शाहू महाराजांनी खरंच ब्रिटिशांना मदत केली होती?

२६ जून २०२०

वाचन वेळ : ७ मिनिटं


राजर्षी शाहू महाराजांची आज जयंती. शाहू महाराज आपल्याला कधी राज्यकर्ते म्हणून आठवत नाहीत, ते नेहमी सुधारणावादी म्हणूनच आठवतात. ते महाराज होते म्हणून त्यांच्यासाठी खालच्या जातीतल्या लोकांना प्रगतीपथावर आणणं सोपं होतं. असं वरकरणी वाटत असलं तरी त्यांनाही विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या समाजकार्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं गेलं.

महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांची चर्चा करताना ‘फुले-शाहू-आंबेडकर’ असा जोड उल्लेख करण्याची प्रथा आहे. याचं कारण असं की न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी, आगरकर यांनी पुरस्कारलेल्या सुधारणांचं बहुतांश लक्ष्य हे उच्चवर्णीय लोक होते. आणि त्या सुधारणा बऱ्याच अंशी कौटुंबिक होत्या. याउलट महात्मा फुले, छत्रपती शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेल्या सुधारणा व्यापक आणि मूलगामी होत्या.

तेव्हाच्या सामाजिक स्थानाचा विचार करता जोतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर हे शूद्रातिशूद्र जातीत मोडणारे होते. पण एका बाजूला जोतिरावांचं सामाजिक कार्य पुढे नेलं तर दुसऱ्या बाजूला डॉ. आंबेडकरांचं नेतृत्व उभं केलं. जोतिरावांचे विचार क्रांतिकारक होते. त्यांनी समाजसुधारणांचा घातलेला पाया भक्कम होता. पण साधनसामग्री आणि यंत्रणांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळं जोतिरावांचं कार्य अपेक्षेइतकं पुढं सरकू शकलं नाही.

शाहू महाराज क्षत्रिय नव्हते

शाहू महाराज स्वतः सत्ताधारी असल्यामुळं त्यांच्याकडे यंत्रणा आणि साधनसामग्री यांचा तुटवडा नव्हता. तसंच शिवछत्रपतींचे वंशज म्हणून महाराष्ट्रात त्यांचं एक वेगळंच स्थान होतं. त्याचाही त्यांना लाभ झाला. आणि दुसरं असं की जोतिरावांच्या वेळी महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज सामाजिक सुधारणांविषयी काहीसा उदासीन होता. तो शाहू महाराजांमुळे सक्रिय बनला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेनं म्हणजे राणीसाहेब ताराबाईंनी करवीर रियासती स्थापन केली. याच्या गादीवर छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचे दत्तक पुत्र म्हणजे शाहू यांना बसवलं. अगदी लहान वयात सिंहासनारूढ झालेल्या शाहू महाराजांचा स्वाभाविक समज आपण क्षत्रिय कुलावतंस आहोत, असाच होता.

ललकार्‍यातून आणि द्वाहीतून तसा उल्लेखही व्हायचा. पण आपले ब्राह्मण पुरोहित धर्मकृत्य क्षत्रियाला साजेशा वेदोक्त मंत्रांनी करत नसून शूद्रांसाठी असलेल्या पुराणोक्त मंत्रांनी करतात, याची जाणीव त्यांना राजारामशास्त्री भागवतांमुळे झाली. आणि त्यांना याचा धक्का बसला, तीच त्यांची प्रेरणा ठरली.

हेही वाचा : शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी भाषणातून दिला पुरोगामी राष्ट्रवादाचा धडा

ब्राह्मणांचा शाहू महराजांशी दुजा व्यवहार

शाहूंबरोबर पंचगंगेवर स्नान करायला येणारा ब्राह्मण अंघोळ न करताच मंत्र म्हणायचा. शूद्रांसाठी पौराणिक पद्धतीचा मंत्र असल्यामुळं स्नानाची आवश्यकता नाही. वैदिक मंत्र म्हणायचे असतील, तरच स्नानाची आवश्यकता आहे, असं त्याचं म्हणणं होतं.

हे सगळं शाहू महाराजांना समजल्यावर त्यांनी आपले सगळे विधी वेदोक्त पद्धतीनं करण्याची लेखी आज्ञा काढली. तसंच कोल्हापुरातल्या काही जणांनी वैदिक वाङ्मयात प्रवीण असलेल्या नारायणभट्ट सेवेकरी नावाच्या ब्राह्मणाकडून वेदोक्त पद्धतीनं श्रावणीही करून घेतली. या प्रकारानंतर नारायणभट्ट सेवेकऱ्यांवर सगळ्या ब्राह्मणांनी बहिष्कार टाकला. राजवाड्यातल्या नोकरीतून त्याला कमी करावं, अशी कोल्हापुरातल्या ब्रह्मवृंदाकडून मागणीही करण्यात आली. पण महाराजांनी त्याला भीक घातली नाही.

‘वेदोक्त प्रकरण’ या नावानं हे प्रकरण त्या काळी चांगलंच गाजलं. शाहू महाराज दोन्ही बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करूनच एकेक पाऊल पुढं टाकत होते. इतर ठिकाणचे मराठा संस्थानिक कोणत्या धार्मिक पद्धतीचा पुरस्कार करत आहेत, याचीही त्यांनी माहिती घेतली. त्यासंदर्भात त्यांनी सगळ्या संस्थानिकांना पत्रंही पाठवली.

समाजसुधारणा म्हणजे राजकीय सुधारणा

राजोपाध्ये आणि इतर ब्राह्मण मंडळींनी जोरदार विरोध करत महाराजांच्या क्षत्रीय असण्याबद्दल शंका उत्पन्न केल्या. दोन्ही बाजूंनी पुराव्यांवर पुरावे दाखल झाले. शेवटी महाराजांच्या आज्ञेनं राजोपाध्येंची वतनं काढून घेतली गेली. दुर्देवानं या प्रसंगी महाराष्ट्रातल्या आंग्ल शिक्षित ब्राह्मणांनीही महाराजांच्या विरोधी भूमिका घेतली. लोकमान्य टिळकांनीही या भूमिकेची पाठराखण केली. त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण काही काळ गढूळ बनलं. 

या प्रसंगांमुळेच शाहू महाराजांना पुरोहित शाहीचं स्वरूप आणि सामर्थ्य समजलं. आणि तिच्याशी झुंज द्यायला ते सज्ज झाले. खरं पाहता टिळक आणि शाहू महाराज हे दोन महापुरुष एकमेकांना पूरक ठरले असते, तर महाराष्ट्राचा इतिहासच बदलला असता. पण तसं झालं नाही. समाजसुधारणांचा राजकीय सुधारणांशी संघर्ष, ही जणू महाराष्ट्रातली ऐतिहासिक अपरिहार्यताच.

सत्यशोधक समाज की आर्य समाज?

न्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांच्यासारख्या उदारमतवादी ब्राह्मणांशी शाहू महाराज नेहमी चर्चा करत. जातिव्यवस्थेला धर्माचं समर्थन लाभलं असल्यामुळे जातिविरोधी चळवळ धर्माच्या माध्यमातून करणं अधिक व्यवहार्य होतं. जोतिरावांचा सत्यशोधक समाज हा वेदांना झिडकारणारा तर दयानंदांचा आर्य समाज वेदांना प्रमाण मानणारा  पण महाराजांनी दोन्ही पंथांना आश्रय दिला. 

दोन्ही पंथ परस्परविरोधी असल्यामुळं महाराजांनाही त्रास झालाच पण जातिविरोधी सुधारणा त्यांना महत्त्वाच्या वाटत होत्या. जातीयवादी, ब्राह्मणद्वेष्टे अशी विशेषणंही त्यांना लावली गेली. तत्कालीन वर्तमानपत्रांतूनही त्यांच्यावर सातत्यानं टीका होतहोती. कोणतीही सुधारणा करताना त्यातल्या त्यात अस्पृश्यांसाठी सुधारणा करताना सुशिक्षित माणसांचं पित्त खवळणार हे शाहू महाराजांना माहिती होतं.

हेही वाचा : शाहू महाराजांवरचं पुस्तक वाचकांच्या भेटीला आलंय? आपण वाचलंत का?

तलाठी नेमण्यास सुरवात

महाराजांनी परंपरागत कुलकर्णी वतन बंद करून त्याऐवजी नोकरदार तलाठी नेमण्याचा धडाका लावला. अस्पृश्यांनी सतत कष्टाची आणि कमी प्रतिष्ठेची कामं करायची आणि कुलकर्ण्यांनी जमाबंदीसारखं महत्त्वाचं काम करायचं? हे त्यांना पटत नव्हतं. ही रीत त्यांनी बंद केली. त्यानंतर बलुतेदारांबद्दल शाहू महाराजांनी विशिष्ट पवित्रा घेतला आणि महाराजांना वकिलीच्या सनदा दिल्या. हे काम त्याकाळी फारच धाडसाचं होतं. 

अस्पृश्यांना जी क्षेत्रं माहीत नाही त्या क्षेत्रांची दारं त्यांच्यासाठी उघडी करणं, हे शाहू महाराजांना महत्त्वाचं वाटत होतं. खालच्या जातीत जन्मले म्हणून त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता नाही, असं नाही तर त्या क्षेत्रात त्यांना संधी दिल्याशिवाय त्यांनी त्या क्षेत्राचं काम करता येणार नाही, ही भूमिका यामागे होती. त्यांनी त्यांच्या पत्नीसाठीही खालच्या जातीतला गाडीवाला नेमला आणि राजवाड्यापाशी एका अस्पृश्याला चहाचं दुकान थाटून दिलं. 

प्रत्यक्ष कृती महत्त्वाची

कोणत्याही परिवर्तनासाठी कायदा आवश्यक असतो पण तो प्रत्येकवेळी पुरेसा ठरतोच असं नाही. त्यांनी वागणुकीतून काही धडे घालून दिले. वेदोक्त प्रकरणापासून शाहू महाराजांनी अस्पृश्यविरोधी लढ्याला सुरुवात केली. तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर टीकाटिप्पणी होत गेली. पुढं जाऊन त्यांनी अस्पृश्यांच्या परिषदा भरवल्या. अस्पृश्यांबरोबर सहभोजनांचंही आयोजन केलं. हे सगळं करताना लोक त्यांच्याबद्दल काय कुजबुजत आहेत, याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.

महाराष्ट्रातलं कोल्हापूर संस्थांनच्या हद्दीतलं करवीर संकेश्वयर हे शंकराचार्यांचं पीठ. त्याला भोसले दरबाराचा आश्रय होता. हिंदू धर्मात कालबाह्य झालेल्या आणि समाजाच्या प्रगतीला अडसर झालेल्या गोष्टीचा त्याग करून त्याला नवे कालोचित स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी पाश्चा त्य विद्या प्राप्त केलेल्या शंकराचार्य या पीठावर प्रस्थापित व्हायला हवा ही शाहूंची इच्छा होती.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

क्षात्र जगद्गुरु पीठाची स्थापना

डॉ. कुर्तकोटी या उच्चशिक्षित तरुणाकडे महाराजांचं लक्ष गेलं. आणि ते शंकराचार्य झाले. पण छत्रपतींना या नव्या शंकराचार्यांकडून अपेक्षित असा अनुकूल प्रतिसाद मिळेना. वेदोक्त प्रकरण असो किंवा संस्थानांच्या हद्दीतल्या सामाजिक सुधारणांची अंमलबजावणी असो, शंकराचार्य असून अडचण आणि नसून खोळंबा ठरायला लागले.

कूर्तकोटींना दूर करणं अवघड नव्हतं. पण त्यांच्याजागी दुसरा कोणीही आला तरी वेगळं वागला नसता हे महाराजांना कळून चुकलं. प्रश्न व्यक्तीचा नसून त्या पदाला चिकटलेल्या मूल्यव्यवस्थेचा होता. ती व्यवस्था जातिभेद, अस्पृश्यता यांना स्थान देणारी होती. त्यामुळे महाराजांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या ब्राह्मणी जगद्गुरू पीठाला पर्याय शोधला.

समतेचा पुरस्कार करणाऱ्या. क्षात्र जगद्गुरुंचं पीठ निर्माण केलं. त्यांची ही कल्पना सत्यशोधक समाजाच्या ईश्वर आणि मानव यांच्यात मध्यस्थ नको, या मताशी विसंगत होती. पण समाजकारणातलं शह काटशह पद्धधतीच्या डावपेचाचा भाग म्हणून योग्यच होती.

जातिनिहाय वसतिगृहं काढली

विठ्ठल रामजी शिंद्यांसारखे निर्भीड विचारवंतच काय, पण खुद्द शाहूंच्या दरबारातले भास्करराव जाधवांसारखे विश्वासू सहकारीसुद्धा क्षात्र जगद्गुरुपीठाविरुद्ध होते. सनातनी ब्राह्मणांचा विरोध तर झाला. प्रजेला समान हक्क देण्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं, मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना दंड करण्याची तरतूद कायद्यात केली. गुणवान विद्यार्थी हेरून महाराज त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करत. पुढे नोकरी मिळेल अशी व्यवस्थासुद्धा करत.

कोल्हापूरला शिक्षणाची सोय आहे म्हटल्यावर बाहेरचे अनेक विद्यार्थी तिथं यायला लागले. सहशिक्षण एकवेळ ठीक होतं. पण एकत्र राहणं, जेवणं या गोष्टी तेव्हाच्या जातिग्रस्त समाजाच्या पचनी पडल्या नव्हत्या. महाराजांनी मग जातिनिहाय वसतिगृह काढायला जागा दिल्या. इमारती दिल्या. देणग्याही दिल्या. शिक्षण संस्था काढायला तसंच त्या चालवायला उत्तेजन दिलं.

हेही वाचा : शाहू महाराजांच्या एन्फ्ल्युएन्झा मंडळानं स्पॅनिश फ्लूला रोखून दाखवलं!

शाहू महराजांनी ब्रिटिशांना मदत केली?

ब्रिटिशांविरुद्ध जी कटकारस्थानं होतहोती, तीही महाराजांनी उघडकीला आणली. त्यांच्या या वागणुकीमुळं ब्रिटिश सरकारला एकप्रकारे मदतच झाली. त्यांच्या या ब्रिटिशप्रेमाबद्दल त्यांच्यावर टीकाही होतहोती. एका बाजूला शिक्षणविषयक सुधारणा, वेदोक्त प्रकरण यामुळं ते ब्राह्मणेतरांना प्रिय झाले.

अराजक चळवळीत ब्रिटीश सरकारला मदत केल्यामुळं त्यांना राजकीय शत्रू समजलं गेलं. स्वराज्यप्राप्तीच्या साधनांनाच शाहू महाराज विरोध करत आहेत असं बोललं जाऊ लागलं. पण याही टीकेला त्यांनी भीक घातली नाही.

‘समाजाच्या प्रगतीचा विचार करायचा असेल, तर राज्यकर्त्यांची मदत घेणं भागच आहे. हिंदुस्थानातल्या लोकशाही म्हणजे सामाजिक आणि राजकीय सत्तेच्या अभेद्य दुर्गातल्या एका विशिष्ट वर्गाचं शुद्ध आणि घातक वर्चस्व आहे. या जातिवर्चस्वापेक्षा हल्लीचा अधिकारी वर्ग मला जास्त पसंत आहे. मागासलेल्या वर्गाला शक्य तितक्या लवकर शिक्षण मिळणं आणि सामान्य जनतेची गुलामगिरी नष्ट होणं, हे मुद्दे माझ्यादृष्टीनं जास्त महत्त्वाचे आहेत. कारण माझ्या मते हिंदुस्थानातील लोकशाहीचा हाच खरा पाया आहे,’ अशी उघड भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळं अनेक गैरसमज पसरले.

शाहू महाराजांवर टीका झाल्या

स्वराज्याला त्यांचा विरोध नव्हता. ब्रिटिशांची मदत घेऊन खालच्या वर्गासाठी मूलभूत सुधारणा करण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू होता. समाजातील खालच्या जाती स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यांचे नेते त्यांच्या जातीतून निर्माण झाले पाहिजेत. त्यांना कुणाच्या तोंडाकडे पाहायला लागू नये असं छत्रपतींचं धोरण होतं. त्या धोरणाचं एक दृश्यफळ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं नेतृत्व.

महाराजांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी आणि वर्तमानपत्र चालविण्यासाठी मदत केली. अस्पृश्यांची परिषद भरवून त्यांना स्वावलंबनाचं महत्त्व पटवून दिलं. बाबासाहेबांच्या नेतृत्वगुणांचा परिचयसुद्धा करून दिला. छत्रपतींवर जातीयवादी आणि ब्राह्मण द्वेष्टे, अशी टीका होणं स्वाभाविक होतं. पण महाराजांचं धोरण हे अस्पृश्यवर्गाला न्याय मिळवून देण्याचं होतं.

नोकरांचं ज्ञान वाढवलं 

संस्थांना ५० टक्के नोकर्याण मागासवर्गीयांना राखीव ठेवण्याच्या जाहीरनाम्यात ते म्हणतात, ‘मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण-प्रभू-शेणवी-पारशी आणि दुसरे पुढे गेलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा.’ म्हणजे त्यांना विशिष्ट जात अभिप्रेत नसून पुढे गेलेल्या सर्व जाती अभिप्रेत होत्या, असं म्हणता येईल. राखीव जागांच्या बाबतीतसुद्धा पात्रतेबाबतीत त्यांचा आग्रह होता.

राखीव जागांवर जे उमेदवार भरले जातील. त्यांनी नोकरीत चांगली कामगिरी केली तर बढती द्यायची तरतूद होती. अशा नोकरांचं ज्ञान आणि बौद्धिक कुवत वाढावी असेही त्यांचे प्रयत्न होते. कुलकर्ण्यांच्याऐवजी नेमलेल्या सर्व तलाठ्यांनी दयानंदांचा ‘सत्यप्रकाश’ वाचावा, अशी सक्तीही त्यांनी केली होती. आणि या अभ्यासावर परीक्षाही घेण्यात याव्यात असंही सुचवलं. अस्पृश्यांसाठी राखीव जागांची मर्यादा केवळ तलाठ्यांपुरतीच नसून सर्व खात्यांमधे अधिकाराच्या पदापर्यंत त्याची तरतूद होती.

पुरोगामी महाराष्ट्राचं श्रेय शाहू छत्रपतींना

शाहू महाराजांनी केलेल्या सुधारणा या मूलगामी स्वरूपाच्या होत्या. आयुष्यभर आपल्या वादळी व्यक्तिमत्त्वानं महाराजांनी अनेक टीकाकार आणि विरोधक निर्माण केले. वेदोक्त प्रकरणामुळे तसंच क्षात्र जगद्गुरू पीठाच्या स्थापनेमुळे ब्राह्मणांचा सतत रोष ओढवून घेतला. तरीही एका संस्थांनच्या मोठ्या राजासारखा दिमाख न बाळगता शाहू महाराज आयुष्यभर अस्पृश्यांच्या तसेच नोकरचाकरांच्या बाबतीत आत्यंतिक दयाळूपणानं वागले.

व्यक्तिशः महाराजांचं विलक्षण चारित्र्य सामान्य माणसाला उकलण्यासारखं नव्हतं. खालच्या समाजात ते अगदी आपलेपणानं मिसळत. समाजातल्या हीन दीन जातींना अगदी प्रेरणा देण्याच्या आंबेडकरांच्या कार्याचा मूलस्रोत शाहू महाराज होते. त्यांचं सगळं कार्य पूर्ण निर्दोष होतं असं नाही. पण त्यांच्या कार्यातले पुष्कळसे दोष हे अपरिहार्यही होते.

शाहू महाराजांनी ब्रिटिशांकडून स्वतःचा कोणताही फायदा करून घेणारे नव्हते तर सामाजिक सुधारणांसाठी मदत घेणारे होते. ‘स्वतःच्या परिस्थितीबाबत लाचार न होता, स्वतःची उन्नती करा’ अस्पृश्यांच्या मनात जागृतीची ही ज्योत पेटवणारे शाहू महाराज आंबेडकरांसारख्या महान नेत्याला पुढे आणण्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व ठरलं, हे निर्विवाद सत्य आहे. महाराष्ट्राला आज पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जावं, याचं मोठं श्रेय शाहू छत्रपतींना आहे.

हेही वाचा :  

ज्ञानोबा तुकारामः जातीच्या पलीकडे नेणारा क्ल्यू 

वि. रा. शिंदेः ते रोज एकदा अस्पृश्यांबरोबर जेवत

पत्रकारितेच्या पलीकडचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर

'वारीच्या वाटेवर' ही महाकादंबरी म्हणजे भागवत धर्माची बखर

कोरोनानंतर दोन मोठी संकटं आपली वाट पाहतायत: नॉम चॉम्स्की

रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन

डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरू