कोरोनावरचं नवं औषध स्वस्त आहे, पण तब्येतीसाठी मस्त आहे का?

१९ जून २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


कोरोनावरचा रामबाण उपाय सापडलाय अशी बातमी सध्या सगळीकडे वायरल झालीय. ब्रिटिश सरकारच्या एका प्रयोगात डेक्झामेथाझोन हे औषध वेंटीलेटरवर असलेल्या कोरोना पेशंटचा मृत्यूदर कमी करू शकतं, असं स्पष्ट झालंय. तेव्हापासून या औषधाची मागणी वाढलीय. हे औषध उपयुक्त असेलही. पण त्यावर इतक्या लवकर विश्वास ठेवणं बरोबर नाही, असं अनेक डॉक्टर आणि तज्ञांचं म्हणणं आहे.

‘तुमची पत्नी वेंटिलेटरवर असते. तिच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं अशा अवस्थेत ती असते. त्याचवेळी तुमचे डॉक्टर या औषधाविषयी तुम्हाला सांगतात. हे औषध अस्तित्वात आहे. ते आधी अनेक लोकांनी वापरलंय. मग त्याचा प्रयोग माझ्या पत्नीवर झाला तर काय हरकत आहे, असं मला वाटलं’

इंग्लडमधल्या बकिंगहॅमशाअरमधे राहणाऱ्या पॉल मिलबॅंक यांची ही प्रतिक्रिया बीबीसीच्या एका स्टोरीत सापडते. त्यांची पत्नी कॅथरिन यांना कोरोनाची लागण झाली होती. त्या १२ दिवस वेंटिलेटरवर होत्या. तेव्हा त्यांच्यावर एका औषधाचा प्रयोग करण्याची परवागनी पॉल यांनी दिली होती. कॅथरिन आता ठणठणीत बऱ्या झाल्यात आणि त्यांना बरं करणाऱ्या त्या औषधाचं नाव आहे डेक्झामेथाझोन. कोरोना वायरसवरचं स्वस्त आणि मस्त औषध म्हणून या औषधाचा सध्या सगळीकडे बोलबाला होतोय.

हेही वाचा : कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

१० रूपयाला मिळतं औषध

डेक्झामेथाझोन हे कोरटिकोस्टेरॉईड या प्रकारातलं औषध आहे. स्पायनल कॉर्ड म्हणजेच पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांच्या शरीरातल्या एका संप्रेरकापासून हे औषध बनवलं जातं. माणसाच्या शरीरात दोन्ही किडन्यांवर असणाऱ्या एका ग्रंथीमधे हे संप्रेरक असतं. या संप्रेरकासारखं एक द्रव्य प्रयोगशाळेत बनवून त्यापासून डेक्झामेथाझोन हे औषध बनवलं जातं. 

त्वचेचे आजार, पुरळ, अलर्जी, खाज, अस्थमा, फुफ्फुसाचे आजार, मेंदूची सूज, डोळ्यांवर आलेली सूज, डोळ्यांचं ऑपरेशन, टीबी अशा अनेक आजारांसाठी हे औषध वापरता येतं. प्रिमॅच्युअर म्हणजे बाळाची पूर्ण वाढ होण्याआधीच त्याचा जन्म होत असेल तर बाळांतपण सोपं व्हावं म्हणून हे औषध आईला दिलं जातं. गोळ्या, इंजेक्शन किंवा सलाईनमधून हे शरीरात सोडतात.

१९५७ मधे हे औषध बनवलं गेलं. पण मान्यता मिळाल्यावर १९६१ मधे ते पहिल्यांदा प्रत्यक्षात वापरलं गेलं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनं तयार केलेल्या गरजेच्या औषधांच्या यादीतही १९७७ पासून हे औषध समाविष्ट करण्यात आलंय. इतकं महत्त्वाचं हे औषध अगदी आपल्या साध्या मेडिकल मधेही मिळू शकतं.

मुख्य म्हणजे डेक्झामेथाझोन अतिशय स्वस्त औषध आहे. जगातल्या बहुतांश देशात हे औषध सहज उपलब्ध होतं. अमेरिकेत डेक्झामेथाझोनचा महिन्याभराचा डोस फक्त २५ डॉलरला मिळतो. तर बाळाच्या जन्मासाठी या औषधाचा कोर्स केला जातो तेव्हा त्याचा खर्च ५० डॉलरपर्यंत जातो. भारतात या औषधाच्या इंजेक्शनची किंमत १० रूपयांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं जातंय. तर गोळ्यांचं एक पाकीट साधारण ७ रूपयांना मिळतं.

तर ५ हजार पेशंटचे जीव वाचले असते

बिझनेस टुडेच्या एका बातमीनुसार, २०१९ मधे भारताने जवळपास १५० लाख डॉलर इतक्या किमतीचं डेक्झामेथाझोन हे औषध निर्यात केलं. भारताकडून अमेरिका, नायजेरिया, कॅनडा, रशिया आणि युगांडा या पाच देशांना सगळ्यात जास्त औषधं पुरवलं जातं. अमेरिकेत तर आपण ५० लाख डॉलर किमतीचं औषध निर्यात होतं.

ब्रिटनमधल्या नॅशनल हेल्थ सर्विस अंतर्गत कोरोनाची लागण झालेल्या १० हजार लोकांवर डेक्झामेथाझोन औषधाचा प्रयोग करण्यात आला. त्याचे अनेक चांगले परिणाम या पेशंटवर दिसून आले. त्यानंतर ऑक्सफर्ड युनिवर्सिटीकडून या प्रयोगाचे रिझल्ट जाहीर करण्यात आले. डब्ल्यूएचओनंही या प्रयोगाबद्दल युके सरकारचं कौतूक केलं.

डब्ल्यूएचओच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, कोरोना वायरसनं खूप आजारी असणाऱ्या पेशंटवर हे औषध फारच प्रभावी ठरू शकतं. ब्रिटनमधल्या प्रयोगात वेंटीलेटरवर असणाऱ्या पेशंटना हे औषध देण्यात आलं. तेव्हा पेशंटचा मृत्यूदर एक तृतीयांश कमी झाल्याचं स्पष्ट झालं. म्हणजे, वेटिंलेटरवर असलेल्या ८ पैकी १ पेशंटचा जीव या औषधानं वाचला. तर, कृत्रिम ऑक्सिजनवर असलेल्या २५ पेशंटपैकी एकाचा जीव हे औषध वाचवू शकतं.

आपली रोगप्रतिकारक शक्ती कोरोना वायरसविरोधात लढत असते. अनेकदा ही लढाई इतकी टोकाला जाते की रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणाबाहेर जाते आणि शरीरात एकप्रकारचं वादळ तयार होतं. डेक्झोमेथाझोनमुळे रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित काम करते. त्यामुळेच फक्त खूप आजारी असलेल्या लोकांवरच हे औषध काम करतं, असंही डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोना वायरसची साथ पसरल्यावर लगेचच या औषधाचा उपयोग कळाला असता तर आत्तापर्यंत ४ ते ५ हजार पेशंटचे जीव वाचले असते, असं युकेच्या संशोधकांचं म्हणणं आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा :

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

अमेरिकेला कोरोनानं ताब्यात घेतलं, सेंट लुईस शहर वेगळं राहिलं, कारण

कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर आपल्या या अवयवांनाही करतोय टार्गेट

कोरोनापेक्षा खरा धोका आहे तो आपल्या आतल्या वायरसचाः युवाल नोवा हरारी

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

हा तर रामबाण उपाय?

‘कोरोनाशी लढायला मदत करणारं डेक्झामेथाझोन हे पहिलं औषध आहे. आमच्या प्रयोगातून खूपच सकारात्मक परिणाम दिसलेत. अगदी कृत्रिम ऑक्सिजनवर असणाऱ्या पेशंटना बरं करण्याइतके याचे स्पष्ट फायदे दिसतायत. अतिशय स्वस्त, कुठेही मिळणारं हे औषधं पेशंटना लगेचच देऊन आपण त्यांचा जीव वाचवू शकतो.’ असं ऑक्सफर्ड युनिवर्सिटीतले प्राध्यापक आणि रीकवरी ट्रायलचे मुख्य संशोधक पीटर डॉर्बी यांचं म्हणणं आहे.

तर डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रॉस अधानोम यांनीही या प्रयोगाचं स्वागत केलंय. ‘ऑक्सिजन आणि वेंटिलेटरचा आधार लागणाऱ्या कोविड १९ च्या पेशंटचा मृत्यूदर कमी करून दाखवणारं हे पहिलं औषध आहे. ही खूपच आनंदाची बातमी आहे आणि यासाठी मी युके सरकार, ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आणि या प्रयोगात भाग घेतलेल्या सगळ्या हॉस्पिटल आणि पेशंटचं अभिनंदन करतो,’ असं ते म्हणाले.

त्यामुळेच डेक्झामेथाझोन हे औषध कोरोना वायरसवरचा रामबाण इलाज म्हणवला जातोय. असं असलं तरी हायड्रोक्लोरोक्वीनप्रमाणेच याही औषधाबद्दल आपण फार लवकर अंतिम निष्कर्षापर्यंत पोचतोय, असं अनेक डॉक्टर आणि आरोग्य संस्थांचं म्हणणं आहे.

अति वापर धोकादायक

डेक्झामेथाझोनचा कोरोना पेशंटवर प्रयोग करणाऱ्या रीकवरी ट्रायल या ब्रिटिश संस्थेनंच हायड्रोक्लोरोक्वीन औषधाचा प्रयोग कोरोना पेशंटवर केला होता. या संस्थेकडून ६ प्रकारच्या उपचारपद्धतींची चाचणी चालू आहे. त्यात डेक्झामेथाझोनसोबत एचआयवीसाठी दिलं जाणारं लोपिनावीर रेटोनावीर, अझीथ्रोमायसीन, टोसिलिझोमा ही औषधं, कोरोनातून बरं झालेल्या पेशंटच्या रक्तातून बनवलेली प्लाझ्मा थेरपी आणि हायड्रोक्लोरोक्वीन या ५ औषध पद्धतींचा समावेश होता.

त्यापैकी हायड्रोलक्लोरोक्वीन हे औषध फार वादग्रस्त ठरलं. मलेरिया विरोधात काम करणाऱ्या या औषधाचा प्रयोग कोरोनाची लागण झालेल्या पेशंटवर केला गेला. पण त्याचा कोणताही परिणाम दिसला नाही. काही प्रकारच्या इन्फेक्शनवर हे औषध नक्कीच काम करतं. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ते देण्यासाठी धमकी दिल्यामुळे त्या औषधाला खूप प्रसिद्धी मिळाली. तसंच काहीसं डेक्झामेथाझोनबाबतही होत असावं, असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे.

शिवाय, डेक्झामेथाझोन रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणात ठेवत असलं तरी त्याच्या अति वापराने तोंडात ऍलर्जी येणं, हाडांची झीज होणं, मोतीबिंदू, स्नायूंची ताकद कमी होणं असे दुष्परिणाम होऊ शकतात. शिवाय, स्तनपान करणाऱ्या म्हणजेच बाळाला अंगावर दूध पाजणाऱ्या आयांसाठी तर हे औषध संपूर्णपणे वर्ज्य आहे.

हेही वाचा : अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

डॉक्टरांना विचारणं गरजेचं

अमेरिकेच्या मेरिलँड युनिवर्सिटीमधले साथरोगतज्ञ फहीन युनूस यांनीही या औषधावर शंका उत्पन्न केलीय. ‘या औषधामुळे काही चांगलं होण्याऐवजी वाईटच जास्त होईल, असं मला वाटतंय. का? एकतर याचे फायदे ५ टक्के पेशंटमधेच दिसलेत. शिवाय, युकेनं केलेला हा एकमेव अभ्यास आहे. त्यातले बारकावे अजून अभ्यासले गेलेले नाहीत. त्यामुळेच त्याचे फायदेही वादग्रस्त आहेत. या औषधावर इतका लवकर विश्वास टाकणं बरोबर नाही,’ असं त्यांनी एका ट्वीटमधे सांगितलंय.

शिवाय, कोरोनावरचं औषध असा याचा बोलबाला केला जात असल्याने अनेकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध विकत घ्यायला सुरवात केलीय. पण हे एक संप्रेरक आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती दाबली जाते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते घेतलं तर शरीरातलं साखरेचं प्रमाण किंवा ब्लड प्रेशरही वाढू शकतं. पोटाच्या अल्सर, निद्रानाश, वजन वाढणे, लकवा बसणे असे अनेक आजार होऊ शकतात, असा धोक्याचा इशाराही डॉक्टर युनूस देतात.

डब्ल्यूएचओनंही या औषधाचं स्वागत केलं असलं तरी आणखी अभ्यासाची गरज आहे, असंही स्पष्ट केलंय. अनेक मोठे जर्नल, वैद्यकिय मासिकं असं कुठल्याही आजाराचं औषधं सापडलं की ते छापतात आणि नंतर ते मागे घेतात. थोडक्यात, हे औषध उपयोगाचं आहेच. पण त्यावर वेगवेगळ्या पातळ्यांवर अभ्यास होत नाही तोपर्यंत त्याला कोरोनावरचं औषध किंवा कोरोनावरचा रामबाण उपाय असं म्हणता येणार नाही. आणि डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेणं हे स्वतःहून आपलं मरण जवळ केल्यासारखं होईल.

हेही वाचा : 

लठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार आहे?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

कोविड टो म्हणजे काय? हे कोरोनाचं नवं लक्षण आहे का?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

वस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय?

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

विटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित?