सोशल मीडियावर गेल्या दोन वर्षांपासून धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी साजरा करायचा याविषयी वेगवेगळी चर्चा सुरू आहे. आता होतो, तसा तिथीनुसार दसऱ्याला की १४ ऑक्टोबर या तारखेला? आता नव्याने सुरू झालेल्या या चर्चेला चाळीसेक वर्षापूर्वीच सुरवात झालीय. वरवर पाहता वाटतं तसा हा फक्त दोन कालगणनांचा घोळ नाही.
‘हिंदू म्हणून जन्मलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’ अशी ऐतिहासिक घोषणा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ मध्ये येवला इथं केली. यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी विविध धर्मांचा अभ्यास करून शेवटी बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. बौद्ध धर्मात जाण्यापूर्वी त्यांनी त्या धर्मव्यवस्थेला धम्मात रूपांतरित केलं आणि मग १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी नागपूर इथं धम्मदीक्षा घेतली. याच दिवशी हिंदू धर्मपरंपरेतील महत्वाचा सण दसरा, विजयादशमी होती. धम्मदीक्षेनंतर काही दिवसांतच बाबासाहेबांचे ६ डिसेंबर १९५६ला महापरिनिर्वाण झालं.
स्वतंत्र भारताच्या, जगाच्या इतिहासात धम्मदीक्षा सोहळ्याच्या घटनेला ऐतिहासिक महत्व आहे. इतिहासात या दिवसाचा उल्लेख ‘धम्मक्रांती दिन’, ‘दलित क्रांतिदिन’ म्हणूनही करण्यात आलाय. धम्मदीक्षा दिनाच्या स्मृती जागवण्यासाठी बौद्ध लाखोंच्या संख्येने दरवर्षी दीक्षाभूमीवर जमतात. पण या स्मृती तारखेनुसार जागवायच्या की तिथीनुसार, या जुन्याच चर्चेला आता नव्याने फोडणी देण्यात येत आहे. हा वाद नेमका कधी सुरू झाला, हे शोधलं असता आपल्या चाळीसेक वर्ष मागं जावं लागतं.
विचारवंत राजा ढाले यांनी १३ ऑक्टोबर १९७६ला दैनिक ‘नवाकाळ’मध्ये ‘अखिल दलितांचा क्रांतिदिन १४ ऑक्टोबर’ या नावाचा लेख लिहिला. त्यानंतर तिसेक वर्षांनी नवीन मुद्द्यांसह त्यांनी ‘अशोक विजयादशमी की १४ ऑक्टोबर?’ ही छोटेखानी पुस्तिका लिहिली. यात त्यांनी धम्मक्रांती दिन १४ ऑक्टोबरलाच साजरा करावा, असा आग्रह धरला.
त्याचं दृश्य स्वरूप गेली काही वर्षं नागपूरला दिसतं आहे. दीक्षाभूमीवर १४ ऑक्टोबरलाही लोकांची मोठी गर्दी होतं आहे. यामध्ये मोठ्या संख्येनं नागपूर आणि परिसरातील लोकांचा सहभाग असतो. यंदातर दीक्षाभूमीवर धम्मक्रांतीदिन साजरा करण्यासाठी १४ तारखेला बौद्ध लाखाच्या घरात जमले होते, अशी माहिती सकाळच्या बातमीत आहे. १४ तारखेलाच धम्मक्रांतीदिन साजरा करा, असं आवाहन काही कार्यकर्ते, संस्था, संघटना दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर करतात.
दुसरीकडे दसरा हा मुळात अशोक विजयादशमी असल्यामुळे तो बौद्धांचाच पवित्र दिवस असल्याचा दवा बौद्ध अभ्यासकांनी केलाय. त्यांच्या दाव्यानुसार, हिंदू पुराणांमधील विजयादशमीच्या कथांना अर्थ नाही. त्या नंतर लादल्या गेल्या आहेत. मुळात सम्राट अशोकाने कलिंग देशावर विजय मिळवलेला हा दिवस होता. त्यामुळे त्या दिवसापासून विजयादशमी साजरी केली जाते. ती मुळात अशोक विजयादशमी आहे. त्यानुसार दसऱ्याला धम्मदीक्षा दिन साजरा करणं चुकीचं नाही. पण १४ ऑक्टोबरचं समर्थन करणारे हा दावा मान्य करत नाहीत.
हेही वाचाः धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?
‘नवाकाळ’मधल्या लेखात ढाले म्हणतात, ‘...१४ ऑक्टोबरचे दिव्य स्मरण करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे हळूहळू आपण १४ ऑक्टोबरचे महत्व कमी करून ते महत्व दसऱ्याला देत आहोत. १४ ऑक्टोबर १९५६च्या क्रांतिदिनाचे दिव्यस्मरण आपण दसऱ्याला करून कसं चालेल?’ या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी २००६ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकेत म्हटलं, ‘...म्हणून आपण दसरा अथवा विजयादशमी या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून चौदा ऑक्टोबरला वाऱ्यावर सोडण्याऐवजी १४ ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून तिथीला वाऱ्यावर सोडलं पाहिजे.’
दसरा वा अशोक विजयादशमी या भारतापुरत्या कालगणनेच्या संदर्भातल्या मर्यादित तिथी आहेत. धम्मक्रांती ही जागतिक परिमाण लाभलेली घटना आहे. त्यामुळं तिचं स्मरण हे जागतिक कालगणना असणाऱ्या ग्रेगरियन कॅलेंडरनुसार व्हायला हवी. ‘धर्मांतर म्हणजे नवजीवन. त्यासाठी जुनं नष्ट झालं पाहिजे,’ या डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेचा उल्लेख करत ढाले यांनी गत धर्माचा भाग असलेल्या विजयादशमी वा दसऱ्याचा आग्रह सोडला पाहिजे, अशी मांडणी केली आहे.
धम्मदीक्षा सोहळ्याचा पहिला वर्धापन तिथीनुसार झाला की तारखेनुसार, हे पाहावं लागेल. १९५७ ला पहिला वर्धापन दिन झाला. त्यावर्षी चौदा ऑक्टोबरपूर्वीच दसरा होता. म्हणून त्यावर्षी तीन ऑक्टोबरला दसऱ्यादिवशीच धम्मक्रांती दिन साजरा करण्यात आला. पुढंही हीच परंपरा कायम राहिली. काही लोक दसऱ्याला धम्मक्रांती दिन साजरा होण्यास नागपूरचे तत्कालीन राजकारणी जबाबदार असल्याचाही आरोप करतात. या प्रथेला पहिला विरोध झाला तो राजा ढाले यांच्या ‘अखिल दलितांचा क्रांतिदिन १४ ऑक्टोबर’ या लेखानं.
या चर्चेचे वेगवेगळे पैलू समोर यावेत यासाठी कोलाज काही अभ्यासकांशी बोलला. त्यातून समोर येणारी मतं अशी आहेत.
हेही वाचाः धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा
पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक केशव वाघमारे १४ ऑक्टोबरच्या बाजूचे आहेत. ते म्हणतात,
दसरा किंवा विजयादशमी या तिथी आहेत. तिथीनुसारचं कॅलेंडर हे हिंदू कॅलेंडर आहे. त्यामुळे त्या भारतापुरत्या कालगणनेशी मर्यादित आहेत. धम्मक्रांती ही जागतिक जागतिक परिमाण लाभलेली घटना आहे. त्यामुळे या घटनेचं स्मरण करतानाही आपल्याला जागतिक कालगणनेचं म्हणजेच इंग्रजी कॅलेडरला प्रमाण मानूनच करावं लागतं.
दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा आपण धम्मांतर म्हणतो, तेव्हा बाबासाहेबांनी धर्म आणि संस्कृती या गोष्टी नाकारल्याचं आपणाला लक्षात घ्यावं लागतं. दसरा किंवा विजयादशमी ही हिंदू धर्माच्या संस्कृतीचा भाग आहे. मग बाबासाहेबांनी जी चौकट नाकारली त्यामध्येच धम्मक्रांतीची घटना का बसवता?
हिंदू धर्म हा एखाद्या ऑक्टोपससारखा आहे. भारतातल्या सर्वच गोष्टी आपल्या कवेत ओढण्याचा प्रयत्न हिंदू धर्म समर्थकांकडून केला जातो. वारकरी, कबीर, महानुभाव, लिंगायत हे हिंदू धर्माविरुद्ध केलेली बंडखोरी होती. पण नंतर हिंदुत्ववाद्यांनी हे सर्व पंथ हिंदू धर्माचाच भाग बनवला. मूळात बौद्धधर्म हा हिंदूधर्माचा भागच नाही. बाबासाहेबांनी हिंदू धर्माला खिजवण्यासाठी धम्मांतर केलं नव्हतं. यामागं त्यांची व्यापक भूमिका होती.
हेही वाचाः धर्मांतरः टोटल पोलिटिकल अॅक्शन
नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक, कवयित्री, चळवळीतील कार्यकर्त्या धम्मसंगिनी रमा गोरख यांनी सांगितलं,
तारीख ही गोष्ट अकॅडमिशियन, विद्वान, विचारवंतांच्या डोक्यातली गोष्ट आहे. कॉमन लोक हे विजयादशीमला तिथं जमतात. शिवजयंतीमुळे तारीख की तिथी हा घोळ सुरू झाला. त्याचे सगळे संदर्भच वेगळे होते. शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्यामागे बुरसटलेल्या जातवर्चस्ववादी विचारांचं षडयंत्र होतं. तसं धम्मदीक्षा दिन कधी साजरा करायचा, हा मुद्दा नाही. तेच लॉजिक जोडायचं तर मग आपल्याला बुद्ध जयंती कधी साजरी करायची हेही सांगावं लागेल.
तिथी आणि ब्राह्मण या दोन गोष्टी एकमेकांशी जोडल्यानं ही भानगड निर्माण झालीय. तिथी आली की ब्राह्मण आला, हे म्हणणंच चुकीचं आहे. त्यामुळे सामान्य लोक धम्मांतर दिन १४ला साजरा करोत किंवा विजयादशमीला, लोकांचा आदर केला पाहिजे. लोकांना नावं ठेवायला नकोत. १४ ऑक्टोबरला नागपूरच्या आजूबाजूचे लोकचं येतात. याउलट विजयादशमी दिवशी जगभरातून धम्म बांधव दीक्षाभूमीवर येतात. दसऱ्याला पर्याय म्हणून विजयदशमीचं एक पर्यायी कल्चर या निमित्तानं उभं राहातंय. तर मग आपण या घटनेकडं सांस्कृतिक राजकारण म्हणून बघायला पाहिजे.
हेही वाचाः वाचा धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण
तिथी आणि तारखेमागच्या सांस्कृतिक राजकारणाविषयी बोलताना समाजशास्त्राचे अभ्यासक राहूल कोसंबी यांनी सांगितलं,
दसरा या एकाच सणावर एकाच दिवसावर बौद्ध आणि हिंदू या दोन धर्मांनी दावा केल्याने विविध अर्थ खुले होतात. समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून या गोष्टीला मोठं महत्व आहे. केवळ विज्ञानवादी भूमिका घेऊन या गोष्टींकडं बघता येत नाही. याला आपण लोकांच्या दृष्टिकोनातून बघायला हवं. आम्ही नास्तिक आणि हे हे आम्हाला चालत नाही, म्हणून गोष्टी फाट्यावर मारणं आता सोडलं पाहिजे. असं केल्यानं तो विचार एका काठावरच जातो. विजयादशमीला नाकारल्याने लोकप्रवाहात मिसळता येणार नाही, हे वास्तव आहे.
समाज त्याच्या वेगानं पुढं जातो. विज्ञानवादी विचार करणारे नास्तिक मात्र वर्षानुवर्षं नास्तिकच राहतात. सांस्कृतिक संदर्भाने राजकारण करण्यासाठी प्रतिमा, प्रतिकांचं राजकारण करावंच लागतं. यासाठी सर्वसामान्य लोक जिथे जमतात तिच जमीन कसदार असते, हे मान्य करून तिथे जावं लागतं. ही प्रतिकं आपण सामान्यांच्या हाती ठेवणार आहोत का, मिळवून देणार आहोत का, हे महत्वाचं आहे.
हेही वाचाः
साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?