होमी भाभांना खरंच अमेरिकेनं मारलं असेल का?

२४ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


भारताचे 'लिओनार्दो दा विन्ची' अशी ओळख असलेले आणि भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाचे संस्थापक होमी जहाँगीर भाभा यांचा आज स्मृतिदिन. होमी भाभा यांच्या नेतृत्त्वाखाली भारतातला अणुऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या आकार घेत होता. भारत-रशिया मैत्रीमुळे हे यश रशियाचं पारडं जड करेल, या भीतीनं भाभांना अमेरिकेनं मारलं, अशी चर्चा आजही कधी आडून तर कधी जाहीरपणे होत असते.

२४ जानेवारी १९६६… फ्रान्सच्या माउंट ब्लॅकच्या परिसरात मुंबईतून लंडनकडे जाणारं एअर इंडियाचं विमान क्रॅश झालं. ११७ जणांचा या अपघातात मृत्यू झाला. हा विमान अपघात भारतासाठी फार मोठा धक्का होता. कारण याच विमानातून विएन्ना इथं एका अणुऊर्जा परिषदेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. होमी भाभा चालले होते. त्यांचा या विचित्र अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच, देशात हलकल्लोळ माजला. 

भारताचा अणुऊर्जा प्रकल्प ज्या मेंदूनं उभा केला होता, तो मेंदू या अपघातानं त्या हिमच्छादित आल्प्समधे हरवला गेला. देशासाठी हे फार फार मोठं नुकसान होतं. या अपघातामागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा हात असल्याचा आरोप केला गेला. ग्रेगरी डग्लस यांनी लिहिलेल्या 'कन्वर्सेशन विथ द क्रो' या पुस्तकात सीआयएचे ऑपरेशन हेड रॉबर्ट क्रोली यांच्याशी झालेल्या चर्चेचा हवाला देत, पुन्हा एकदा या संशयाला बळकटी दिलीय.

हेही वाचा: गीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’

नक्की कोण होते डॉ. होमी भाभा? 

देशातल्या पारशी समूहाच्या योगदानाबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच आहे. अशा एका पारशी कुटुंबामधे ३० ऑक्टोबर १९०९ला होमी यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल हे टाटा समूहामधे सल्लागार होते. सधन, सुशिक्षित घरात वाढलेल्या होमी यांना विज्ञानाची लहानपणापासून आवड होती. त्यातच त्यांचं शिक्षण झालं. १९३० मधे ते केंब्रीज विद्यापीठातून इंजिनीअर झाले. १९३३ला त्यांचं 'ऑब्जर्वेशन ऑफ कॉस्मिक रेडीएशन' हे पहिलं संशोधन प्रसिध्द झालं.

१९४० मधे डॉ. भाभा भारतात परतले आणि काही काळ त्यांनी बंगळुरु इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केलं. तो काळ स्वातंत्र्य चळवळीचा टिपेचा काळ होता. देशात चले जाव आंदोलनाचा पारा चढत होता. दुसऱ्या महायुद्धाचे मळभ जगाच्या आणि देशालाही झाकोळत होते. या अशा वातावरणात डॉ. भाभा बेंगुळुरू इथं अणुऊर्जेचं महत्त्व मांडत होते.

देश स्वतंत्र झाल्यावर त्यापुढे ऊर्जेचं आणि सुरक्षेचं मोठं आव्हान असेल. अणुऊर्जा देशाला शांततामय मार्गानं सुरक्षा आणि ऊर्जा पुरवं शकते, यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच बेंगळुरू इथं त्यांनी काही शास्त्रज्ञांच्या मदतीने अणुऊर्जा संशोधनावर काम सुरु केलं. अणुऊर्जा क्षेत्रात भारतानं संस्थात्मक काम उभं करायला हवं, या दिशेनं त्यांनी टाटांसोबत संवाद साधला.

मुंबईच्या घरी 'टीआयएफआर'ची स्थापना

अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम भारतात मिळत नाही, पण भारतात मुबलक प्रमाणात असलेल्या थोरियमचं रूपांतर युरेनियमधे करता येतं, हे भाभांना माहीत होतं. त्यांनी यावर काम करायला सुरवात केली. यासाठी त्यांनी जे.आर.डी. टाटांकडून मदत घेतली. टाटांनीही त्याला मोकळ्या हातांनी मदत केली. देशाच्या भविष्यासाठी स्वातंत्र्य मिळण्याआधीपासून, टाटा आणि भाभा या दोन पारशी द्रष्ट्यांनी 'टाटा फंडामेंटल रिसर्च सेंटर'ची पायाभरणी केली.

१ जून १९४५ पासून बेंगळुरूतून संस्थेचं काम सुरू झालं होतं. पण ही संस्था मुंबईत सुरू होणं अपेक्षित होतं. त्यासाठी मुंबईत संस्थेकडे हक्काची जागा नव्हती. त्यासाठी होमी भाभा यांनी आपला जन्म ज्या वास्तूत झाला त्या त्यांच्या कौटुंबिक घरामधे ही संस्था सुरू करण्याबद्दल विचारलं. औपचारिकता पूर्ण झाल्या आणि डिसेंबर १९४५ पासून पेडर रोड इथल्या 'केनिलवर्थ' या भाभांच्या बंगल्यातून 'टीआयएफआर'चं काम पूर्णपणे सुरू झालं. आजही पेडर रोडला 'केनिलवर्थ' या इमारतीबाहेर या घटनेची आठवण करून देणारा शीलालेख पाहता येतो.

१९ डिसेंबर १९४५ला झालेल्या संस्थेच्या कार्यक्रमात भाभा म्हणाले होते की,  आज विज्ञानानं माणसाच्या शारिरीक आणि सामाजिक अशा दोन्ही दृष्टिनं स्वातंत्र्यांच्या नव्या शक्यता दाखवल्या आहेत. अणुऊर्जेवरचं प्रभुत्व आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे १०० वर्षांनंतरचं जग पूर्णपणे वेगळं असेल. त्यासाठी भारतानं सज्ज राहायला हवं'. डॉ. भाभा यांचे विचार आज ७७ वर्षानंतर ऐकतानाही ते किती दूरचा विचार करत होते, याचा अंदाज येतो.

हेही वाचा: ताप मोजणाऱ्या बंदुकीनं कोरोना वायरसवर अचूक निशाणा साधता येईल?

अणुऊर्जा आयोगाची स्थापना आणि अणुबॉम्ब

टीआयएफआरची स्थापना जून १९४५ मधे झाली आणि ऑगस्ट १९४५ मधे अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर करून जपानमधली हिरोशिमा आणि नागासकी ही दोन शहरं उध्वस्त केली. साऱ्या जगानं अणऊर्जेचा भयानक आणि जगाचा विनाश करणारं रूप पाहिलं. पुढे १९४७ मधे भारत स्वतंत्र झाला आणि याच अणऊर्जेचं विधायक रूप दाखवण्यासाठी १९४८ मधे पंडित नेहरू यांनी अणुऊर्जा आयोग स्थापन करण्याचं ठरवलं.

या अणुऊर्जा आयोगाचं अध्यक्षस्थान डॉ. होमी भाभा यांना देण्यात आलं. डॉ. भाभांच्या प्रयत्नामुळेच १९५६ मधे मुंबईजवळच्या ट्रॉम्बे इथं 'अप्सरा' ही देशातलीच नाही तर आशियातली पहिली अणुभट्टी उभारण्यात आली. त्यानंतर 'सायरस' आणि 'झर्लिना' या अणुभट्ट्याही उभारण्यात आल्या. या गोष्टी भारताच्या अणुऊर्जा विकासातला एक मैलाचा दगड ठरल्या. अणुऊर्जेचा वापर शेती आणि वैद्यकिय क्षेत्रातही व्हायला हवा यासाठी ते आग्रही होते. अणुऊर्जेव्यतिरिक्त भाभा यांनी स्पेस सायन्स, रेेडिओ अॅस्ट्रॉनॉमी, इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोबायोलॉजी यातील संशोधनालाही चालना दिली. पुढे तेे देशाचे अणुऊर्जा सचिव म्हणूनही काम करत होते.

१९६५ मधे त्यांनी ऑल इंडिया रेडियोला दिलेली मुलाखत प्रचंड गाजली. त्यात ते म्हणाले होते की, 'भारत सरकारची परवानगी मिळाली तर केवळ १८ महिन्यात आपण अणुबॉम्ब तयार करु शकतो.' त्यांच्या या वक्तव्यानं फक्त देशातच नाही तर जगभर खळबळ माजली. त्यांच्या या विधानामुळेच अमेरिकेला भारताच्या अणुकार्यक्रमाची धास्ती वाटू लागली आणि त्यातूनच पुढे त्यांचा मृत्यू झाला असा संशय व्यक्त केला जातो.

भाभांनी वेळ पाळली नसती तर….

अल्बर्ट आइन्स्टाइन, सीवी रामन यांच्यासोबत काम केलेले डॉ. होमी भाभा हे देशातले महान वैज्ञानिक होते, हे आता नव्याने सांगायला नको. नोबेल पुरस्कारासाठी त्यांना पाच वेळा नामांकित करण्यात आलं होतं. एकीकडे महान शास्त्रज्ञ असलेले डॉ. भाभा हे संगीत, उत्तम जेवण आणि बागकामातही त्यांना प्रचंड रस होता. एवढा मोठा माणूस असलेल्या भाभांकडे एकच दुर्गुण होता, तो म्हणजे वेळ न पाळण्याचा.

त्यांचं चरित्र लिहिलेल्या इंदिरा चौधरी त्यांच्याविषयी लिहितात की, प्रत्येक माणसामधे जसे चांगले गुण असतात तसे काही वाईट गुणही असतात. डॉ. भाभा हे त्यांच्या वेळ न पाळण्याबद्दल बदनाम होते. कदाचित ते त्यांच्या कामात एवढे बिझी असतील की, त्यांना वेळेचं भानही राहत नसेल. पण त्यांच्याविषयी असं बोललं जातं हे खरं. ते अनेक बैठकांना, परिषदांनाही उशिरा पोचत असत'.

डॉ. भाभांनी आपला हा दुर्गुण जपून २४ जानेवारी १९६६ला विएन्नाला जाणाऱ्या विमानात पोचण्यासाठी असाच उशीर केला असता, तर कदाचित देशानं हा थोर वैज्ञानिक गमावला नसता. अणुऊर्जा आणि विज्ञान आज ज्या टप्प्यावर उभं आहे, ते पाहताना डॉ. होमी भाभांसारखा द्रष्टा त्याचं नेतृत्त्व करत असता तर कदाचित आज देश वेगळ्या स्थितीत असता, एवढं नक्की.

हेही वाचा: 

सरकारी अधिकारी का व्हायला हवं?

मारवाडी मिठाईच्या रेसिपीतून जन्मला बेळगावचा ‘कुंदा’

जागतिक कन्या दिनः स्त्री सन्मानासाठी दाढीमिशा लावून काम करणाऱ्या शास्त्रज्ञ

गोझी ओकोन्जो : आर्थिक सत्तेच्या चाव्यांनी विकासाची दारं उघडणाऱ्या ‘आजीबाई’