आज तर दिव्यांचा उत्सव आहे!

१५ नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


चोहीकडे अंधार आहे म्हणून आपण दिवाळी साजरीच करायची नाही का? करायची ना, नक्की करायची. ती यासाठी करायची की त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. आयुष्यातल्या अडचणींचा निचरा करायची उमेद मिळणार आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या प्रकाशाच्या किरणांतूनच सकारात्मक स्पंदनं मिळत असतात.

कोरोनाचा प्रकोप आणि त्यापायी लागलेला प्रदीर्घ लॉकडाऊन यामुळे आपला देशच नव्हे तर सारे जग एका अभूतपूर्व अशा संक्रमणातून अशा प्रकारे गेलं की जणू काळपुरुषाला गाढ झोप लागलीय. त्या झोपेत त्याला एखादं दीर्घ दु:स्वप्न पडलंय.

गेल्या वर्षी याच दिवशी आपल्याला कुणी सांगितलं असतं की येत्या वर्षांत असा एखादा अद्रुष्य़ जंतू सारं जग ठप्प करेल, माणसं घरात कोंडली जातील, रस्ते सुनसान होतील, विमाने हॅंगरमधे जातील. कारखाने, शाळा, क्रीडांगणं, बागा ओस पडतील. तर आपण त्याला वेड्यात काढलं असतं. पण असे अद्भुत प्रत्यक्षात घडलं आणि आपल्यापैकी प्रत्येकजण त्या अद्भुतिकेचा एक भाग बनून गेला.

स्वप्न हे वाईट असो किंवा चांगले पण ते कधी शाश्वत नसते. त्याला कालमर्यादा असते. तद्वत हे दु:स्वप्न सुद्धा सरण्याची चिन्हं दिसू लागलीयत. कालपुरुष हळूहळू कूस बदलतोय. रात्रीच्या गर्भात उद्याचा आशादायी उष:काल चाहूल देऊ लागलाय. या आशादायी उंबरठ्यावर आजची दिवाळी उभीय.

हेही वाचा : खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं?

जोपर्यंत माणसाच्या मनात आशा आहे तोवर माणसाला भविष्य आहे. आशा संपली की माणूस हरला. मी असीम आशावादी आहे. हा कोरोना अध्याय हा आपल्या आयुष्यातला एक बॅडपॅच आहे असं मी समजतो. आणि हा बॅडपॅच आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा होता की त्याने आपल्याला आयुष्याची ओळख करून दिली. खूप काही शिकवलं. आपत्तीशी झुंजायला शिकवलं. आरोग्याबद्दल जागरुक रहायला शिकवलं. पैशाचे मोल समजावून दिलं. आपलं कोण आणि परकं कोण ते ओळखायला शिकवलं.

अकल्पित्पणे आलेले संकट टाळता येत नाही. ते सहाजिकही आहे. आपणही ते टाळू शकलो नाही. पण त्याच्याशी जिद्दीने लढलो. लढता लढता जिंकलोही. कोरोनाशी केलेल्या या लढाईनं आपल्याला आयुष्याचं मोल समजावून दिलं. दु:खाची तोंडओळख झाल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. सततचं सुख माणसाला दुबळं करतं. आयुष्याचं खऱ्या अर्थाने आकलन होण्यापासून त्याला दूर ठेवतं. ज्यांनी कधी दु:खं बघितलीच नाहीत त्यांना सुखाची चव कशी समजणार? ज्यांनी अंधार पाहिलाच नाही त्यांना उजेडाचं महत्त्व कसं कळणार?

मग चोहीकडे अंधार आहे म्हणून आपण दिवाळी साजरीच करायची नाही का? करायची ना, नक्की करायची. ती यासाठी करायची की त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. आयुष्यातल्या अडचणींचा निचरा करायची उमेद मिळणार आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. या प्रकाशाच्या किरणांतूनच सकारात्मक स्पंदनं मिळत असतात.

अंधार आणि प्रकाशाचा लपंडाव आयुष्यभर चालू असतो. म्हणून तर उजेडाचं महत्त्व कळतं आपल्याला. प्रदीर्घ अंधारानंतर येणारी उजेडाची एक तिरीपसुद्धा खूप आशादायी असते. इथे तर प्रकाशाचे घडे घेऊन दिव्यांचा उत्सव सुरू होतोय.

हेही वाचा : कसा लावायचा बिहार निकालाचा अन्वयार्थ?

तर मित्रहो,चला, या पार्श्वभूमीवर आपल्या मनातली सारी निराशा झटकून टाकूया. आपल्या आयुष्यावर चढलेली अद्न्यानतमाची काजळी दूर करुया. आणि दीपदेवतेला प्रार्थना करुया की दु:खाचा अंधकार दूर होऊन सगळीकडे उजेडाचं राज्य यावं. प्रत्येक घरात सौख्य आणि समाधान नांदावं. सर्वांना आरोग्य लाभावं.

हो, आणखी एक करूया, दिवाळी म्हणजे फक्त एक दिवा नव्हे, तर दिवाळी म्हणजे दिव्यांच्या ओळी. दिव्याने दिवा पेटत जातो, दिव्यांच्या ओळी प्रज्वलित होतात, तेव्हाच प्रकाशाचा उत्सव साजरा होतो. आपणही तेच करू या. दिवाळी एकेकट्याने साजरी न करता ज्यांच्या आयुष्यात दु:ख आहे त्यांच्या आयुष्यात प्रकाश पेरुया. ज्यांच्या आयुष्यात दैन्य आहे त्यांना मदतीचा हात देऊया. जे धुळीत माखले आहेत त्यांना उचलून घेऊया.

ज्योत से ज्योत जलाते चलो
प्रेम की गंगा बहाते चलो

ही संतशिकवण जगून बघूया.

हेही वाचा : कमला हॅरिसच्या विजयाचा भारतीयांना आनंद व्हायचं काहीही कारण नाही!

मग दिव्यांच्या ओळीत एकेक दिवा जसा लागू लागेल तसतसे क्रुष्णगहन तमाच्या पार्श्वभूमीवर जाणीवांचे आकाश लकाकू लागेल, दुर्दम्य आशेच्या चांदण्या झगमगू लागतील, उत्साहाच्या चंद्रज्योती प्रकाशमान होतील आणि सारा आसमंत आनंदाने भरुन जाईल. मला खात्री आहे तुम्हा वाचकांच्या विश्वात आज एकही झाड असं उरणार नाही ज्याला माझ्या शुभेच्छांचा श्रावण स्पर्शून गेला नाही आणि मनाचा एकही कोपरा असा रिता राहणार नाही ज्याला माझ्या प्रेमाचा दिवा उजळून गेला नाही!

आज दिव्यांचा उत्सव आहे
समर्पणाची इथे पूजा ही
अन तेजाचा गौरव आहे....!
आज दिव्यांचा उत्सव आहे....!

विश्वामधले दैन्य सरावे, 
व्यथा, वेदना, विघ्न हरावे
या विश्वाच्या कल्याणाची
प्रार्थनाच ही अभिनव आहे....!
आज दिव्यांचा उत्सव आहे....!

विद्वेषाला नकोच थारा, 
अन प्रेमाला मिळो निवारा
प्रेमालागी प्रेम भेटते
हे नियतीचे लाघव आहे...!
आज दिव्यांचा उत्सव आहे....!

आनंदाच्या फुटोत लाटा
चैतन्याच्या मखमल वाटा
या प्रेमाने बोला, भेटा;
त्यानंतर हे संभव आहे
आज दिव्यांचा उत्सव आहे....!

दुःखी न येथे राहो कोणी
उल्हासाची झरोत गाणी
दीप देवता प्रसन्न व्हावी
तिच्या पदाशी आर्जव आहे
आज दिव्यांचा उत्सव आहे....!

शुभ दीपावली....!

हेही वाचा : 

अत्त दीप भव हा तर बुद्ध होण्याचा पासवर्ड!

सगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात?

प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक

घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण

जोतिबाच्या नावानं चांगभलं ही संपूर्ण मानवजातीच्या भल्याची मागणी