मला भावलेले ‘सिनेमॅटिक’ बाबासाहेब आंबेडकर

१४ एप्रिल २०२२

वाचन वेळ : ७ मिनिटं


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. या महामानवावर आधारित असे बरेच आत्मकथनात्मक सिनेमे आहेत. बाबासाहेबांचा या सिनेमांमधला वावर फार वरवरचा वाटतो. पडद्यावर एखादा नट बाबासाहेबांची स्क्रिप्टेड भूमिका साकारतोय यापेक्षा तो नट स्वतःला मिळालेल्या कुठल्याही भूमिकेत बाबासाहेबांचे विचार पेरतोय हे पाहणं मला महत्त्वाचं वाटतं.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब बाबासाहेब या महामानवाची आज १३१वी जयंती. या महान व्यक्तिमत्वावर आधारित असे बरेच आत्मकथनात्मक सिनेमे, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी आहेत. त्या सिनेमांमधे बाबासाहेबांचा संघर्षपूर्ण प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळतो.

हे असे सिनेमे पाहून बाबासाहेब अमुक दिवशी जन्मले, त्यांनी असं शिक्षण घेतलं, अशी क्रांती घडवली आणि संविधान निर्माण केलं एवढंच कळतं. यातले काही सिनेमे त्यांनी हे सगळं का आणि कुणासाठी केलं हेही दाखवतात. बाबासाहेबांचा या सिनेमांमधला वावर फार वरवरचा वाटतो. कुणीतरी त्यांचं एखादं स्केच काढावं किंवा पुतळा बनवावा, अशाच प्रकारचे हे सिनेमे वाटतात.

असे चित्रातले, पुतळ्यातले बाबासाहेब प्रतिक म्हणून चळवळीत मिरवायला उपयोगी पडतात. पण मला हवे होते ते त्यांच्या अनुयायांच्या रक्तामधले, आचारविचारातले, कर्तृत्वातले बाबासाहेब. पडद्यावर एखादा नट बाबासाहेबांची स्क्रिप्टेड भूमिका साकारतोय यापेक्षा तो नट स्वतःला मिळालेल्या कुठल्याही भूमिकेत बाबासाहेबांचे विचार पेरतोय हे पाहणं मला महत्त्वाचं वाटतं.

बायोपिक ते बॅकग्राऊंडपर्यंतचा प्रवास

भारताला संविधानाची अनमोल भेट देणाऱ्या बाबासाहेबांना मरणोपरांत भारतरत्न मिळण्यासाठी जिथं १९९० उजाडावं लागलं, तिथं मनोरंजन क्षेत्रात बाबासाहेबांचा शिरकाव होणे सहजासहजी शक्यच नव्हतं. दिग्दर्शक जब्बार पटेलांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना रुपेरी पडद्यावर आणलं.

त्यांनी फक्त बाबासाहेबांचा बायोपिक चित्रित करण्यावर समाधान मानलं नव्हतं, तर आपल्या ‘सिंहासन’, ‘मुक्ता’सारख्या इतर सिनेमांमधेही बाबासाहेबांची फोटोफ्रेम त्यांनी वापरली होती. तोवर ‘गांधी’सारख्या महत्त्वाच्या सिनेमांमधे बाबासाहेबांचा उल्लेखही करणं मोठमोठ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी टाळलं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार हा भारतीय समाजव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक असूनही कित्येक सिनेमांमधे तो जाणीवपूर्वक डावलला गेला. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात फक्त अभिवादनासाठी म्हणून इतर महापुरुषांच्या रांगेत मांडल्या जाणाऱ्या बाबासाहेबांच्या फोटोपेक्षा सिनेमात एखाद्या विशिष्ट प्रसंगाच्या बॅकग्राऊंडचा भाग असणारी बाबासाहेबांची फ्रेम मला अधिकच महत्त्वपूर्ण वाटते.

हेही वाचा: मुक्काम चैत्यभूमीः ‘जय भीम’ जागवणारी रात्र

भारतीय सिनेइतिहास विभागणारा ‘फँड्री’

मराठी सिनेमांमधे आंबेडकरांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव जब्बार पटेलांनंतर थेट नागराज मंजुळेच्या ‘फँड्री’मधे पाहायला मिळाला. ‘फँड्री’बद्दल बोलताना तमिळ दिग्दर्शक राम म्हणतो, ‘भारतीय सिनेमाच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर ‘फँड्री’ अगोदरचा भारतीय सिनेमा आणि ‘फँड्री’नंतरचा भारतीय सिनेमा असे दोन गट पडतात.’ गेल्या काही वर्षांत तमिळ सिनेसृष्टीत सुरु झालेल्या दलित सिनेचळवळीचं श्रेय निर्विवादपणे ‘फँड्री’ला जातं.

‘फँड्री’च्या फ्रेम प्रचंड बोलक्या आहेत. त्यातल्या काही फ्रेममधे कथानायक जब्या आपल्या खांद्यावर काठीला बांधलेलं डुक्कर घेऊन शाळेसमोरून जाताना दिसतो. कैकाडी समाजातलं हे पात्र डुक्कर वाहून नेतंय, यात तोवर काही विशेष वाटत नाही जोवर त्या फ्रेममधे बाबासाहेब दिसत नाहीत. गाडगेबाबा, शाहू महाराज आणि सावित्रीबाई दिसत नाहीत.

फ्रेमच्या बॅकग्राऊंडला या प्रतिमा दिसताच त्यांनी अहोरात्र दलितोद्धारासाठी केलेलं कार्य आणि त्यापश्चातही सुधारणेपासून वंचित राहिलेला दलित समाज चटकन डोळ्यांसमोर उभा राहतो. सवर्ण वर्चस्ववादावर जब्याने चिडून भिरकावलेला दगड पाहताना नशिबापेक्षा मनगटाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला सांगणारे बाबासाहेब ‘फँड्री’च्या क्लायमॅक्समधे अनुभवायला मिळतात.

याच नागराजने त्याच्या ‘झुंड’ या पहिल्या हिंदी सिनेमात भीमजयंतीचा जल्लोष दाखवलाय. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांनी मध्यवर्ती भूमिका साकारलीय. भारतीय सिनेमाच्या दृष्टीकोनातून मेनस्ट्रीम म्हणजेच मुख्य प्रवाहातल्या बॉलीवूडमधे भीमजयंती साजरी होण्याची ही पहिलीच वेळ. यातल्या एका प्रसंगाच्या निमिताने का होईना, पण महामानवाला आणि महानायकाला एकाच फ्रेममधे आणण्याची किमया नागराजने करून दाखवली. 

‘आपल्याला कमीपणा येईल, असा पोशाख करू नका.’

दलित कथावस्तू ही फक्त ठराविक प्रेक्षकवर्गाला खुश करण्यासाठी, वैचारिक सिनेमे करण्यासाठी वापरायची नसते, तर त्यातून क्लास आणि मास प्रेक्षकवर्गाला एकत्र आणत बॉक्स ऑफिसवरही राज्य करता येऊ शकतं हा आत्मविश्वास नव्या फिल्ममेकर्सच्या मनात जागवणारा तमिळ दिग्दर्शक पा. रंजीत त्याच्या सिनेमातल्या पात्रांचं, कथानकांचं श्रेय बाबासाहेबांना देताना म्हणतो,

‘असा सिनेमा बनवण्याचं धैर्य मला बाबासाहेबांमुळे मिळतं. त्यांनी आम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारायला शिकवलं. आम्हालाही संस्कृती आहे आणि तिचा अभिमान असायला हवा, हेही त्यांनीच शिकवलं.’

आणि म्हणूनच रंजितच्या सिनेमातला रजनीकांतने साकारलेला कबाली कायम सुटाबुटात वावरतो. स्वतः रंजीत कधीच चुरगळलेला किंवा अस्वच्छ गणवेश शाळेत घालून गेला नाही, असं त्याचे वडील सांगतात. पहिल्याच सिनेमामधे बाबासाहेबांचा फोटो दाखवशील तर सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालणार नाही, असले बाचकळ सल्लेही त्याने धुडकावून लावले आणि आपले सगळे सिनेमे सुपरहिट करून दाखवले.

हेही वाचा: भीमा कोरेगावमधे २०१ वर्षांपूर्वी नेमकं घडलं काय?

‘शिका. संघटीत व्हा. संघर्ष करा.’

सिनेमांच्या संवादांमधून स्पष्ट झळकणारे बाबासाहेब आणि त्यांचे विचार त्या सीनला किती वरच्या थरावर नेऊन ठेवतात, याचा प्रत्यय वेट्री मारनच्या ‘असुरन्’मधे येतो. या सिनेमाच्या क्लायमॅक्समधे धनुषने साकारलेला शिवासामी चौकीत सरेंडर होण्यापूर्वी चिदंबरमला शिक्षणाचं महत्त्व पटवून देताना म्हणतो,

‘तू अन्याय सहन न करता तुझ्या मनाने त्यांच्याविरुद्ध लढलास. पण हा एकच पर्याय नाहीय विरोध करण्याचा. आपल्याकडे शेतजमिनी असतील, तर त्या जप्त केल्या जातील. आपल्याकडे संपत्ती असेल, तर ती ओरबाडली जाईल. पण आपल्याकडे शिक्षण असेल तर आपल्याकडून हे कधीही हिसकावून घेतलं जाणार नाही. तुला खरंच जर त्यांच्यावर मात करायची असेल तर शिक. शिकून मोठा व्यक्ती हो पण आपल्या अधिकाराचा गैरवापर मात्र करू नकोस.’

त्यानंतर चौकीत प्रवेश करण्यापूर्वी काही क्षण चिदंबरमकडे पाहणाऱ्या शिवासामीच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकतं. पिढ्यानपिढ्या गुलामगिरीच्या ओझ्याखाली दबलेल्यांना त्यांच्या माणूस असण्याची आणि सन्मानाने जगण्याची जाणीव करून देणारे महामानव आता आपल्या पुढच्या पिढीलाही कळतील, याची जाणीव करून देणारं शिवसामीचं हसू खूप काही सांगून जातं.

टी. जे. ज्ञानवेलचा ‘जय भीम’ हा सिनेमा जस्टीस चंद्रू यांनी सेंगाई या इरुला जमातीच्या आदिवासी महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी लढलेल्या एका प्रदीर्घ खटल्यावर आधारित आहे. सिनेमाच्या क्लायमॅक्समधे जस्टीस चंद्रूंची भूमिका साकारणारा सूर्या खुर्चीत बसून पेपर वाचताना दिसतो. बाजूला बसलेली सेंगाईची मुलगी त्याची नक्कल करू पाहते पण सूर्याला बघून पुन्हा सावरून बसते. तेव्हाचं सूर्याचं आश्वासक स्मितहास्य शिवासामीची आठवण करून देतं.

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’

मारी सेल्वाराजच्या ‘परीयेरम पेरूमल’मधे लॉ कॉलेजला अॅडमिशन घेतलेला नायक नेहमी स्वतःचं नाव सांगताना त्याच्या नावाच्या शेवटी ‘बी. ए. बी. एल.’ लावतो. त्याला डॉक्टर व्हायचंय हे कळल्यावर कॉलेजचे प्राचार्य त्याला हे वकील घडवण्याचं कॉलेज असल्याचं सांगतात.

त्यावर तो तितक्याच तडफेने त्याची बाबासाहेबांसारखा डॉक्टर बनायची महत्त्वाकांक्षा व्यक्त करतो आणि त्यांचा निरोप घेतो. दलितांसाठी शिक्षण आणि त्याची उपयुक्तता अधोरेखित करणारा हा प्रसंग. हा सीन इथेच संपत नाही. नायक गेल्यानंतर प्राचार्य शिपायाला त्याचं वाक्य टिपून ठेवायला सांगतात आणि म्हणतात,

‘हा आंबेडकर व्हायला आलाय, याचा अर्थ लवकरच हा इथं भांडणं करणार! तेव्हा तो आत्ता काय म्हणाला होता याची नोंद ठेवायलाच हवी.’

हे वाघिणीचं दूध पिऊनच आपला नायक पुढच्या संघर्षासाठी स्वतःला तयार करणार असल्याचं या सीनमधे स्पष्ट होतं.

हेही वाचा: नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

‘जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.’

मारी सेल्वाराजचा ‘कर्णन’ आणि पा. रंजितचा ‘काला’ हे दोन्ही तमिळ सिनेमे अनुक्रमे महाभारत आणि रामायणाची दुसरी बाजू आपल्यासमोर आणतात. या दोन्ही प्राचीन महाकाव्यांचा भारतीय समाजमनावर मोठा प्रभाव आहे. जाचक सवर्ण वर्चस्ववादाच्या दृष्टीकोनातून या महाकाव्यांची मांडणी या सिनेमांमधे केली गेलीय. 

‘कर्णन’ला तमिळनाडूतल्या कोडियांकुळम गावच्या जातीय दंगलीची पार्श्वभूमी आहे. सिनेमात नायकाच्या गावाचं नाव कोडियांकुळमऐवजी पोडियांकुळम असं दाखवलंय. यात पोडियांकुळमचे गावकरी कौरवसेनेचं तर शेजारच्या मेलूरचे गावकरी पांडवांचं प्रतिनिधित्व करतात. महाभारतात कर्णाचा सूतपुत्र म्हणून सातत्याने जो अपमान करण्यात आला, त्याची उत्तरं हा सिनेमा देतो.

‘काला’ जितका बाबासाहेबांचा आहे, तितकाच तो द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांचाही आहे. विशिष्ट वर्गाचं लांगुलचालन करणारा जाचक इतिहास खोडून नवा इतिहास घडवण्याची प्रेरणा हे दोघे देतात. या दोघांच्या विचाराने प्रभावित होऊन राम आणि रावणातला वर्गसंघर्ष आणि जातसंघर्ष पा. रंजितने ‘काला’मधून मांडलाय. पोथ्यापुराणांमधे वाचलेलं रामायण-महाभारत या सिनेमॅटिक रामायण-महाभारतापुढे कचकड्याचं ठरतं.

‘इतिहासाची पुनरावृत्ती होत असते’ या वाक्याची प्रचिती पा. रंजितच्या ‘सरपट्टा परंपरै’मधून येते. त्यात आर्याने साकारलेली कबिलन या दलित बॉक्सरची भूमिका वर्णद्वेषाला सणसणीत पंच लगावणाऱ्या जगप्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलीची आठवण करून देते. आर्याने जिंकलेली मॅच ही फक्त त्याच्या एकट्याच्याच नाही, तर त्याच्या आखाड्याच्या, त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहणाऱ्या समाजाच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे. 

‘जग बदल घालुनी घाव। सांगून गेले मला भीमराव।।’

नागराज मंजुळे, पा. रंजीत, मारी सेल्वाराज, वेट्री मारन, ज्ञानवेलसारखे दिग्दर्शक आणि त्यांचे सिनेमे पाहताना लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंच्या या ओळी नजरेसमोर येतात. बाबासाहेबांना शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा अभिप्रेत असलेला अर्थ या दिग्दर्शकांना गवसलाय. यांच्या सिनेमांमधलं जातवास्तवाचं चित्रण पाहताना उगाच कसलाही रटाळपणा जाणवत नाही. पण त्यामागचं विदारक सत्य मात्र सहज कळून जातं. 

गावकुसाबाहेरची वस्तीही माणसांचीच आहे, आपल्या मर्जीने वागायला ती आपल्या गोठ्यात बांधलेली जनावरं नाहीत, हे समाजभान जागृत करण्याची जबाबदारी सध्या या दिग्दर्शकांनी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांपुरते मर्यादित नसून त्यांच्या विचारांचा वारसा चालवण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे, हा विचार जनमानसात रुजवण्याचं त्यांचं हे ध्येय निश्चितच कौतुकास्पद आहे.

बा भिमा, आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलंस.. विनम्र अभिवादन!!

हेही वाचा: 

धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

माझ्या अस्मितेच्या आणि असहिष्णुतेच्या नायकाला अखेरचा जयभीम!