फडणवीसांमधे पवारद्वेष अधिक भरलाय की मुस्लिमद्वेष?

१६ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर चौदा ट्विटची मालिका सादर केली. राज ठाकरेंच्या हातात हात घालून महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य जितकं बिघडवता येईल तितकं बिघडवण्याचा विडा फडणवीसांनी उचललाय असं दिसतं. त्यामुळेच फडणवीसांच्या या ट्विटरहल्ल्याची दखल घेणं भाग पडतं.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चौदा ट्विटची मालिका सादर केली. त्यावरून सगळ्या माध्यमांनी फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल, ट्विटहल्ला वगैरे सनसनाटी बातम्या केल्या. फडणवीसांनी पवारांची जणू पोलखोल केलीय, त्यांचा गैरव्यवहार उघड केलाय अशा अविर्भावात यासंदर्भातल्या सगळया बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

खरं तर फडणवीसांनी शरद पवारांवर टीका करणे हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. अशा टीकेचं उत्तर पवारांनी द्यावं. पण फडणवीस जेव्हा प्रचलित गोष्टींचा चुकीचा अन्वयार्थ लावून लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात, लोकांच्या अल्प स्मरणशक्तीचा गैरफायदा घेऊन भलत्या गोष्टी थोपवण्याचा प्रयत्न करतात आणि या गोष्टी सामाजिक स्वास्थ्यासंदर्भातल्या आणि अल्पसंख्यांकांच्या हिताच्या विरोधातल्या असतात तेव्हा त्या राजकीय राहत नाहीत.

असला खोटारडेपणा किंवा दांभिकपणा उघड करण्याची गरज असते. त्यामुळेच फडणवीसांच्या या ट्विटरहल्ल्याची दखल घेणं भाग पडतं. आणि त्यासंदर्भातली वस्तुस्थिती मांडण्याची गरज निर्माण होते.

धर्मवेडाची रणनीती

राज ठाकरेंच्या हातात हात घालून महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य जितकं बिघडवता येईल तितकं बिघडवण्याचा विडा फडणवीसांनी उचललाय असं दिसतं. हातातला सत्तेचा घास हिरावल्यामुळे आलेलं नैराश्य अडीच वर्षांनंतरही फडणवीस झटकू शकलेले नाहीत. जे फडणवीसांचं तेच राज ठाकरेंचं. राज यांना ज्यांच्याशी स्पर्धा वाटते ते उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

त्यांचं व्यक्तिमत्त्व राज यांच्यासारखं करारी, आक्रमक आणि लोकांना आकर्षित करणारं नसलं तरीही त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार, खासदार निवडून येतात. आपल्या सभांना हजारोंची गर्दी जमते, टीआरपी असलेले आपण एकटेच नेते असल्यामुळे माध्यमे लाईव्ह कव्हरेज देतात तरीही दुसऱ्यांच्या सुपाऱ्या वाजवाव्या लागतात, ही खंत राज ठाकरेंना असावी.

असे हे दोन वैफल्यग्रस्त नेते एकत्र येऊन महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवायला लागलेत. त्याचबरोबर त्यांना माहिती आहे की, शरद पवार हा या सरकारचा आधार आहे. सरकार खिळखिळं करायचं असेल तर शरद पवारांवर आघात करायला पाहिजे.

त्यामुळे एका निश्चित रणनीतीनुसार दोघांनीही शरद पवारांना लक्ष्य केलंय. राज ठाकरेंचं समजू शकतं, त्यांची समज मर्यादितच आहे. पण महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद पाच वर्षं भूषवलेला माणूस एवढा धर्मवेडा आणि अल्पसंख्यांकांचा द्वेष करणारा असू शकतो, यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव असू शकत नाही. 

कलम ३७०चा अजेंडा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम ३७०ला विरोध केला होता आणि ते कलम रद्द केल्यानंतर त्याला शरद पवारांनी विरोध केला होता, असं सांगून पवार हे बाबासाहेबांच्या विचारांचे विरोधक आहेत, असं भासवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलाय. एखाद्या विषयाची सोयीस्कर मांडणी कशी करायची, हे फडणवीसांकडून शिकून घ्यायला हवं. कलम ३७०, बाबासाहेबांची भूमिका, त्याची आवश्यकता हा प्रदीर्घ चर्चेचा विषय असताना केवळ मोजक्या शब्दात त्यासंदर्भात शेरेबाजी करून ते बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात.

फडणवीसांचा पक्ष आणि त्याची मातृसंघटना रोज बाबासाहेबांच्या विचारांची हत्या करत असताना आणि बाबासाहेबांच्या संविधानाला अपमानित करत असताना त्यांना नको तिथं बाबासाहेबांची आठवण यावी, हे खासच म्हणायला हवं. ऍड. प्रकाश आंबेडकर यांनीही कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता आणि आरएसएस आपला राजकीय अजेंडा राबवत असल्याची टीका केली होती.

आपला राजकीय अजेंडा राबवून त्याला बाबासाहेबांच्या विचारांशी जोडण्याचा हा प्रयत्न त्यांच्या परंपरेला साजेसा असाच म्हणावा लागेल. काश्मिर फाईल्स हा सिनेमा एकतर्फी मांडणी करणारा आणि काश्मिरमधल्या परिस्थितीचं विकृत चित्रण करणारा बटबटीत सिनेमा आहे, याबद्दल अनेक राजकीय आणि चित्रपट अभ्यासकांनी सविस्तर मते मांडलीत.

हा एक सोयीस्कर मांडणी केलेला तद्दन प्रचारपट आहे. अनेक काश्मिरी पंडितांनीही या चित्रपटातल्या चित्रणाशी असहमती दर्शवलीय, तरीही तो फडणवीसांना ऐतिहासिक चित्रपट वाटतो यावरून त्यांचं आकलन लक्षात येतं. एवढी चर्चा झाल्यानंतरही पुन्हा आपलंच तुणतुणं वाजवण्याचा हा प्रयत्न बालवाडी पातळीवरचा म्हणता येईल.

हेही वाचा: खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

सातत्याने तुष्टीकरणाचा आरोप

नवाब मलिकांवरची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं उघड सत्य आहे. त्यांनी एनसीबीची लक्तरे वेशीवर टांगली त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून केलेली ही कारवाई आहे, तरीही त्यासंदर्भात एकच गोष्ट सतत बोलत राहून लोकांच्या मनावर खोटं बिंबवण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो. ‘नवाब मलिक मुस्लीम असल्यामुळे त्यांचा संबंध जोडला जातोय,’ हे पवारांचं विधान ऑन रेकॉर्ड आहे.

त्याचप्रमाणे १९९३च्या बाँबस्फोटावेळी बारा बाँबस्फोट झाले असताना तेरा स्फोट झाल्याचं सांगून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी पवारांनी घेतली होती. ही माहिती पवारांनीच स्वतः सांगितली होती आणि अनेक मुलाखतींमधून त्याचा पुनरुच्चार केलाय. आपण असं का केलं याचं स्पष्टीकरणही त्यांनी तपशीलवारपणे दिलंय.

त्यातून पवारांमधल्या जबाबदार राज्यकर्त्याचं दर्शन घडतं. तेच घेऊन त्यावरून पवार खोटं बोलल्याचा आणि तुष्टीकरणाचा आरोप करणं केवळ हास्यास्पद आहे. रझा अकादमीने जो हैदोस घातला, पोलिसांवर हल्ले केले त्यासंदर्भात कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यात आलीय. त्यामधे पवारांचं नाव गोवण्याचं काहीही कारण नसताना तिथंही फडणवीसांनी ओढून ताणून पवारांना आणलंय.

मुस्लिम आरक्षणाचं काय झालं

पृथ्वीराज चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. फडणवीस सरकार आल्यानंतर न्यायालयाने हे आरक्षण नाकारलं. त्याचवेळी मुस्लिम आरक्षणासंदर्भात सकारात्मकतेने पुढे जाण्याचे निर्देश दिले होते.

फडणवीसांनी मराठा समाजाच्या दबावाखाली मराठा आरक्षण निवडणुकीपर्यंत पुढे ढकलत नेलं आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा मात्र गुंडाळला. खरं तर मुस्लिम समाजाचं मागासलेपण, शिक्षणाचा अभाव या गोष्टी विचारात घेता मराठा समाजाच्या आधी मुस्लिमांना आरक्षण मिळण्याची आवश्यकता होती आणि आहे.

त्यासंदर्भातला निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. तर तेही फडणवीस पवारांच्या तुष्टीकरणाशी जोडतात. यावरून त्यांच्यात पवारद्वेष अधिक भरलाय की मुस्लिमद्वेष असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. सच्चर समितीची अंमलबजावणी करण्याची मागणी याच भूमिकेशी सुसंगत होती, हे लक्षात घ्यायला हवे.

हेही वाचा: दोनच कायद्यांचे अधिकार असूनही ईडी पॉवरफुल कशी?

दहशतवाद्यांशी जोडला जाणारा संबंध

‘निवडणुकीत कुणाला विजयी करायचं आणि कुणाचा पराभव करायचा हे अल्पसंख्यांकांनी ठरवलंय,’ हे पवारांचं विधान त्यावेळच्या राजकीय परिस्थितीतलं असू शकतं. ते स्वतंत्रपणे काढून त्याचा वेगळा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचा वापर सर्वात आधी पवारांकडून केला गेला हे फडणवीसांचं म्हणणं खरंय. पण पवारांचं ते विधान साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, असीमानंद वगैरे मंडळींनी खरं ठरवलंय.

दहशतवादी इशरत जहाँला निष्पाप संबोधणारे पवारच होते. सत्तेत असताना त्यांनी ‘इंटेलिजन्स ब्युरो’लाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असाही पवारांवर त्यांनी आरोप केलाय. पवारांच्या त्या म्हणण्यात आजही तथ्य आहे. गुजरात पोलिसांनी बनावट चकमकीत इशरतला ठार केलं होतं. सीबीआयने त्यासंदर्भातले ठोस पुरावे मांडले होते. इशरतच्या आईची आपल्या मुलीच्या सन्मानासाठीची लढाई अजूनही सुरु आहे.

ख्यातनाम वकील वृंदा ग्रोव्हर यांनी मुलाखतींमधून इशरतचं निर्दोषत्व आणि त्यामागचं गुजरात पोलिसांचं षडयंत्र तपशीलवार मांडलंय. त्यासंदर्भातला बीबीसी हिंदीचा वृत्तांत आवर्जून वाचायला हवा. मोदी सत्तेवर आल्यानंतर कोर्टाचे निकाल कसकसे लागत गेले हे फडणवीसांनाही चांगलं माहिती आहे. तरीही ते रेटून खोट्या गोष्टी मांडतायत.

सामाजिक सलोखा बिघडवतंय कोण

सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पवारांचे हे प्रयत्न बाबासाहेबांनी स्वीकारले नसते, असं शेवटी फडणवीसांनी म्हटलंय. खरं तर सत्तेवाचून बेचैन झालेले फडणवीस सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. पहिल्या टप्प्यात त्यांनी ओबीसी समाजघटकांना पवारांविरोधात सोडून पाहिलं. त्याने काही फरक पडत नाही म्हटल्यावर राज ठाकरेंना हाताशी धरलंय.

यानंतरच्या टप्यात ते असदुद्दीन ओवेसींना सोबत घेतील आणि महाराष्ट्रात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा डर्टी गेम खेळू शकतील. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सुरु आहे, या भ्रमात महाराष्ट्रातले सत्ताधारी असतील तर त्यांच्या बुडाखालची सत्ता कधी खेचली जाईल हे कळणारही नाही.

आतापर्यंतच्या अडीच वर्षात गृहखात्याच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी झालीय. यापुढील काळातही गृहखात्याचीच कसोटी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला फडणवीसांनी १४ ट्विट केले, तशा पद्धतीने गांधी जयंतीला ३० ट्विट करायला हरकत नाही. गेलाबाजार नथुराम गोडसे जयंतीला १९ मे रोजी १९ ट्विट करावीत.

हेही वाचा: 

मोदींचा नवा भारत आणि आमचा नवा भारत वेगळा, कारण

बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

राजेश टोपेः आईच्या आजारपणातही महाराष्ट्र बरा होण्यासाठी लढणारा आरोग्यमंत्री

राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही