नव्या नवरीच्या भावनांचं गाणं ऐकून बिहार का बिथरलाय?

२५ सप्टेंबर २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


बिहारमधे एका भोजपुरी गाण्यावरून अक्षरशः घमासान सुरु आहे. एका नवविवाहितेच्या भावनांचं ते प्रकटन असल्याचं गाण्याचे गीतकार सांगतात. पण अख्खं भोजपुरी मनोरंजनविश्वच या गाण्यामुळे दोन गटात विभागलं गेलंय हे तिथल्या मीडियात जाणवतं. या गाण्याच्या निमित्ताने, समाजाच्या दांभिकतेवर नेमकेपणानं बोट ठेवणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट.

‘देवरा ढोढी चटना बा’ हे नवं भोजपुरी गाणं यूट्यूबवर अक्षरशः धुमाकूळ घालतंय. देवर म्हणजे दीर तर ढोढी म्हणजे नाभी, बेंबी. आपला नवरा आपल्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्या अनावर भावनांना आवर कसा घालायचा हे पत्नीला समजत नाही. तिला वाटतं की पती केवळ पैसे कमवण्याच्या फंदात अडकलाय आणि तिची खरी संपत्ती अशीच वाया जाईल.

तिचा दीर तिच्यावर लट्टू झालाय आणि तिला रिझवण्याच्या नादात तो लगट करू लागलाय. तिच्या नाभीला, तिच्या ओठांना आता त्याची हूल पडलीय अशा अर्थाचे ते गाणं आहे. बिहारमधल्या रूढीवादी आणि कर्मठ मंडळींनीही अक्षरशः बोटं मोडली असली तरी त्यांच्या नाराजीला भीक न घालता हे गाणं तुफान धुमाकूळ घातंतेय. एखाद्या मराठी सिनेमाच्या व्ह्यू काऊंटपेक्षा या गाण्याचा व्ह्यू काऊंट मोठा आहे.

सपना चौधरीची लोकप्रियता

याआधीही एका हरयाणवी गाण्यात अशा अर्थाचे बोल आले होते आणि त्याने इतका धुडगूस घातला होता की ते गाणं सादर करणाऱ्या सपना चौधरीला थेट बिग बॉसची दारं उघडली गेली होती. ‘तेरी लत लग जायेगी तडपाया न करो’ हे ते गाणं होतं. आपला पती बाहेरगावी गेल्यावर दिराचं सारखं सारखं घरी येणं तिला व्यसन जडल्यासारखं वाटू लागतं.

वहिनी आणि दीर यांच्या नटखट प्रेमाचं हे गाणं रिल्सवर इतकं फेमस झालं की पोर्तुगालसह अरब देशात आणि आफ्रिकेत अफाट गाजलं! पण रुढीप्रिय हरियाणवी लोकांनी या गाण्याविषयी इतकी नाराजी दर्शवली की, सपना चौधरीचे शो काही दिवस बंद पडले. पण काही दिवसांनी या गाण्याची लोकप्रियता इतकी वाढली की विरोध धूसर होत गेला.

हेही वाचा: जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा

वादाला चढला जातीय रंग

बिहारमधल्या वादालाही आता आपल्या देशाच्या थोर परंपरेला अनुसरून जातीय रंग अगदी रसरसून चढलाय. ‘देवरा ढोढी...’चे गायक चंदन चंचल हे निषाद समाजाचे आहेत जो की अतिमागास जातवर्ग आहे. त्यांना विरोध करणारे पवनसिंग, रितेश पांडे हे सगळे उच्चवर्णीय आहेत.

या वादात तटस्थ राहिलेले खेसारीलाल यादव हे यादव समाजाचे आहेत. पण जे विरोध करतायत त्यांनी याहून वाईट आणि अश्लील, द्विअर्थी गाणी गायलीत! गायक चंदन चंचल आणि गीतकार आर्यन यांना दमदाटीपासून ते धमक्या देण्यापर्यंत सारं होऊन गेलंय.

बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधला सामान्य माणूसही या गाण्यामुळे काहीसा विभागला गेलाय. काहींना वाटतं की हे दीर वहिनीच्या नात्याची माती करणारं गाणं आहे. त्यामुळे या गाण्याविषयी काय भूमिका घ्यायची यावरून वादंग माजलंय. 

महिला काय म्हणतात?

या निमित्ताने काही वेब पोर्टलनी, काही युट्युबरनी हिंदी पट्ट्यातल्या महिलांची मतं जाणून घेतली तर त्यांच्यातल्या विशीपंचविशीमधल्या महिलांनी या गीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप आणि नितळ असावा असं मत नोंदवलंय. महिलेलाही मन असतं. तिच्याही देहभावना असतात, असं अगदी खुलेपणाने या नव्या मुलींनी सांगितलंय. तर चाळीशीपार टप्प्यातल्या महिलांनी या गाण्याविषयी तीव्र नाराजी दर्शवली.

विशेष गोष्ट म्हणजे पंचवीस ते चाळीस या वयोगटातल्या महिला तटस्थ किंवा गोंधळलेल्या आढळल्या असा निष्कर्ष त्या पाहणीत होता. माझ्या मते त्यांनी मत मुद्दामच नोंदवलं नसावं कारण आता कुठे त्यांचा संसार सुरु झाला असेल. आपल्या पतीची किंवा सासरच्या कुठल्याही माणसाची नाराजी त्यांना पेलवणारी नसावी नाहीतर त्यांनी काही तरी मत नोंदवलं असतं.

डान्सबारचा काळ संपल्यानंतर ज्या मुली ऑर्केस्ट्राबार आणि ओपन ऑर्केस्ट्रामधे चेपल्या गेल्या, त्यांना भोजपुरी गाण्यांनी क्रेझ मिळवून दिली. समाजाने नाकारलं, घरच्यांनी दारं बंद केली पण या मनोरंजन विश्वाने त्यांना बरबाद होण्यापासून वाचवलं.

अलीकडच्या दशकात आपल्या महाराष्ट्रातही वरातीत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत ज्या मुली नाचवल्या जातात, त्या बहुसंख्येने याच पट्ट्यातल्या आहेत. त्यांना जर या गाण्यांविषयी विचारलं तर त्या भरभरून हसतात आणि त्यांचे डोळे पाणावतात!

हेही वाचा: ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

समाजमाध्यमांचा सहभाग

‘लल्लन टॉप’सारखं वेब पोर्टल यावर विशेष कार्यक्रम घेऊन लोकांना बोलतं करतं. आपल्याकडे अशा चर्चा ना वृत्त वाहिन्यांवर होतात ना कुठल्या वेब पोर्टलवर होतात! संस्कृतीचं सुकून गेलेलं रताळं आकसून जाईल अशी भीती वाटत असावी. काही विषय निषिद्ध मानताना नकळत आपण आपल्या सीमा खुज्या करत असतो हेच आपल्याला कळत नाहीये!

खरं तर, अशा गीतांमधूनच स्त्रियांच्या मनाचा आणि बदलत्या स्त्रीभावनांचा कानोसा मिळतो. देशाच्या चारही दिशांकडच्या राज्यातल्या स्त्रियांच्या शृंगारविषयक कल्पनेत खूप फरक आहे आणि देहभावनांपासून ते पतीशिवाय इतर पुरुषांकडे पाहण्याचा दृष्टीकोनही मोठ्या प्रमाणात भिन्न आढळतो. याचा अभ्यास करणाऱ्या एका गटात हा विषय नेहमीच चर्चिला जातो. तिथेही या गाण्यावरून गट पडलेत.

दशकापूर्वी देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या महिलांच्या देहिक जाणिवांचा आढावा घेणारं एक सर्वेक्षण नेल्सनच्या माध्यमातून घेतलं होतं. तेव्हाही हा फरक समोर आला होता. देश एक असला तरी या महिलांचं व्यक्त होणं एकसमान नाही. त्या त्या भागातले सणवार आणि सामाजिक बंधनांचा मोठा प्रभाव तिथल्या महिलांवर पडलाय.

त्यामुळे राज्य बदलून दुसऱ्या राज्यात गेलं की तिथलं वेगळं स्त्रीजीवन लगेच लक्षात येतं. तिथं काही काळ रेंगाळलं की मग लक्षात येतं की इथलं पाणीच वेगळं आहे! भोजपुरी भाषेला एक गोडवा आहे, एक अतिव लाघवी लय या भाषेला आहे आणि तीच लय तिथल्या महिलांमधे ठसठशीत आढळते! 

मराठी प्रेक्षकांची अभिरुची

दक्षिणेकडच्या सिनेमांनी स्वतःची ओळख बनवलीय याला आता कुणीच असहमत असणार नाही पण आता भोजपुरी सिनेमाही आपल्या पावलांवर ठाम उभा आहे. त्याला स्वतःचा प्रेक्षकवर्ग आहे. त्याला कमालीची भडक म्हणजे काही अंशी सेमीपॉर्न, अतिरंजकता आणि मेलोड्रामाकडे झुकणारी लय आहे आणि मुख्य म्हणजे त्याने तिथल्या प्रेक्षकांची नाडी ओळखली आहे. हरियाणवी, पंजाबी, भोजपुरी सिनेसृष्टीला जे कळतंय ते मराठी सिनेमाला समजत नाही, हे नवलच आहे!

अक्षरशः झोपडपट्टीतून आलेली अनेक मंडळी त्या सिनेसृष्टीत दिसतात. समाजातले अगदी विखारी आणि नकोसे झालेले विषयही तिथल्या सिनेमांना चालतात. उच्च अभिरुची आणि उच्च अभिव्यक्ती या गोंडस शब्दांनी आपल्या कथित संस्कृतीला इतकं ग्रासलंय की नाक मुरडणं ही फॅशन होऊन गेलीय. एका विशिष्ट प्रेक्षकवर्गाला आवडतील असे सिनेमे ठराविक कंपूकडून सादर होतात. तेच नट त्याच नट्या, तेच चोथा झालेले आशय-विषय, तेच गीतकार आणि तेच संगीत!

ठाणे, पुणे, डोंबिवली, मुंबईपलीकडेही मराठी माणूस राहतो याचा मराठी सिनेमा आणि वाहिन्यांनाही विसर पडलाय असंच वाटतंय. आपल्याकडे लोकांना आवडतील असे मराठी सिनेमे बनत नाहीत, खटकेबाज संवाद, ठेक्यावर ताल धरायला लावणारी गाणी आणि सामाजिक घुसळण असणारे ‘सैराट’सारखे सिनेमे अगदी तुरळक बनतात.

हेही वाचा: महिला दिन विशेष : आईंना हमे देखके हैरान सा क्यूँ हैं?

मराठी सिनेमानं काय शिकावं?

आपल्याकडे कुणी वेगळ्या विषयावरचा, वेगळ्या धाटणीचा ‘भाऊबळी’सारखा सिनेमा बनवला तरी त्याला समांतर आणि प्रायोगिक सिनेमाचं लेबल लागलेलं असतं. त्यामुळे गोंधळात अजूनच भर पडतेय. ‘क्लास’साठीचा सिनेमा मराठीत अवश्य बनावा, पण ‘मास’साठीचेही सिनेमे बनावेत. नाहीतर सामान्य मराठी प्रेक्षक अजूनच दूर जाईल आणि त्याला पुन्हा थियेटरकडे वळवणं एक दिव्य होऊन जाईल. 

सिनेमा आला तर गाण्यांचा कैफ चढायला हवा. संवाद लोकांच्या ओठी पोचले पाहिजेत. सिनेमा हा केवळ आणि केवळ प्रबोधनासाठीच वापरला गेला पाहिजे या गैरसमजातून बाहेर या. देशभक्ती, इतिहास, प्रांतवाद, अस्मितावाद हा अभिनिवेश काळानुसार ओसरून जाईल आणि मग लक्षात येईल की मराठी सिनेसृष्टीने काय गमावलंय! 

लोकांच्या निखळ मनोरंजनाचेही सिनेमे बनायला हवेत. जुन्यांना थोडा आराम दिला पाहिजे आणि नव्यांना थोडी संधी तरी दिलीच पाहिजे. त्याशिवाय लोकांच्या मनात काय चाललंय हे मराठी सिनेसृष्टीला कसं कळणार? देशभरातल्या वेगवेगळ्या भाषांच्या सिनेमाची देहबोली काय सांगतेय याचा कानोसा घेतला तरी मराठी सिनेमाला कळेल की त्यांच्या तुलनेत आपलं डबकं होत चाललंय!

नैतिकतेचं सामाजिक ढोंग

‘देवरा ढोढी चटना बा’विषयी आपल्यातही प्रचंड मतभिन्नता असेल हे नक्की. पण वरवर किरकोळ वाटणाऱ्या अशा गोष्टीतून समजातली घुसळण थोडीशी तरी समोर येते. नव्या जुन्या पिढीतले वैचारिक भेद समोर येतात. नैतिक समजल्या गेलेल्या गोष्टींकडे पाहण्याचे नवे आयाम समोर येतात!

आपल्याला मजाही पाहिजे, धिंगाणाही पाहिजे, थोडी का होईना, ऐशही पाहिजे. मग नाक का मुरडावं? खरं पचत नाही हेच खरं. वरवर नैतिकतेचं ढोंग करणारा आपला समाज किती नासून, सडून गेलाय हे पाहायचं असेल तर सोशल मीडियावरची ट्रोलरची भाषा पाहायची! उघड असलेलं नागडं कुणालाच पचनी पडत नाही पण आपल्यात दडून असलेलं नागडेपण कुणाला सोडायचं नसतं. आपल्या दांभिकतेला सीमा नाहीत!

हेही वाचा: 

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल