरातून उसळून वर आला. त्यातूनच प्रसार आणि प्रचाराचे आधुनिक साधन असणारे वृत्तपत्र आपल्या निराळ्या रंगरूपासह जन्माला आले. बहुजन समाजाच्या चळवळीतून जे वृत्तपत्र जन्माला आले ते म्हणजे दीनबंधु.`

दीनबंधूची वाटचाल पुणे – मुंबई - पुणे 

जोतिबांचे जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी जातवर्चस्वामुळे होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १ जानेवारी १८७७ला पुण्यात दीनबंधूची सुरवात केली. सुरवातीला अवघे १३ वर्गणीदार होते. पण ते तीन वर्षांत ३२० पर्यंत पोचले. ते सत्यशोधक समाजाचं मुखपत्रच बनलं. 

आर्थिक अडचणींमुळे भालेकरांना दीनबंधू चालवणं शक्य झालं नाही, तेव्हा कामगार चळवळीचे भारतातील आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे १८८०मधे मुंबईतून दीनबंधू सुरू ठेवला. कामगार संघटनांचे आद्य प्रवर्तक १८९७ ला त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी ते नेटाने चालवलं. पण नंतर कुणीच पुढे न आल्याने ते बंद पडलं. त्यानंतर भास्करराव जाधव आणि त्यांच्या मित्रांनी मराठा दीनबंधू या नावाने कोल्हापुरात दीनबंधूचा वारसा जागवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 

भालेकर आणि लोखंडे हे दीनबंधूचे दोन्ही पहिले संपादक वैचारिकदृष्ट्या खमके असल्याने त्याच प्रभाव वाढला. १८८४ मधे त्याच्या १६५० प्रती छापल्या जात होत्या. तेव्हा फक्त केसरीचाच खप त्यापेक्षा जास्त होता. ब्राह्मणी वर्तमानपत्रं दीनबंधूवर जोरदार टीका करत. वार्ताहर नावाच्या वर्तमानपत्राच्या १२ जून १८८७च्या पहिल्या अंकात तर लिहिलं होतं, `ब्राह्मणांची निंदा करण्यासाठी दीनबंधूचा अवतार आहे. म्हणून त्या अवताराचा अंमल मोडण्यासाठी वार्ताहराचा अवतार आहे.`

दीनबंधू बंद पडल्याचं शल्य अनेकांना होतं. त्यातल्या वासुदेवराव बिर्जे यांनी बडोद्यातली सरकारी नोकरी सोडून मुंबईत दामोदर सावळाराम यंदे यांच्या मदतीने दीनबंधू पुन्हा सूरू केलं आणि समर्थपणे चालवलं. १९०८ ला त्यांचा प्लेगच्या साथीत मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नी तानूबाई यांनी मोठ्या धड़ाडीने दीनबंधू सुरू ठेवला. त्या भारतातल्या पहिल्या महिला संपादक ठरल्या. त्यांच्या निधनानंतर मात्र मुंबईतला दीनबंधू कायमचा बंद पडला. पण तो पुण्यात सुरू झाला. 

दीनांचा बंधू भाऊबंदकीत बंद 

डॉ. विठ्ठलराव नवले यांनी १९२७मधे दीनबंधू पुण्यात नव्याने सुरू केला. रा. के. लेले त्याविषयी लिहितात, `पुन्हा पुण्याला परतल्यावर दीनबंधूची कामगिरी कोणत्याही दृष्टीने उज्ज्वल ठरली नाही. परंतु पत्र कायम चालू राहण्याच्या दृष्टीने डॉ. नवले यांनी उत्तम व्यवस्था करून ठेवली आहे. दीनबंधू साप्ताहिक, मुद्रणालय आणि इमारत आदींचा सार्वजनिक ट्रस्ट त्यांनी करून ठेवला आहे. त्यामुळे शताब्दी साजरी करण्याचे भाग्य पत्राला लाभले. पण आता त्याच जराही प्रभाव उरलेला नाही.`

नवले कुटुंबाच्या दोन पिढ्या दीनबंधू साप्ताहिकाच्या कामात सक्रिय होत्या. पण गेल्या चाळीस वर्षांपासून दीनबंधू बंद आहे. कौटुंबिक वाद हे यामागे महत्त्वाचं कारण आहे. तसेच चुलत भावंडांमध्ये ट्रस्टच्या जागेच्या हक्कांसाठी तसंच दीनबंधू टायटलच्या कॉपीराईटवरून कुरघोड्या सुरू आहेत. विठ्ठलराव नवले यांचे नातू शरद जयसिंगराव नवले सध्या ट्रस्टची वास्तू असलेल्या जुन्या वाड्यात राहतात. रस्त्याच्या समोर  त्यांचे चुलत भाऊ विजय प्रतापराव नवले पत्नी निलीमा यांच्यासह राहतात. 

अमेरिकेतून आणलेलं छपाई यंत्र उघड्यावर 

विठ्ठलरावांनंतर त्यांचा मुलगा प्रतापराव विठ्ठलराव नवले यांनी संपादकीय जबाबदारी स्वीकारली. प्रतापराव संपादकपदाबरोबरच मुद्रक, प्रकाशक अशा दुहेरी जबाबदारी पाहत होते. त्यामुळे त्यांनी संपादकपदाची जबाबदारी भाऊ जयसिंगराव यांच्यावर सोपवली. हे दोघेही गेल्यावर त्यांच्या मुलांमध्ये पुढील जबाबदाऱ्यांचं लिखित वाटप झालेलं नसल्यामुळे झालेले वाद अजूनही कोर्टात आहे. दीनबंधू चालवणारी ट्रस्ट पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे की खाजगी हक्क ट्रस्ट आहे, यावरून दोन्ही भावंडांमधे हेवेदावे आहेत. हेच या समस्येचं मूळ आहे. 

दीनबंधू साप्ताहिक हे ‘दीनबंधू संस्था, ४४४ रास्ता पेठ, पुणें सिटी’ या त्या काळात नोंदणीकृत पत्त्यावर असलेल्या छापखान्यातून प्रसिद्ध होत असे. या छापखान्याचा एक वेगळा इतिहास आहे. छापखान्याची यंत्रसामुग्री वाड्याच्या मोकळ्या जागेत ताडपत्रीने झाकून ठेवलीय. ती शहाबादी फरशीवर चाळीसहून अधिक वर्षं धूळ, वारा, पाऊस सहन करत तग धरून आहे. ही यंत्रसामुग्री सध्या गंजलेल्या अवस्थेत आहे. त्यातलं मुख्य छपाई यंत्र अमेरिकेतून रास्ता पेठेत आलीय.

इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूह दर पाच वर्षांनी नवी यंत्रसामग्री खरेदी करत असे. त्यांनी अमेरिकेतल्या ओहियो शहरातून छपाई यंत्र मागवलं होतं. दीनबंधू सुरू करण्यासाठी विठ्ठलरावांनी ते सेकंड हँड विकत घेतलं. त्याच्याशिवाय प्रूफरिडिंगच्या दोन मशीनही होत्या, अशी माहिती शरद नवले यांनी दिली. त्या दोन मशीन आता मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्यात. अमेरिकेहून आलेल्या यंत्राचीही दुर्दशा झालीय. भंगार गोळा करणाऱ्यांनी उघड्यावर पडलेल्या छापखान्याचे खिळे आणि इतर सुटे भाग चोरून नेलेत.  

या वाड्यात मुख्य रस्त्याला लागून असणाऱ्या खोलीत जुन्या अंकांचे गठ्ठे पडून होते. त्याला काही वर्षांपूर्वी अचानक आग लागली. फायर ब्रिगेड येईपर्यंत दहा मिनिटातच खोलीतल्या अनेक गोष्टी जळून गेल्या. त्याचे काही अवशेष बाकी आहेत. आता चोरी होऊ नये म्हणून खोलीचे दरवाजे प्लायवूड लावून बंद करण्यात आलेत.

ऐतिहासिक वारशाचं काय होणार? 

दीनबंधूचा इतिहास फार मोठा आहे. त्याचा वैचारिक वारसा महत्त्वाचा आहे. आज भाऊबंदकीमधे तो वारसा उघड्यावर पडलाय. नवले कुटुंबानेच दीनबंधू दीर्घकाळ चालवलं. पण आज त्यांच्यातल्या भांडणामुळे दीनबंधू बंद आहे. तारखांवर तारखा पडत असल्याने त्याच्या पुनरुज्जीवनाच्या शक्यताही दिसत नाही. वाड्याच्या दाराआड शरद आणि मीनाक्षी नवले हे वयस्कर नवराबायको एकमेकांना आधार देत राहत आहेत. समोर विजय आणि नीलिमा हे चुलत भावाचं कुटुंब आहे. नीलिमा यांना दीनबंधू पुन्हा सुरू करून त्याचं संपादक बनण्याची इच्छा आहे. पण ते शरदरावांना पटत नाही. 

पुण्यात ठिकठिकाणी ठिकाणांचं ऐतिहासिक महत्त्व सांगणारे नीलफलक आहेत. पण असा एखादा नीलफलक दीनबंधूच्या इमारतीजवळ लावावा, असं कुणाला आजवर वाटलेलं नाही. दीनदलितांना स्वतःचा आवाज मिळवून देणारं हे वृत्तपत्र ४० वर्षं बंद आहे. कोणत्याही संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांना त्याकडे लक्ष द्यायला सवड नाही. दीनबंधूच्या कार्याचं हवं तसं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, बिर्जे पतीपत्नी यांच्या निमित्ताने दीनबंधूवर लिहिलं गेलंय तेवढंच. 

महात्मा फुलेंचा वैचारिक वारसा फक्त भाषणात नामोल्लेखा पुरता धुसर वापरला तरी टाळ्या मिळतातच. सोशल मीडियावर लाईक्स मिळतात. दीनबंधूचा वारसा पुढे नेणाऱ्या नवले कुटुंबातले दोन वयस्कर वारसदार तसेच निघून गेले काय आणि इच्छा असणाऱ्यांना तो अंक चालवण्याची संधी न मिळता सगळा वारसा गंजून संपला काय? किंवा भंगार म्हणून विकला गेला काय? आपल्या कुणाचं काहीच नुकसान होणार नाही. आपल्याला आपल्या वारशाची किंमत आहेच कुठे?

नवले कुटुंबातील तीन पिढ्यांची कहाणी ऐकली. तसंच त्या संदर्भात महात्मा फुले यांचे विचार वैभवाचे मोल न जाणाऱ्यांची सद्यस्थिती बघितली. की खरोखर नियतकालिकाच्या नावाला सार्थ ठरण्यासाठीच दीनबंधूची सुरुवात झाली होती बहुदा, एवढीच खंत व्यक्त करावी वाटते.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)