चंद्रपुरचे माजी आमदार आणि समाजसेवक एकनाथ साळवे यांचं १३ मार्चला ९१व्या वर्षी निधन झालं. अकरा वर्ष आमदार राहूनही ते कोणत्याही प्रलोभनाला बळी पडले नाहीत. वाचन, लिखाण, मनन आणि चिंतन हेच त्यांचं जीवन राहिलं. त्यांचे चिरंजीव जयंत साळवे यांनी जानेवारी महिन्यात लिहिलेली फेसबुक पोस्ट आज इथं देत आहोत.
आपल्या जन्मदात्याबद्दल मुलाने काय लिहावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं मोठं की, त्यांच्याबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे. ३० मार्च २०२० ला आपल्या वयाची नव्वदी पूर्ण केली. पण त्यांच्यामधे जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे आतापर्यंत तीन ते चार वेळा मरणाच्या दारातून ते परत आले.
वयाच्या एक्क्याणव्या वर्षी ते पत्रलेखन पोस्टकार्डवर करतात. महिन्यातून दहा ते बारा वेळा डायरी लिहितात. वाचन करतात. त्यांना आता ऐकू येत नाही. वॉकर घेऊन चालतात. पण वाचन आणि लिखाण अजूनही चालू आहे. आणखी एक सांगायचं म्हणजे मला महिन्यातून किमान आठ ते दहा वेळा पत्र लिहितात. पण तो पत्रसंवाद एकेरी आहे. मी काही त्यांच्या पत्रांना उत्तरं देत नाही.
परवाचीच गोष्ट. त्यांच्या डायऱ्या सहज चाळत होतो. दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ ला त्यांनी त्यांच्या डायरीत केलेली एक नोंद अशी आहे,
‘अत्त दीप भव. जीवनाचा अंतीम अध्याय. नकारार्थी पाहिलं तर, 'Empty mind is a devil's workshop' पण सृजनशील अत्त दीप भवच्या दृष्टीने पाहायचा निर्णय घेतला. इतर कुणाला दोष देण्याऐवजी उर्वरित ऊर्जेचा, वयाचा, वेळेचा उपयोग करण्याचा निर्धार केला. पण मनाच्या इच्छापूर्तीसाठी चालता येत नाही. वॉकरवर चालतानाही त्रास होतो. चांगली पुस्तकं वाचाविशी वाटतात. पण दृष्टीही गेल्यासारखीच वाटते. अशा निष्क्रियतेत अधिक किती जगायचं? पण हासुद्धा नकारार्थी विचार!'
हेही वाचा : कष्टकऱ्यांच्या पोरापोरींनी आयएएस बनणं कुणाला खुपतंय का?
बाबांचा जन्म ३० मार्च १९३० ला एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील म्हणजे आमचे आजोबा पांडुरंग पाटील साळवे यांचा मृत्यू बाबा एकोणीस वीस वर्षांचे असतानाच झाला. त्यांना चार बहिणी आणि एक भाऊ. त्यांची आई राहीबाई म्हणजे आमची आजी. त्यांचे आजोबा जगन्नाथ पाटील साळवे आणि त्यांचे काका अर्जुन पाटील आणि रामचंद्र पाटील साळवे यांनी त्यांना सांभाळलं.
त्यांना शिक्षणाची आवड होती म्हणून ते शिकले. मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण त्यांनी चंद्रपुरातून केलं. पुढे बीए करायला नागपूरला गेले. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. पण घरच्या गरीब परिस्थितीमुळे पार्ट टाइम शिक्षकाची नोकरी करून त्यांनी बीए केलं. नंतर एलएलबी केलं.
नागपूरला शिक्षण सुरू असताना कुलगुरु डॉ. वि. भी. कोलते यांचं त्यांना प्रोत्साहन मिळालं. विद्यार्थी दशेतच त्यांनी महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचून काढले. कम्युनिस्ट नेते कॉम्रेड एबी बर्धन यांच्याशी त्यांची ओळख झाली.
चंद्रपुरात आल्यानंतर जीवतोडे गुरुजींच्या जनता विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. चंद्रपूरला विठ्ठल मंदिर वॉर्डात दाऊजी येरेवार यांच्या घरी एक खोली भाड्याने घेऊन आयुष्याची गाडी ढकलणं सुरु केलं. ते राष्ट्रसेवा दलातही रोज जायचे. त्यामुळे काँग्रेसच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या ते संपर्कात आले.
त्यानंतर बाबांनी शिक्षकाची नोकरी सोडून चंद्रपुरात वकिली सुरू केली. त्यावेळी त्यांना ज्येष्ठ अधिवक्ता अॅड. ताराचंदजी खजांची, अॅड. देवरावजी कडूकर आणि अॅड. बापूसाहेब साधनकर यांचं मार्गदर्शन मिळालं. त्याआधी त्यांचे आजोबा जगन्नाथ पाटील साळवे यांच्या मध्यस्थीनं १९ मे १९५५ ला बाबांचं लग्न शालिनी रामभाऊ मोरे म्हणजे आमची आई हिच्याशी झाला.
१९६७ ला बाबांना चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. बाबा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. नंतर बाबा पुन्हा १९७२ ला प्रचंड बहुमताने निवडून आले. विधानसभेची मुदत एक वर्षाने वाढली होती. १९७२ नंतर सहा वर्षांनी म्हणजे १९७८ मधे बाबा पराभूत झाले. काँग्रेसचे सुद्धा त्यावेळी अर्स काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असं विभाजन झालं.
हेही वाचा : डॉ. जयसिंगराव पवार: इतिहासाला वर्तमानाशी जोडणारे संशोधक
बाबांनी १९६७ ला राजुरा इथं महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची स्थापना केली. या शाळेच्या स्थापनेला आता पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय. बल्लारपूर इथं बल्लारपूर पेपर मिल, कोळसा खाणी आणि इतर उद्योग असल्यामुळे तिथं बिहार, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातून अनेक लोक आपल्या रोजीरोटीसाठी आले होते.
त्यांच्या मुलांसाठी बाबांनी बल्लारपूर इथं १९७२ मधे दहावीपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालयाची स्थापना केली. हिंदी, उर्दू आणि तेलुगू भाषेतून दहावीपर्यंत शिक्षण देणारी ही महाराष्ट्रातली कदाचित एकमेव शाळा असावी. बल्लारपूर इथल्या या शाळेला २०२२ ला पन्नास वर्ष पूर्ण होतील. या शाळेचं एक ब्रीदवाक्य आहे, 'ग्यान का चिराग बुझने नही देंगे'.
बल्लारपूर इथल्या शाळेतल्या शिक्षकांचा संपूर्ण परिवार म्हणजे फुले परिवार आहे. तिथं हिंदू मुस्लीम ऐक्याचं दर्शन होतं. अनेक प्रकारचे कार्यक्रम बल्लारपूर इथल्या शाळेत घेतले जातात. त्या सगळ्या कार्यक्रमांना बाबांचा आशिर्वाद असतो.
बाबा १९६७ ते १९७८ अशी अकरा वर्ष आमदार होते. १९६७ ला बाबा पहिल्यांदा आमदार झाले. त्याच वर्षी लोकनेते शरद पवारही पहिल्यांदाच आमदार झाले होते. तेव्हा बाबांची पवारसाहेबांशी झालेली मैत्री आजही पहिल्यासारखीच कायम आहे. तेव्हाचे तरुण तुर्क म्हणजे सुशीलकुमार शिंदे, बाबा आणि इतर बरेच तरुण आमदार यांचा एक गट पवारसाहेबांसोबत होता. ही सगळी मंडळी भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात राजकारणात तयार झालेली माणसं होती.
बाबांवर महात्मा गांधी, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचाच पगडा असल्यामुळे बाबांनी कधी देव धर्माला मानलं नाही. समोर आलेल्या माणसाची जात आणि धर्म न पाहता त्याला मदत केली. अकरा वर्ष आमदार राहूनही त्यांनी ना कोणता बंगला बांधला ना चारचाकी गाडी घेतली.
वयाच्या पंच्याहत्तर, ऐंशीव्या वर्षापर्यंत बसमधूनच प्रवास करत राहिले. खूप पैसा कमवावा असं त्यांना कधी वाटलंच नाही. ना कधी त्यांनी आईसाठी सोन्याचा एखादा दागिना घेतला. पण पुस्तकांवर खूप प्रेम केलं. खूप पुस्तकं विकत घेतली. वाचली. वाचन, लिखाण, मनन आणि चिंतन हेच त्यांचं जीवन राहिलं.
हेही वाचा : अ. भि. गोरेगावकर स्कूल : खूप सारं शिकवणारी ‘शिकणारी शाळा’
आई १९५६ मधे जिल्हा परिषद चंद्रपूर इथं नोकरीला लागली. तिने १९८३ ला रिटायरमेंट घेतली. आई नोकरी करत असल्यामुळे बाबांना सामाजिक कामासाठी मोकळीक मिळाली असं म्हणायला हरकत नाही. १९७८ ला बाबा तिसऱ्यांदा निवडून आले नाहीत. ते पराभूत झाले. पण रडत बसले नाहीत. निवडणुकीचा निकाल लागताच तिसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा कोर्टात जाणं सुरू केलं. आपल्या आयुष्याची नवी सुरवात केली.
पण बाबांचं सामाजिक जीवनात सेवेचं काम सुरूच राहिलं. कुठं शेतमजुरांसाठी मोर्चे तर कुठं आदिवासींसाठी संघर्ष तर कधी पोलिसांविरोधात संघर्ष करणं चालूच होतं. दरम्यान आम्ही भावंडं मोठे झालो. मोठी बहीण रजनी डॉक्टर झाली. त्यानंतर चारु ही एमएससी होऊन शिक्षिका झाली. नंतर विजया हिने बीकॉमला प्रवेश घेतला. पण तिचं लग्न झाल्यामुळे ती पुढे शिकली नाही.
तिच्यापेक्षा लहान म्हणजे मी बीकॉम, एलएलबी केलं. सर्वात लहान बहिण मंजूषा हिने पॉ लिटेक्निक केलं. दरम्यान १९९० ला एलएलबी फायनलची परीक्षा पास व्हायच्या आधीच २६ जून १९९० ला माझं लग्न झालं. त्याआधी माझ्या तिनही मोठ्या बहिणींचं लग्न झालं होतं.
१९९३ ला आमच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना घडली. १९९३ ला एक दिवस पेपरात आम्ही बातमी वाचली, 'माजी आमदार अॅडवोकेट एकनाथराव साळवे यांचा बुद्ध धर्मात प्रवेश' ही बातमी वाचल्यावरच आमच्या घरच्यांना कळलं की, बाबांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केलाय. आपल्या समाजात असा समज आहे की, बुद्ध झालं म्हणजे दलित झालं.
१९९३ ते २०२० या सत्तावीस वर्षांच्या काळात समाजाच्या विचारसरणीत बराच बदल झालाय. तरीही तेव्हा आम्हाला बाबांच्या धर्म परिवर्तनामुळे जाती बहिष्कृततेचे चटके सहन करावे लागले. मी वकील होऊन दोन तीनच वर्ष झाली होती. माझं बुद्ध धम्माबद्दलचं आकलन तेव्हा अतिशय कमी होतं.
मी भलेही फुले आणि बाबासाहेबांबद्दलची काही पुस्तकं वाचली होती तरी बुद्ध धम्म म्हणजे काय हे मला तेव्हा समजलं नव्हतं. नंतर मी जेव्हा डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेला 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ वाचला. तेव्हा मला बुद्ध धम्म म्हणजे मानव मुक्तीचा मार्ग आहे हे समजून आलं.
हेही वाचा : मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे
त्याचं असं झालं की, बल्लारपूर इथं आंबेडकरी कार्यकर्त्यांचा एक कार्यक्रम होता. त्यात व्यासपीठावर आंबेडकरी नेते भाऊसाहेब लोखंडे, बाबा आणि इतर मान्यवर होते. लोखंडे साहेबांनी आपल्या भाषणात तेव्हा असं विचारलं की, एकनाथराव साळवे नेहमी बाबासाहेबांच्या विचारांचा पुरस्कार करणारी भाषा बोलतात तर साळवे साहेब बौद्ध धम्माचा स्वीकार का करत नाहीत.
त्यानंतर बाबांनी आपल्या भाषणात म्हटलं की, आम्ही कधीचाच बुद्ध धम्माचा स्वीकार केलाय पण त्याचा गाजावाजा काही केला नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेपरमधे बाबांच्या बुद्ध धम्म प्रवेशाची बातमी आम्हाला वाचायला मिळाली. पण त्याचा परिणाम असा झाला की, आमच्याच जातबांधवांनी आम्हाला जाती बहिष्कृत केलं. पण काही वर्षांनी नागपूरच्याच आमच्या समाजबांधवांनी बाबांचा पुरोगामी अशा बुद्ध धम्माचा स्वीकार केल्याबद्दल सत्कार केला.
नंतर चंद्रपूर इथं कुणबी समाजाच्या कार्यक्रमात बाबांना बोलवण्यात आलं होतं. या कार्यक्रमाची एक गंमत सांगण्यासारखी आहे. बाबा आणि इतर वक्ते व्यासपीठावर होते. तेव्हा मी आणि अॅडवोकेट वासेकर आणि इतर मित्र श्रोत्यांमधे बसलो होतो. एका खेड्यातले पाटील आमच्या बाजूला बसले होते. नंतर बाबांचं भाषण सुरू झालं तेव्हा ते पाटील म्हणाले, 'अबाबा हा एकनाथ साळव्या इथे कसा आला? त्याने तर बुद्धधर्म घेतला नं?' मी बाजूला बसून सर्व गंमत ऐकत हसत होतो.
काही वर्षांनी बाबांनी, 'मी बुद्ध धम्म का स्वीकारला?' ही पुस्तिका लिहून आपली बुद्ध धम्माबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते आपली भूमिका स्पष्ट करताना या पुस्तिकेत म्हणतात, 'निसर्गानुगामी जीवन हा सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. पण चुकीच्या धर्मकल्पना, अविद्या आणि निहित स्वार्थ यातून कृत्रिम धर्माची स्थापना होते. आपले अहंकार आणि स्वार्थ सांभाळण्यासाठी सत् धम्मा ऐवजी खोट्या साधूंनी सांगितलेलं कर्मकांड आणि धर्मद्वेष यात मोठमोठे जनसमुदाय स्वत:ला गुंतवून घेतात.'
'पूर्वापार चालत आलेलं सोडायचं कसं अशा अगतिकतेतूनही लोक असत्य आणि कृत्रिम धर्माचा त्याग करू शकत नाहीत. माणसा माणसांत भेद निर्माण करतात. तलवारी, बंदुका, बॉम्बगोळे घेऊन धावतात. आत्मनाश करणाऱ्या आत्मवंचक लोकांचे धर्म इतरांच्या धर्माचा आकस बाळगतात. तथाकथित धर्मयुद्ध होऊन कित्येक निरपराध लोकांची हत्या होते. या कोलाहलातून मला बाहेर पडलंच पाहिजे. सर्व पूर्वग्रह, भय, विषाद, आशा, आकांक्षा, चिंता आणि क्लेश यांचा त्याग करून मी महाकारुणिक बुद्धाला शरण गेलो. कारण तो मानवाचा, मानवी कल्याणाचा, मानवमुक्तीचा मार्ग आहे.'
'तो निसर्ग धर्म आहे. तो समता स्वातंत्र्याची ग्वाही देतो. तो धम्म सम्यक क्रांतीचा परिवर्तनशील मार्ग आहे. 'भवतु सब्ब मंगलम'चा तो संकल्प आहे. माझ्या स्वातंत्र्याबरोबर इतरांना स्वतंत्र करण्याची बुद्ध धम्मात हमी आहे. बुद्ध धम्म सर्व मानव प्राण्यांचा आहे. फक्त जाणीव व्हायची आहे. त्यासाठी जाणत्या, सावध कार्यकर्त्यांनी, माता भगिनींनी भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, परमपुज्य डॉ. बाबासाहेबांच्या पावन स्मृतींशी इमान राखून संघटित होऊन संघर्षासाठी बाहेर आलं पाहिजे.’
'एका महान बौद्ध क्रांतीचा वारसा हा आपला ऐक्य बिंदू ठरावा. मानवी स्वातंत्र्याचा विज्ञान, उत्पादकता, सामाजिक न्याय आणि निसर्ग यांच्याशी बुद्ध धम्मात सुंदर समन्वय साधलेला आहे. अशा बुद्ध धम्माचा स्वीकार करून मी मानवमुक्तीच्या एका महान चळवळीशी जोडला गेलो अशी माझी धारणा आहे.'
हेही वाचा : स्त्रिया कोर्टाचा अपमान करतात की कोर्ट स्त्रियांचा?
बाबांनी १९९३ मधे बुद्ध धम्माचा स्वीकार केला. १९९४ ला माझ्या लहान बहिणीचं लग्न भारतीय तटरक्षक दलातल्या कमांडींग ऑफिसर राकेश गोंडाणे या होतकरु तरुणासोबत नोंदणी पद्धतीने आणि बुद्ध पद्धतीने अश्या दोन्ही प्रकारे झाला. या लग्नासाठी दिवंगत राजा ढाले आणि इतर बरीच प्रतिष्ठित मंडळी हजर होती. ढाले साहेबांनी या लग्नाचं कौतुक करणारं पत्र मला पाठवलं. ते आजही माझ्याजवळ आहे.
बाबांना १९७२ ला कॉमनवेल्थ पार्लियामेंट सेमिनारसाठी भारताकडून लंडनला पाठवण्यात आलं. १९७८ पासून पुन्हा नव्याने वकिली सुरू केल्यानंतर चंद्रपूर नागपूर कोर्टात त्यांनी कामं केली. टाडा कायद्याखाली गरीब, निरपराध आदिवासींना गोवण्यात आलं होतं. त्यांच्या वतीने बाबांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली.
शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलितांना सिंचनासाठी पाणी सत्याग्रह केले. तलाव आणि सिंचनाच्या सोयीसाठी सत्याग्रह केला. त्यांनी महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स, माओ, महात्मा गांधी यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. यासोबतच सर्व धर्माचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे.
१९९२ ला सामाजिक समता परिषदेचं आयोजन केलं. ग्रामीण कष्टकरी शेतकरी आणि आदिवासींसाठी अनेकवेळा बाबा तुरूंगात गेले. आंतरजातीय लग्नांना त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं. त्यासाठी २००४ ला बामणी इथं नटश्रेष्ठ निळूभाऊ फुले, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, अॅड. मोतीरामजी पावडे, कुमुद पावडे यांच्या उपस्थितीत माहेर संमेलन आयोजित करून त्यामधे साठ आंतरजातीय विवाहितांचा सत्कार केला.
बाबांनी बहुजनांचा धर्म - बुद्ध धम्म, मी बुद्ध धम्म का स्वीकारला?, भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूमिपुत्रांचा बुलंद आवाज, सत्यशोधक आसूड शेतकऱ्यांचा ही पुस्तकं आणि आदिवासी, नक्षलवादी आणि पोलिस यांच्या संघर्षावर एन्काऊंटर ही मराठी कादंबरी लिहीली. त्यांना 'दलितमित्र' हा पुरस्कार तथा स्नेहांकित संस्थेतर्फे 'चंद्रपूर भूषण' हा मानाचा पुरस्कार आणि इतरही अनेक पुरस्कार मिळालेत. १९४२ ते १९७२ अशी तीस वर्ष त्यांनी काँग्रेस सेवा दलात काम केलं.
अगदी शेवटापर्यंत ते वाचन आणि लिखाण करत. पण त्यासोबत ते निरोपाची भाषाही बोलू लागले होते. आई शालिनी हिची त्यांना अतिशय उत्तम साथ होती. पण त्यांचे मित्र सोबत नाहीत याचं त्यांना दुःख होतं. एकांतात बसून आपल्या आयुष्याचं चिंतन करताना ते व्याकूळ होत तेव्हा कवी ग्रेस यांच्या काही ओळी सहज आठवून जात,
'क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी
गाय जशी हंबरते तसले व्याकूळ व्हावे
बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे॥
हेही वाचा :
बंद शाळांमुळे शिक्षणातल्या 'बहुजन हिताय'चे तीन तेरा
चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?
अनिश महाजन : सगळ्यांसाठी आरोग्याचं स्वप्न पाहणारे टायगर वूड्सचे डॉक्टर