‘टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’ हे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’मधल्या पात्राच्या तोंडचं वाक्य तीनशेहून जास्त वर्षांपासून गाजतंय. मराठी माणसापुढं हाच संभ्रम दोनवेळा जेवायचं की दर दोन तासांनी खायचं यानिमित्तानं उभा झालाय.
पोटाचा घेर वाढतोय, तसा जगण्याचा तोल सुटतोय, हे ध्यानात आलेल्या मराठी माणसानं गेल्या दहाएक वर्षात खाण्याचा विषय चांगलाच मनावर घेतलाय. हीच संधी साधून अनेकजण ‘पाच हजारात १० किलो वजन कमी करा’सारखे फंडे विकायला लागलेत. दुसरीकडं व्याख्यानं, लेख, पुस्तकांच्या माध्यमातून हे फंडे सांगितले जातायत. हा फंडे विक्रीचा बाजार जोरात सुरूय. यातून वजन कमी करण्याची एक इंडस्ट्रीच नावारूपाला आलीय. दुसऱ्यांचं पोट कमी करण्याचा फंडा सांगत स्वतःचं पोट भरण्याचा धंदा अनेकजण करतायत.
हे सगळं सुरू असतानाच सध्या डाएट कॉन्शस मराठी माणूस डॉ. जगन्नाथ दीक्षितांना फॉलो करायचं की ऋतुजा दिवेकरना या संभ्रमात अडकलाय. मापात खायला तयार असलेल्यांसाठी हा एक सनातन संभ्रम निर्माण झालाय. कारण कुणी दोन स्लॉटमधे जेवण योग्य म्हणतंय, तर कुणी दर दोन दोन तासांनी जेवायला सांगतंय. त्यामुळं नेमकं काय करायचं, हा सगळा गोंधळ तयार झालाय.
या सगळ्याला नव्यानं सुरवात झाली वर्षभरापूर्वी. लातूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजात प्राध्यापक असलेल्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिवसांतून दोन वेळा जेवा. एक जेवण ५५ मिनिटांत करा, असं सांगितलं. त्यांचं जवळपास तासाभराचं भाषण वॉट्सअपवर वायरल होऊ लागलं. नंतर त्यांचा आपल्याला फायदा कसा होतो, हे सांगणारे मॅसेज. त्यानंतर एबीपी माझावर सप्टेंबरमधे झालेला माझा कट्टा. त्याआधी महाराष्ट्र करिना कपूरची ‘झीरो फिगर’ गुरू ऋतुजा दिवेकर यांना फॉलो करत होता. त्या सांगायच्या, यांनी दर दोन तासांनी जेवण करा आणि फिट रहा.
लठ्ठपणा ही फक्त वैयक्तिक आरोग्याची गोष्ट नाही. ती आपल्या देशासमोरची सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं एक मुख्य समस्या आहे. जिकडं बघावं तिकडं पोट सुटलेल्या लठ्ठ व्यक्ती जागोजागी दिसतात. लठ्ठपणासोबतच येणारे हाय बीपी, डायबेटीस, हार्ट अटॅक, मेंदूतला रक्तस्राव या सगळ्यांचंच आपल्या देशातील प्रमाण लक्षणीयरित्या वाढतेय.
बीफोर आणि आफ्टरचे फोटो दाखवून हजारो रुपये कमवण्याचे धंदे सुरू आहेत. लठ्ठ लोकांना मूर्ख बनवण्याचा हा उद्योग जोरात चालूय. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही दिवसांतून दोनदाच जेवणं हा वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठीचा मूलमंत्र सांगण्याचा दावा डॉ. दीक्षित करतात. त्याला त्यांनी जीवनशैली बदल योजना असं नाव दिलंय.
डॉ. दीक्षित यूट्यूबवरच्या आपल्या भाषणात सांगतात, `लठ्ठपणा आणि डायबेटीस हे जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत. त्यांचा ठोस मुकाबला करण्यासाठी गोळ्या, औषधं नाही, तर जीवनशैलीत योग्य बदल करणं हाच उपाय आहे, यावर आमचा विश्वास आहे. हा तर्क विचार करणाऱ्या कोणालाही पटेल असाच. आणि हा तर्क केवळ विशफुल थिकिंगवर आधारित नसून याला आम्ही प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधांचा आणि जागतिक संशोधनांचा आधार आहे.`
डॉ. दीक्षित यांनी स्वतःच २०१२ मधे स्वतःचं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्यामुळे त्यांच्या पोटाचा घेर काही कमी झाला नाही. यूट्यूबवर डॉ. श्रीकांत जिचकारांचं भाषण ऐकलं. डॉ. जिचकारांनी सांगितल्यानुसार त्यांनी स्वतःवर प्रयोग केला. आठ किलो वजन आणि दोन इंचांनी पोटाचा घेर कमी झाला. त्यानंतर शेकडो लोकांवर प्रयोग केले. त्यातूनच ‘लठ्ठपणा आणि डायबेटीसमुक्त भारत’ अभियान सुरू झालं.
मुळात हे सारे प्रयोग डॉ. श्रीकांत जिचकार यांनी १९९७ ते २००३ केले होते. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सर्वाधिक डिग्र्या मिळवलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री जिचकार मुळात डॉक्टर होते. त्यांनी लठ्ठपणामधे इन्सुलिनची भूमिका लोकांसमोर आणली. दोनदाच जेवणं कसं लाभदायक ठरू शकतं हे सांगणारी त्यांची व्याख्यानं आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रासोबत देशभरात फिटनेस चळवळ सुरू व्हावी, ही जिचकारांची इच्छा होती.
जिचकारांचा हा वारसा दीक्षितांनी पुढे चालवला. स्वतः प्रयोग केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी सप्टेंबरमध्ये डॉ. दीक्षितांचं ‘विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध’ हे पुस्तक आलं. ऑगस्ट २०१८पर्यंत या पुस्तकाच्या १६ आवृत्या आल्यात. याच वर्षी सात आवृत्या आल्या. यावरून दोन वेळा जेवण्याचा हा फंडा किती वेगानं पसरतोय, हे ध्यानात येतं.
डॉ. दीक्षितांचा फंडा साधा आणि सोपाय. दिवसातून दोन वेळा जेवा. दोन वेळा जेवण्याच्या वेळा ज्याच्या त्याच्या वेगळ्या असू शकतात. ही वेळ ठरवण्याचा एक निकष म्हणजे कडक भूक लागणं. दिवसभरातून ज्या दोन वेळा तुम्हाला अशी भूक लागेल, त्या तुमच्या जेवणाच्या वेळा असतील. जेवणाच्या या दोन वेळा म्हणजे दोन स्लॉट आहेत. एक स्लॉट ५५ मिनिटांचा आहे. या स्लॉटमधे तुम्ही गरजेपुरतं काहीही खाऊ शकता. जेवणासोबतच रोज ४५ मिनिटं साडेचार किलोमीटर चाला. दोन जेवणांमधे इन्सुलिन स्राव तयार न करणारे पदार्थ खायला ते सांगतात. इन्सुलिन तयार करणारे, सर्वांना निरुपद्रवी वाटणारे साखरेच्या चहासारखे पदार्थसुद्धा जेवणच आहेत, असंही ते सांगतात.
कडक भूक लागली की खायचं. एकदा जेवायला बसलात की ते जेवण ५५ मिनिटांत संपवायचं. जेवणाचे दोन स्लॉट. दोन स्लॉटच्या मधल्या वेळेत सुरवातीच्या काळात भूक लागल्यासारखं वाटंल. यावेळी पोटभर पाणी प्या, घरात बनवलेलं ताक प्या, ग्रीन टी, एखादा टोमॅटो घेऊ शकता. दोन स्लॉटमधे तुम्ही कधीही जेवू शकता. यामधे वेळेचा काही संबंध नाहीय. कडक भूक लागली की दिवसात दोनदा जेवायचं. मग ही भूक कधी का लागेना.
डाएट प्लॅनसोबत व्यायामही गरजेचा आहे. ४५ मिनिटात साडेचार किलोमीटर चालणं हा बेस्ट व्यायाम आहे. पहिल्या वीसेक मिनिटांत तुमच्यातलं ग्लुकोज जळणार आणि मग नंतर फॅट. दोनवेळचं जेवण आणि व्यायाम यांच्यात सातत्य ठेवल्यास तीनच महिन्यात सकारात्मक बदल दिसतील, असा दावा डॉ. दीक्षित करतात.
ही आहारपद्धत कोणत्याही त्रासाविना तुम्ही आयुष्यभरासाठी आचरणात आणता येते. लठ्ठपणा आणि डायबेटीस हे एकमेकाला पुरक आहेत. आम्ही इन्सुलीन लेवल कमी करायला सांगतो. जीवनशैली बदल योजना फॉलो केल्यास चार गोष्टींमधे फरक दिसायला लागतो. त्या म्हणजे वजन कमी होतं, पोटाचा घेर कमी होतो. शुगर लेवल नियंत्रणात राहते आणि इन्सुलिन लेवल कमी राहते. तीन महिन्यात या चार पॅरामीटरमधे काय बदल होतो. त्यावरून या योजनेचे यशापयश मोजावं, असं डॉ. दीक्षितांना वाटतं.
कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीशिवाय सर्वसामान्यांना सहभागी करून घेणारं ‘लठ्ठपणा आणि डायबेटीसमुक्त भारत’ हे अभियान आता चांगलंच बाळसं धरतंय. दीक्षित सांगतात, त्यानुसार जुलै-ऑगस्ट २०१५ मधे त्यांचा पहिला वॉट्सअप ग्रुप तयार झाला. आज ही संख्या १६२ वर गेलीय. सदस्यसंख्या ४० हजारावर पोचलीय. या आहार योजनेचा प्रचार आणि प्रसार करणारे जवळपास ६१ ग्रुप अडमिन या अभियानात कार्यरत आहेत. महाराष्ट्रात या विषयावर सुमारे २५० व्याख्यानं डॉ. दीक्षित आणि गटप्रमुखांनी दिलीत.
ऋतुजा दिवेकरांचा दर दोन तासांनी थोडं-थोडं खाण्याचा फंडा आता मागे पडल्यासारखा वाटतो. कारण या फंड्याला जोडून आलेली गोष्ट म्हणजे करीना कपूरची झीरो फिगर. त्यांचीही पुस्तकं गाजली. ठिकठिकाणी भाषणं झाली. त्यातून अनेकांना फायदा झाला. ही काहीतरी बॉलीवूड स्टाईल आहार पद्धती असल्याचा समज सर्वसामान्यांमधे झालेला दिसतो. मॉडर्न खाणं नको, तर आजीआजोबा खायचे ते खा, असा त्यांचा दावा होता. पण त्यांचा फॉर्म्युला गाजला, तो सोशल मीडिया फार अक्टिव नसतानाच्या काळात. त्या तुलनेत दीक्षितांचा दोन वेळा जेवण्याचा हा फॉर्म्युला सोशल मीडियाचा हात धरून जोरात तळागाळातही आगेकूच करताना दिसतोय.
गुगलवर डॉ. जगन्नाथ दीक्षित असं टाईप करताना डॉ. जगन्नाथ दीक्षित डाएट प्लॅन असा ऑप्शन दिसायला लागतो. याचा अर्थ हा ऑप्शन लोकांनी डॉ. जगन्नाथ दीक्षित या नावासोबत सर्वाधिक वेळा काय सर्च केला असणार. त्यामुळं लोक या सगळ्याकडं एक डाएट प्लॅन म्हणूनच बघतायत, असं दिसतं. पण ते म्हणतात हा डाएट प्लान नाही तर लाईफ स्टाईल आहे.
डायबेटीक लोकसुद्धा ही पद्धत अवलंबू शकतात. डायबेटीसपूर्व व्यक्ती तीन ते सहा महिन्यांत डायबेटीसमुक्त होईल. औषधं सुरू न झालेले डायबेटीकही सहा ते नऊ महिन्यांत डायबेटीसमुक्त होतील. एवढंच नाही, तर अनेक औषधं घेऊनही डायबेटीस नियंत्रणात येत नसणाऱ्या रूग्णांची औषधंही कमी होऊ शकतील आणि डायबेटीस नियंत्रणात येईल, असं डॉ. दीक्षितांचं म्हणणंय.
`या अभियानात कुणाला सहभागी व्हायचं असेल तर आम्ही त्यांना दोन टेस्ट करायला सांगतो. एक, इन्सुलिन आणि दुसरी एचबीएवनसी. मला डायबेटीस नाही, असं सांगणाऱ्या ३० टक्के लोकांमधे मधुमेहाची समस्या आढळली. डायबेटीसच्या लोकांना औषधं बंद करा, डॉक्टरांकडं जाऊ नका, असं आम्ही कधीच सांगत नाही. संबंधित डॉक्टरांशी बोलून ही पद्धत अवलंबायची की नाही हे ठरवावं.’ दीक्षित सांगतात.
दोनवेळा जेवा फॉर्म्युल्यामधे सगळ्यांचा पसंतीला उतरणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे, आपण आधी खात पित होतो, ते नंतरही कायम ठेवता येतं. डाएट प्लानमधे हे खाऊ नका, ते खाऊ नका असा सांगितलं जातं. पण या फॉर्म्युल्यात असं काहीच नाही. इथं शाकाहारही चालतो, मांसाहारही चालतो. हा फॉर्म्युला फॉलो करण्याआधी पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ तुम्ही खात असला तर ते आजही तुम्हाला खाण्यास कुठलंच बंधन नाही.
सध्या बालपणातल्या लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनतेय. गेल्या चार दशकांमध्ये लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमधे लठ्ठपणाचं प्रमाण तब्बल दहापटीनं वाढलंय. जगभरात १२.४० कोटी मुलं-मुली ही खूप जाड आहेत, असा एका संशोधनातून समोर आलंय. दीक्षित म्हणतात, ‘अठरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी या डाएट प्लॅनची आवश्यकता नाही. वाढत्या शरीरात दोन वेळच्या जेवणावर ते दिवस काढू शकत नाहीत. त्यामुळे या मुलांसाठी चार स्लॉटमधे जेवण द्या, असं आम्ही सांगतो. मुलांना एक तास ग्राऊंडवर खेळायला पाठवा.’
अनुवंशिक कारणांमुळं किंवा काही संप्रेरकाधारित आजारांमुळे लठ्ठ झालेल्या व्यक्तींचे वजन कमी होण्यास कदाचित दोनवेळा जेवणाचा उपाय तितकासा उपयोगाचा ठरणार नाही. पण लठ्ठपणाची ही कारणं शंभरातल्या दोन तीन लोकांमधे दिसतात. बहुतांश लोकांमधे जास्त किंवा अयोग्य खाणं आणि शारीरिक श्रम न करणं हीच लठ्ठपणाची मुख्य कारणं असतात.
डॉ. दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनशैली बदल योजनेमधे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल, तर ती इन्सुलिन. आपल्या शरीरात स्वादुपिंड नावाची ग्रंथी असते. हिला इंग्रजीत पॅन्क्रियाज म्हणतात. या ग्रंथीतून इन्सुलिन आणि ग्लुकॅगान ही संप्रेरकं तयार होतात. इन्सुलिन हा शरीरातला बचत करणारा संग्राहक संप्रेरक आहे. आपण कोणतीही गोष्ट खाल्ली की इन्सुलिनचं एक माप स्वादुपिंडातून स्रवतं. मोठय़ा प्रमाणात अतिरिक्त इन्सुलिन तयार झाल्यावर त्याचा परिणाम डायबेटीस आणि लठ्ठपणा अशा आजारात होतो. एक माप इन्सुलिन तयार झाल्यानंतर ते ५५ मिनिटं कार्यरत असतं आणि त्यानंतर दुसरा माप तयार होतं. खाण्याच्या वेळा कमी करून इन्सुलिन निर्माण होण्यावर आपण निर्बंध घालू शकतो. त्यातून डायबेटिस आणि लठ्ठपणावर मात करू शकतो. मात्र याला काही डॉक्टरांकडून विरोध होताना दिसतोय.
याच सोबत इन्सुलिनचं अजून एक काम आहे. ते बरेचदा लक्षात येत नाही. ते म्हणजे, जोपर्यंत साखरेची व्यवस्था लागत नाही तो पर्यंत फॅटसेल्समधून फॅट बाहेर येऊ न देणं. रक्तात साखर किंवा फॅट जास्त प्रमाणात राहिले तर त्याचे वाईट परिणाम होतातच पण विटेपेक्षा दगड कठीण अशा न्यायानं साखरेचं वाढतं प्रमाण हे जास्त धोकादायक असतं. जोपर्यंत साखरेचं प्रमाण सुरक्षित पातळीपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत फॅटला तिच्या घरातून बाहेर पडू न देण्याचं काम इन्सुलिन करतं.
या ५५ मिनिटांच्या स्लॉटमधे जेवणाच्या पद्धतीवरही आक्षेप घेण्यात येत आहे. ही पद्धत आयुर्वेदाच्या विरोधात असल्याचं वैद्य परीक्षित शेवडे म्हणतात. त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे म्हटलंय, ’आवडेल ते खा, या सल्ल्यावरही शेवडे यांनी आक्षेप घेतला. ‘प्रत्येक आहारीय पदार्थाचे गुणधर्म वेगळे असतात. आरोग्याला वाईट असलेले पदार्थ जरी नेमून दिलेल्या ५५ मिनिटांत घेतले तरी त्याचे दुष्परिणाम होणारच आहेत. शिवाय पचायला जड आणि हलके असंही वर्गीकरण आयुर्वेदाने केलंय. जड पदार्थ आपल्या क्षमतेच्या निम्मे, तर हलके पदार्थ जेमतेम क्षमतेपर्यंतच खावं असंही आयुर्वेद सांगतो.’
ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर आता जीवनशैलीचा महत्वाचा भाग बनलेत. असं असताना दीक्षित फॉर्म्युला केवळ दोनदाच जेवायला सांगतो. नाष्टा ही गोष्टच इथं नाही. लंच आणि डिनर या गोष्टींचीही ते बात करत नाहीत. केवळ पहिलं जेवण आणि दुसरं जेवण याभोवतीच सगळं फिरतंय. दोन वेळा जेवणाची ही जुनीच पद्धत असल्याचंही सांगितलं जातं. पण आयुर्वेदात या दोन वेळा जेवणाला आधार नाही, असं वैद्य शेवडे म्हणतात.
लेखिका दीपा देशमुख दोनवेळा जेवण्याच्या फॉर्म्युल्याविषयी आपल्या फेसबूक पोस्टमधे म्हणतात, ‘खरं तर डॉ. दीक्षित आधी तुमची मानसिक तयारी करतात. भूक ही अनेकदा मानसिक असते. ती खोटी भूक तुम्हाला तुमच्या लागलेल्या सवयीमुळे सतत खायला भाग पाडते. त्यामुळे एकदा का तुम्हाला दोन वेळ खाण्याची सवय लागली की खोटी भूकही भीती दाखवणं बंद करते. मग तुम्ही आपोआपच फिरायला जाता. आणि मग जगन्नाथ दीक्षितांचं पुस्तक वाचताच त्यात दिलेला आहार, त्यातला व्यायाम हेही करायला लागता. थोडक्यात सुरवातीलाच घाबरवलं तर कोणीही तयार होणार नाही, हे ओळखून डॉ. दीक्षितांनी ‘हे सगळं खूप सोपं आहे’ असा आधार सगळ्या मंडळींना दिलाय.’
दीक्षितांनी सांगितलंय तसं दोनदा जेवायचं की ऋजुता दिवेकर सांगतात, तसं दोन तासांनी, या प्रश्नाचं उत्तर तसं सोपं नाही. डाएटचे वेगवेगळे फॉर्म्युले येत जात असतात. उद्या डॉ. दीक्षितांचा फॉर्म्युलाही मागे पडेल. दुसराच एखादा फॉर्म्युला पुढे येतील. कारण कोणताही फॉर्म्युला कितीही परफेक्ट असला, तरी त्याची अमलबजावणी आपणच करायची असते. जे ती नीट करतात, त्यांचं वजन कमी होतं. जे त्यातला उत्साह कायम ठेवू शकत नाहीत, त्यांची ढेरी पुन्हा वाढू लागते. त्यामुळे आतातरी आपल्याकडे एकच बिनपैशाचा मार्ग शिल्लक आहे. तो आहे, `करके देखो`!