डोनाल्ड ट्रम्प २०२४च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या मैदानात उतरायची तयारी करत असतानाच एका जुन्या अफेअरनं त्यांचं टेंशन वाढवलंय. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियलनं ट्रम्प यांच्यासोबतच्या शारीरिक संबंधांचा खुलासा केल्यामुळे ट्रम्प वादात सापडले होते. हे अफेअर गुंडाळण्यासाठी ट्रम्पनी स्टॉर्मीला १ कोटी दिले खरे पण हे लफडं उलटं ट्रम्प यांच्याच अंगलट आलंय.
२०१६ची अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक. डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट लढत झाली. ट्रम्पनी दिलेली 'ग्रेट अगेन'ची हाक अमेरिकनना मात्र अधिक आश्वासक वाटली. निवडणुकीत ट्रम्प विजयी झाले. पण याच काळात ट्रम्प यांचं एक जुनं अफेअरचं प्रकरण चर्चेत आलेलं होतं.
१८ मार्चला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या 'ट्रूथ मीडिया'वरून ट्रम्प यांनी आपल्याला याच प्रकरणात अटक होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ट्रम्पनी आपल्या समर्थकांनाही तयार रहायचे आदेश दिलेत. पण हे अफेअरचं प्रकरण सध्या ट्रम्पसाठी डोकेदुखी ठरताना दिसतंय.
२००६ची गोष्ट. अमेरिकेतल्या नेवादा इथं गोल्फ टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. याच टूर्नामेंटमधे अमेरिकेतली प्रसिद्ध सेलिब्रेटी मंडळी सहभागी झालेली होती. त्यावेळी अमेरिकेतलं टीवी चॅनेल असलेल्या 'एनबीसी'वर 'द अप्रेंटिस' या रिअॅलिटी शोची प्रचंड हवा होती. याच 'शो'मधून डोनाल्ड ट्रम्प प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेले होते.
हेच ट्रम्प २००६ची गोल्फ टूर्नामेंट बघण्यासाठी नेवादात आले होते. इथंच त्यांची गाठभेट झाली ती पॉर्नस्टार असलेल्या स्टॉर्मी डॅनियल यांच्याशी. स्टॉर्मी तेव्हा २७ वर्षांच्या होत्या. पहिल्याच भेटीत डोनाल्ड ट्रम्पनी स्टॉर्मीला टीवी शोमधे अभिनेत्री म्हणून संधी द्यायचं आश्वासन दिलं होतं. पुढे दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांच्या अफेअरची चर्चा होऊ लागली. वेळोवेळी ट्रम्पही स्टॉर्मीला टीवी शोचं आश्वासन देत राहिले. त्याच काळात दोघांमधे शारीरिक संबंध आले.
ट्रम्पनी दिलेलं आश्वासन मात्र हवेतच राहिलं. पुढे दोघांचा कॉण्टॅक्ट आणि भेटीगाठीही थांबल्या. मधल्या काळात हे सगळं प्रकरण बाहेर काढायचा प्रयत्न स्टॉर्मीनं केला पण तोपर्यंत ट्रम्प अमेरिकन राजकारणात स्थिरस्थावर झालेले होते. अशातच २०१८ला स्टॉर्मीनं अमेरिकेतलं न्यूज मॅगझीन '६० मिनिट'ला एक इंटरव्यू दिला. या इंटरव्यूनं अमेरिकाच नाही जगभरात खळबळ उडवून दिली होती. कारण याच इंटरव्यूमधून स्टॉर्मीनं पहिल्यांदाच ट्रम्प यांच्यासोबतचे शारीरिक संबंध उघड केले होते.
हेही वाचा: ट्रम्प हरलेत, ट्रम्पवाद अमेरिकेत बोकाळलेला आहेच
जानेवारी २०१७ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर वर्षभरातच आलेल्या या इंटरव्यूमुळे ट्रम्प यांच्या प्रतिमेला धक्का बसणार होता. महिलांबद्दलची ट्रम्प यांची आक्षेपार्ह वक्तव्य आधीच चर्चेत होतीच. त्यावरून त्यांना टीकेचा सामनाही करावा लागला होता. पण स्टॉर्मी यांचा इंटरव्यू येणं म्हणजे भडका उडवणारं होतं आणि झालंही अगदी तसंच!
स्टॉर्मीना तोंड बंद ठेवण्यासाठी आधीपासूनच धमकावलं जात होतं. त्यासाठी त्यांना १ कोटी अमेरिकन डॉलर्सची ऑफरही देण्यात आली होती. आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करून त्यांनी पैशाची ऑफर स्वीकारलीही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प जिंकल्यामुळे दबावही स्टॉर्मीवर आलेला होता. त्यामुळेच त्यांनी काहीकाळ शांततेचं धोरण स्वीकारलं. पण २०१८ला '६० मिनिट' मॅगझीनला स्टॉर्मीचा इंटरव्यू आला आणि ट्रम्पचं टेंशन एकाएकी वाढलं.
१ कोटींमधे अफेअर गुंडाळण्याचं हेच प्रकरण सध्या ट्रम्प यांच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. लग्न झालं असताना शिवाय मुलंही असताना शारीरिक संबंध ठेवल्यामुळे ट्रम्प यांच्यावर टीका होतेय. त्यामुळे हे प्रकरणही न्यायालयात पोचलंय. त्यानंतर मागच्या आठवड्यात ट्रम्पना अमेरिकेतल्या मॅनहॅटन कोर्टानं साक्ष देण्यासाठी हजर रहायचे आदेश दिले होते.
या सगळ्यात ट्रम्प यांचे वकील राहिलेले मायकल कोहेन हे केंद्रस्थानी आहेत. कारण त्यांनीच स्टॉर्मी यांच्यासोबतच्या संबंधांचं प्रकरण दाबण्यासाठी मध्यस्थी केल्याचं उघड झालंय. कोहेन यांच्याच खात्यावरून स्टॉर्मी यांना १ कोटी ट्रान्सफर करण्यात आल्याचं मॅनहॅटन कोर्टात सिद्ध झालंय. त्यासाठी कोहेननी स्टॉर्मी यांच्यावर दबाव आणला होता. आता आरोप निश्चितीनंतर हे प्रकरण न्यूयॉर्क कोर्टाच्या ग्रँड ज्यूरींकडे पोचेल.
ट्रम्प आणि वाद हे समीकरण नवं नाही. याआधीही ट्रम्प यांचे अनेक कारनामे उघड झालेत. राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या 'द ट्रम्प ऑर्गनायझेशन' या कंपनीनं बक्कळ पैसा कमवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्या इतर कंपन्यांचे आर्थिक व्यवहारही वादात सापडले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात या कंपन्यांना टॅक्समधे भरमसाठ सूट दिल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर होता. त्यामुळेच न्यूयॉर्क कोर्टानं १७ मार्चला ट्रम्पना १३० कोटींचा दंड ठोठावला.
ट्रम्पनी आता मॅनहॅटन कोर्टालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आपल्याला या प्रकरणात गोवलं जात असल्याचं म्हटलंय. पण अटकेची कोणतीही अधिकृत बातमी नसताना आणि केवळ चौकशी सुरू असताना ट्रम्पना अटकेच्या धास्तीनं घाम फुटलाय. समजा मॅनहॅटन कोर्टानं या प्रकरणात ट्रम्पना दोषी ठरवलं तर अशाप्रकारच्या गुन्ह्याचा आरोप झालेले ट्रम्प अमेरिकेतले पहिलेच राष्ट्राध्यक्ष असतील. त्यामुळे २०२४ची अध्यक्षीय निवडणूकही ट्रम्पना जड जाऊ शकते. हेच त्यांच्या भीतीचं खरं कारण आहे.
हेही वाचा:
जो बायडन टीमवर ओबामा काळाचा प्रभाव?
हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?
ट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय?
'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!
अमेरिकेत ट्रम्प निवडून येणं हीच असेल जगासाठी मोठी दुःखद बातमी