दिल्लीत जिंकण्यासाठीच नाही तर दुसऱ्या नंबरसाठीही लढाई

१२ मे २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


दिल्लीत यंदाही तिरंगी लढत होतेय. भाजपपुढे सगळ्या सात जागा राखण्याचं तर आप आणि काँग्रेसपुढे दुसऱ्या क्रमांकासोबतच जागा जिंकण्याचं आव्हान आहे. आपापलं आव्हान कायम ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांनी प्रचारात कुठलीही कसर सोडली नाही. या प्रचारात भाजप आणि आपमधे आरोप प्रत्यारोपही झाले.

दिल्लीच्या सर्व सात जागांवर रविवारी १२ मेला मतदान होतंय. गेल्यावेळी सगळ्या जागांवर भाजपचा उमेदवार लाखाच्या मताधिक्याने जिंकून आला. पहिल्याच निवडणुकीत दुसरा क्रमांक पटकावत आम आदमी पार्टीने सगळ्यांना तोंडात बोटं घालायला लावलं, तर काँग्रेस पहिल्यावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली.

भाजपला सातही मतदारसंघात ४६.४० टक्के, तर आपला ३२.९० टक्के आणि काँग्रेसला केवळ १५.९५ टक्के मतं मिळाली. आप आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज ही ४८.०५ टक्के होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी नको म्हणून आप आणि काँग्रेसकडून आघाडीचे प्रयत्न झाले. पण ही बोलणी काही यशस्वी झाली नाही. त्यामुळे दिल्लीत यंदाही तिरंगी लढत होतेय.

हेही वाचाः भोपाळमधे लागणार सॉफ्ट हिंदुत्व विरुद्ध हार्ड हिंदुत्वाचा निकाल

यंदाच्या लढतीचं वैशिष्ट्य

यंदाची लढत मात्र काही गेल्यावेळसारखी नाही. काँग्रेसने यंदा आपल्या मातब्बर, अनुभवी चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. दुसरीकडे आपने गेल्यावेळच्या एकालाही उमेदवारी दिली नाही. सगळीकडे नवे, उच्चशिक्षीत उमेदवार दिलेत. सत्ताधारी भाजपने दोन जणांचं तिकीट कापून स्टार चेहऱ्यांना तिकीट दिलंय. यात क्रिकेटर गौतम गंभीर आणि गायक हंसराज हंस यांना संधी मिळाली.

पण मधल्या काळात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रभाव वाढताना दिसला. राजौरी गार्डन विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्या उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त झालं. भाजपचा उमेदवार जिंकला, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेसला चांगली मतं मिळाली. या जोरावरच काँग्रेसने आघाडी करून काही जागा सहज जिंकता येत असताना वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी काँग्रेसने मातब्बर, अनुभवी चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

दिल्लीतल्या सात मतदारसंघात एकूण एक कोटी ४१ लाख मतदार आहेत. यामधे ३० ते ३९ वयोगटातल्या मतदारांची संख्या तब्बल ४२ लाख आहे. सात जागांसाठी १६४ उमेदवार रिंगणात आहेत. यात आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरलाय.

हेही वाचाः महाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत

उत्तर पूर्व दिल्ली

उत्तर पूर्व दिल्लीमधे सगळ्यात प्रतिष्ठेची लढत होतेय. इथे भाजप प्रदेशाध्यक्ष, गायक, विद्यमान खासदार मनोज तिवारी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. आपचे दिलीप पांडे हे इथली लढत तिरंगी बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. उत्तर प्रदेश, बिहारी लोकांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात तिन्ही उमेदवार आपलं पूर्वांचली कार्ड खेळताहेत.

तिवारी हे मोदींच्या नावाने मतं मागताहेत. तर १५ वर्ष सीएम राहिलेल्या शीला दीक्षित आपण केलेली कामं सांगताहेत. दीक्षित यांच्या कारकिर्दीतच दिल्लीचा चेहरामोहरा बदलला. सर्वसामान्यांमधे त्यांची चांगली इमेज आहे. सातही मतदारसंघात काँग्रेस हीच कामं आपल्या प्रचारात पुढे करताना दिसतेय. आपचे दिलीप पांडे हे पक्षाचा मीडियातला चेहरा म्हणून ओळखले जातात. ते केजरीवाल सरकारने केलेली कामं सांगताहेत.

चांदणी चौक

इथे भाजपकडून केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, काँग्रेसतर्फे जेपी अग्रवाल आणि आपने पंकज गुप्ता यांना उमेदवारी दिलीय. हा व्यापारी बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे विरोधी उमेदवार जीएसटी, नोटाबंदी आणि सीलिंगचा मुद्दा लावून धरण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे भाजपकडून मोदींच्या नावाचा वापर केला जातोय. आपकडून दिल्ली सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतं मागितली जाताहेत. व्यापाऱ्यांमधे चांगली उठबस असलेले काँग्रेसचे अग्रवाल आपले जुने संबंध आणि मुस्लीम समुदायाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताहेत. यात भाजप आणि काँग्रेसमधेच लढत होईल, असं दिसतंय.

पूर्व दिल्ली

सगळ्यात चुरशीची लढत पूर्व दिल्लीत होताना दिसतेय. इथे भाजपने विद्यमान खासदाराचं तिकीट कापून क्रिकेटर गौतम गंभीरला तिकीट दिलंय. आपने आतिशी यांना तर काँग्रेसने अरविंदर सिंह लवली यांना उमेदवारी दिलीय. यात गंभीर आणि आतिशी यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही. मात्र आतिशी यांनी दिल्ली सरकारसाठी शाळा उभारणीमधे महत्त्वाचं योगदान दिलंय. गंभीरच्या स्टार चेहऱ्यामुळे इथली लढत रंगतदार झालीय. पण सुरवातीपासून गंभीर वेगवेगळ्या वादात अडकला. त्याचा त्याला फटका बसू शकतो.

दक्षिण दिल्ली

दक्षिण दिल्लीत भाजपकडून विद्यमान खासदार रमेश बिधुडी, काँग्रेसकडून बॉक्सर विजेंदर सिंह तर आपकडून राघव चड्डा मैदानात आहेत. जाट आणि गुर्जर तसंच पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांची संख्या इथे मोठी आहे. जाट आणि गुर्जर समाजाला आपल्याकडे वळवण्याच्या हिशोबाने काँग्रेसने विजेंदर सिंहला तिकीट दिलंय. प्रचारात मागं राहिलेल्या विजेंदरकडे हे मतदार किती वळतील हे अजून गुलदस्त्यातच आहे. 

हेही वाचाः मतदानात शहरी लोक का मागे राहतात?

नवी दिल्ली 

नवी दिल्ली ही एक प्रकारे सरकारी सीट आहे. इथे मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरदारवर्ग आहे. भाजपने शेवटच्या क्षणी उमेदवारी कायम ठेवत मीनाक्षी लेखी यांना तिकीट दिलंय. काँग्रेसने २००९ मधे इथून खासदार राहिलेल्या अजय माकन यांना तर आपने ब्रजेश गोयल यांना उमेदवार केलंय. या मतदारसंघात शीख समाजाची संख्या खूप मोठी आहे. यात लेखी आणि माकन यांच्यात लढत होईल.

उत्तर पश्चिम दिल्ली

अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातल उमेदवार जाहीर करायला भाजपला खूप वेळ लागला. खासदार उदित राज यांचं तिकीट कापून गायक हंसराज हंस यांना तिकीट दिलं. त्यामुळे नाराज उदित राज हे काँग्रेसमधे गेले. इथे काँग्रेसने राजेश लिलोठिया, तर आपने गुग्गन सिंह यांना मैदानात उतरवलंय. उदित राज यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसू शकतो.

पश्चिम दिल्ली

या मतदारसंघात युपी, बिहारी मतदारांचा प्रभाव आहे. भाजपकडून विद्यमान खासदार प्रवेश साहेब सिंह, काँग्रेसकडून माजी खासदार महाबल मिश्र तर आपने बलबीर सिंह जाखड यांना तिकीट दिलंय. इथे भाजप आणि काँग्रेस यांच्यातच लढतीची शक्यता आहे. यात वडील साहेबसिंह वर्मा यांचा प्रभाव प्रवेश यांच्या पाठिशी आहे, तर महाबल मिश्र यांचा पूर्वांचली मतदारांमधे चांगला प्रभाव आहे.

हेही वाचाः महाराष्ट्रातल्या ४८ जागांवर कोण जिंकणार, कोण हरणार?