हिंदुत्ववादी पॉप संगीत आळवतंय मुसलमानविरोधी सूर

०८ फेब्रुवारी २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


भजन-किर्तनात न रमणाऱ्या तरुणाईला धार्मिक उपदेश करायचा तर त्यासाठी तरुणाईला जवळची वाटतील अशीच साधनं निवडली जायला हवीत. याच विचारातून उत्तर प्रदेशमधे हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला आलंय. धार्मिक उपदेशापेक्षा धार्मिक विद्वेषाचा प्रसार करणाऱ्या या संगीतविश्वाचं अंतरंग उलगडणारी डॉक्युमेंटरी डीडब्ल्यू या जर्मन न्यूज एजन्सीनं प्रसारित केलीय.

‘माझी आई फार आजारी होती. तिला रक्ताची गरज होती. त्यावेळी ब्लड बँकसारखी सोय नव्हती. बाबा तिच्यासाठी रक्त मिळवताना धावपळ करत होते. तिचा आजार इतका जीवावर बेतलेला असतानाही आईने बाबांना निक्षून सांगितलं होतं की काही केल्या कुठल्याही मुसलमानाचं रक्त माझ्यासाठी आणू नका. हे असं माझ्या घरचं वातावरण. ते माझ्या रक्तातच भिनलंय.’

डीडब्ल्यू या जर्मन न्यूज एजन्सीसाठी रिपोर्टर म्हणून काम करणाऱ्या आकांक्षा सक्सेनाला हे सगळं सांगताना गायक संदीप आचार्यच्या चेहऱ्यावर ‘परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन’चा कोरडेपणा सहज दिसत होता. वारसाहक्काने मिळालेली हिंदुत्ववाद आणि इस्लामद्वेषाची ही शिकवण संदीप स्वतःपुरती मर्यादित न ठेवता, आपल्या पॉप गायकीतून तिचा प्रचार करतो. हे हिंदुत्ववादी पॉप संगीतविश्व डीडब्ल्यूने आपल्या नव्या डॉक्युमेंटरीमधून मांडलंय.

शरयूच्या काठावरचे विषारी सूर

हिंदुत्ववादी राजकारणाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तरप्रदेशची तरुणाई ‘हिंदू का है हिंदुस्तान, मुल्लो जाओ पाकिस्तान’च्या तालावर थिरकते, यात नवल वाटण्यासारखं काही नाही. अनेक महत्त्वाच्या हिंदू तीर्थक्षेत्रांचं माहेरघर असलेलं उत्तर प्रदेश गेल्या काही वर्षांपासून गंगा-जमनी तहजबीला फाटा देत शरयूच्या काठावर पर्यायी संस्कृती उभी करतंय. या काठावर घुमणारे हिंदुत्ववादी पॉप गाण्यांचे सूर बरंच काही सांगून जातात.

२०२२ला खरगोनमधे झालेल्या दंगलीतही अशाच गाण्यांचा मोठा वाटा होता. रामनवमीच्या उत्सवासाठी खरगोनमधे निघालेल्या डीजे मिरवणुकीत जाणीवपूर्वक मशिदीसमोर ही गाणी वाजवली गेली. त्यानंतर या भागात दंगलीचा आगडोंब उसळला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगलखोरांच्या घरांवर योगी सरकारने बुलडोझर चालवण्याचा आदेश दिला, ज्यात सर्वाधिक नुकसान मुसलमान वस्त्यांचं झालं होतं.

हेही वाचा: कोकणी मुसलमानांचे पूर्वज होते तरी कोण?

आमदारकीपेक्षा गायकी भारी

दशकभरापूर्वी, हिंदू युवा वाहिनीच्या सांस्कृतिक विभागाचा जिल्हाध्यक्ष असलेल्या संदीप आचार्यने हिंदुत्ववादी पॉप संगीत जन्माला घातलं. व्हॉट्सऍप युनिवर्सिटीवर फुकट मिळत असलेलं ज्ञान हाच हिंदूंचा खरा इतिहास असल्याची संदीपची ठाम समजूत आहे. त्यामुळेच ‘दुनिया जाने शिवलिंग छुपाएँ बैठे हो मक्का मदिने में, मक्केमेंही जल चढाऊंगा अब जी सावन के पावन महिनेमें’ अशी गाणी बनवायला त्याला कमालीचा हुरूप येतो.

लहानपणापासून एकही मुसलमान मित्र नसल्याचं छातीठोकपणे सांगणारा संदीप सगळ्या मुसलमानांना वाट चुकून धर्मांतर केलेले हिंदू मानतो. त्याला राजकारणात रस नाही. कारण स्थानिक आमदार-खासदारांच्या भाषणापेक्षा माझी गाणी ऐकायला गर्दी होतेय, तर राजकारणातल्या तुटपुंज्या प्रसिद्धीचं मी काय करू असा सवाल त्याने ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत विचारला होता.

कम्प्युटर इंजिनियर बनला गायक

उत्तरप्रदेशमधे होत असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणात तरुणांच्या वाढत्या सहभागामागे राज्यातली बेरोजगारी कारणीभूत असल्याचं विश्लेषण न्यूजक्लिकचे अनिंद्यो चक्रवर्ती यांनी केलं होतं. संदीप आचार्यला आपला मोठा भाऊ आणि गुरु मानणारा भोजपुरी गायक प्रेम कृष्णवंशी हाही याच बेरोजगारीचं एक उत्तम उदाहरण आहे. कम्प्युटर सायन्समधे इंजिनीयरिंग केलेल्या प्रेमला सध्या विखारी धार्मिक विद्वेषाचं सोशल इंजिनीयरींग भुरळ घालतंय.

लखनऊच्या बहुजन वस्तीत वाढलेल्या प्रेमचे अनेक मुसलमान मित्र, शेजारी असल्याचं तो मान्य करतो, पण ते त्याच्या गाण्यांमधून मात्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही. भोजपुरी प्रेमगीतं, विरहगीतं गाणारा प्रेम संदीपच्या संपर्कात आल्यापासून आपल्यासारख्याच दोन-चार बेरोजगार मित्रांना घराच्या गच्चीवर जमवून हिंदुत्त्ववादी गाण्यांची मैफिल जमवतो, तेव्हा बेरोजगारीचा सूर किती हतबल असू शकतो, याचा प्रत्यय येतो.

हेही वाचा: जिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू!

प्रशासनाचं दुर्लक्ष फावतंय

डीडब्ल्यूने बनवलेल्या डॉक्युमेंटरीमधे संदीपचा एक कार्यक्रम चित्रित केला गेलाय. या कार्यक्रमात सर्वच वयोगटातल्या स्त्री-पुरुषांचा सहभाग दिसत असला, तरी त्यात लहानग्यांचा आणि तरुणाईचा टक्का प्रकर्षाने जाणवतो. संदीपने या कार्यक्रमात गायलेली गाणी आक्षेपार्ह, चिथावणीखोर असूनही बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचं त्याकडे होणारं सोयीस्कर दुर्लक्ष डीडब्ल्यूने आपल्या डॉक्युमेंटरीमधे टिपलंय.

ही सगळी गाणी यूट्यूबच्या माध्यामतून लाखो लोकांपर्यंत पोचतात. एखाददुसऱ्या तक्रारीनंतर ही गाणी यूट्यूबकडून डिलीटही केली जातात. बऱ्याचदा अकाऊंटही उडवलं जातं. पण त्याचं कसलंही सोयरसुतक नसलेले हे गायक नवं अकाऊंट उघडून ही गाणी पुन्हा अपलोड करत राहतात. हा पाठशिवणीचा खेळ सतत चालूच असतो आणि तितक्याच सातत्याने सायबर सेल या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असतं.

भजनकीर्तन नको, गाणंच वाजवा!

जनसामान्यांमधे देव, देश, धर्माबद्दल आत्मीयता वाढावी यासाठी भजन, कथानिरुपण, कीर्तनासारखे सामाजिक कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जात असतात. पण त्यातून होणाऱ्या उपदेशाचा परिणाम समाजातल्या काहीच घटकांपुरता, विशेषतः वयोवृद्धांपुरता मर्यादित असतो. पण ही आत्मीयता जागृत ठेवण्यासाठी ज्या तरुण मनांची गरज असते, ती तरुण मनं मात्र अशा कार्यक्रमांमधे रस घेताना दिसत नाहीत.

त्यांना डीजेच्या कर्कश्श आवाजाचं, उडत्या चालीच्या गाण्यांचं, विनाकारण उत्सवीकरणाचं विशेष अप्रूप असतं. या आवाजात त्यांना बेरोजगारीचा शिक्का झटकून बेभान होत नाचणं महत्त्वाचं वाटतं. तेव्हा त्यांच्या मदतीला हे हिंदुत्ववादी पॉप संगीतविश्व धावून येतं. लोकप्रिय भोजपुरी सिनेगीतांच्या चालीवर बनवलेली ही गाणी त्यांना जवळची वाटतात. त्यांच्या अंगात धर्मासाठी पेटून उठायची रग निर्माण करतात.

‘हिंसेचं सामान्यीकरण, गौरवीकरण करणारी ही गाणी ऐकून बहुतेकांची मानसिकता ही हा विद्वेष साहजिकच आहे, असं मानण्याकडे झुकते. गाण्यात जे सांगितलंय त्याची फक्त कल्पना करण्याऐवजी ते आपण प्रत्यक्षातही उतरवू शकतो असा विश्वास ऐकणाऱ्यांना मिळतो. त्यातूनच पुढे दंगली होतात.’ असं मत दिल्ली युनिवर्सिटीचे एक अध्यापक अपूर्वानंद झा यांनी या डॉक्युमेंटरीसाठी दिलेल्या मुलाखतीत नोंदवलं.

हेही वाचा: 

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

हिंदू-मुस्लिम नसलेली पत्रकार सांगतेय, दिल्ली दंगलीत काय झालं?

बेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र