विनोबा भावे : सुळी दिलेले संत (भाग १)

१५ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : १५ मिनिटं


विसाव्या शतकातल्या भारतावर सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या महामानवांपैकी एक म्हणजे विनोबा भावे. दीर्घकाळ विनोबांच्या सहवासात राहिलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा विनोबांविषयी इनसाइट देणारा हा सविस्तर वैचारिक पट तीन भागांत.

माझ्या जन्मापासून ते विनोबांच्या मृत्यूपर्यंत माझं विनोबांशी नातं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर ते अजूनच दृढ झालं आहे. फक्त मधली काही वर्ष अपवाद होती. 

गांधीजींच्या आदेशावरून अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले माझे वडील वर्धा जिल्ह्यातील एका खेड्यात शेतकऱ्यांसारखं जगून ग्रामीण अर्थशास्त्राचे प्रयोग करीत होते. या प्रयोगासाठी विनोबांनी स्वतः पवनार जवळील महाकाळ गावात बारा एकर जमीन मिळवून दिली. त्यानंतर विनोबांनी त्यांच्या अनेक भाषणांत हा उल्लेख केला आहे की, ‘भूदान यज्ञात मिळालेली जमीन सर्वांना माहीत आहे, पण मी ठाकुरदास बंग यांना मिळवून दिलेली जमीन हा माझा त्या पूर्वीचा भूदान यज्ञ.’

मी काही महिन्यांचा असताना विनोबा त्या महाकाळ गावी आले होते. तेव्हा त्यांनी मला बघितलं का? विनोबा एका तान्ह्या बाळाला हात लावतील असं मला वाटत नाही. पण माझ्या सहा महिन्यांच्या डोळ्यांनी विनोबांना तेव्हा पहिल्यांदा पाहिलं असणार. त्यानंतर माझी पंधरा वर्ष विनोबा आणि गांधीजींनी स्थापन केलेल्या शाळा आणि आश्रमांत गेली. विनोबांसोबत बरेच दिवस पदयात्रेमधे मी त्यांचं बोट धरून चाललो आहे. मला त्यातच कृतार्थता वाटायची. विनोबा काय बोलत आहेत याकडे माझं फार लक्ष नसायचं. पण संस्कार घडायचा. 

त्यानंतर अनेक वर्ष विनोबांचा सहवास ते जिवंत असेपर्यंत मला वेळोवेळी मिळत राहिला. प्रायोपवेशन करून त्यांनी १९८२ मधे देहत्याग केला. तेव्हा शेवटच्या दिवसांत मी त्यांच्या जवळच होतो. विनोबांच्या मृत्यूनंतर ज्या सहा डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूच्या सर्टिफिकेशनवर सही केली त्यात मीही एक होतो. म्हणून मी म्हणालो की माझ्या जन्मापासून ते विनोबांच्या मृत्यू पर्यंत माझा आणि त्यांचा संबंध होता. विनोबांनी मला आयुष्यात भरभरून दिलं आहे. आजही देतच आहेत. रोज माझी पहाट सहसा विनोबांच्या वाचनाने होते आणि संध्याकाळ विनोबांनीच रचलेलं मराठीतलं ईशावास्य किंवा गीता प्रवचनाच्या वाचनाने होते. 

कसे होते विनोबा?

विनोबा अदृष्य राहण्याच्या कलेत फार माहीर होते. विनोबांबाबत वाचलेला एक प्रसंग सांगतो. वर्ध्याला जमनालाल बजाज यांनी आपल्या मुलांना विनोबांच्या आश्रमात ठेवले होते. कमलनयन बजाज, जे पुढे मोठे उद्योगपती झाले, ते त्या विद्यार्थ्यांपैकीच एक. खोडकर होते. एक दिवस त्यांनी पहिले की आलेलं एक पत्र विनोबांनी फाडून कचरा कुंडीत टाकलं. पत्र महात्मा गांधींचं होतं. गांधींचं पत्र विनोबांनी फाडलं याचा अर्थ गांधींनी विनोबांना पत्रात खूप झापलं असणार! कमलनयननी ते तुकडे गोळा केले, एका कागदावर नीट चिटकवले आणि पत्र वाचलं. 

त्या पत्रात महात्मा गांधींनी लिहिलं होतं, ‘तुमसे बढकर ऊँची आत्मा मैने आज तक नहीं देखी.’ गांधीजी शब्द खूप तोलून-मापून वापरणारे होते. त्यामुळे त्यांचं हे पत्र जन्मभर कुणालाही मिरवता आलं असतं. पण विनोबांनी ते निर्लिप्तपणे फाडून फेकून दिलं. गांधीजी योग्यच म्हणाले होते. नेहरूंनीदेखील एका जागी म्हटलं आहे की, ‘मी जगभर फिरतो. मोठमोठ्या लोकांना भेटतो आणि त्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो की आज(नेहरू स्वातंत्र्योत्तर काळाविषयी म्हणत आहेत) अख्ख्या जगात विनोबांच्या उंचीचा एकही दुसरा माणूस नाही.’ 

पण तो माणूस जगाला फारसा माहीत नाही. कारण विनोबा या माणसाचा बहुतांश काळ हा अप्रकाशात आणि अज्ञातातच गेला. हा मार्ग त्यांनी स्वतः निवडला होता. एकदा त्यांनी म्हटले आहे की ‘धुमसत असतांना, धूर निघत असताना दिसून पडण्याची हौस करण्याची गरज नाही; आणि अग्नि पेटेल तेव्हा प्रकाश दिसेलच.’ १८८५ ला जन्म झाला तिथपासून १९४० पर्यंतचा त्यांचा काळ हा बहुतेकांसाठी अज्ञातच आहे. गांधींच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतंत्रपणे सेवा आणि साधना सुरू आहे. 

१९४० साली गांधींनी त्यांना देशातले ‘पहिले वैयक्तिक सत्याग्रही’ म्हणून घोषित केलं. एवढंच नाही तर स्वतः लेख लिहून भारताला विनोबांची ओळख करून दिली. १९४० ते १९७० अशी ढोबळमानाने तीस वर्षे विनोबा सार्वजनिक प्रकाशात होते. त्या काळातलं त्यांचं  सगळ्यात मोठं काम म्हणजे भूदान आणि ग्रामदान. १९७० नंतर विनोबा पुन्हा सूक्ष्मात गेले, आणि १९८२ मधे महानिर्वाण असा थोडक्यात विनोबांचा जीवनक्रम राहिला. आपलं जीवन शक्यतो अप्रकाशातच ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी  केला. पण विनोबांचं दर्शन त्यांच्या कार्यात आणि साहित्यात दिसतं. त्यांच्या प्रकाशित साहित्याचा धावता आढावा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 

विनोबांचं आध्यात्मिक साहित्य

विनोबांचं साहित्य काही मुख्य प्रकारांमधे वर्गीकृत करता येतं. पहिला प्रकार आहे आध्यात्मिक साहित्य. यात शिरोमणी म्हणजे ‘गीता पंचक’. गीतेचा समश्लोकी मराठी अनुवाद जो आपल्या आईलाही समजू शकेल यासाठी त्यांनी ‘गीताई’ नावाने केला. गीताई वर त्यांनी जी प्रवचने दिली ती ‘गीता प्रवचने’ महाराष्ट्रात बऱ्यापैकी माहीत आहेत. 

पण विनोबांचं माहीत नसलेलं आणखी एक पुस्तक म्हणजे ‘गीताई चिंतनिका’. ज्यांना कुणाला गीताई आणि गीता समजून घ्यायची असेल त्यांना हे पुस्तक अतिशय सुंदर मार्गदर्शन करतं. यात विनोबा गीताईच्या एका एका श्लोकावर, एका एका शब्दावर भाष्य करीत आहेत. या शिवाय ‘गीताई शब्दकोष’ आणि ‘स्थितप्रज्ञ दर्शन’ अशी विनोबांची गीतेवरची पाच पुस्तकं. या पुस्तकांच्या रूपाने एक अद्वितीय खजिना विनोबा आपल्यासाठी सोडून गेले आहेत. 

 ‘ईशावास्य उपनिषद’ या पुस्तकाविषयी गांधीजी एका ठिकाणी म्हणतात, ‘जगातील सगळी पुस्तके नष्ट होणार असतील आणि एकच पुस्तक वाचायला मिळणार असेल तर मी ईशावास्य उपनिषद निवडेन’. त्याला पुस्तक तरी काय म्हणावं? इनमिन अठरा श्लोक. पण अख्ख्या भारतीय तत्वज्ञानाचं सार या पुस्तकात येतं. आपण सहज गाऊ शकू असा ईशावास्योपनिषदचा मराठी अनुवाद विनोबांनी केला आहे. 

माझं सौभाग्य आणि दुर्भाग्य दोन्ही सांगायचं झाल्यास विनोबांनी वर्ध्याच्या ‘सत्याग्रह आश्रम’च्या ज्या एकांत खोलीत बसून गीताई रचली, माझ्या लहानपणी त्याच खोलीत बसून पहाटे चार वाजता अंधाऱ्या प्रकाशात मी पहिल्यांदा हे ईशावास्य उपनिषद ऐकलं, म्हटलं. पण मला तेव्हा त्या जागेचं स्थानमाहात्म्य माहीत नव्हतं की गीतेच्या जन्मस्थानी बसून आपण ईशावास्य उपनिषद ऐकतो आहोत. 

अठराव्या बैलाचं कूट

एकदा गांधीजी विनोबांना म्हणाले की ‘मला सहज समजेल असं एक टिपण तू मला संस्कृत ईशावास्य उपनिषदवर बनवून दे.’ ते उपनिषद गांधींना अजून समजून सांगण्यासाठी विनोबांनी त्यावर जे भाष्य लिहिलं त्याला म्हणतात ‘ईशावास्य वृत्ती’. हे एक अद्वितीय भाष्य आहे. या शिवाय पतंजलीची जशी योगसूत्रे आहेत तशी १०८ ‘साम्यसूत्रे’ विनोबांनी संस्कृतमधे रचली आहेत. त्यात विनोबांनी गीतेला सूत्रबद्ध केले आहे. 

‘अष्टादशी’ नावाने विनोबांचं आणखी एक पुस्तक आहे. १८ निवडक उपनिषद आणि त्यांचा मराठी अनुवाद म्हणजे ‘अष्टादशी’ हे पुस्तक. कठोपनिषद, केनोपनिषद आदींचा यात समावेश आहे. उपनिषदातली एक सुंदर कथा या पुस्तकात विनोबांनी सांगितली आहे. ती मनाला फार भावली. गोष्ट अशी की, पुरातन काळी एका खेड्यात एक म्हातारा मेला. त्याला तीन मुलं होती. 

म्हाताऱ्याने मरताना आपलं मृत्युपत्र करून ठेवलं होतं. त्यात लिहिलं होतं की, ‘माझ्याकडे जेवढे बैल आहेत ते तिन्ही मुलांमधे वाटावे. पण त्यांची कुवत आणि गरजेनुसार हा वाटा वेगवेगळा करावा. निम्मे बैल मोठया मुलाला द्यावे. एक तृतीयांश बैल दुसऱ्या मुलाला आणि एक नवमांश बैल हे तिसऱ्या मुलाला द्यावे.’ अडचण अशी की बैल होते एकूण १७. त्यामुळे त्याचे एक द्वितीयांश, एक तृतीयांश आणि एक नवमांश, असे तीन वाटे कसे करायचे? बैल कापावे? 

वाद मिटविण्यासाठी त्यांनी गावच्या प्रमुखाला बोलावलं. तो आपल्या बैलावर बसून आला. त्याने समस्या ऐकून घेतली आणि म्हणाला, ‘तुमचे वडील माझे मित्र होते. मी तुमच्या पित्यासारखाच आहे. तुमच्या वडिलांच्या १७ बैलांमधे माझाही एक बैल जोडून देऊ. आता बैल झाले १८. त्यातले एक द्वितीयांश म्हणजे नऊ बैल दिले एका मुलाला, एक तृतीयांश म्हणजे सहा बैल दिले दुसऱ्या मुलाला. आणि एक नवमांश म्हणजे दोन बैल दिले तिसऱ्या मुलाला. एकूण झाले सतरा. आणलेला अठरावा बैल परत घेऊन तो म्हातारा निघून गेला. 

त्यांचा प्रश्न सुटला पण त्याबरोबर माझाही एक मोठा प्रश्न सुटला. माझ्यासाठी तो युरेका क्षण होता. हा अठरावा बैल बीजगणिताच्या क्ष सारखा आहे. तो तुम्ही धरला तर प्रश्न सुटतात आणि पुन्हा तो शेवटी जसाच्या तसा अलगद कायम राहतोच की! पण आपण जर हट्टच धरून बसलो की क्ष नाहीच मानायचा तर मात्र बैल कापावा लागेल. ईश्वर हा असाच अठरावा बैल आहे. तो तुम्ही मानला तर जीवनाची कित्येक कोडी सुटतात. आणि यात तुमचं काहीच जात नाही कारण तो शेवटी नामानिराळा अलिप्तच राहतो. अष्टादशी मधल्या या अठराव्या बैलाने एक कूटप्रश्न सोडविला. 

रामनामाची खुबी काय?

विनोबांनी ‘ऋग्वेद सार’ रचला आहे. तसाच ‘गुरूबोध’-सार’ही रचला आहे. विनोबा जेव्हा पहिल्यांदा ‘गुरूबोध सार’ सांगत होते त्या वेळी योगायोगाने मी तिथे हजर होतो. त्यांच्या वाणीतून ते मला ऐकायला मिळालं. ते अद्भुत शिक्षक होते. जादुगारासारखे. शब्दांमधून गूढ अर्थ काढून दाखवायचे. त्याचप्रकारे बुद्धाचं ‘धम्मपद’ आहे, ‘कुराणसार’ आहे, ‘ख्रिस्तधर्म सार’ आहे. असे धर्मांचे सार विनोबांनी सोप्या भाषेत मांडले आहेत. 

विनोबांची अतिशय मार्मिक भाषा ‘संतांचा प्रसाद’ या पुस्तकात बघायला मिळते. तुकारामाचं हार्द्र विनोबा उलगडून दाखवत आहेत. तुकारामाच्या तंबोऱ्याची दुसरी तार विनोबांच्या हृदयात झंकारत आहे. तुकारामाच्या आध्यात्मिक उंचीवर डोकावून विनोबा आपल्याला तुकाराम समजावून सांगत आहेत. याहून सुंदर आणि विलक्षण अनुभव नाही. दुसरं कोण आपल्याला तिथे नेईल?

‘रामनाम: एक चिंतन’ नावाचं विनोबांच एक छोटंसं पुस्तक आहे. रामनाम हे प्रकरण अनेकांना मोठं कोडं ठरलं आहे. गांधींचं हे काय ‘रामनाम’ आहे ते विज्ञानाच्या विद्यार्थ्याला कळत नाही. तर्कपूर्ण विचार करणाऱ्यांनाही ते नीटसं कळत नाही. आणि ‘मी सुशिक्षित आहे, विचारवंत आहे’, असा अहंकार असणाऱ्यांना तर ते मुळीच कळत नाही. रामनामाची खुबी काय हे विनोबा या पुस्तकात समजवून सांगतात. 

योगाच्या महागुहेमधे प्रवेश

‘महागुहेमधे प्रवेश’ या नावाचं विनोबांचं एक संकलित पुस्तक आहे. योग, आध्यात्म, ध्यान, समाधी, साक्षात्कार अशा अनेक गूढ विषयांवर विनोबांनी मांडलेले विचार या पुस्तकात आहेत. या पुस्तकाने माझी अनेक जळमटं दूर झाली. माझ्या हृदयरोगानंतर मी गंभीरपणे योगशास्त्राचा अभ्यास केला. भारतभर फिरलो. सर्व मुख्य योगपीठांमधे जाऊन आलो. सगळ्या गुरूंना भेटलो. त्यामुळे या विषयात मी ज्ञानी जरी नसलो तरी जिज्ञासू आहे. 

विनोबा या योगमार्गाबद्दल विलक्षण अंतर्दृष्टी इनसाइट देतात. यातली एक उदाहरणादाखल सांगतो. पतंजलीच्या योगाशास्त्रामधे ज्या आठ पायऱ्या आहेत त्यामधे समाधी ही अंतिम व सर्वोच्च स्थिती मानली गेली आहे. त्यामुळे योगी ध्यान लावतात, ओम म्हणतात, पण त्यांच्या मनामधे एकच तळमळ असते की समाधी केव्हा लागणार? पण विनोबा म्हणतात, ‘समाधी हे सर्वोच्च ध्येय नाही.’ एकदम बॉम्बगोळा टाकावा तसं हे विधान. सगळे योगी ज्या समाधीसाठी धडपडतात, ज्या अप्राप्याच्या मागे धावतात त्या बाबत विनोबा म्हणतात, समाधी हे साधनेचं सर्वोच्च ध्येय नाही! ‘स्थितप्रज्ञ-वृत्ती’ हे सर्वोच्च ध्येय. 

हा ‘द्राक्षं आंबट’ प्रकार नाही. असा निर्णय देण्याचा विनोबांना अधिकार होता. प्रसिद्ध विदुषी श्रीमती विमलताई ठकारांनी काही वर्षांपूर्वी मला एक स्मरण सांगितलं. १९५० ते १९५८ या काळात त्या बराच काळ विनोबांसोबत होत्या. आध्यात्मिक साधिका होत्या. एकदा विनोबांनी त्यांना विचारलं की निर्विकल्प समाधी अवस्था किती काळ राहते या विषयी रामकृष्ण परमहंस काय म्हणाले आहेत. परमहंस म्हणाले होते, जास्तीत जास्त २१ दिवस. त्यानंतर शरीर गळून पडेल. विनोबा म्हणाले, ‘विमल, मी गेले सहा महिने सतत निर्विकल्प समाधी अवस्थेत आहे. वाट बघतो आहे शरीर केव्हा गळून पडेल याची. पण शरीर अजून तगून आहे.’ आणि तरी विनोबा म्हणतात, समाधी हे अंतिम ध्येय नाही. 

हिंसेने दुखावणारा तो हिंदू

थोडक्यात एखाद्या गायीने जंगलात चारा खावा आणि दुध आपल्यासाठी घरी आणावं तसं विनोबांनी गेल्या चार हजार वर्षातील आध्यात्मिक साहित्य, धार्मिक साहित्य, संत साहित्य पचवून आपल्यासाठी दुधासारखी ही पुस्तकं निर्माण केली आहेत. आपल्याला समजेल, उमजेल अशा भाषेत. आणि ते करतांना जुन्या ग्रंथांवर, शब्दांवर नव्या अर्थाचं कलम केलं आहे.  

‘हिंदू’ हा शब्द खूप प्रचलित आहे. आपल्याला हे ही माहीत आहे की हिंदू हा संस्कृत मधला मूळ शब्द नाही. अरब लोक भारतात आले तेव्हा त्यांनी सिंधू नदीच्या काठावर राहणाऱ्या समाजाला हिंदू म्हटलं. अरबी भाषेत स आणि ह ही एकच अक्षरे आहेत. त्यामुळे सिंधूचा उच्चार अरबी लोकांनी हिंदू असा केला. भौगोलिक दृष्ट्या सिंधू परिसरात राहणारे लोक ते हिंदू. जसे विदर्भातले वैदर्भीय अगदी तसेच. पण पुढे त्याला धार्मिक, सांस्कृतिक असा अर्थ प्राप्त झाला. 

विनोबा ‘हिंदू’ या शब्दाची निरुक्ती काय सांगतात ? ‘हिंसया दूयते चित्तम’. हिंसेने ज्याच्या हृदयाला, चित्ताला दुःख होते तो हिंदू. हे प्रचंड मोठं विधान आहे. आध्यात्मिकही आणि राजकीय देखील. हिंदुत्वाच्या आजच्या अवतारामधे ‘हिंसया दूयते चित्तम’ ही व्याख्या हिंदूला काय करायला मार्गदर्शन देते? अशा प्रकारे विनोबांनी एका एका शब्दावरती जी भाष्य केली आहेत ती म्हणजे नवीन सांस्कृतिक अर्थाचा शोध आहे. 

राजनीतीला पर्याय लोकनीती

समाज कसा असावा याबाबत विनोबांनी बरंच चिंतन केलं. भूदान, ग्रामदान, सर्वोदय या रुपात कामही केलं. त्यावरती त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्याला आपण क्रांतीसाहित्य म्हणू. ‘स्वराज्यशास्त्र’ हे पुस्तक म्हणजे स्वराज्यावर राजकीय भाष्य. विनोबा वस्तुतः राज्यवादी नव्हते, अराजकवादीही नव्हते. म्हणायचंच झाल्यास ते अराज्यवादी होते. आणि त्याहून योग्य म्हणजे ते ‘स्वराज्यवादी’ होते. 

स्वराज्याची ‘रूल ऑफ द सेल्फ’ ही व्याख्या सर्वांनाच परिचयाची आहे. आवडतीही आहे. आपलं राज्य कुणाला आवडणार नाही? पण गांधी म्हणतात, ‘Swarajya is not rule of the self, but rule on the self!’ स्वतःवर, स्वतःच्या इच्छांवर, स्वतःच्या वासनांवर, स्वतःच्या वर्तनावर मला नियंत्रण करता आलं पाहिजे. राज्य आणि स्वराज्य यावर विनोबांनी या पुस्तकात आपले विचार मांडले आहेत. ‘लोकनीती’ हे विनोबांचं आणखी एक अप्रतिम आणि उपयुक्त पुस्तक. राजनीतीला पर्याय विनोबा लोकनीती सांगत आहेत. 

‘शिक्षण विचार’ हे पुस्तक काळाच्या फार पुढे होतं. मी शिक्षण शास्त्रज्ञ नाही. पण सुदैवाने वयाच्या चौदा वर्षांपर्यंत मी गांधी आणि विनोबांनी स्थापन केलेल्या शाळांमधे, नई तालीम या शिक्षणपद्धतीत शिकलो. पुढे आयुष्यभर देखील मी त्याच पद्धतीने शिकत राहिलो. भारतात सर्वत्र लॉर्ड मेकॉलेने सुरू केलेली इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू होती. शाळेच्या चार भिंतीत बसून पुस्तक आणि फळा या आधारे दिलेले माहितीचे ओवरडोस म्हणजे शिक्षण. 

गांधीजींनी या ऐवजी ‘नयी तालीम’ ही पद्धती मांडली. शास्त्र म्हणून विनोबांनी ती विकसीत केली. ‘शिक्षण विचार’ पुस्तक क्रांतिकारी आहे. या पुस्तकात एका जागी विनोबा फार मार्मिक लिहितात. निव्वळ पुस्तकी शिक्षणाऐवजी नयी तालीम म्हणजे जीवनासाठी शिक्षण, जीवनाचं शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण असे अनेक अर्थ सांगण्यात येतात. पण विनोबा म्हणतात, ‘हे सगळे मला नामंजूर आहेत. कारण या सगळ्यांमधे अजूनही जीवन आणि शिक्षण यामधे द्वैत कल्पित आहे. वस्तुतः जीवन हेच शिक्षण!’ हे वाक्य वाचलं तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. यापेक्षा अधिक साक्षात्कारी वाक्य मला शिक्षणाच्या क्षेत्रात माहीत नाही. 

विनोबांचं ‘मधुकर’ हे पुस्तक अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. यात एक दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्रातले साहित्यिक, मराठीचे प्राध्यापक मधुकरच्या शैलीच्या प्रेमात पडले. विनोबांची मराठीतील निबंधशैली अद्वितीयच मानली जाते. सगळ्या पाठ्यपुस्तकात ‘मधुकर’ हे पुस्तक विनोबांची लेखनशैली म्हणून शिकविलं जातं. पण आपण विनोबांच्या विचारांचं मर्म दुर्लक्षित करून निबंधशैलीलाच कवटाळून बसलो. पोशाख धरला आणि आतला माणूस सोडून दिला. 

सत्याग्रहाचा सत्यग्राही विचार

विनोबांचं अजून एक छोटेखानी पुस्तक, ‘सत्याग्रह विचार’. हे खरं तर संकलन आहे. विनोबांचे सत्याग्रहाबाबत काय विचार होते? त्याविषयी समज, गैरसमज, अपेक्षा, अपेक्षाभंग, आरोप काय नाहीत? विनोबांनी उत्तरआयुष्यात सत्याग्रहाबाबत जी भूमिका घेतली त्यावर अनेकांचा आक्षेप आहे. विनोबांची भूमिका गांधींना विन्मुख आहे, पलायनवादी आहे, संघर्ष टाळणारी आहे इत्यादी. त्यामुळे पुस्तकातील एका भागाचा उल्लेख करावासा वाटतो. 

विनोबा म्हणतात, हिंसेचं, युद्धाचं शास्त्र मानवजात हजारो वर्षांपासून निर्माण करीत आहे. त्यामुळे विध्वंसाचा पुरेसा अनुभव आपल्याकडे आहे. अहिंसेचं शास्त्र तर आता नुकतंच होऊ घातलं आहे. त्याचा अंतिम शब्द अद्याप कुणी सांगितलेला नाही. It is a science in evolution. म्हणून गांधींनी जो सत्याग्रह केला तोच अंतिम आहे असं विनोबा मानत नाही. 

विनोबा म्हणतात की गांधीनी सुरुवात केली असून पुढचं शोधण्यास सांगितलं आहे. ‘मी रोज बदलतो’, असं म्हणणारे गांधी मी सांगितला तोच अंतिम सत्याग्रह असं कसं म्हणू शकतील? त्यामुळे आपल्याला सत्याग्रहाचे नव नवे अर्थ, नव्या पद्धती आणि त्याचे सूक्ष्म अर्थ शोधावे लागतील. नवे प्रयोग करावे लागतील. 

एका जागी तर विनोबा म्हणतात की ‘सत्याग्रह’ शब्दामधेच थोडी समस्या आहे. आता आली अडचण! गांधीनी प्रसिद्ध केलेला हा शब्द. गांधीनीच ज्या माणसाला प्रथम सत्याग्रही म्हणून निवडलं, जणू त्यांचा सत्याग्रहाचा वारस. पण तेच विनोबा म्हणताहेत की सत्याग्रह शब्दामधेच एक समस्या आहे. ती म्हणजे त्यातला आग्रह. सत्याचा आग्रह धरला तर सत्य कुठे उरतं? माझं सत्यांचं आकलन वेगळं असू शकतं आणि दुसऱ्याचं वेगळं. दोघांनीही आपापल्या सत्याचा आग्रह धरला तर दोघांचा दुराग्रह तेवढा शिल्लक राहील. सत्य शिल्लक राहणार नाही. 

त्यामुळे सत्याचा आग्रह होऊ शकत नाही. वैज्ञानिक हे सत्याचा आग्रह धरत नाहीत. ते म्हणतात, माझ्या निरीक्षणावरून, आकड्यांवरून मला हे चित्र दिसत आहे. उद्या ते कदाचित बदलेल. उद्या तुला काही वेगळंच दिसू शकतं. त्यामुळे सत्य काय हे आपण दोघेही शोधूया. वैज्ञानिकांनी तरी सत्याबाबत आग्रही राहू नये. सत्याचा आग्रह धरला तर सत्याचा बळी जाईल. 

विनोबा म्हणतात की ‘सत्याग्रही’ ऐवजी आपण ‘सत्यग्राही’ असावं. हा शब्दच्छल नाही. विनोबांनी सत्याग्रहाबाबत पुढे घेतलेली भूमिका यातून प्रगट होते. विनोबा म्हणतात, सत्याचा देखील आग्रह धरता येत नाही. कारण मला जे दिसतं तेच सत्य हाच मुळी दुराग्रह आहे. हा असत्याग्रह होऊ शकतो. म्हणू सत्यग्राही असावं. 

सत्यग्राही सुरुवातीलाच मान्य करेल की सत्य माझ्या प्रतिपक्षाकडेही असू शकतं. तेही मला समजून घेतलं पाहिजे. ते सत्य असेल तर मला ते स्वीकारलं पाहिजे. प्रतिपक्षाचं आणि माझं सत्य मिळून संपूर्ण सत्य बनतं. वस्तुतः अहिंसेमधे प्रतिपक्षच नसतो. सत्य हाच एकमेव पक्ष असतो. माझाही पक्ष असायला नको कारण माझा अहंकार, आसक्ती त्यात जुळली आहे. मुळात प्रतिपक्षच नको. कारण कोणीच प्रति नाही. सगळे माझेच आहेत. उरावे ते केवळ सत्य. 

सत्याला विषाचा प्याला

ही मोठी कठीण आणि सूक्ष्म भूमिका आहे. पण ही भूमिका नक्कीच गांधींच्या पुढे जाते. किंवा असं म्हणावं की ही भूमिका गांधींना पुढे घेऊन जाते. विनोबांनी सत्याग्रहाचा विकास थांबविलेला नाही. अतिशय सूक्ष्म विचार त्यांनी केलेला आहे. अनेक प्रयोग केले आहेत. आणि त्यावरून विनोबांची सत्याग्रहाबाबतची भूमिका बनलेली आहे. त्यामुळे विनोबांच्या सत्याग्रहाबाबत भूमिकेवर टिप्पणी करताना प्रत्येकाने आपली कुवत बघून घ्यावी. पण अप्रिय सत्य सांगितलं म्हणून सॉक्रेटिसला विषाची शिक्षा देण्याची इथे परंपरा आहे. 

विनोबांनी कधी आत्मकथा लिहिली नाही पण त्यांची ‘प्रेमपंथ अहिंसेचा’ आणि ‘स्नेह सन्निधि’ ही दोन पुस्तकं त्यांच्या शिष्या कालिंदी यांनी संपादित केली आहेत. विनोबांच्या लिखाणात वा भाषणात जागोजागी स्वतःच्या जीवनाविषयी उल्लेख येतात. ते संकलित करून ही पुस्तकं निर्मिली आहेत. ‘स्नेह सन्निधि’ हे पुस्तक पहिल्या दर्जाची ऐतिहासिक सामग्री आहे. यात विनोबांनी लिहिलेली पत्र आहेत. पत्रावाटे ते जणू त्यांचं अंतर, त्यांच्या अंतरातले संघर्ष, त्यांचा विकास, ते करत असलेले मुख्यतः १९२० ते १९५० या काळातले प्रयोग वाचकांसमोर मांडत आहेत.

‘विचारपोथी’ नावाचं विनोबांचं एक छोटेखानी पुस्तक आहे. विनोबांनी त्याला, ‘स्वतःशी अर्धवट पुटपुटलेले माझे स्वगत विचार’ असं म्हटलं आहे. अद्वितीय हिरेमाणिकं  त्यात आहेत. त्यात एका जागी विनोबा म्हणतात, (सेवा) / (अहंकार) = 0

माणसात अनंत अहंकार भरलेला आहे. तुम्ही कितीही सेवा केली तरी त्यांचं फलित शून्यातच जातं. कारण कोणत्याही संख्येला अनंताने भागले असता फलित शून्य हे असते. गणिताच्या भाषेत विनोबा सामाजिक अध्यात्म मांडत आहेत. आणि त्याच्या पुढे त्यांचा उपाय, आपला अहंकार शून्य करा. स्वतःला शून्य करा. काय घडेल?  (सेवा) / (0) = अनंत. कोणतीही संख्या भागिले शून्य केल्यास गणितात उत्तर येतं अनंत. आपल्या अहंकाराला शून्य केलं आणि सेवा केली तर छोट्याश्या सेवेचाही अनंत परिणाम घडू शकतो. असं हे सेवेचं आध्यात्मिक गणित अकाट्य आहे.

विनोबांचे विचार प्रथम अशा वेगवेगळ्या पुस्तकांमधे मांडले गेले. काही त्यांनी स्वतः लिहिलेली तर काही संकलित. पुढे आश्रमच्या लोकांनी त्यांचं संकलन करून एकूण १० हजार पृष्ठांचे २० भाग ‘विनोबा विचार’ या नावाने काढले. पराग चोळकर आणि एमकेसीएलचे विवेक सावंत यांनी विनोबांचे आणि विनोबांबाबतचे एक लाख पानांचे सर्व उपलब्ध साहित्य www.vinoba.in या वेबसाईट वर मांडलं आहे जे आपल्यासमोर आज उपलब्ध आहे.

 

याच लेखाचा पुढचा दुसरा भाग : विनोबा भावेः सुळी दिलेले संत (भाग २)

याच लेखाचा पुढचा तिसरा भाग : विनोबा भावेः सुळी दिलेले संत (भाग ३)

(एमकेसीएलने तयार केलेल्या vinoba.in या वेबसाईटच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणावर आधारित हा लेख साधना साप्ताहिकाच्या सौजन्याने तीन भागांत देत आहोत.)