जेएनयूमधल्या विद्यार्थांवर हल्ला झाला. त्याच्या निषेध सभेसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोन जेएनयूमधे गेली होती. तिथे ती काहीच बोलली नाही. फक्त आपली हजेरी लावली. तरीही काही लोकांनी लगेचच तिच्या छपाक सिनेमातून चुकीचा मेसेज देण्यात येत असल्याची अफवा पसरवणं सुरू केलं. आणि ‘छपाक’ बघणं देशद्रोही झालं. दीपिकाच्या प्रकरणात आपल्या सहिष्णुतेचे 'तुकडे तुकडे' झालेत.
दीपिकाने असं काय घोडं मारलंय? जेएनयूमधे जाणं राष्ट्रविरोधी आहे? ही तुकडे तुकडे गँग आहे तरी कोण? आता छपाक पाहिला तर आपणसुद्धा देशद्रोही ठरू? तुम्ही #बॉयकॉटछपाक हा हॅशटॅग फेसबूक किंवा गुगलवर सर्च कराल तेव्हा हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडू शकतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करु यात.
दीपिका जेएनयूमधे गेली. जेएनयू म्हणजे दिल्लीतलं नामांकित जवाहरलाल नेहरु विद्यापीठ. इथं रविवारी ५ जानेवारीला रात्री काही गुंड शिरले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेशी घोष हिलासुद्धा रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. बाकी काही विद्यार्थ्यांना धर्म, विचारसरणी आणि प्रांत याबद्दल विचारणा करुन मारल्याचंही इथली मुलं सांगतात.
जेएनयूमधल्या विद्यार्थी संघटनेवर सध्या डाव्या विचाराच्या संघटनांची सत्ता आहे. आयेशी घोष या डाव्या विचारांच्या आहेत. त्यांनी या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हात असल्याचा आरोप केलाय. याच घटनेविरोधात देशभरातले विद्यार्थी आणि संवेदनशील नागरिक आंदोलन करतायत. दिल्लीच नाही तर मुंबई, पुणे, बंगळुरु, कोलकाता अशा सगळ्या प्रमुख शहरांत हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे, अर्थातच जेएनयू.
याच जेएनयूमधे अभिनेत्री दीपिका पदुकोण पोचली. मंगळवारी संध्याकाळी दीपिका इथं आली. तेव्हापासून तिला ट्रोल केलं जातंय. दीपिकाने जिथे हजेरी लावली ती निषेध सभा विद्यापीठातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संघटनेने आयोजित केली होती. अर्धा तास ती या सभेला थांबली. एकही शब्द बोलली नाही. घोषणा दिली नाही की निषेधाचा साधा फलकही झळकावला नाही. पण यानंतरच पुढे रान पेटलं.
फक्त जेएनयूमधे जाण्याने एवढा गोंधळ का व्हावा? जेएनयूमधे जाणं देशविरोधी आहे का असा प्रश्न आता पडू लागलाय. बाकीची नावं सोडा, पण देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः जेएनयूमधे शिकल्यात. आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही जेएनयूवाले आहेत. मग अशा विद्यापीठात जाणं देशविरोधी असू शकेल का?
हेही वाचा : आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती
जेएनयूने अनेकदा सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून आपल्या पाठीवर शाबासकी मारुन घेतलीय. तरीही त्याकडे देशविरोधी कारवायांचा अड्डा म्हणून का पाहिलं जातं? आणि इथं येणाऱ्या दीपिकासारखा मोठ्या सेलिब्रेटींनाही देशद्रोही असल्याची लेबलं कोण लावतं? याचा आपण विचार करायला हवा.
राहता राहिला प्रश्न डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहण्याचा, तर न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला माणूस, अन्यायाविरोधात दाद मागणाऱ्या माणसाला आपण कुठल्यातरी विचारसरणीमधे कसं काय विभागू शकतो? पण आपल्याला हे प्रश्न पडणंच बंद झालेत आणि म्हणूनच जेएनयूत गेला म्हणजे देशद्रोही झाला, हे म्हणायला आपण मोकळे झालोय. पण याला एका घटनेची पार्श्वभूमी आहे. जी पुढच्या प्रश्नाच्या उत्तरातून कदाचित स्पष्ट होऊ शकेल.
तर ही तुकडे तुकडे गँग आहे तरी कोण? आणि दीपिका तुकडे तुकडे गँगमधे कशासाठी गेलीय? गेल्या काही वर्षांपासून डाव्या संघटनांचा उल्लेख बऱ्याचदा हा शब्द वापरून केला जातो. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही काही दिवसांपूर्वीच सरकारला विरोध करणाऱ्या लोकांचा 'तुकडे तुकडे गँग' असा उल्लेख केला होता. 'तुकडे तुकडे गँग देशात अशांतता परवतेय', असं शहा म्हणाले होते.
याच्या मुळाशी २०१६ मधे झालेली एक सभा आहे. या सभेत जेएनयूमधे कथित देशविरोधी नारे दिल्याचा आरोप झाला. ज्या नाऱ्यांमधे तुकडे तुकडे हा शब्द होता. प्रकरण कोर्टात गेलं. मात्र पोलिसांना अजून हा आरोप सिद्ध करता आला नाही. आता जी गँगच अस्तित्वात नाही, त्यात दीपिकाला एंट्री तरी कशी मिळणार. बरं ती डाव्या संघटनेत गेली का? तर तिने तसं काही जाहीरही केलेलं नाही. आणि केलंच, तरी बिघडलं कुठे? आपली विचारसरणी निवडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच की. आपल्या आवडत्या अभिनेत्रीने आपल्याच आवडीची विचारसरणी निवडावी, असं थोडीच आहे.
आता महत्त्वाच्या प्रश्नावर येऊ. छपाक पाहिला तर आपण देशद्रोही ठरू का? हा प्रश्नच मुळात बावळटपणाचा आहे, असं म्हणावं लागेल. पण सध्या वातावरणच तसं झालंय. ते मुद्दाम तसं केलं गेलंय. याच्या मागे कुणाचं आयटी सेल आहे, हे वेगळं सांगायला नको. पण जे सुरु आहे, ते भीषण आहे. सोशल मीडियावर वायरल होणारी ही पोस्टर्स पाहा.
कुणी तिला देशद्रोही म्हणतंय तर कुणी तुकडे-तुकडे गँगची सदस्य. ‘छपाक’सारख्या महिला सबलीकरणावर बेतलेल्या सिनेमाची नायिका. एक महाभाग तर, पॉर्न स्टार जॉनी सिन्सचा फोटो वापरुन तिला ट्रोल करतायत. आपण माणूस म्हणून अजून किती खाली जाणार आहोत, कुणास ठाऊक!
या चर्चेत धर्म आला नसता, तरच नवल. छपाक हा सिनेमा लक्ष्मी अगरवाल या एसिड हल्ला झालेल्या तरूणीच्या जीवनावर आधारित आहे. लक्ष्मीच्या चेहऱ्यावर एसिड फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं नईम खान. म्हणजे मुस्लिम. पण सिनेमात हे नाव बदलून राजेश केलंय, असा प्रचार दीपिका जेएनयूत जाऊन आल्यानंतर सुरू झाला. ‘छपाक’मधे चुकीची माहिती देऊन समाजाची दिशाभूल केली जातेय, असाही आरोप केला जातोय.
हेही वाचा : एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था?
दीपिका ही सिनेमातली हिरोईन नसून लेखिकाच आहे असं काही लोकांना वाटत असावं. नाना आरोप करत, तिच्या सिनेमाला जाऊ नका, असं आवाहनही काहींनी केलंय. पण हा आरोप बिनबुडाचा आहे हे लवकरच जगासमोर आलं. ज्यांनी सिनेमा पाहिलाय त्यांनीच सांगितलंय की एसिड फेकणाऱ्या व्यक्तीचं नाव बदलंय. पण धर्म वगैरे काही बदलेला नाही. राजेश नाही तर दुसरं मुस्लिम नाव सिनेमात वापरण्यात आलंय.
हे पाहिल्यावर आपण नेमका कशावर विश्वास ठेवतो. याचा आपापल्या पातळीवर प्रत्येकाने विचार करावा. यातूनही आपल्याला शहाणपण येईल की नाही याबद्दल शंकाच आहे. कारण आपण तर अव्वल राष्ट्रभक्त आहोत. आणि दीपिका तर अँटी नॅशनल वगैरे आहे. त्यामुळे छपाक बघितलात तर तुम्ही काहींच्या नजरेत देशद्रोही ठराल.
बाकीच्यांच्या नजरेत आपण काय आहोत याचा विचार करण्यात आपण तसंही आपला फार वेळ घालवत असतो. निदान याबाबतीत तरी बाकींच्यापेक्षा स्वतःच्याच नजरेत आपण कोण आहोत? याचा विचार करुन सिनेमाची तिकिटं काढूया आणि सिनेमा नक्की बघूया.
दीपिका प्रकरणाच्या निमित्ताने आपण देशातल्या सावळ्या गोंधळाचं गांभीर्य समजून घ्यायला हवंय. दीपिकासारखी एक आघाडीची अभिनेत्री एका घटनेचा निषेध करते. आणि तिच्यावर लोक तुटून पडतात. तिची बदनामी करतात. तिचा सिनेमा पाहू नका, असं आवाहन करत, खोटी माहिती पसरवतात. हे किती बरोबर आहे किंवा चूक? याची उत्तरं आपली आपणच शोधली पाहिजेत.
इथे फक्त दीपिका नाही. सोनम कपूर आहे, तापसी पन्नू आहे, स्वरा भास्कर, राजकुमार राव, फरहान अरख्तर आणि किमान शंभर तरी आघाडीचे कलाकार आहेत. ते काहीएक भूमिका घेतायत. भूमिका मांडतायत. केवळ पडद्यावर भूमिका साकारत नाहीत. जेव्हा आपण आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून फेसबूक वॉट्सअपवर वर्च्युअल निषेध नोंदवतोय, अगदी त्याच काळात ते रस्त्यावर उतरलेत.
दीपिका, जेएनयू आणि तुकडे तुकडे यामुळे छपाकचे किंवा त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे तुकडे-तुकडे झालेले नाहीत. हे तुकडे तुकडे आपल्यातल्या सहिष्णूतेचे झालेत. आपण शाळेत शिकलेल्या काही मुल्यांचे झालेत. राहता राहिला प्रश्न देशद्रोही ठरण्याचा, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. कुठल्याही धर्म अथवा अस्मितेच्याऐवजी देशाच्या संविधानाच्या बाजूने आपण उभं राहिलो आणि म्हणून कुणी आपल्याला देशद्रोही म्हणालं, तर विश्वास ठेवा तुमच्यासारखा देशप्रेमी दुसरा कुणीच नाही.
दीपिकाच्या अर्ध्या तासांच्या शांततेतही 'जय हिंद' आणि 'भारत माता की जय' आहे. फक्त हे ऐकण्यासाठी तुम्ही डावा कान वापरताय की उजवा. यावर ऐकू येणं न येणं अवलंबून आहे.
हेही वाचा :
आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे
घरी येणाऱ्या भाजपवाल्यांना नागरिकत्व कायद्याबद्दल हे २० प्रश्न विचारुया
पाकिस्तानी सत्तेला ‘हम देखेंगे’ म्हणणारं गाणं हिंदूविरोधी का ठरवलं जातंय?
(लेखक हे तरुण टीवी जर्नलिस्ट आहेत.)