हत्ती आणि गाढव अमेरिकेच्या राजकारणात आले कसे?

०४ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत निवडणुकीची धुमधाम सुरू होती. कुणी हत्तीचा चेहरा घालून ट्रम्प यांना मत देण्याची विनंती करत होतं. तर कुणाच्या गॉगलवर गाढवाचं चित्रं पाहून हा बायडन समर्थक असला पाहिजे, असा अंदाज लोक बांधत होते. तेव्हापासूनच ही  हत्ती आणि गाढवाची भानगड नेमकी आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आज अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकाल. त्यानिमित्ताने हत्ती आणि गाढव राजकारणात कसे आले त्याची ही गोष्ट.

सगळ्या जगाचं लक्षं सध्या एकाच गोष्टीकडे आहेत. ती म्हणजे अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक. आज या निवडणुकीचा निकाल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर जो बायडन बसणार की डोनाल्ड ट्रम्प हे आज ठरेल. अमेरिकन लोकांनी दिलेल्या या निर्णयाचा जगाच्या राजकारणावरही मोठा परिणाम होईल.

गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत निवडणुकीची धुमधाम सुरू होती. राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार चालला होता. त्यांचे समर्थकही प्रचारात आपापल्या पद्धतीने प्रचारात गुंतले होते. कुणी हत्तीचा चेहरा घालून ट्रम्प यांना मत देण्याची विनंती करत होतं. तर कुणाच्या गॉगलवर गाढवाचं चित्रं पाहून हा बायडन समर्थक असला पाहिजे, असा अंदाज लोक बांधत होते. सगळ्या मीडियावरही हत्ती विरूद्ध गाढव अशी चित्रं फिरत होती.

ही चित्रं पाहणाऱ्या प्रत्येक भारतीय सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न होता. अमेरिकेच्या राजकारणात हे हत्ती आणि गाढवांची भानगड नेमकी आहे काय? तर हे प्राणी म्हणजे अमेरिकेच्या राजकीय पक्षांची चिन्ह आहेत.

हेही वाचा : आंखी दास यांच्या फेसबूक राजीनाम्याच्या निमित्ताने

दोन पक्षांची निवडणूक

अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे तिथले सर्वेसर्वा असतात. सगळ्या अमेरिकेवर, राजकारणावर, निर्णयांवर त्यांची पकड असते. हे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष राजकीय पक्षांना आधीच जाहीर करावे लागतात. शिवाय, अमेरिकेत द्विपक्षीय पद्धत वापरली जाते. संपूर्ण राजकीय पटलावर फक्त दोनच पक्षांचं वर्चस्व राहतं. हे दोन पक्ष राष्ट्रपतीचे उमेदवार जाहीर करतात.

सध्या अमेरिकेच्या राजकारणात रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक या दोन पक्षांचं वर्चस्व आहे. रिपब्लिकन पक्ष हा उजव्या विचारसरणीचा मानला जातो. अब्राहम लिंकन हे या पक्षाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. तर यंदा रिपब्लिकन पक्षाने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी दिलीय.

यांचे राजकीय विरोधक डेमोक्रेटिक पक्ष हा उदारवादी, डाव्या विचारसरणीचा मानला जातो. अँड्रू जॅकसन यांच्यापासून या पक्षाची सुरवात झाल्याचं म्हणतात. हा अमेरिकेतला सगळ्यात जुना पक्ष आहे. यंदा जो बायडन हे डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्रपतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. तर उपराष्ट्रपतीपदासाठी डेमोक्रेटिक पक्षाने भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उमेदवारी दिलीय.

जॅकऍस जॅक्सन

या दोन पक्षांचं चिन्ह म्हणून १९ व्या शतकापासून प्राण्यांचा वापर केला जातो. हत्ती हे रिपब्लिकन पार्टीचं तर गाढव हे डेमोक्रेटिक पार्टीचं चिन्ह आहे. या दोन्ही चित्रांचा जनक म्हणून थॉमस नॅस्ट या कार्टुनिस्टचं नाव घेतलं जातं. १८६२ ते १८८६ या दरम्यान हारपर्स विकली या पेपरमधे ते काम करत होते. त्यांच्या कारकिर्दीत अमेरिकेचे पहिले प्रसिद्ध राजकीय कार्टुनिस्ट म्हणून त्यांनी मान्यता मिळवली.

१८२८ च्या निवडणुकीत अँड्रू जॅक्सन यांचा डेमेक्रेटिक पक्षाचे उमेदवार म्हणून जोरदार प्रचार चालला होता. जॅक्सन या नावाशी सार्धम्य पाहून त्यांच्या विरोधकांनी त्यांना जॅकऍस हे नाव दिलं. इंग्रजीत जॅकऍस हे विशेषण अतिशय मुर्ख माणसाला संबोधण्यासाठी वापरलं जातं. गाढव किंवा पुरूषाचं ढुंगण असाही याचा अर्थ होतो. 

अशा वाईट शब्दात शब्दात खिल्ली उडवली जात असतानाही जॅक्सन यांनी त्याचं वाईट वाटून घेतलं नाही. उलट त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरमधे त्यांनी गाढव या प्राण्याचा समावेश केला. शेवटी, जॉन ऍडम्स यांना हरवत अँड्रू जॅक्सन यांनी विजय मिळवला आणि अमेरिकेचे डेमोक्रेटिक पक्षाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. पुढे १८७० मधे थॉमस नॅट्स यांनी गाढव या प्राण्याला हे डेमोक्रेटिक पार्टीचं चिन्ह म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.

हेही वाचा : अमेरिकन राजकारणाचा किस पाडणारी निवडणूक

हत्तीच्या वजनाची गोष्ट

डेमोक्रेटिक पक्षाच्या स्थापनेनंतर १८५४ मधे रिपल्बिकन पार्टीची स्थापना झाली आणि ६ वर्षांनंतर अब्राहम लिंकन हे रिपल्बिकनचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हाच गुलाम, राज्यांचे अधिकार अशा काही विषयावरून अमेरिकेत सिविल वॉर सुरू झालं. तेव्हा युद्ध दाखवण्यासाठी काही पोस्टरमधे हत्तीचा वापर होऊ लागला. नंतर १८७४ मधे थॉमस नॅस्ट यांनी हारपर्स विकलीमधून रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह म्हणून हत्तीचा वापर केला. 

सिंहाच्या वेषातलं एक गाढव जंगलातल्या प्राण्यांना घाबरवतंय असं हे चित्रं होतं. त्यात जिराफ, युनिकॉर्न, घुबड, ऑस्ट्रिच पक्षी, कोल्हा, ससा, हत्ती असे प्राणी होते. प्रत्येक प्राणी अमेरिकेतल्या राजकारणात महत्त्वाच्या असणाऱ्या एका संस्थेचं प्रतिनिधित्व करत होता. रिपब्लिकन पक्षाचा हत्ती आपलंच वजन न झेपल्याने पडतोय असं दाखवलं होतं. ‘द थर्ड टर्म पॅनिक’ असं या चित्राचं नाव होतं.

सांताक्लाॉजचं नवं रूप

हत्ती आणि गाढव यांच्याप्रमाणेच टॅममॅनी टायगर या राजकीय प्राणी आणि सांताक्लॉज आणि अंकल सॅम ही दोन प्रसिद्ध चित्रंही थॉमस नॅस्ट यांनी जगाला दिली. सांताक्लॉजला त्याचं हे आधुनिक रूप नॅस्ट यांनीच दिलं. आधी सांताक्लॉज उंच, सडपातळ दाखवला जायचा. नॅस्ट यांनी त्याला गुबगुबीत, जाडा, भरपूर दाढी मिशा असणारा केलं.

आज त्यांचा हत्ती आणि गाढव हे अमेरिकेच्या राजकारणातले महत्त्वाचे प्राणी झालेत. लोकांच्या टोप्यांवर, गॉगलवर ते आहेत. शिवाय, यावर्षीच्या निवडणुकीत तर इंटरनेटवरच्या मीमवरही ते दिसतायत. इतकंच काय, अमेरिकन लोकांच्या फॅशन आणि कपड्यांवरही त्यांचा परिणाम दिसून येतो. तेव्हा आता सत्ता हत्तीकडे जाणार की खुर्चीवर गाढव बसणार हे पहावं लागेल.

हेही वाचा : 

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

तालिबानशी शांतता चर्चेने अफगाणी महिला का अस्वस्थ आहेत?

ब्लॅक लाईव्ज मॅटर चळवळीपासून भारतीय लोक दूर का राहतात?

अर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?