धर्मांतरः टोटल पोलिटिकल अॅक्शन

१८ ऑक्टोबर २०१८

वाचन वेळ : ८ मिनिटं


उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, हे खरंच ठरलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धर्मांतराच्या क्रांतीमुळे कोट्यवधी कुटुंबांना नवं आयुष्य मिळालं. स्वातंत्र्याचा नवा अर्थ कळला. धर्मांतरामुळे नेमकं काय झालं? कसं झालं? आजच्या जगात त्याला काय अर्थ उरलाय? याची एक चर्चा.. 

१४ ऑक्टोबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासातील सर्वात मोठं धर्मांतर घडवून आणत भारतात बुद्धविचारांची पुन्हा स्थापना केली. हा भाग धर्मांतराचा होता. त्याहीपेक्षा मोठं पाऊल होतं ते तत्कालीन सात कोटी लोकांवर लादल्या गेलेल्या अस्पृश्यतेच्या निवारणाचा. त्याआधी बाबासाहेबांनी प्रत्येक मार्गाने अस्पृश्यता निवारण करून पाहिलं. पण दरवेळेस भारतातील जातीय मानसिकतेने त्यातले लूपहोल्स शोधून बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सुधारणेच्या एकूण एक प्रयत्नांना सुरूंग लावला.

इंग्रज सत्तेच्या काळात त्यांनी जमेल तितकं अस्पृश्यांच्या उत्थानाचं कार्य साधलं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अस्पृश्यता पालनाला संविधानातच कायद्याने चाप लावला. पण मनामनात असलेली जात घालवण्याइतका वेळ बाबासाहेबांकडे नव्हता. त्यामुळे आता हिंदू धर्मात सुधारणा होणं शक्य नाही, हा विचार त्यांच्या मनात पक्का रुजला होता. त्यातूनच त्यांनी १९३५ साली धर्मांतराची घोषणा केली.

हेही वाचाः धम्मचक्र प्रवर्तन दिन : तिथीनुसार की तारखेनुसार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती. हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसामाणसांत भेद करतो, ज्या धर्मात स्वातंत्र्य, समता, बंधुता नाही, त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही, म्हणून त्यांनी धर्मांतराची गरज वाटली. बाबासाहेबांचा हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला सवाल होता, ‘जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही. प्यायला पाणी मिळू देत नाही. विद्या ग्रहण करू देत नाही. अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो. त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहायचं?’

बौद्ध धर्मच का स्वीकारला?

`आम्ही बौद्ध धर्मच का स्वीकारला?` या छोटेखानी पुस्तिकेत आपल्या भूमिकेचे विवेचन करताना बाबासाहेब म्हणतात, `माझ्या समाजात अजून शिक्षणाचा शिरकाव अतिशय कमी आहे. त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षण गरजेचे आहे. मनुष्यमात्र हा आशेवर जगत असतो. आशा ही श्रद्धेतून मिळते. श्रद्धा ही त्याच्या ठायी असलेल्या धर्मातून मिळते. इथे धर्म म्हणजे कोणतंही कर्मकांड अपेक्षित नसून, तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे. ती अशी एक आदर्श पद्धती असेल ज्यात वैज्ञानिक विचारांनाच मुख्य आधार असेल. तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील. आणि त्यातून मिळणारी आशा ही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरित करत राहील.`

ते पुढे म्हणतात, `मला बुद्धाच्या धम्मामध्ये या साऱ्या गोष्टी आढळतात. मी बुद्धाचा स्वीकार करून या देशावर एक प्रकारे उपकारच करत आहे. बुद्ध याच मातीतला. प्रतिक्रांतीमुळे काही काळासाठी अदृश्य होता. आम्ही त्याचे पुनरूज्जीवन करत आहोत. त्याहीपेक्षा कोणत्याही प्रकारच्या भेदांना थारा नसणाऱ्या एका महान अशा परंपरेत आणि आदर्श पद्धतीमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. जसे महासागरात सर्व नद्या एकत्रित झाल्यानंतर त्या नद्यांचे अस्तित्व उरत नाही तसेच आम्ही जाती सोडून बुद्ध नावाच्या महासागरात जाणार आहोत. त्यानंतर आमचं जातींचं अस्तित्वच नष्ट झालेलं असेल.`

धम्म आला, जगणं बदललं

धर्मांतर ही कधीच प्रतिक्रिया नव्हती. तो अगदी विचार करून घेतलेला नेमका निर्णय आणि परिपूर्ण कार्यक्रम होता. या कार्य़क्रमाने काय साध्य झालं? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी बाबासाहेबांमुळे बुद्ध झालेल्यांच्या घरातील मागील सहा पिढ्या तपासून पहायला हव्यात. स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यांमधील ९० टक्क्यांहून अधिक   अतिशय विचित्र अवस्थेत जगत होते. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा करताना लोकांना आपल्या कपड्यांचा त्याग करायला लावला.

प्रत्येकाने दीक्षा समारंभासाठी येताना पांढरे शुभ्र कपडे परिधान केले पाहिजेत, असा दंडक घातला. धर्मांतराची प्रक्रिया सुरू होण्याआधी त्यांनी काही पत्रके काढली. ठिकठिकाणी जाऊन बुद्धाच्या मूर्त्या स्थापल्या. तेथील अस्पृश्यांना जातीव्यवस्थेने लादलेली कामं सोडायला भाग पाडली. ते करताना सडलेलं मांस खाणं सोडा, मेलेली जनावरं ओढणं सोडा, असे कार्यक्रम दिले.

लोकांनी आपले कपडे बदलले. व्यवसाय बदलले. चालणं, बोलणं, राहणं, खाणं बदललं. खिशातून चान्या घेऊन रस्ताभर खात हिंडण्याची सवय सुद्धा हळूहळू नाहीशी झाली. हे झाले प्राथमिक बदल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे बदल घडले. लोकांना स्वाभिमानाने स्वतःची ओळख सांगता येऊ लागली. आयडेंटीटी क्रायसिस हा खूप मोठा प्रश्न आहे आणि समस्यासुद्धा. बाबासाहेबांनी तमाम अस्पृश्यांना स्वत्वाची जाणीव करून दिली.

अस्पृश्य या स्थितीवाचक संज्ञेतून बाहेर काढत बौद्ध या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बिरुदाची देणगी दिली. बाबासाहेबांनी इथल्या भूमिपुत्राला त्याच्या खऱ्या इतिहासाची जाणीव करून दिली. धर्मांतर करणं ही बाबासाहेबांची टोटल पॉलिटकल अॅक्शन होती. ती खऱ्या अर्थाने जातीव्यवस्थेने बरबटलेल्या हिंदू धर्माचं अस्पृश्यांच्या मानसिकतेतून विध्वंसन करण्याची कृती होती. याची सुरवात मनूस्मृतीच्या दहनाने झाली होती आणि शेवट धर्मांतराने झाला.

हेही वाचाः वाचा धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

लोकशाहीचे पुरस्कर्ते बुद्ध

बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारताना गौतम बुद्धाचं नव्या जगाला पटणारं वर्जन दिलं. ते समजावून सांगणारा सुनील रामटेकेंच्या भाषणातला एक उतारा मला इथे द्यावासा वाटतो.  

सिद्धार्थ २९ वर्षाचा होतो. म्हातारा, रोगी, मृत व्यक्तीला बघून त्याच्यात वैराग्य निर्माण होतो. त्यानंतर तो संसार सोडण्याचा निर्णय घेतो, हे कारण तर्कसंगत आणि बुद्धीला पटणारं नाही. पण बाबासाहेबांनी शाक्य आणि कोलिय यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वारंवार युद्ध व्हायचं. शाक्यांच्या सभेत सेनापतीच्या युद्धाच्या प्रस्तावाला सिद्धार्थाने विरोध केला. तेव्हा त्याच्यासमोर तीन पर्याय होते. देश सोडून जाणं. देहांताची शिक्षा किंवा वडिलांचं राज्यपद हिरावून घेणं. या तीनपैकी देश सोडून जाण्याचा निर्णय सिद्धार्थाने घेतला. पण पारंपरिक बौद्ध धम्मीय पहिलं कारणच योग्य मानतात. म्हणून बाबासाहेबांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकाला विरोध करताना हा बाबासाहेबांचा धम्म आहे म्हणून हिणवले. परंतु काही कालावधीने जगातील बहुतांश राष्ट्रांनी बाबासाहेबांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ यातील बुद्ध स्वीकारलाय.

बाबासाहेबांनी काठमांडूमधे भरलेल्या बौद्ध धम्म संगीतीला संबोधित करताना ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण दिलंय. त्यात बुद्धाच्या धम्मावर मार्क्सवादाचा प्रभाव होऊ नये यासाठी मार्क्सवाद हे जगातील समस्या सोडवण्यासाठी कसं निरर्थक आहे, हे प्रतिपादित केलं. मार्क्सने मजुरांच्या हुकुमशाहीचं समर्थन केलं होतं तर बुद्धाने सर्वच प्रकारच्या शोषक व्यवस्थेचा विरोध केला होता. बुद्धाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, करुणा या उदात्त मुल्यांचा पुरस्कार करून नीतीमान आणि आदर्श समाज निर्माण झाला तर मनुष्याची दुःखातून मुक्तता होईल असं सांगितले. बुद्ध कसे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत हे सुद्धा बाबासाहेबांनी पटवून दिलं.

धर्मांतरासाठी घेतला २० वर्षांचा वेळ 

बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यापासून ते धर्मांतर करण्यापर्यंत तब्बल वीस वर्षांचा कालावधी घेतला. या काळात त्यांनी जगभरातील सर्वच धर्मांचा खूप सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला. हा अभ्यास करताना त्यांनी नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही भारतीय दर्शन पद्धतींचा अवलंब केला आहे.

एकूण नऊ दर्शनं आहेत. त्यातली पहिली सहा, ज्यांना षड्दर्शन म्हटलं जातं ती अशी, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक. ही सहाही दर्शनं वेदांना प्रमाण मानतात. म्हणून त्यांना आस्तिक म्हटलं गेलं आहे. जैन, बौद्ध आणि लोकायत ही बाकीची तिन्ही दर्शनं वेदांचं प्रामाण्य मुळापासून झिडकारतात. ती नास्तिक आहेत. त्यामुळे राष्ट्र, पितृभूमी, शस्त्रास्त्रांनी देशाला मिळणारी ताकद, देशभक्ती सारख्या संकल्पना कोणत्या नास्तिकत्त्वात बसत नाही. बुद्धाचे विचार यापेक्षा वेगळे आहेत.

बाबासाहेबांचं बुद्धाशी आलेलं पहिलं एक्सपोझर हे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरूजींकडून आलं. भीमा मॅट्रीकच्या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात केळुस्कर गुरूजींना भीमाला बुद्धचरित्र भेट दिलं होतं. तिथूनच बाबासाहेबांचा बुद्धाकडे असलेला कल हळूहळू वाढत गेला. बाबासाहेबांनी बुद्धाची विचारप्रणाली ही मार्क्सच्या एकूण एका सिद्धांतांवरसुद्धा तपासून पाहिली. बुद्धाचा स्वीकार करण्याआधी ईश्वर ही संकल्पना नाकारणाऱ्या कपिलमुनींच्या सांख्य दर्शनाचा त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच बुद्धाचा स्वीकार केला.

बुद्धाचा विचार हा विज्ञानवादी आहे. तो कालसुसंगत आहे. तर्कसुसंगत आहे. त्यात कट्टरता नाही. शिवाय प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य मान्य करताना स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा आखणाऱ्या नियमांना त्यात पूर्ण स्थान आहे. बुद्ध टोकाचा विचार नाही. तो सुवर्णमध्य साधण्याचा विचार सुचवतो. बुद्धाने कधीच धर्मसंस्थापक, ईश्वरी अवतार वा ईश्वराचा पुत्र वगैरे असल्याचा क्लेम केलेला नाही. बुद्धाच्या विचारात लोकशाही आहे. पुरोगामी विचारधारा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वं बुद्धाने जगाला दिलीत. बुद्धाच्या एकुण नीतीनियमांमध्ये चर्चेला स्थान होतं. संहिता ही संविधानाचं फ्युचरिस्टिक रुप होती. यासारख्या अनेक कारणांमुळेच बाबासाहेबांनी बुद्धाचा स्वीकार केला.

मधल्या वीस वर्षांत बाबासाहेबांचा ओढा या तिन्ही धर्मांकडे गेलाच होता. शीख धर्मीयांची पाच `क` साठी असलेली सक्ती, शिखांमधे असलेली जातीव्यवस्था, कट्टरता त्यांना शिखांपासून हळहळू लांब नेत गेली. बाबासाहेबांचा काळ्या शेरवानी मधला फोटो हा शीख धर्माचा अभ्यास करतानाचा आहे.

इस्लामच्या बाबतीतही तीच गत होती. दार-उल-हरब, दार-ऊल-इस्लाम सारख्या संकल्पना त्यांच्यातील संविधानवादी माणसाला पटणं शक्यच नव्हत्या. शिवाय मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये झालेला जातींचा शिरकाव त्यांना मान्य कसा झाला असता?

हेही वाचाः धर्मांतराच्या ६२ वर्षांनंतर तरी आत्मटीकेचा प्रवाह वाढायला हवा

मी आस्तिक, नास्तिक नाही, वास्तविक आहे

धर्मांतरानंतर एका पत्रकाराने दोन प्रश्न विचारले. एक, तुमचा हा धम्म हीनयान की महायान? बाबासाहेब म्हणतात दोन्हीपैकी कोणताही नाही. याला नवयान म्हणा.

दुसरा प्रश्न. तुम्ही नास्तिक आहात की आस्तिक? बाबासाहेब म्हणाले, मी नास्तिकही नाही. आस्तिकही नाही. मी वास्तविक आहे. बुद्ध आचरण्याची गोष्ट आहे. पाळण्याची नाही.

पण १४ ऑक्टोबर १९५६ ला धर्मांतरित झालेले बाबासाहेबांचे बहुसंख्य अनुयायी अडाणी होते. पण बाबासाहेबांच्या शब्दांना प्रमाण मानून, बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरवात केली होती. त्यानंतर बाबासाहेबांनी ज्या उच्चशिक्षित लोकांवर धम्माचा रथ पुढे नेण्याची जबाबदारी सोपवली होती. ती पार न पाडता उच्चशिक्षित मंडळी गटातटाच्या राजकारणात गुंग झाली. ते सामाजिक, धम्मकार्याला गती देण्याऐवजी समाजकारणात आणि धम्मकार्यातही राजकारण शोधू लागली.

बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म या दोन्ही संकल्पनांतील मूलभूत फरक विषद केलाय.  पण बहुसंख्य तो फरक विसरलेत. धर्माचा संबंध देवाशी आहे, तर धम्माचा संबंध माणसाशी आहे. धर्म हा बुद्धिप्रामाण्य नाकारतो. धम्म बुद्धिप्रामाण्य मानतो. धर्म म्हणजे बंधन. धम्म म्हणजे स्वातंत्र्य. धर्म म्हणजे चमत्कार, भाकडकथा, दैववाद. तर धम्म म्हणजे विज्ञानवादी चिकित्सक बुद्धिनिष्ठा.

बाबासाहेबांनी धर्म आणि धम्मात केलेला हा फरक नजरेआड केल्यामुळेच आज बौद्ध समाज पुन्हा एकदा जीर्ण शीर्ण हिंदू रूढी परंपरांकडे वळलाय. बौद्धांची मानसिक स्थिती आज जुने सोडवेना आणि नवे स्वीकारता येईना अशी झाली आहे. बाबासाहेबांना बौद्ध धम्माद्वारे एक नवा समाज, नवा माणूस घडवायचा होता. जातिसंस्थेचं उच्चाटन करून सामाजिक ऐक्य निर्माण करायचं होतं. सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यायची होती. लोकशाही धर्मनिरपेक्षता बळकट करणं, हाही त्यांच्या धम्मस्वीकाराचा मूळ उद्देश होता. त्या अनुषंगाने किती प्रगती केलीय, याचं चिंतन करायला हवं. अस्पृश्यांना शतकानुशतकांच्या जोखाडातून अगदी सायंटिफिकली, पॉलिटिकल प्रोग्रामद्वारे आपल्याला बाहेर काढणाऱ्या बाबासाहेबांना ते चुकीचे की बरोबर, असे प्रश्न विचारण्याआधी थोडा विचार करायला हवा.

प्रश्न जरूर विचारला जावा. पण तो प्रश्न विचारताना आधीच एक बरोबर आणि एक चूक हे ठरवून विचारता येणार नाही. कदाचित आज मध्यमवर्गीय मानसिकता किंवा ज्याला आपण पोस्ट ग्लोबलाईज्ड माईंडसेट म्हणतो त्यात १९५६चे संदर्भ फिट बसणार नाहीत. बसूही नयेत. पण ते फिट न बसणाऱ्यांचा वर्ग बौद्धांमधे आकाराने आणि संख्येने फार छोटा आहे. बौद्ध म्हणून असलेली आयडेंटीटी ही कदाचित या वर्गाला फारशी महत्त्वाची नसेल. नसावी. त्यात फार कौतुक किंवा नुकसान नाही. पण कोणत्याही आयडेंटीटीविना जगणं, हा देशभरातल्या झोपडपट्ट्या आणि वाड्यावस्त्यांत राहणाऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि त्यांच्या मानसिक स्थैर्याचा प्रश्न आहे.

हेही वाचाः धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

मी स्वतः बौद्ध आहे. पण माझ्यासाठी बौद्ध असणं ही माझी राजकीय ओळख आहे. पण बौद्ध असल्यामुळे मला रोज उठून अमुक गाथा, पंचशील म्हटलेच पाहिजे हा अट्टहास माझ्या ठायी नाही. किंवा तो बाबासाहेबांच्या विचारधारेतही नव्हता कधीच. ती माझ्यासाठी जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती आहे. माझ्यासाठी नास्तिक असणं ही तर्काने लढण्याची, जगण्याची वृत्ती आहे. पण भारतातले बहुसंख्य नास्तिक जातप्रश्नावर भूमिका घेत नाहीत. त्यांच्या धर्मविध्वंसनाच्या भूमिका जर तरच्या आहेत. त्यांची धर्म-धम्म या संकल्पनावर समीक्षा करायची तयारी नसते. बुद्धाला विचार म्हणून न स्वीकारता त्याला धर्माची ओळख देण्याचा संकुचितपणाही त्यांच्यात असते.

बुद्ध हा तर्काने आलेला विचार आहे. म्हणून तो बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणूनच पाच हजार वर्षांचा बॅकलॉग गेल्या साठ वर्षांत बौद्धांनी निम्म्याहून अधिक फरकाने भरून काढलाय.

आता यात काही कट्टरतावादी, अतिगामी सामील आहेत. तो त्यांच्या विनाशी बुद्धीचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण संपूर्ण चळवळीला, बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या राजकीय कृतीला तर दोष देऊ शकत नाही. जर दोष द्यायचा असेल तर तुमच्याकडे वेगळा कृती आणि कार्यक्रम काय आहे?

हेही वाचाः

साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले?

साईबाबाः लोकसेवकाचा लोकदेव होतो तेव्हा

((लेखक कवी आणि सोशल मीडिया एक्स्पर्ट आहेत.))