आज कार्तिक वद्य त्रयोदशी. हा ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधीचा दिवस. वारकरी आज ज्ञानदेवांच्या समाधीशी लीन होण्यासाठी आळंदीला पोचतात. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबारायांमधलं भक्कम नात्याला उजळा देणारा हा लेख.
वारकरी परंपरा ही विलक्षण आत्मभान असणारी परंपरा आहे. वारकरी केवळ ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि कबीर यांनाच संत मानतात, असं निरीक्षण लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर नोंदवलं आहे. तशा अर्थाचा एक अभंगही त्यांनी उद्धृत केला. लोकहितवादींचं निरीक्षण तसं बरोबरच होतं. उपरोक्त संतांपैकी ज्ञानदेव हे भागवतधर्म मंदिराचा पाया, तर तुकोबा कळस होते.
जेणे जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा॥ या तुकोक्तिप्रमाणे भविष्यकालीन उंच आणि अवाढव्य सांस्कृतिक मंदिराचा खोल आणि भक्कम पाया ज्ञानोबांनी रचला. तुकोबा त्याचे कळस तर झालेच; पण अक्षई ते झाले। आता न मोडे रचिले॥ अशी मजबूतपणाची आत्मविश्वासपूर्ण ग्वाहीही त्यांनी दिली. अशा परिस्थितीत वारकर्यांनी ‘ज्ञानोबा तुकाराम’ असं, म्हणजेच पाया आणि कळस यांचं भजन अव्याहतपणे चालवलं असल्यास तो त्यांच्या स्वाभाविक कृतज्ञतेचा आविष्कार तर ठरतोच, पण त्याचबरोबर परंपरेने प्राप्त झालेल्या आत्मभानाची जपणूक करण्याच्या प्रयत्नाचा तो भागही ठरतो.
ज्ञानदेव - नामदेव - कबीर - एकनाथ ही आपली पूर्वपरंपरा तुकोबांनी एका खेळियात सांगून टाकली आहेच. आपल्या परंपरेचे जनक म्हणून तुकोबांना ज्ञानदेवांबद्दल अपरंपार आदरभाव होताच. देहू येथील आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या श्रीविठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार तुकोबांनी केला. हे अनेकांना माहीत आहे. त्याची नोंद तुकोबांनीच केलेली आहे. परंतु खुद्द आळंदी येथील ज्ञानदेव मंदिराचं बांधकाम ही तुकोबांनी केले हे किती जणांना माहीत आहे? गेल्या शतकात एका गॅझिटीयरमध्ये त्याची नोंद ब्रिटिशांनी करून ठेवली आहे.
वारकरी परंपरा ज्ञानदेवांची समाधी संजीवन समाधी मानते. त्यामुळे समाधिस्थ ज्ञानदेवांशी संवाद साधणे, तिच्या लेखी शक्य आहे. तुकोबांच्या काळी तसं करणारे लोक होतेही. तुकाराम गाथेतील ‘धरणेकर्याचे अभंग’ नामक जे एक प्रकरण आहे त्याचा संदर्भ हाच आहे. आपल्याला संपत्ती आणि ज्ञान यांची प्राप्ती व्हावी म्हणून बीड परगण्यातील एक ब्राह्मण आळंदीत ज्ञानदेवांच्या समाधीपुढे धरणं धरून बसला. त्याला ज्ञानदेवांनी स्वप्नात दृष्टांत दिला की तू देहूला तुकोबांकडे जा. त्यानुसार तो आला.
ज्ञानदेवांनी हा असला अधिकार आपल्याला द्यावा याबद्दल तुकोबांना कसंसंच वाटू लागलं. एका बाजूने ज्ञानदेवांची आज्ञा मोडता येत नाही आणि दुसर्या बाजूने ज्ञानदेवांनी आपल्याला हा थोरपणा देऊ केला, हा घेववत नाही, अशा द्वंद्वात सापडून त्यांनी ज्ञानदेवांची स्तुती करणारे अभंग लिहिले. हा ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्यातील परंपरामान्य संवाद. दुसर्या एका ठिकाणी अनगडशहा फकिराच्या शापाने अंगाचा दाह होत असलेले रामेश्वरभट्ट ज्ञानदेवांना साकडं घालतात. तेव्हा त्यांनाही ज्ञानदेव तुकोबांकडेच जायला सांगतात.
तुकारामोत्तर कालातही समाधी आणि प्रामाणिक भक्त यांतील संवाद खंडित झालेला नाही, असं सूचित करणारा परंपरेतला पुरावा म्हणजे, ‘विठोबा रखुमाई’ हे शब्द बाबासाहेब आजरेकर यांनी ज्ञानदेवांच्या समाधीतून ऐकले आणि तेव्हापासून हे नवं भजन संप्रदायात दाखल झालं. त्यापूर्वी केवळ ’रामकृष्णहरी’ हेच भजन रूढ होतं.
धरणेकर्याच्या प्रती तुकोबांनी जी ज्ञानदेवांची स्तुती केली त्यात त्यांनी ज्ञानदेवांना ‘ज्ञानियांचा राजा’ म्हणून संबोधले आहे. ज्ञानदेवांनी रेडा बोलवल्याचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानदेवांनी ‘वैष्णवांची मांदी’ मेळविली असे तुकोबा म्हणतात, तेव्हा ज्ञानदेवांभोवती जमा झालेल्या अठरापगड जातींच्या संतांची आठवण होते. ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानांचं सार मात्र तुकोबांनी जितक्या अचूकपणे आणि तरीही जितक्या कमी शब्दांत सांगितले आहे, तसे अजून कोणीही सांगू शकले नाही. तुकोबा म्हणतात,
तुका म्हणे हा ज्ञानाचा सागर ।
परि नेदी आगर भिजो भेदे॥
ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा सागर, पण त्याच ज्ञानदेवांना ज्ञानाच्या मर्यादा माहीत आहेत. ज्ञानाच्या सागराचे पाणी भक्तीच्या आगारात घुसले तर साराच अनर्थ व्हायचा. भक्तीचा व्यवहारच खुंटायचा म्हणून अभेदज्ञान झाल्यावरही जीवेश्वरातील भेद तसाच ठेवून ते भक्तीचा व्यवहार चालू ठेवतात, असं तुकोबा सुचवतात.
द्वैत दशेचे अंगण। तेथे अद्वैत वोळगे आपण।
भेदू तवतव दूण। अभेदासि॥
या ज्ञानदेवांच्या अमृतानुभवातील ओवीचे स्पष्टीकरण तुकोबांनी सागर आणि आगर या कोळ्यांच्या जीवनव्यवहारातील उदाहरणाने केलेलं आहे. वैष्णवांची मांदी मेळवायची, दु:खमय मानला गेलेला संसाररूपी पिंपळ सुखमय म्हणजे सोन्याचा करून टाकायचा आणि अभेदज्ञान पचवून भक्तीचा विलास सुरक्षित ठेवायचा, अशी ज्ञानदेवांची तिहेरी कामगिरी समर्पकरित्या सांगून कळसाने पायाला मानवंदना दिलेली आहे.
तुकोबा प्रत्येक महिन्याच्या वद्य एकादशीला आळंदीला जात आणि ज्ञानदेवांच्या समाधीपुढे कीर्तन करत. पंढरपूरच्या शुद्ध वारीला आळंदीच्या वद्य वारीची जोड तुकोबांनी दिली. ही नवी प्रथा त्यांनी सुरू केली. प्रत्येक महिन्याच्या वद्य एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीसमोर कीर्तन करण्याची परंपरा आम्ही देहूकरांनी गेली साडेतीनशे वर्षे जपली आहे. आमचा तो हक्क आणि कर्तव्य बनलं आहे. हे या ठिकाणी मुद्दाम नमूद करावंसे वाटते.
तुकोबांच्या पारंपरिक चरित्रानुसार त्यांच्या आयुष्यातील दोन मोठी आव्हानं ज्ञानोबारायांच्या समाधीपुढे कीर्तन करत असताना मिळाली. वह्या बुडवण्याचं आणि काया ब्रह्म करण्याचं अशी ती दोन आव्हाने होती. आळंदीला वाटचाल करत असतानांच आपल्याला बघून उडून जाणारी पाखरे पाहून
अवघी भुतें साम्या आली। देखिली म्यां कै होती॥
विश्वास तो मग खरा। पांडुरंग कृपेचा॥
असे आर्त उद्गार काढले. त्यांना तेव्हा सर्वभूतात्मैक्य भावनेचा लाभ झाला आणि उडून गेलेले पक्षी त्यांच्या अंगावर येवून बसले. थोडक्यात तुकाराम चरित्र हेच मुळी ज्ञानदेवांशी आंतरिक संबधानी गुंफलं गेलं आहे.
रामेश्वर भट हे बहुळ गावचे वतनदार. ते ज्ञानेश्वर महाराजांचे निस्सिम उपासक. त्यांचा योगाचा अभ्यासही चांगला होता. वतन सोडून त्यांनी आळंदीक्षेत्री आपले वास्तव्य ठेवले होते. माऊलींची सेवा व्हावी यासाठी तेथे ते अयाचित वृत्तीने राहत होते. त्यांना ज्ञानेश्वरांसंबंधी अत्यंत पूज्यभाव होता.
आळंदी देहूमधील अंतर अवघं नऊ मैलाचं. त्यात तुकोबांचा दर वद्य एकादशीला आळंदीला येऊन माऊलींसमोर कीर्तन करण्याचा नियम. त्यांची कीर्ती हळुहळू वाढतच होती. परत ते अभंगरचनाही करू लागले. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, ज्ञानदेव हे त्यांच्या दृष्टीने वारकरी संप्रदायाचे आदिपुरूष या भावनेनेच त्यांनी आळंदीत ज्ञानेश्वर मंदिराचं बांधकाम केलं. याच भावनेतून पूर्वी संत एकनाथांनीही समाधीचा जीर्णोद्धार केलेला होता.
महाराष्ट्रातल्या काही मंडळींना ज्ञानदेवांनी वारकरी असणं रूचत नाही. ते ज्ञानदेवांना वारकर्यांपासून दूर करू इच्छितात. वारकरी म्हणजे प्राकृत, अडाणी टाळकुटे, तर ज्ञानदेव म्हणजे तत्त्वज्ञ, योगी आणि साधक. रामेश्वरभट हे ज्ञानदेवांचे भक्त होते. परंतु वारकरी नव्हते. तुकोबांमुळे ज्ञानदेवांच्या वारकरी असण्याला उजाळा मिळतो आहे, ही त्यांच्या लेखी चिंतेची बाब होती. हे थांबणार कसं?
तुकोबांना निरुत्साहित केलं, त्यांचा तेजोभंग केला, तर हे थांबेल. तुकोबा हे वारकर्यांचे नेते होते. तुकोबा शूद्र असून कवित्व करतात किंवा त्यांच्या अभंगांमधून वेदांचा अर्थ प्रकट होतो. या गोष्टी सांगायला ठीक होत्या. पण शूद्रांनी, तुकोबांच्या जातीपेक्षाही हीन मानल्या जाणार्यांनी यापूर्वी कवित्व केलेलं होते. त्यांच्यात वेदांचा अर्थही येत होताच. मग आताच एवढी रूष्टता का? हे खरं आहे की तुकोबांनी ब्राह्मण्यावर कडक टीका केली होती. पण तशी ती एकनाथांनीही केली होती.
तुकोबा ज्ञानदेवांसह वारकर्यांची परंपरा सांगत होते. ज्ञानदेवांच्या विचारांचा अन्वयार्थ सांगत होते. आणि तो लोकांना पटत होता. ब्राह्मणांनाही तो मान्य होऊ लागला होता. रामेश्वरांना हे मान्य नव्हतं. ज्ञानदेवांचे उत्तराधिकारी म्हणून मिरवणारे हे कोण? त्यांचा अधिकार काय? असा विचार त्यांच्या मनात येणं स्वाभाविक होतं. एक तर ज्ञानदेव ब्राह्मण, तुकोबा शूद्र हा ठसठशीत भेद होताच. पण ज्ञानदेवांनी आपला अधिकार चमत्कारांनी सिद्ध करून दाखवल्याच्या कथा होत्या. तुकोबांना असा अधिकार नुसता कवित्वाने कसा प्राप्त होणार? ज्ञानदेवांसारखे काहीतरी केलं तरच त्यांना मानता येईल?
या भूमिकेतूनच रामेश्वरांनी तुकोबांना आव्हान दिलं. वह्या बुडवायला लावल्या आणि तुकोबांनी आपला शंभर नंबरी कस सिद्ध करून दाखवला. तेव्हा रामेश्वर पूर्ण वितळले. तुकोबांचे भक्त बनले. ज्ञानदेव आणि तुकोबा यांच्या चरित्रांमधलं आणखी एक साम्यस्थळ रामेश्वरांनी स्वत: अनुभवलं. तेव्हा तर ते अधिकच प्रभावित झाले. मंबाजीने बहिणाबाईंच्या गाईला आपल्या मठात कोंडून काठीने मारलं. तेव्हा ते वळ तुकोबांच्या पाठीवर उमटले. या प्रसंगी रामेश्वरभट्ट उपस्थित होते. याची नोंद बहिणाबार्ईनी आपल्या आत्मवृत्तात करून ठेवली आहे.
तुकोबांची पात्रता ज्ञानोबांइतकीच आहे याची खात्री रामेश्वरांना पटली. आता ही बाब इतरांना पटवून द्यायची आहे. परंतु इतरांना म्हणजे कोणाला? याचं स्पष्ट उत्तर म्हणजे ‘महाराष्ट्रातील ब्राह्मणांना’ असं होतं. एखाद्या माणसाची नेमकी लायकी काय, हे कळण्यासाठीही विशिष्ट पात्रता लागते. तुकारामकालीन महाराष्ट्रात ज्ञानाच्या सर्व किल्ल्या ब्राह्मणांच्याच कमरेला असल्यामुळे तुकोबा किती खोल पाण्यात आहेत हे पहिल्यांदा समजले ते ब्राह्मणांना आणि ज्यांना समजले त्यांनी सांगितले ते ब्राह्मणानांच.
तुकोबा थोर आहेत वगैरे म्हणणे वेगळे. ही इयत्ता आता रामेश्वर ब्राह्मणांना समजावून सांगतात, `म्हणे रामेश्वरभट्ट द्विजा। तुका विष्णु नाही दुजा॥` रामेश्वर भटांनी त्यांचं काम चोख बजावलं. आधी तुकोबांची परीक्षा घेतली आणि नंतर ते परीक्षेला उतरल्याचं सत्य जाहीरपणे उद्घोषित केलं. त्यात हातचे काहीही राखून ठेवलं नाही. त्यांनी तुकोबांच्या दोन आरत्याही रचल्या. तुकोबा या व्यक्तीची थोरवी गायली.
अगोदर वैष्णव नसलेले रामेश्वर जेव्हा तुकोबांच्या सामर्थ्य प्रत्ययाने आणि ज्ञानदेवांच्या स्वप्नदृष्टांताने वैष्णव झाले, वारकरी परंपरेत सामील झाले, तेव्हा वैष्णवविचार प्रकट करू लागले. रामेश्वरांची तुकोबांकडे पाहण्याची दृष्टी ही अगोदर अवारकरी, अवैष्णवी अशी होती. ती ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेशी विसंगत होती, म्हणून ते ज्ञानदेवांना बाजूला करून तुकोबांच्या अधिकाराला आव्हान देत होते.
परंतु नंतर त्याचं ‘दृष्ट्यंतर’ घडून आलं. ते वारकरी बनले. ब्राह्मण वैष्णवांचा गुरू शुद्र वैष्णव असायला हरकत नाही आणि त्याने आपल्या गुरूला नमन करायलाही हरकत नाही, असा व्यापक उदारमतवाद त्यांच्या ठायी बाणला. इतकंच नव्हे तर वैष्णवांच्या जातीची चौकशी करणं, तिचा उल्लेख करणं, हे पाप आहे. असं ते म्हणू लागले. हा जसा तुकोबांचा वैयक्तिक प्रभाव होता तसाच तो ज्ञानोबा तुकोबा या वारकरी परंपरेचाही प्रभाव होता.
आता प्रश्न असा उपस्थित होतो की तुकोबांना ज्ञानदेवांसंबंधी एवढा आदर असण्याचं कारण काय? हे कारण तुकोबांच्या गुरुपरंपरेत सापडते. तुकोबांची गुरुपरंपरा शोधायला फार दूर जायला नको. स्वत: तुकोबांचा आपली गुरूपरंपरा विशद करणारा अभंग उपलब्ध असून, तो गाथेच्या सर्व प्रतींमध्ये समाविष्ट असल्याने, त्याच्या प्रामाण्यामध्ये शंका घेता येत नाही.
राघव चैतन्य केशव चैतन्य।
सांगितली खूण मालिकेची॥
बाबाजी आपुले सांगितले नांव।
मंत्र दिला रामकृष्णहरी॥
राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी, तुकोबा अशी ही परंपरा आहे. या परंपरेवरही ब्राह्मणी प्रक्षेप म्हणून आक्षेप घेण्यात येतो परंतु तिचं सूचन करणारे उल्लेख तुकोबांच्या अभंगांमधून अन्यत्रही आढळून येतात. ते इतक्या सहजपणे आलेले आहेत की त्यांवर मुद्दाम रचल्याचा आक्षेप घेताच येत नाही.
तुकोबांच्या साक्षात शिष्या बहिणाबाई शिऊरकर देहूमध्ये तुकोबांच्या सहवासात काही वर्षं राहिल्या होत्या. त्यांनीही हीच गुरुपरंपरा सांगितली आहे. विशेष म्हणजे या परंपरेचा उल्लेख त्या चैतन्य परंपरा असा स्पष्टपणे करतात. इतकंच नव्हे तर देहूकर परंपरेतील हस्तलिखितांच्या सुरुवातीला ‘श्री राघव चैतन्य, श्री केशव चैतन्य, श्री बाबाजी चैतन्य, सद्गुरुभ्यो नम:’ असं गुरूपरंपरेचं नमन आढळतं.
तुकोबांच्या उपरोक्त अभंगात राघव चैतन्यांपूर्वीची परंपरा आलेली नाही. येथेही आपल्याला बहिणाबाईंची मदत होते. त्यातून ज्ञानदेवांचं स्थान आणि माहात्म्य समजते. बहिणाबाईंचा गुरुपरंपरा सांगणारा जो अभंग आहे. त्यानुसार उपलब्ध होणारी परंपरा अशी: आदिनाथ (शंकर), मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सच्चिदानंद बाबा, विश्वंभर, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी, तुकाराम, बहिणाबाई.
यातील आदिनाथ ते ज्ञानदेव हा भाग ज्ञानेश्वरीमुळे सर्वश्रुत आहे. तर राघव चैतन्य ते तुकोबा हा भाग स्वत: तुकोबांनीच सांगितला आहे. या साखळीतील सच्चिदानंद बाबा आणि विश्वंभर हे दुवे बहिणाबाईंकडून उपलब्ध होतात. विश्वंभर म्हणजे कदाचित तुकोबांचे आठवे पूर्वजही असू शकतील.
बहिणाबाईंनी दिलेली परंपराच बहिणाबाईंचे शिष्य दिनकवी सांगतात. तुकोबांचे उत्तरकालीन स्वप्नोपदिष्ट शिष्य शंकरस्वामी सिऊरकर हेही आपल्या संस्कृत गुरूमालिका स्त्रोतात हीच माहिती देतात. निळोबांचे पणतू पांडुरंग यांनी निळोबांचे चरित्र लिहिलं आहे. तेही याच परंपरेला दुजोरा देतात. बहिणाबाईंनी, शंकरस्वामींनी आणि दीनकवींनी दिलेल्या परंपरेशी सुसंगत आहे. पांडुरंग आणखी माहिती देतात.
त्यानुसार श्रीगोंद्याजवळील देऊळगाव येथील विप्र खंडोजी हे निळोबांचे शिष्य. निळोबांनी त्यांना अनुग्रह देताना म्हटलं होतं, `चैतन्य संप्रदाय बरा। कैलासनाथ मूळ गुरू॥` निळोबांचे चिरंजीव भिवजरबाबा खंडोबांना म्हणतात,
संख्या झाली अवतारांची। आता ऐक संप्रदायाची॥
प्रथम मच्छिंद्रनाथाची। गुरूमाऊली श्रीशंकर॥
मच्छिंद्रपासूनी बरवे। तुजपर्यंत शिष्य अकरावे॥
ऐसे ऐकोनि तेथले। धन्य म्हणे व्यासराय॥
निळोबांच्या शंकरस्वामींना उपदेश झाला तो बहुधा व्यासरायानंतर असावा. तात्पर्य, तुकोबांची गुरुपरंपरा काही लोक समजतात. त्याप्रमाणे महाविष्णू - ब्रह्मदेव - नारद - व्यास - अशी नाही. तर ती आदिनाथ - मच्छिंद्रनाथ - गोरखनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - ज्ञानदेव - सच्चिदानंदबाबा - विश्वंभर अशी आहे. पुढे राघव चैतन्यापासून ती समान आहे.
या सर्व पुराव्याला ब्राह्मणी प्रक्षेप ठरवणं, हे फारच ताणण्यासारखे होईल. या पुराव्यामुळे तुकोबांची गुरूपरंपरा ही ज्ञानदेवांचीच गुरूपरंपरा आहे हे निर्विवादपणे सिद्ध होतं. देहूकरांकडील गाथ्यांच्या हस्तलिखितांच्या सुरुवातीच्या ज्या नमनाचा उल्लेख पूर्वी केलेला आहे, त्याची सुरवात ‘श्री निवृत्तीनाथाय नम: श्री ज्ञानेश्वराय नम:’ अशी होते. राघव चैतन्यादी नावं नंतर येतात.
या परंपरेचे आदिगुरू आदिनाथ शंकर आहेत. ज्ञानोबा तिचे महागुरू आहेत, तर तुकोबा परमगुरू आहेत. तुकोबांना ज्ञानदेवांबद्दल इतका आदर का, याचं हे असं इतकं सरळ कारण आहे. आदिनाथ शंकर ही पौराणिक देवता आहे. ज्ञानदेव सर्वांत कर्तृत्ववान संत आहेत. साहजिकपणे तुकोबा त्यांना मानतात.
तुकारामोत्तर वारकरी परंपरा तुकोबांचं कर्तृत्व आणि ज्ञानदेव - तुकाराम संबंध लक्षात घेऊन तुकोबांनाही तितकंच मानते. त्या दोघांचं ‘ज्ञानबा तुकाराम’ असं भजन करते. त्यांचं वर्णन पाया आणि कळस असं करणार्या बहिणाबाईंकडून क्ल्यू घेऊन नारायणबाबा ज्ञानोबा तुकोबांची पालखी सुरू करतात. भजनही सुरू करतात. जातीपातीच्या संकुचित वर्तुळाच्या पलीकडे पोहचलेला हा विचार आहे.
(साभारः वारकरी दर्पण या त्रैमासिकाचा ताजा अंक. अंकासाठी संपर्क सचिन पवारः ९९२२७७८०४४)