भवरलालजींनी माळरानावर साकारले गांधीविचार

१२ डिसेंबर २०१८

वाचन वेळ : ५ मिनिटं


जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलाल जैन यांचा आज ८१ वा जन्मदिन. त्यांनी जोपासलेली श्रमसंस्कृती आणि निष्ठेच्या बळावर जैन इरिगेशनचा वटवृक्ष उभा राहिलाय. त्याचबरोबर जळगावचं गांधीतीर्थ हेदेखील त्यांचं फार मोठं काम आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाश. 

गांधीजींच्या संकल्पनेशी आजच्या आधुनिक विज्ञानाला जोडून पर्यावरणपूरक मापदंडांची पूर्तता करणाऱ्यांना ग्रीहा आणि लीड्स अशी दोन आंतरराष्ट्रीय मानांकनं दिली जातात. अशी मानांकनं म्युझियमना संग्रहालयांना मिळणं खूपच कठीण. पण या दोन्ही मानांकन संस्थांकडून सर्वाधिक मानांकन मिळवलेली संग्रहालय क्षेत्रातली देशातली एकमेव वास्तू म्हणजे गांधीतीर्थ. गांधीविचार आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नव्या पिढ्यांपर्यंत पोचवण्याचं डॉ. भवरलाल जैन यांनी पाहिलेलं स्वप्न गांधीतीर्थात साकार होतंय, याची ही पावती आहे. 

गांधी विचारांच्या पायावर आधारीत संशोधन, प्रकाशन, रचनात्मक कार्य, साहित्य संग्रह, अभ्यासक्रम, प्रशिक्षण यासर्व गोष्टी एकाच छताखाली संशोधक, अभ्यासकांना मिळाव्यात यासाठी गांधीवादी विचारवंत डॉ. भवरलाल जैन यांनी जळगाव येथे गांधीतीर्थची निर्मिती केली. जळगाव हे काही साबरमती वा सेवाग्राम सारखं गांधीजींच्या वास्तव्याने पुलकीत झालेलं ठिकाण नव्हतं. तरीही तिथे आज गांधीजींच्या विचारवारशाचं महान स्मारक उभं राहिलंय. 

हे फक्त म्युझियम नाही

कॉलेजमधे असल्यापासूनच गांधीविचारांनी प्रभावित झालेले भवरलालजी उर्फ भाऊ यांच्या पुढाकारातून २००७ मधे उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात गांधी रिसर्च फाऊंडेशनची सुरुवात झाली. परंतु विद्यापिठाच्या परिसरात इतकं भव्य केंद्र उभारण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक आणि कायदेशीर समस्या होत्या. त्यामुळे भाऊंनी जैन हिल्सवर आजच्या भव्यदिव्य अशा गांधीतीर्थची निर्मिती करण्याचं ठरवलं. 

आज गांधीजी स्वतः असते तर त्यांनी काय केलं असतं, हे अभ्यासण्यासाठी महाराष्ट्रातले, देशातले आणि देशाबाहेरच्याही अनेक गांधीयन संस्था, गांधीवादी विचारवंताशी अनेक वेळा चर्चा करून भाऊंनी हा प्रकल्प उभारलाय. त्याचबरोबर हा गांधी विचार कृतीतूनच जगासमोर मांडण्यासाठी ग्रामविकास, स्वयंरोजगार, पर्यावरण संरक्षण, रचनात्मक कार्य फाऊंडेशनने सुरू केलंय

गांधीजींवरचं सर्वात मोठं डॉक्युमेंटेशन

जळगाव येथील गांधीतीर्थ हे  जैन हिल्सवरील नितांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यात १० एकर विस्तीर्ण जागेत उभं आहे. कधी काळी तिथे ओसाड माळरान होतं, हे कुणाला खरंही वाटणार नाही. ते १६ महिने २० दिवस अशा रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झालंय. त्यामधे ८१ हजार चौरस फुटांचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील महात्मा गांधींच्या जीवन कार्यावरचं जगातलं पहिलं ऑडियो गाईडेड म्युझियम आहे. 

म्युझियमबरोबरच तिथे संशोधन केंद्रही आहे. या संशोधन केंद्रात आत्तापर्यंत १० हजाराहून अधिक पुस्तकं,  गांधीयुगातली नियतकालिकं, गांधीजी आणि विनोबांच्या भाषणांचे ऑडियो, वीडियो, फोटो, ११९ देशांनी गांधीजींवर प्रकाशित केलेली टपाल तिकिटं, साडे तीन लाखाहून अधिक स्कॅन दस्तावेज, ई बुक्स असा दुर्मिळ संग्रह कायमस्वरुपी जतन करण्यात आलाय. 

विशेष म्हणजे भारत सरकारच्या नॅशनल आर्काईव्ज या आंतरराष्ट्रीय केंद्रासह अनेक राष्ट्रीय संस्था आणि व्यक्तींकडील लाखो दस्तावेज गांधी रिसर्च फाऊंडेशनने संकलित केलेत. आजपर्यंत असं डॉक्युमेंटेशनचं दुसरं काम झालेलं नाही. पण ते अजूनही थांबलेलं नाही.

पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान 

या सगळ्या गोष्टींमुळेच दरवर्षी हजारो पर्यटक गांधीतीर्थ मधील संग्रहालयाला भेट देतात. त्यामुळेच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने महाभ्रमण उपक्रमातही गांधीतीर्थाचा समावेश केलाय. गांधीतीर्थ उदघाटनाच्या वेळी भारताच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांनी भाऊंच्या या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना म्हटलं होतं, ‘भाऊ, यापुढे त्यांच्या उद्योगासाठी नाही तर गांधीतीर्थमुळे ओळखले जातील’. इथल्या भेटीत भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटलं, ‘गांधीतीर्थ हे पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणारं प्रेरणास्थान ठरेल.’

गांधीतीर्थ इथे दररोज सकाळ संध्याकाळ सर्वधर्मप्रार्थना होते. तसंच गांधी जयंतीला सर्व धर्माच्या प्रमुखांकडून गांधी तीर्थच्या मंचावरून संपूर्ण समाजाला सहचर्य बंधुभावाचा दरवर्षी संदेश दिला जातो. 

१५ लाख जणांनी दिली गांधीपरीक्षा

गांधीतीर्थच्या माध्यमातून आज खेड्यांमधे चालणारं काम हे गांधीजींच्या ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पनेवर चाललेली यशस्वी वाटचाल म्हणता येईल. हाच विचार महाराष्ट्रात, देशभरात आणि देशाबाहेर पोहचवण्यासाठी गांधी विचार संस्कार परीक्षा हा उपक्रम सुरू झाला. या उपक्रमामुळे गांधीविचार जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकला. शांततापूर्ण नव्या जगाची निर्मिती होण्यासाठी हे एक मोठं योगदान म्हणता येईल. 

इथले पाणीबचत, शिक्षण आणि स्वच्छतेचे प्रयोग वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहेत. जगातील सर्वात मोठ्या इरिगेशन कंपन्यांपैकी एक असलेल्या जैन इरिगेशनची पाणीबचतीच्या दिशेने चालू असलेली वाटचाल, अनुभूतीसारख्या शाळांमधून चालू असलेली मूल्यशिक्षणाची तळमळ आणि जैन कंपनीच्या जगभरातल्या प्रकल्पांमधे असलेला स्वच्छतेचा आग्रह, या गोष्टी सतत सुरूच आहेत. महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरात १५० खेड्यांमध्येही हाच स्वच्छता आरोग्य, पाणीबचत, शुद्ध पेयजल पुरवठा, शिक्षण, शेतकरी आणि महिलांचे बचतगट, त्यातून स्वयंरोजगार निर्मिती हे कामही मोठ्या प्रमाणावर विस्तारतंय.  

गांधीजींनी एक लाखमोलाचा संदेश दिलाय, माझं जीवन हाच माझा संदेश. या संदेशाने प्रभावित होऊन डॉ. भवरलाल जैन यांनी आपल्या जीवनातून तसंच उद्योगांतून शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. उद्याची युद्ध ही पाण्यासाठी असतील, हा धोका ओळखून त्यांनी पाणीबचतीचे मार्ग देशाला दाखवले. आज गांधीतीर्थ हे गांधीजींच्या विचारांचं भव्य प्रेरणास्थान आहेच. पण त्याचबरोबर ते भवरलालजींच्या कामाचंही स्मारक ठरतंय. 

(लेखक गांधी रिसर्च फाऊंडेशनचे कार्यकारी अधिकारी आहेत.)