विनोबा भावे : सुळी दिलेले संत (भाग ३)

१५ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : १२ मिनिटं


विसाव्या शतकातल्या भारतावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या महामानवांपैकी एक म्हणजे विनोबा भावे. दीर्घकाळ विनोबांच्या सहवासात राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा विनोबांविषयी इनसाइट देणारा हा सविस्तर वैचारिक पट तीन भागांत.

विनोबांचा हा अहिंसक प्रेमभाव डाकूंना समजला, त्यांनी विश्वास ठेवला. आपल्याला तो समजला नाही. याची कसोटी केव्हा झाली? भ्रष्टाचार आणि हुकुमशाही विरुद्ध जयप्रकाश नारायण यांनी संघर्ष सुरु केल्यावर ‘इंदिरा विरुद्ध जयप्रकाश’ असं द्वंद्व उभं राहिलं. आमच्या पिढीला हे द्वंद्व खूप आकर्षक वाटलं. जेपींच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आमच्यासारख्या विनोबांना प्रश्न केला की तुम्ही आमच्या बाजूचे की तिकडचे?

जयप्रकाशवादी की इंदिरावादी?

तेव्हा आमची मनोवृत्ती ही जॉर्ज बुश सारखी होती. दोज हु आर नॉट विथ अस, दे मस्ट बी विथ अवर एनिमीज. म्हणून आम्ही विनोबांना विचारत होतो की तुम्ही जयप्रकाशवादी की इंदिरावादी? पण यापेक्षाही एक उंच भूमिका असू शकते, ती म्हणते दोघंही माझेच. दोघांचे मतभेद आहेत. जयप्रकाश आणि इंदिरा यांच्या भूमिका वेगळ्या आहेत म्हणून काय मी एकाला परका मानू, टाकून देऊ?  हे एखाद्या आईच्या दोन मुलांत मतभेद झाले आणि आईला विचारत आहेत की तू कोणाच्या बाजूला? आई काय उत्तर देणार?

याच लेखाचा मागील पहिला भाग इथे वाचा, विनोबा भावेः सुळी दिलेले संत (भाग २)

याच लेखाचा मागील दुसरा भाग इथे वाचा, विनोबा भावेः सुळी दिलेले संत (भाग ३)

आम्हाला तो प्रश्न पडला नाही कारण आम्हाला मातृहृदय नव्हतं. आम्हाला साम्यदृष्टी नव्हती. जो आम्हाला पटला त्या पक्षात आम्ही पटकन उभे राहिलो. पण ज्याला साम्यदृष्टी आहे, जो अधिक उंच पातळीवर उभा आहे, मातृहृदयाने तो दोघांनाही म्हणतोय की तुम्ही माझेच, तो म्हणेल मी केवळ एका पक्षाच्या बाजूने उभा नाही. त्यांच्यातला अंतर्गत संघर्ष हा माझा मार्ग नाही. हा प्रश्न मी अहिंसा आणि प्रेमाने सोडविणार. प्रतिपक्ष न कल्पिता मी सत्य शोधणार. 

अन्यायाशी लढल्याने निरगाठ पक्की होते. विनोबांचं हे वेगळंच लॉजिक आहे. त्यांच्या ‘मधुकर’ पुस्तकात ‘जशास तसे’ नावाचा एक निबंध आहे. तो आम्हाला शाळेत अभ्यासाला होता. विनोबा त्यात सांगतात, तलवारीने तलवारीशी युद्ध करता येत नाही. आपण तलवार कधी खेळलो नाही. त्यामुळे आपण ‘तलवारीला तलवारीने उत्तर’ असा शब्द प्रयोग वापरतो. जे खरंच तलवार खेळले त्यांना माहीत आहे की तलवारीला उत्तर ढालीने देतात. आगीचं उत्तर आगीने आपण कधी देतो का? आगीचं उत्तर आपण पाण्याने देतो. त्याचप्रकारे क्रोधाचं आणि द्वेषाचं उत्तर आपल्याला प्रेमानेच देता येतं. क्रोधाने क्रोध वाढतो, उत्तर कुठे मिळतं? म्हणून ‘जशास जसे’ नाही, ‘जशास तसे’! 

त्याच न्यायाने अन्यायीला शत्रू कल्पून त्याच्याशी लढल्यास निरगाठ पक्की होणार. प्रश्न सुटणार नाही. लढून जिंकण्याचा विखारी आनंद त्यातून कदाचित मिळेल. ‘इंदिरा चुकली असेल, भ्रमित झाली असेल पण तिला मी शत्रू मानणार नाही. तिला मी परकी कल्पणार नाही.’ विनोबांची ही भूमिका संधिसाधूपणा नव्हती. हा साधुपणा होता. हे विनोबांचं साधुत्व होतं. 

अतिशय उंच पातळीवरील आध्यात्मिक आणि विशाल मनाची ती भूमिका होती. आम्हाला समजली नाही. त्यांच्या हेतूवरच आरोप झालेत. विनोबा शासनमुक्त होते. पण आम्ही असे समजलो की ते सरकार धार्जिणे आहेत. आम्ही असं समजलो की ते इंदिरा गांधींच्या बाजूने आहेत. त्यांची ती अहिंसा होती, समदृष्टी होती, परम साम्य होतं. आमचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. 

आता चाळीस वर्षांनंतर मी या घटनेकडे मागे वळून बघतो तेव्हा हे लक्षात येतं की तेव्हा जयप्रकाश हे लोकशक्ती जागृत करून भ्रष्टाचार आणि लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रश्न सोडवू पहात होते. तर विनोबा आत्मशक्तीच्या प्रभावाने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते. या दोन भूमिका विरोधी आहेत, असं आम्ही कल्पिलं. वस्तुतः त्या विरोधी नव्हत्या, पूरक होत्या. 

लोकशक्ती विरुद्ध आत्मशक्ती अशी स्थिती नव्हती तर लोकशक्ती आणि आत्मशक्ती अशी स्थिती होती. पण त्यांची भूमिका आमच्या छोट्या बुद्धीला समजली नाही. द्वंद्व आमच्या मनात होतं, आम्हाला तसंच दिसलं. आम्ही म्हटलं, एक तर त्या बाजूला उभे राहा किंवा त्या बाजूला. विनोबा अहिंसक आणि लोकशाहीवादी होते. संघर्षाचा मार्ग हा आदर्श सत्याग्रह नाही अशी त्यांची तात्विक भूमिका होती. पण तरी ‘विवेकाने निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य’ म्हणून विनोबांनी आपल्या अनुयायांना ‘कुठलीही हिंसा करणार नाही’ या अटीवर जयप्रकाशांच्या सत्याग्रहात सामील होण्याची अनुमती दिली. पण त्याच वेळी त्यांनी इंदिरा गांधींशी संवाद सुरू ठेवला. 

आणीबाणी पर्व

विनोबा संत होते आणि आम्ही त्यांच्याकडून राजकीय भूमिका मागत होतो - तुम्ही इंदिरेचा धिक्कार करा. पण या संघर्षातून जेव्हा आणीबाणीची हुकुमशाही आली तेव्हा मात्र आम्ही आमच्या घरात किंवा विद्यापीठात लपलो. आपण घेतलेल्या संघर्षाच्या मार्गाचे जे काही अवांछित आणि अटळ दुष्परिणाम होते, ते स्वीकारण्याचं शौर्य आम्ही दाखविलं नाही.

लहान मुलासारखी आम्ही विनोबांकडून मागणी करायला लागलो, ‘विनोबा, आता आणीबाणीवर तुम्ही काही तरी उपाय करा. यातून मार्ग काढा. आता तुम्हीच प्रश्न सोडवा.’ एवढंच नाही, तर हा प्रश्न आम्हाला जी पद्धत हवी आहे त्या पद्धतीने सोडवा. आंदोलन करा, सत्याग्रह करा, इंदिराचा विरोध करा आणि तुरुंगात जा. तरच तुम्ही खरे सत्याग्रही.’ आमच्या छोट्या व्याख्या, आमचे छोटे आग्रह! 
प्रश्न आम्ही निर्माण केले. विनोबा आम्हाला वारंवार सांगत होते की सत्याग्रहाने प्रश्न सोडवण्याची ही जागा नाही. सत्याग्रह मलाही समजतो. देशात शत्रुत्व निर्माण न करता अहिंसक मार्गाने हा प्रश्न सोडविला पाहिजे, असं त्यांना वाटत होते. खरं म्हणजे You can not solve a problem by the same level of intellect, which created the problem in the first place, असं एक सर्वमान्य सूत्र आहे. 

द्वैत आणि शत्रुत्व कल्पिण्याच्या दोन्ही बाजूंच्या ज्या वृत्तीने शेवटी आणीबाणीची हुकुमशाही आली ती त्याच पद्धतीने सोडवा ही आमची बालिश मागणी होती. विनोबांनी त्याला आपल्या सौम्य सत्याग्रहाच्या पद्धतीने हाताळलं. पण आम्ही त्यांना ‘सरकारी संत’ म्हणून जाहीर करून टाकलं. 

आईचा अबोला होता तो

खरं म्हणजे परिस्थितीनुसार पक्ष बदलणारे आम्ही. आम्ही म्हणजे महाराष्ट्रातले बुद्धिवंत. पण जे तत्वनिष्ठ आणि समदृष्टीने अचल राहिले त्या विनोबांना मात्र आम्ही संधिसाधू आणि पळपुटे म्हटलं. साहित्य संमेलनासाठी २५ लाखाची भीक मागत आम्ही शासनाच्या मागे फिरतो आणि स्वतःला साहित्यिक म्हणवतो. आणि ज्या विनोबांनी आयुष्यात शासनाचा एक पैसा घेतला नाही, बारा बारा तास मजुरासारखं श्रम करून आपली रोटी कमविली, ते विनोबा सरकार धार्जिणे! 

आणीबाणीविरुद्ध यदुनाथ थत्तेंची साधना आणि दुर्गा भागवत ही दोन उज्वल उदाहरणे सोडली तर कोणीही आवाज उठविला नाही. सर्व बुद्धिवादी सोयीस्कररित्या भीतीने चूप होते. विनोबांनी आणीबाणीचा निषेध म्हणून मौनाचा सत्याग्रह सुरू केला. पण आम्हाला अपेक्षा होती की विनोबांनी ‘मुर्दाबाद’ अशी घोषणा द्यावी. विनोबांनी खरं तर मौन धारण करून सूक्ष्म सत्याग्रहाचा संदेश दिला. ते एका आईचं मौन होतं. आईने अबोला धरला तर किती परिणाम होतो हे आपल्याला माहीत आहे. 

पण विनोबांचा हा सूक्ष्म सत्याग्रह आम्हाला समजलाच नाही. त्यामुळे आम्ही विनोबांना ‘मौनीबाबा’ म्हणून हिणवलं. खरं म्हणजे विनोबांनी जेव्हा मौन सोडलं आणि त्यांच्या `मैत्री` या मुखपत्रात आणीबाणीवर टीकात्मक लिखाण प्रकाशित झालं तेव्हा ते मुखपत्रच शासनाने जप्त केलं. विनोबा आणीबाणीविरोधात आपल्या मौन भाषेत बोलले. पण विनोबा सरकारी संत हा आम्ही त्यांच्यावर ठपका ठेवला. 

एस. एम. जोशींसारखे संत राजकारणी रात्री १२ वाजता महाराष्ट्रातल्या एका थोर बुद्धिवंत प्राध्यापकाच्या घरी निवासासाठी पोचले. पण एस. एम आले, आणीबाणीमधे आले, हे झेंगट घरात कशाला म्हणून रात्री बारा  वाजता घराचं दार बंद करून एस. एम. ना अंधारात लोटणारे ते प्राध्यापक मात्र महाराष्टातले बुद्धिवंत! यात एक गोष्ट मी अधोरेखित करतो की या सगळ्या वादात मीदेखील विनोबा विरोधी होतो.  

दोन संतांचा संवादाचा प्रयत्न

इंदिरा गांधींमधे हुकुमशाही वृत्ती होतीच. पण त्या चवताळलेल्या वाघिणीला लाल झेंडी दाखवून आणखी आक्रमक करणं निरर्थक होतं. म्हणून भारतातील दोन संत महापुरुषांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. एक विनोबा आणि दुसरे जे. कृष्णमुर्ती. पुपुल जयकर या जे. कृष्णमुर्ती यांच्या खूप जवळच्या होत्या आणि त्या इंदिरा गांधींच्या बालमैत्रीण होत्या. 

पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींचं अतिशय सुंदर चरित्र लिहिलं आहे. त्यामधे त्या वर्णन करतात. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी मानसिकदृष्ट्या एकट्या आणि असुरक्षित झाल्या आहेत. जे. कृष्णमुर्ती इंदिरा गांधींशी वारंवार संपर्क, संवाद करत आहेत. निरोप पाठवत आहेत. तसंच इंदिरा गांधीदेखील विनोबांना भेटायला यायच्या किंवा विनोबादेखील त्यांना निरोप पाठवायचे. 

त्या दोघांनी जाहीर टीका करून त्यांना अजून असुरक्षित करण्याचा धोका घेतला नाही. त्यांना समजावलं, आश्वस्त केलं. अत्याचाऱ्याला देखील आपलं म्हणायला जास्त मोठं शौर्य लागतं. जो अत्याचारी आहे, त्याचा निषेध करणं तुलनात्मक दृष्ट्या सोपं आहे. तुम्ही आणि मी तेच करतो. किंवा तेवढं देखील धैर्य दाखवत नाही. पण ही अत्याचारी व्यक्ती चुकली आहे, पण ती माझीच आहे, असं म्हणून तिला आपलं म्हणून उचलायला मोठं धैर्य लागतं. निंदा नालस्ती स्वीकार करायची तयारी लागते. 

हे धैर्य या दोन संतांमधे होतं. या दोघांनी तिच्या अंतरात्म्याला आवाहन केलं. ‘निवडणुका लवकरात लवकर घे, सर्व राजबंद्यांना सोड, लोकशाही हक्क पुन्हा प्रस्थापित कर’. हे तिला वारंवार समजावलं. इतर अनेक कारणांसोबतच या दोघांचाही परिणाम इंदिरा गांधींवर झाला. त्यांनी निवडणुका घेतल्या आणि त्या पराभूत झाल्या. हे सर्वांना माहीत आहे. 

नीलकंठासारखं विष धारण केलं

पराभूत झालेल्या इंदिरा गांधींची प्रतिक्रिया पुपुल जयकर यांनी नोंदविली आहे. मार्च १९७७. पुपुल त्यांना भेटायला गेल्या. इंदिरा गांधी हरलेल्या होत्या. घरी एकट्या बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘पुपुल, आय एम रिलीव्ड’. मी मोकळी झाले. रागावलेल्या नव्हत्या. चिडलेल्याही नव्हत्या. जणू त्या म्हणाल्या, माझं चुकलंच होतं. माझ्या चुकांच्या पिंजऱ्यात मीच कैद झाली होती. वाघावर स्वार झाली होती मी, पण उतरायचं कसं माहीत नव्हतं. आज मी त्या चुकीच्या भूमिकेतून खाली उतरले. 

त्या `आय एम रिलीव्ड` म्हणाल्या. पण आम्ही मात्र स्वतः कमावलेला नव्हता त्या विजयाचा जल्लोष केला. आणि विनोबांना कॉम्प्रोमाईझ सेंट, अधःपतित संत असं जाहीर केलं. पण नीलकंठाने जसं गळ्यात विष धारण केलं. तशी आमची टीकाही या बैराग्याने शांतपणे धारण केली. 

आज मी हे सगळं पश्चातापदग्ध होऊन बोलतोय. कारण त्या वेळी विनोबांवर टीका करण्यात अख्ख्या महाराष्ट्रासोबत मी देखील सामील होतो. १९७६ मधे आणीबाणी सुरू असताना विनोबांच्या पवनार आश्रमामधे सर्व सेवा संघाचं संमेलन झालं. जयप्रकाशांसह प्रमुख नेते तुरुंगात होते. माझे आई वडीलही तुरुंगात होते. आणीबाणीवर काय उपाय काढता येईल, यावर या संमेलनात चर्चा सुरू होती. 
तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ अशोक आम्ही दोघांनी भर संमेलनात विनोबांच्या कुटीसमोर विनोबांचा निषेध केला. हातामधे फलक धरले, ‘सगळे तुरुंगात असताना विनोबा आणि सर्व सेवा संघ मौन का आहेत? तुम्ही निषेध करा.’ विनोबांनी आमच्याकडे हसून दुर्लक्ष केलं. त्यांचं हृदय मोठं होतं. 

आणीबाणी सुरूच होती. दरम्यान मी राणी सोबत लग्न करायचं ठरवलं. तुरुंगात नेऊन राणीची आईवडिलांशी भेट घालून दिली. नंतर सर्वप्रथम मी राणीला विनोबांकडे घेऊन गेलो. कितीही राग असला तरी आईवडिलांच्या खालोखाल मला दुसरी संमती विनोबांची हवी होती. म्हणालो, `विनोबा, ही राणी आहे आणि आम्ही दोघं लग्न करतोय. तुमचा आशीर्वाद हवा.` त्यावेळी विनोबा म्हणाले,  `अरे, रामदास जेव्हा बोहल्यावर चढत होते तेव्हा काय म्हटलं तुला माहीत आहे का? सावधान!` 

मला सावधान म्हणून त्यांनी हसून टाळी वाजविली. राणीला ते आवडलं नाही. लग्नासाठी आशीर्वाद देण्याऐवजी म्हणतात, सावधान! आता असं वाटतं की वस्तुतः ते मला नव्हे, राणीला सावधान करीत असावेत. कारण ते मला बऱ्यापैकी ओळखत होते. 

विनोबांना पुन्हा शोधावं लागेल

मी महाराष्ट्राचाच प्रतिनिधी. तुमच्यासारखाच वागलो. विनोबांना दोष दिला. त्यांच्यापासून दुरावा केला. शेवटची काही वर्षे तर मी त्यांच्याकडे जाणं फारच कमी केलं होतं. तशा स्थितीत अचानक त्यांनी देहत्याग केला. माझ्या जीवनातला विनोबा अध्याय संपला. किंवा तसं मला वाटलं. 

पुढे १५ वर्षांनी जेव्हा मला हृदयरोगाचा झटका आला. एन्जिओप्लास्टी टेबलवर माझी कोरोनरी आर्टरी फाटली. मृत्यूच्या कड्यावर उभा होतो. पुढच्या क्षणी आता मी जाणार! त्या क्षणी त्या अंधारातून अचानक ईशावास्यच्या शब्दांतून विनोबा मला परत भेटले. 

ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, 
पूर्णापासून पूर्ण निष्पन्न होते. 

विनोबा मला ते वैश्विक अद्वैत सांगत होते. काही क्षण मी तशा आध्यात्मिक भूमिकेत होतो. त्या दर्शनाने त्या क्षणी मला उचलून घेतलं, सांभाळून घेतलं. त्यानंतर काही काळाने परत मी तुमच्या आमच्यासारखा झालो. 

हृदयरोग आणि मृत्यूपासून मुक्तीच्या शोधात मला विनोबा परत सापडले. त्यामुळे मला महाराष्ट्राला सांगावंसं वाटतं, मित्रांनो, आपल्याला विनोबांना परत शोधावं लागेल. अंतर्मुख होऊन शोधावं लागेल. स्वतःच्या भिंगातून आम्ही विनोबांना तपासतो. पण आपल्या चष्म्याचे रंग कोणते आहेत हे आम्हाला आधी तपासावं लागेल. आपल्या पूर्वदूषित विचारांतून आपण विनोबांना बघतो आहोत का ? 
आता चाळीस वर्ष होऊन गेलीत. त्या वेळच्या सगळ्या द्वंद्व आणि विकारांतून बाहेर पडून आता आपण सत्याचा शोध घेऊ शकलो पाहिजे. तेव्हा नेमकं काय घडलं? विनोबांची नेमकी काय भूमिका होती? आमची काय भूमिका होती? मला कधी कधी शंका येते की असं तर नाही ना घडलं, की विनोबांचा रथ कायमच जमिनीच्यावर होता. आम्हाला ते फार लाजिरवाणं वाटत होतं. आम्ही ओरडलो, ‘असा कसा हा एकटा अम्लान, योगी, राजहंस? ओढा त्याला खाली. आणा आपल्या पातळीवर’. 

अशीच गर्दी दोन हजार वर्षांपूर्वी जेरुसलेम शहरात गोळा झाली होती. ‘जीझस शत्रूवर प्रेम करायला सांगतो. पापी वेश्येचाही उद्धार करतो. पकडा आणि मारा याला. फाडा याची वस्त्रं, ठरवा याला गुन्हेगार. चढवा याला सुळावर! ’ गर्दीने निकाल दिला. दोन हजार वर्षांनंतरही आमची तीच मानसिकता आहे.      

बुद्ध असो, ख्रिस्त असो, ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, गांधी असो आम्हाला ते सहन होत नाहीत. आम्ही त्यांना बदनाम करतो. सुळावर चढवतो, आम्ही त्यांना गोळ्या घालतो. आज आम्ही स्वतःला तपासायची गरज आहे. विनोबांवर नैतिक निकाल जाहीर करण्याऐवजी आपण स्वतःचा दृष्टीकोन, त्याच्या मर्यादा तपासायची गरज आहे. विनोबांना त्याचं काही देणंघेणं नाही. ते स्थितप्रज्ञ आहेत, निर्लिप्त आहेत. ‘निंदा स्तुती न घे मौनी, मिळे ते गोड मानितो’ या वृत्तीत ते आहेत. प्रश्न त्यांच्या अपराधाचा नाही. आमच्या क्षालनाचा आहे. 

या पूर्वीही अनेकदा असं घडलं आहे. टिळकांच्या जहाल मार्गाचं अनुमोदन न केलेल्या गोखलेंना, तसेच महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनातून संकुचित राष्ट्रवादाला बळ मिळेल म्हणून असहमती व्यक्त करणारे रवींद्रनाथ टागोर यांना जनमताने अशा प्रकारच्या टीकेचं धनी बनवलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला ‘स्वतंत्र भारतात प्रांतवाद प्रबळ होणे योग्य नाही’, या भूमिकेमुळे विनोबांनी समर्थन द्यायचे नाकारलं, तेव्हा प्र. के. अत्रेंनी विनोबांना ‘वानरोबा’ म्हणून हिणवलं होतं.

प्रश्न कोणाची भूमिका चूक की बरोबर याचा नाही. मला जसं वाटतं त्या शिवाय दुसऱ्याला प्रामाणिकपणे वेगळं वाटू शकतं हे स्वीकारायला जी उदार आणि व्यक्तिस्वातंत्र्याला वाव देणारी भूमिका आवश्यक आहे, ती नसण्याचा आहे. उत्तेजित गर्दीने आणि जनमताने अनेक वेळा अशा आक्रस्ताळ्या भूमिका घेतल्या आहेत. संताना सुळावर चढवलं आहे.

अनुशासन पर्व? सत्य आणि असत्य

आणीबाणीच्या दरम्यान इंदिरा गांधींचे कट्टर समर्थक आणि सहयोगी वसंतराव साठे विनोबांना भेटायला गेले. परतल्यावर नागपूरला त्यांनी जाहीर केलं की विनोबांनी ‘अनुशासन पर्व’ असं म्हणून आणीबाणीचं समर्थन केलं. हा विनोबांवर मोठा आरोप आहे. 

माझ्या मनात आता प्रश्न येतो की साठेंना तेव्हा कोणीच कसं विचारलं नाही की विनोबा तर मौनात आहेत, सूक्ष्मात आहेत. त्यामुळे विनोबा खरंच असं म्हणाले याचा पुरावा काय? अगदी साधी पत्रकारिता होती. बुद्धिवंत म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात ही साधी विवेकबुद्धी नव्हती की ‘पुरावा काय?’ 

त्या काळी चालणाऱ्या सरकारी प्रचारात इतका अपप्रचार होता की आपण सर्वच बातम्यांवर अविश्वास ठेवत होतो. मग नेमक्या याच बातमीवर आम्ही विश्वास का ठेवला? कारण आम्हाला विश्वास ठेवायचा होता. बरं, साठे काही सत्यवचनी म्हणून प्रसिद्ध नव्हते. पण तरी साठेंवर संशय घेण्याऐवजी आम्ही त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवला. 

आश्रमवासीयांनी त्याचा प्रतिवाद केला नाही कारण विनोबा म्हणाले, असत्याचा प्रतिवाद केला तर असत्य जास्तच मजबूत होतं. असत्य त्याच्या मृत्यूने स्वतःच मरेल ही त्यांची भूमिका होती. खरं म्हणजे विनोबांना ‘तुम्ही आणीबाणीला अनुशासन पर्व का म्हटलं?’ असा प्रश्न विचारणं हे त्या इंग्रजी वाक्प्रचारासारखं आहे की ‘व्हेन डिड यू स्टॉप्ड बिटिंग युअर वाईफ?’ बायकोला मारणं तुम्ही केव्हा थांबवलं? म्हणजे बायकोला मारत होते, हे गृहीत धरूनच पुढचं स्पष्टीकरण विचारायचं. अशाच प्रकारे विनोबांना आरोपी ठरवूनच आम्ही प्रश्न विचारात होतो. सीतेला रामायणातील धोबी चरित्रहीन ठरवत होता. 
दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. दि. बा. घुमरे हे नागपूर ‘तरुण भारत’ चे अनेक वर्षे संपादक राहिले आहेत. नागपूरच्या पत्रकारविश्वात आदरणीय नाव. त्यांना सगळे मामासाहेब असं म्हणायचे.

त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. साठे जेव्हा विनोबांना भेटायला गेले तेव्हा योगायोगाने घुमरे तिथे हजर होते. तसंच विनोबांच्या सेक्रेटरी कुसुमताई देशपांडे देखील तेथे हजर होत्या. त्या विनोबांचा शब्द न शब्द जसाच्या तसा उतरवून घ्यायच्या. कुसुमताईंनी देखील विनोबाच्या अंतिम पर्वाविषयी पुस्तकात लिहिलं आहे. 

साठे भेटीचा तो प्रसंग या दोघांनी स्वतंत्रपणे विस्तृत वर्णन केला आहे. विनोबांनी आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ म्हटलं नाही. लाखभर लोक तुरुंगात डांबून ठेवले असताना साठे विनोबांना आणीबाणीमधे भारतात सगळं कसं सुरळीत सुरू आहे, हे सांगून भलावण करत होते. विनोबांचं मौन सुरू होतं. 

पुढे असलेलं महाभारत पुस्तक उघडून त्यातील ‘अनुशासनपर्व’ या एका शब्दावर बोट ठेवून विनोबांनी साठेंना हाताच्या इशाऱ्याने प्रश्न टाकला, हे काय तुमचं अनुशासन पर्व आहे? विनोबांनी उपरोधाने इशाऱ्यातून प्रश्न उपस्थित केला. आणीबाणीला प्रश्नांकित केलं. साठेंनी त्याला प्रशस्तीपत्र म्हणून बाहेर जाहीर केलं. पुढचं सर्व काम आपण सर्वांनी पूर्ण केलं. विनोबांनी केवळ एक दंतहीन स्मित केलं. 

विनोबांचं निर्वाण

१९८२ साली त्यांना एक दिवस हृदयरोगाचा झटका आला. पहिल्या दिवशी त्यांनी उपचार घेतला. आमची सहा डॉक्टरांची टीम होती. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी सांगितलं की आता इथलं कार्य संपलं. आता जाणे आहे. त्यांनी सगळा उपचार थांबवला. अन्न पाणीही घेणं थांबवलं. विनोबांच्या त्या शेवटच्या सात दिवसांत घरचा डॉक्टर म्हणून मी तिथेच होतो. 

विनोबांचा तो शेवटचा काळ म्हणजे एक माणूस जिवंतपणी कसा देहमुक्त झाला होता याचं विलक्षण प्रात्यक्षिक होतं. कणाकणाने देह मरत होता. त्यांना वेदनाही होत होत्या. त्या काळात इंदिरा गांधी त्यांना भेटायला आल्या. अन्न, पाणी, औषध घ्या म्हणून समजावलं. पण त्यांनी नाकारलं. 

डॉ. सुशीला नायर भेटायला आल्या. सुशीला बहन म्हणजे गांधीजींच्या पर्सनल फ़िजिशिअन. पन्नास वर्षांची त्यांची विनोबांशी ओळख. हा माणूस चार दिवसांपासून अन्न पाणी त्याग करून बसलेला आहे. शरीर पाण्याच्या थेंबासाठी तडफडत आहे, पण ते नाकारून निग्रहाने शरीराकडे निर्लिप्तपणे बघतात आहेत. सुशीला नायरनी जबरदस्तीने पाण्याने भरलेला ग्लास त्यांच्या तोंडापर्यंत नेला. मोह होण्याची परिस्थितीच त्यांनी निर्माण केली. पण विनोबांनी हाताने फटका मारून ग्लास खाली पाडला. संदेश स्पष्ट होता. सर्वांनी प्रयत्न थांबवले. 

हळूहळू शरीर शांत व्हायला लागलं. सातव्या दिवशी सगळंच थांबलं. श्वासही थांबला. हृदयाची गतीही थांबली. आम्ही ईसीजी मशीन लावून ठेवलं होतं. ईसीजी मधल्या रेषा मंद मंद होत गेल्या. आणि शेवटी रेषा सपाट झाली. दहा मिनिट थांबलो आणि नंतर आम्ही डॉक्टरांनी विनोबांचा मृत्यू झाला असं घोषित केलं. 

त्या दिवशी मृत्यूच्या प्रमाणपत्रावर मी केलेली सही आज निरर्थक झाली आहे. विनोबा आज शरीर रूपाने आपल्यात नाहीत. पण रोज भेटतात. त्यांच्या आईच्या मृत्युनंतर त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की, ‘आई, तू जिवंतपणी जे मला दिलस ते कुणीच दिलं नाही. पण तू मेल्यावर जे देते आहेस ते तू मला जिवंतपणीही दिले नाहीस. आत्म्याच्या अमरत्वाचा एवढा पुरावा मला पुरेसा आहे.’ जिवंतपणी विनोबांकडून मला खूप मिळालं होतं. पण त्याहूनही जास्त विनोबा गेल्यावर मला रोज त्यांच्याकडनं मिळतं आहे. 

मित्रांनो, आम्ही विनोबांवर अन्याय केला. आमच्या छोट्या बुद्धीने त्यांनी कसं वागावं याचे नियम लादले. ते तसे वागले नाहीत म्हणून त्यांना आम्ही खाली ओढलं. पण इतक्या वर्षांनंतर आता पुनर्मुल्यांकन करण्याची, विनोबांना पुन्हा भेटण्याची वेळ आली आहे. मला खात्री आहे की आम्ही आताही गेलो तरी ते मातृहृदयी विनोबा हात पसरून आम्हाला स्वीकारतील. 

नदी वाहत होती. वाहतच राहणार आहे. त्या किनाऱ्यावर जाऊन तहान भागवणे आता आपल्या हातात आहे.  

(समाप्त)

याच लेखाचा पुढचा पहिला भाग : विनोबा भावेः सुळी दिलेले संत (भाग १)

याच लेखाचा पुढचा दुसरा भाग : विनोबा भावेः सुळी दिलेले संत (भाग २)

(एमकेसीएलने तयार केलेल्या vinoba.in या वेबसाईटच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणावर आधारित हा लेख साधना साप्ताहिकाच्या सौजन्याने तीन भागांत देत आहोत.)