कुमरी शेती सांगते, आपला समाज स्त्रीप्रधान होता

२२ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : ७ मिनिटं


महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या एकत्र सीमाभागात सह्याद्रीच्या उतारावर कुमरी शेती होते. जंगलांना न दुखावता जंगलात होणारी ही शेती थेट आपलं नातं प्राचीन स्त्रीप्रधान संस्कृतीच्या काळाशी जोडते. आज अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या कुमरी शेतीचा अभ्यास या अंगाने होण्याची गरज आहे. 

माणसाचा निसर्गाशी हजारो वर्षांपासून संबंध आहे. पण त्याने निसर्गाशी एकरूप होण्याऐवजी त्याला ओरबाडून तथाकथित विकास करायला सुरवात केली. विकासपुरुष बनलेला माणूस निसर्गाला स्वतःसारखं बनवण्याच्या भानगडीत पडलाय. याउलट जंगलात राहणाऱ्या आदिवासी जाती, जमाती यांनी निसर्गाशी मिळून मिसळून वागणं कायम ठेवलंय. त्यांनी निसर्गाशी संतुलित आणि संवादी नातं अधिकाधिक घट्ट केलंय.

आपल्या विकासाच्या भलत्या कल्पनांमुळेच पर्यावरणवादी असोत किंवा सरकारचं पर्यावरण खातं असो, त्यांच्यासाठी जंगलात राहणारा माणूस पर्यावरणाचा एक नंबरचा शत्रू ठरतो. पर्यावरणाची सर्वाधिक हानी जंगलात राहणाऱ्या माणसानेच केलीय, असा त्यांचा पक्का समज झालाय. खरं बघितलं तर जंगलात राहणाऱ्या या जाती जमातीच जंगलच्या रक्षणाचं काम अत्यंत श्रद्धेने करत आल्या आहेत. 

याचंच एक उदाहरण म्हणजे कुमरी शेती. सह्याद्रीच्या तीव्र उतारावर कुमरी शेती नावाची शेती परंपरा आहे. तिचा वारसा मोठा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या सीमेलगत आजही ही शेती केली जाते. यामधे दरवर्षी वनखात्याकडून जमिनीचा एक पट्टा फेरपालट पद्धतीने लिलावाने घेतला जातो. या पट्ट्यात दोन झाडांच्या मधल्या जागेत पालापाचोळा साफ करून नांगर न घालता भात, नाचणी किंवा वरी ही पिकं घेतली जातात.

निसर्गाला कोणताही धोका होणार नाही, याची काळजी घेत हजारो वर्षांपासून कुमरी शेती केली जातेय. कोणतीही जीवनशैली स्वतःची वेगळी ओळख घेऊन जन्माला येते. कुमरी शेतीनेही विकसित होताना आपली वैशिष्ट्यं जन्माला घातलीत. ही वैशिष्ट्यं जगावेगळी आहेत. ती समजून घेताना कुमरी शेतीही समजून घेता येते. 

घट्ट नातं निसर्गाशी आणि इतिहासाशीही

कोणतीही जीवनशैली माणूस आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधांतून जन्माला येते. माणसाचं निसर्गाशी जितकं खोल आणि घट्ट नातं तयार होईल, तितकी ती जीवनशैली अधिक परिपूर्ण आणि समृद्ध होत जाते. कुमरी शेतीचा जन्मही या परिसरातली माणसं आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधांतूनच झालाय. घाटमाथ्यावरच्या तीव्र उतारावरील जमीन, तिचा हलका पोत, कोसळणारा प्रचंड पाऊस या साऱ्यांनी मिळून कुमरी शेती जन्मली आणि विकसित झालीय.

सामाजिक, सांस्कृतिक अंगानेही तिचं एक वेगळेपण आहे. कुमरी म्हणजे कुमारी. जमिनीत नांगर न घालता केली जाणारी शेती. बाईने शेतीचा शोध लावला आणि माणसाच्या जगण्यात क्रांतिकारक बदल झाला. जन्मापासूनची माणसाच्या जीवनातली वणवण भटकंती शेतीच्या शोधाने थांबली. शेतीने कामधंदा मिळाला. पुढे नांगराने शेती करण्याची पद्धत विकसित झाली आणि शेती महिलांच्या ताब्यातून पुरुषांकडे गेली. महिलांना गुलाम बनवण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने इथूनच सुरू झाली.

कुमरी शेतजमीन सुपीक आहे. उत्पादक आहे. पण ती अजूनही कुमारी आहे. नांगराची ओळख ही पुरुषत्वाचं प्रतीक आहे. हे नांगर अजून या कुमारी जमिनीत घातलेलं नाही. आजच्या भांडवली जगात निसर्गाला ओरबडून त्यापासून बनवलेल्या वस्तूंना चलनी मोल आलंय. या सगळ्या भांडवली उत्पादन व्यवस्थेत कुमरी शेतीचं वेगळेपण अजून ठसठशीत दिसतं.

हजारो वर्षांचे पुरावे

कुमरी शेती आता काही अपवादात्मक ठिकाणीच अस्तित्वात आहे. मात्र काहीशे वर्षांपूर्वी खूप मोठ्या प्रमाणात या पद्धतीची शेती केली जायची. अनेक प्राचीन ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे. कुमरी शेती ‘मातृप्रधान गणसमाजाच्या’ काळात अस्तित्वात आली. आपल्याला माहीत असलेल्या पुरुषप्रधान राजेशाहीच्या खूप खूप आधी स्त्रीप्रधान लोकशाहीआधारित समाजपद्धती प्राचीन काळात अस्तित्वात होती. कुमरी शेती त्या काळाशी नातं सांगते. याचे पुरावे आज परिसरात अस्तित्वात असलेल्या सांस्कृतिक परंपरा, भौगोलिक परिसर, लोकगीतं, लोकपरंपरा यांच्यात आहेत. 

महान प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील निऋतीला आद्य गणमाता समजतात. निऋती या आद्यगणमातेची मुलगी भगवती. तिचं मंदीर पारगड इथं आहे. याबरोबरच या परिसरातल्या अनेक गावांमधे ग्रामदैवत म्हणून मातृदेवतांची मंदिरं दिसतात. उदाहरणार्थः कोदाळी - माऊली, इसापूर – सत्तेरी.

गावचा सातबारा एक

मातृप्रधान गणसमाजातल्या गणमातेची निवड करताना ती सुंदर असली पाहिजे ही पूर्वअट होती. पण सौंदर्याचे मापदंड वेगळे होते. गणातील सगळ्या कुटुंबांना शेती उत्पादनाचं समान वाटप करणारी बाई म्हणजे सुंदर बाई. असा सौंदर्याचा सामाजिक समतेचा आशय असलेला निकष त्याकाळी अस्तित्वात होता. आज कुमरी शेतीचं गावातल्या सगळ्यां कुटुंबाना होत असलेलं समान वाटप लक्षात घेता, तिचा उदय गणसमाजाच्या काळात झाला असावा, या दाव्याला आधार मिळतो.

पुढे जंगलांची मालकी वनखात्याकडे आली. त्यानंतर कुमरी शेतीसाठी वनजमिनीचा एक पट्टा दरवर्षी लिलावाने घ्यावा लागतो. शेतीवर अवलंबून असलेल्या गावातील सगळ्या कुटुंबांना या जमिनीचं समान वाटप केलं जातं. सध्याचा काळ खासगीकरणाचा आहे. यामधे एखादी व्यक्ती आपल्याकडे प्रचंड मालमत्ता साठवून ठेऊ शकतो. कुमरी शेतीत मात्र आजही आपली सामूहिक मालकी आणि उत्पादनाच्या साधनांचं समान वाटप केलं जातं. पारगड जवळच्या इसापूरमधे सगळ्या जमिनीवर गावची सामूहिक मालकी आहे. आजही या गावचा एकच सातबारा आहे.

जातींच्या पूर्वीची कुमरी शेती

कसदार आणि चांगल्या जमिनीचा ताबा तथाकथित वरच्या जातीकडे आणि हलक्या आणि निकस जमिनीचा ताबा खालच्या जातीकडे हे जातव्यवस्थेचं लक्षण. पण याला कुमरी शेती पद्धतीत फाट्यावर मारण्यात आलंय. जातिव्यवस्थेतल्या उतरंडीवरून इथं उत्पादन व्यवस्थेतला स्तर ठरत नाही. म्हणूनच कुमरी शेतीचा उगम आणि विकास हा जातव्यवस्थापूर्व गणसमाजाच्या काळातच झाला असावा, असं म्हणण्याला आधार आहे.

जंगल संपत्तीचा जो पट्टा यंदा कुमरी शेतीसाठी एकदा वापरलेला पट्टा पुन्हा १६ वर्षांनी फेरवापरात आणला जातो. यातून कुमरी शेतीमधे पर्यावरणीय जैवविविधतेला किती महत्व होतं, हे दिसतं. १६ वर्षांत या परिसरातल्या झाडांची वाढ पुरेशी होतेच, सोबत जमिनीचा मगदूर म्हणजे कसही कायम राहायला हा काळ पुरेसा ठरतो.

एकाच जमिनीत तेच ते पीक सतत घेतलं, तर जमिनीचा कस कमी होतो. हे आता शेतीच्या तज्ञांनीही सांगितलंय. हे आता सगळ्यांना माहीत झालंय. तरीही भरघोस नफा मिळवण्यासाठी अनेकजण जमिनीला थोडासाही निवांतपणा मिळू देत नाहीत. अशा नफेखोर शेतीमुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कुमरी शेती मात्र परिसरातल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं आजही खूप समृद्ध आहे.

ढाल्याची पुनव बायकांचीच

महाराष्ट्राच्या अनेक गावांमधे चुडी पुनव साजरी केली जाते. काही भागात तिला रांड पुनव असंही म्हणतात. कुमरी शेती असलेल्या परिसरात या पौर्णिमेला ढाल्याची पुनव म्हणून मोठा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीष महिन्याच्या अमावास्येपासून रोज रात्री बायका एकत्र जमतात. सगळ्याजणी मिळून नाचतात. चुडी पुनवेच्या रात्री तर सगळ्या बाया रात्रभर नाचून ढाल्याची पुनव साजरी करतात.

आपल्याला जगवणाऱ्या जंगलांना म्हणजे वनदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उत्सव आहे. चुडी किंवा रांड पुनवेच्या निमित्ताने या परिसरात साजरा केला जाणारा उत्सव हा कुमरी शेतीच्या सामूहिक उत्पादन व्यवस्थेतूनच उदयाला आलाय. हा उत्सव पुरुषसत्ता नाकारणारा आहे. आजच्या चलनी जगात बाईला एखाद्या बाजारू वस्तूसारखं स्वरूप दिलं गेलंय. अशा काळात कुमरी शेतीच्या परिसरातील या उत्सवाचं वेगळेपण मोठं डौलदार दिसतं.

पर्यावरणाचा विचार हा निव्वळ निसर्गाच्या अस्तित्वाशी संबंधित नाही. निसर्गातली साधनसंपत्ती, तिचा वापर करणाऱ्या माणसांसह सगळे जीव आणि त्यांच्या हातातील अवजारांचं स्वरूप यावर पर्यावरणाचं भविष्य अवलंबून आहे. पारंपरिक पर्यावरणवादी कुमरी शेतीचा विचार तिच्या या वैशिष्ट्यासह आज करताना दिसत नाही.

निसर्गाशी मैत्री

कुमरी शेतीचा जन्मच मुळात निसर्गाशी माणसाच्या असलेल्या मैत्रीपूर्ण व्यवहारातून झालाय. निसर्गाला कोणतीही दुखापत होणार नाही, अशा पद्धतीने साधन सामुग्रीचा माफक वापर हे या शेतीचं वैशिष्ट्य आहे. रासायनिक खतांचा आणि आधुनिक यंत्रांचा वापर तर अजिबात केला जात नाही. जमिनीमध्ये नांगर न घालता काठीच्या सहाय्याने ही शेती केली जाते.

कुमरी शेतीमुळे जंगलाची हानी आणि जैवविविधता संपुष्टात येते, असा आरोप काही जण करतात. पण या शेतीच्या परिसरातली घनदाट जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पाहता या आरोपात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट होतं. 

अस्तित्व पणाला

कुमारी शेतीने बाईच्या गुलामगिरीची व्यवस्था नाकारली. उत्पादनाच्या साधनांवर सामूहिक मालकी सांगितली. जातव्यवस्थेच्या उतरंडीला अटकाव केला. समतेवर आधारलेल्या स्त्रीवादी संस्कृतीचं जतन केलं. एवढे दिवस खंबीरपणे तग धरलेल्या कुमरी शेतीचं अस्तित्वच आता पणाला लागलंय.

निव्वळ नफा कमावणारी उत्पादन व्यवस्था आणि तिच्या बाजारू संस्कृतीशी तिचा संघर्ष सुरू आहे. कुमरी शेती शेकडो वर्षांची परंपरा आहे. तिचं सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. हे सगळं आता जपून ठेवण्याची, हा वारसा पुढे नेण्याची गरज निर्माण झालीय. प्राचीन मातृप्रधान गणसमाजाचे अर्वाचीन अवशेष जपणारी पारगड परिसरातली कुमरी शेती महाराष्ट्रातले संशोधक आणि अभ्यासकांना साद घालतेय. म्हणतेय, एवढे दिवस मी तुमचं माणूसपण जपलं, आता मला जपा.

(लेखक हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.)