अमेझॉनचं जंगल कसं आहे? आणि तिथले आदिवासी कसे राहतात? 

१४ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : १२ मिनिटं


अमेझॉन जंगलात जानेवारी महिन्यापासूनच आग लागण्यास सुरवात झाली. ऑगस्टमधे ही मोठ्या प्रमाणात पसरली. त्यात २२ लाख ४० हजार एकर जागा भस्म झालीय. आपल्याला माहितीय का, आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनचा २० टक्के वाटा या जंगलाचा आहे. इथली अमेझॉन नदी पृथ्वीची जडणघडण होत असतानासुद्धा वाहत होती. याच अमेझॉन जंगलात फिरण्याचा अनुभव या लेखातून वाचुया. 

अमेझॉन लागलेल्या भयावह आगीने तिथल्या निसर्ग सौदर्याबरोबरच, पर्यावरण आणि माणसाच्या जगण्याची चिंता प्रत्येकाला होऊ लागली. अमेझॉनचं महत्त्व तज्ज्ञांनी अधोरेखित केलं. याच जंगलातला फिरण्याचा अनुभव आणि वैशिष्ट्य सांगणारा लेख डॉ. अनंत लाभसेटवार यांनी लिहिलाय. लेखक हे अमेरिकेतल्या `फर्स्ट नॅशनल बँक अँड ट्रस्ट कंपनी`चे माजी अध्यक्ष आहेत. हा लेख ग्रंथाली प्रकाशनाच्या `शब्द रुची मासिक` सप्टेंबर २०१९च्या अंकात प्रकाशित झालाय. या अंकात जगातल्या विविध देशांची, शहरांची माहिती देण्यात आलीय. त्यापैकी एक म्हणजे ‘अमॅझॉन, जगातलं महाअरण्य.’ या लेखाचा हा संपादित अंश.

हल्‍ली ‘अमेझॉन’ म्हटलं की लोकांना ऑनलाईन वस्तू विकत घेण्याच्या वेबसाईटची आठवण येते. पण त्या आधी तो शब्द पृथ्वीवरील सर्वात मोठ्या पर्जन्य वनासाठी वापरला गेला. हे आपल्या सर्वांना शाळेत भूगोल शिकताना समजलं. पण नंतर मात्र आपण विसरून जातो. एवढंच. मला मात्र या महाजंगलाविषयी नेहमीच कुतूहल वाटलं. त्याचा भौगोलिक विस्तार उभ्या भारतापेक्षा १.६ पट मोठा आहे. 

हे जंगल देशाच्या सीमारेषा विसरून बऱ्याच देशांमधे पसरलंय. त्याचा खूपसा भाग ‘ब्राझील’मधे असला तरी शेजारच्या ‘कोलंबिया’, ‘वेनेझुएला’, ‘इक्‍वेडोर’, 'बोलिविया', 'पेरू' आणि इतर देशांमधे घुसलाय. मागच्या वेळी मी ब्राझीलमधे गेलो तेव्हा या निसर्गाला भेट देता आली नाही. ही उणीव मी २०१८ला भरून काढली.

मायामीवरून ‘इक्‍वेडोर’ देशाच्या राजधानी ‘किटो’ला बायकोबरोबर पोचलो. जगात भारतीय पासपोर्टचा फारसा आदर केला जात नाही. विसा असल्याशिवाय भारतीय नागरिकाला परदेशात प्रवेश नाही. पण इक्‍वेडोर देशात जायला आपल्याला विसा लागत नाही. 

आणि आम्ही अमेझॉनला जाण्यासाठी निघालो

आमच्या ग्रुपमधे २०-२५ लोक असतील. सकाळी नाश्ता झाल्यावर आमची बस सूर्यनारायणाला तोंड देत पूर्वेकडे निघाली. किटो हे राजधानीचं शहर भव्य अँडिज पर्वतांच्या रांगांमधे लपलेलं. हा सर्व पर्वत ओलांडून पूर्वेला गेल्यावर अमेझॉन जंगल सुरू होतं. या प्रवासाला मात्र सहज पाच-सहा तास लागले. पर्वतांच्या अंगावर आणि भव्य दरीच्या काठावर वाढलेली वनराई हिरवीजर्द.

किटोवरून अमेझॉनच्या जंगलात जाण्यासाठी १०० मैलांचं अंतर कापावं लागतं. मात्र वाटेत अँडिज पर्वतावर गिर्यारोहण करून उतरावं लागतं. त्यामुळे या प्रवासाला ४-५ तास लागले. एरवी वळणं म्हटलं की माझा ‘वेगरोग’ जागा होतो. पण इथल्या अप्रतिम निसर्गसौंदर्यामुळे मला त्याचा विसर पडला. ढग पर्वतावर येऊन बसले. आजुबाजूच्या दर्‍याही त्यांनी भरलेल्या. ढगांना भेदून आमची गाडी अंतर कापू लागली.

अँडिज पर्वतावर संस्कृत श्लोक

अँडिज पर्वत उत्तरदक्षिण ४ हजार ४०० मैलमधे पसरलेला. हा पर्वत अटलांटिक सुमद्रावरून येणारे वारे अडवतो. त्यामुळे अँडिज पर्वताच्या पूर्वभागात अतिवृष्टी होऊन जंगल वाढतं. तर पश्चिमेला अक्षरश: वाळवंट सापडतं. मधूनच ढग दाटून येत आणि आपलं पोट रितं करून निघून जातं. मग सूर्य वर येई. असा लपंडावाचा खेळ सुरू होता. 

अँडिज पर्वताच्या अनेक रांगा आहेत. वाटेत लपलेलं आरामाचं ठिकाण म्हणजेच पर्वताच्या काठावर क्षारमय पाण्याची ४ तलावं दिसली. प्रत्येकाच्या पाण्याचं तापमान वेगळं. त्यात वक्राकार नळातून पाण्याच्या धारा पडत होत्या. त्याखाली बसण्याची व्यवस्था. मी आणि माझी बायको लता एका तलावात धारेखाली बसलो. आणि मला अचानक एक श्लोक सुचला, ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या शब्दांनी अँडिज पर्वतावरचं वातावरण प्रथमच पावन झालं.

तो श्लोक ऐकून एका तरुणीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती हसली. ती तरुणी आपल्या नवऱ्याबरोबर माझ्याजवळ पोहत आली. आणि त्या श्लोकाविषयी विचारलं. ती व्यवसायानं शिक्षिका होती. त्यामुळे तिनं भारताविषयी ऐकलं होतं. किटोमधे भारतीय भोजनालय असून तिथे तिनं मसालेदार जेवण खाल्लंय. शिवाय तिला भारतीय पुराणाविषयी कुतूहल होतं. म्हणून ती विचारायला आली.  

अमेझॉन नदी पश्चिमेकडे वाहायची 

आराम झाल्यावर आम्हीही अमेझॉन जंगलाकडे निघालो. दुपारी तिथे कडक ऊन जाणवत नव्हतं, कारण हा देश विषुववृत्तावर आहे. पण एप्रिल महिन्यामधे दक्षिण गोलार्धातला हिवाळा असतो. तरी फार उंचावर असल्यामुळे ऊन फारसं भासलं नाही.

प्रवास करत असताना शेवटी बस एकदम थांबली. ते बसस्थानक नव्हतं. समोर एक भलीमोठी नदी वाहत होती. तिचं नाव नापो. ४ हजार मैल लांबीच्या अमेझॉन महानदीला ११०० उपनद्या आहेत. नापो ही त्यातली एक. ७०० मैलांच्या डोंगराळ भागातून प्रवास करून ती शेवटी अमेझॉन नदीत येऊन मिळते.

अमेझॉन नदी पूर्वेकडे वाहून शेवटी अटलांटिक समुद्रात जाते हे आपल्याला माहितीय. पण १५ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीची जडणघडण होताना ही नदी पश्चिमेकडे वाहत होती. पृथ्वीच्या रचनेत अँडिज पर्वत निर्माण झाले आणि अमेझॉनचं तळ झालं. माती पोखरत पोखरत पाण्याला पूर्वेची वाट मिळाली आणि तिचं अटलांटिक समुद्राशी १० दशलक्ष वर्षांपूर्वी मीलन झालं.

अज्ञानात सुख अनुभवलं 

या नदीतून दर सेकंदाला ५.८ दशलक्ष गोड पाणी अटलांटिक समुद्राच्या क्षारयुक्‍त पाण्यात रिचवलं जातं. त्या गोड पाण्याची व्याप्‍ती समुद्रात १२५ मैल पसरते. पूर्वीच्या काळी समुद्री चोर ते पीत असत. या उपनदी जवळ वृक्षाच्छादित उंच डोंगर. तिथे आमची राहण्याची सोय केलेली.

तिथे राहण्यासाठी एकच अडचण होती. ती म्हणजे इलेक्ट्रिक इल. इलपासून आपल्याला विद्युत शॉक बसू शकतो. विषारी बेडकं आणि पिराना मासे. बेडकाचं मांस काही लोक खातात. पण इथल्या प्राणांच्या मांसात विष असतं. त्यामुळे त्यांच्या दर्शनानं तोंडाला पाणी सुटण्यात अर्थ नव्हता. पिराना मासे तर मांसभक्षक म्हणून फेमस आहेत. त्यावेळी या प्राण्यांविषयी आम्ही अनभिज्ञ होतो. त्यामुळे अज्ञानातलं सुख अनुभवायला मिळालं.

हेही वाचा: अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली

जंगलात चालण्यासाठी काठी

नदीच्या वेगवान प्रवाहाला भेदून आमची नाव पैलतीरावर पोचली. मग अनेक पायर्‍या चढल्यावर आमचा लॉज आला. दुसर्‍या दिवशी अमेझॉन जंगलाच्या पोटात शिरून त्याचं अंतरंग बघण्याची संधी मिळाली. सुदैवानं त्यावेळी पावसानं आपले घोडे आवरून धरले होते. नाहीतर या विषववृत्तावरील भागात तो केव्हा येईल याचा नेम नसतो. तो वारंवार आणि अनियमित येत असला तरी फार काळ टिकत नाही.

तरी भरपूरशा जणांनी पाँचो चढवून पावसाळ्याला तोंड देण्याची व्यवस्था केली. आम्ही मात्र ईश्वरावर भरवसा ठेवला होता. पुन्हा त्या होडीत बसून १० मिनिटं प्रवास केल्यावर एका ठिकाणी उतरलो. लाकडाच्या अनेक पायर्‍या चढून वर गेलो. तेव्हा अमेझॉन या महाभव्य जंगलाच आपण शिरणार याचा आनंद झाला. आत काय आहे याची कल्पना नसल्यामुळे उत्सुकता वाढली.

प्रत्येकाला एक काठी देण्यात आली. ती वार्धक्य म्हणून नाही तर जमिनीचा चढउतार आजमावण्यासाठी. वाटाड्या आणि एक आदिवासी बरोबर होते. त्याचं नाव वामो. त्याला या जंगलाचं अंतरंग, वनवाटा तसंच त्याचं तिथल्या वनस्पतीचं ज्ञान गाढ होतं. जंगलात श्वापदं असू शकतात. त्याच्या निवारणार्थ आदिवासीनं बरोबर एक लांब पात्याचा चाकू घेतला.

अमेझॉन जगाचं फुफ्फुस

अ‍ॅमेझॉनची जंगलं दोन प्रकारची- एक दाट आणि दुसरं अतिदाट. अतिदाट जंगल खास व्यावसायिकांसाठी राखून ठेवलेलं. तिथल्या खोडाचा व्यास भीमाच्या कवेतदेखील मावला नसता. शिवाय वन्यप्राण्यांचा उपद्रव जास्त. म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य पर्यटकांसाठी दाट अरण्याची सोय केली.

पृथ्वीवरचा जो भूभाग आहे त्याचा २०% भाग हे जंगल व्याप्‍त करतं. उलट उभा भारत फक्‍त २.०४% भागावर ठाण मांडतो. यावरून त्याच्या भौगोलिक भव्यतेची कल्पना येईल. जगातला सर्वात मोठा देश म्हणजे रशिया. पण तोदेखील फक्‍त १२% भूभाग व्याप्‍त करतो. अमेझॉनमधे जी जैवविविधता सापडते ते दुसरं कुठेही दिसत नाही. इथे नुसत्या किड्यांच्या २५ लाख जाती आहेत. याशिवाय ४० हजार प्रकारची झाडं आणि २ हजार जातींचे वेगवेगळे पक्षी.

वाढत्या लोकसंख्येमुळे हरित वायू उत्सर्जन आणि पर्यावरण प्रदूषण सारखं वाढतंय. पण या भव्य जंगलातली अब्जावधी झाडं हवेतला कार्बड डायऑक्साइड वायूचं भक्षण करून हरित रसायन तयार करतात. या प्रक्रियेत प्राणवायू अर्थात ऑक्सिजन तयाक होतो. या शुद्धीकरणामुळे अमेझॉनला जगाचं फुफ्फुसं मानलं जातं.

अतिउंच झाडं सूर्यप्रकाश रोखतात

या भागात वनस्पती वेगानं वाढण्याचं कारण विषववृत्ताशी असलेलं सामिप्य तर आहेच? पण दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सहारा वाळवंटातून इथे नियमितपणे वाहून येणारी धूळ. दरवर्षी ५० दशलक्ष टन धूळ इथे वार्‍यानं येते. त्यात फॉस्फरसचं प्रमाण जास्त असतं. हे मूलद्रव्य वनवर्धक असल्यामुळे वनस्पतीला पहेलवान बनवतं.

या जंगलाचं मानवाच्या अस्तित्वात एवढं महत्त्व असूनही त्याचा रोज वनविनाश होतोय. तो बघून रडायला येतं. दर मिनिटाला १५० एकर जमीन बोडकी होते. त्याचं शेतजमिनीत रूपांतर होतं. त्यावर गुरांसाठी गवत आणि माणसासाठी सोयाबिन यांचं उत्पादन घेण्यात येतं. आज ब्राझीलचा सोयाबिन उत्पादनात जगात दुसरा नंबर लागतो. पण इथल्या जमिनीचा कस अल्पकाळात उतरतो. म्हणून वननाश करून सारखी नवीन जमीन शेतीसाठी वापरण्यात येते.

डिफोरेस्टेशनचं म्हणजे निर्वनीकरणाचं प्रमाण एवढं वाढलंय. आतापर्यंत अमेझॉनचा २०% भूभाग बोडका झाला. जगातला २०% प्राणवायू अमेझॉन निर्माण करत असल्यामुळे त्याचं आक्रसणारं क्षेत्रफळ म्हणजे मानवजातीवर कोसळत असलेलं एक संकटच. तिथली अतिउंच आणि भव्य झाडं सूर्यकिरणांना अडवून धरत होती. त्यामुळे बाहेर ऊन असलं तरी इथे कायमची सावलीच. पर्णभाराचा मंडप एवढा अभेद्य की त्यातून पाणी झिरपण्यास ७ मिनिटं लागतात असं ऐकलंय.

हेही वाचा: ‘आरे’ला कारे केल्याने मुंबईतली एक संस्कृती हरवणार आहे!

मुंग्या खाऊन ढेकर

सूर्यप्रकाश नसल्यामुळे इथे गवत आणि फुलझाडं अशी दिसलीच नाहीत. वनवाटा किंवा रानवाटापेक्षा अस्पष्ट आणि गळलेल्या पानांखाली लपलेल्या. कुठे पक्ष्यांची किलबिलही नव्हती. इथे नीरव शांतता होती. इथल्या झाडांमधे दोन प्रकारच्या स्पर्धा. एक म्हणजे आपली मुळं जास्तीत जास्त दूर पसरवून जमिनीतून पाणी आणि क्षार शोषणं. सर्वच झाडं स्वअस्तित्वासाठी तसं करतात. त्यामुळे जमिनीवर मुळाचं नुसतं जाळं पसरलं होतं. बरीच मुळं भूमिगत असली तर काही पृष्ठस्तरीय होती. त्यांचा आकार बघून हत्तीलादेखील लाज वाटली असती. मुळांच्या पसार्‍यामुळे वन्यवाटावरून चालणं कठीण झालं. त्यावेळी ती काठी बाळगण्याचं शहाणपण कळलं. 

दुसरी स्पर्धा सूर्यप्रकाशासाठी. हरितद्रव्य बनवण्यासाठी त्याची गरज असते. इतरांपेक्षा जेवढं उंच तेवढा सूर्यप्रकाश जास्त. म्हणून या उंच वाढण्याच्या स्पर्धेमुळे इथली वनराई गगनचुंबी झाली. ठेंगणी झाडं सूर्यप्रकाशाभावी मरून जातात. त्याचे वाळलेले देह तिथे पडले होते. इथले बरेच किडे उपद्रवी तर काही खाण्यायोग्य. एका वाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या निवेदकानं अमेझॉनमधे जाऊन खोडात लपलेल्या मुंग्या खाल्ल्या. आणि आपण या जेवणामुळे किती तृप्‍त झालो हे ढेकर देऊन दाखवलं. 

पनामा हॅट कशी बनते? 

एका झाडावर भलंमोठं बांडगूळ दिसलं. ते टरमाइटचं घर. त्या बाहेर पडून लेफ्ट-राईट करीत दूरवर जातात. परतताना त्या कधी; रस्ता चुकत नाही. त्यांच्यात जी दिशादर्शक यंत्रणा योजली आहे त्यात अमेरिकन नौदलाला रस आहे. ते ज्ञान पाणबुड्यासाठी वापरता येतं. आमचा वामो नावाचा जो चाकूधारी आदिवासी वाटाड्याने चाकू चालवून एका विशिष्ट पानापासून बारीक धागे कसे करायचे याचं कलाप्रदर्शन दाखवलं.  

या दोर्‍यांपासून हॅट तयार करतात. या उभट टोपीमुळे ऊननिवारण करता येतं. थिओडोर रुझवेल्ट हे अमेरिकेचे २६वे अध्यक्ष. पनामा देशाला भेट देताना यजमानांनी त्यांना ती हॅट भेट म्हणून दिली. आणि एकदम त्या टोपीला जागतिक लोकप्रियता मिळाली. त्या टोप्या अमेझॉनमधे निर्माण होणार्‍या वनस्पतिजन्य धाग्यापासून विणल्या जातात. 

बराच वेळ हिंडल्यावर आम्ही लॉजवर जाण्यास उतरलो. पण यावेळी होडीत बसलो नाही. एका लाकडी पसरट सतरंजीसारख्या आसनाच्या काठी बसलो आणि पाय नापो नदीच्या पाण्यात सोडले. पाणी फार खोल नसलं तरी प्रवाह वेगवान होता. त्यावेळी मला मांसभक्षक पिराना माशांचा विसर पडला. लॉजवर पोचलो न पोचलो की विषववृत्तावरील पाऊस म्हणजे काय याचा अनुभव आला.  

पुराचं स्वागत करणारे लोक

आकाशात ढगांनी दाटी केली. ते आकाशातून खाली उतरून झाडांच्या डोक्यावर येऊन बसले. मग सगळीकडे अंधार पसरला. ढग फुटले आणि आपल्या मान्सूनसारखी वर्षावृष्टी सुरू झाली. विषववृत्तावर कधी वादळ निर्माण होत नाही असं कळलं. त्या पावसानं तृप्‍त आणि शांत झालेली सृष्टी तिथे उभी होती. लवकरच सगळीकडे पाणीच पाणी झालं. १०-१५ मिनिटांच्या जलवर्षावानंतर वरुणराजानं उसंत घेतली. 

सूर्यानं त्या दिवशी दांडी मारली होती. पण आमच्या वाटाड्याला हा पाऊस म्हणजे भातुकलीचा खेळ वाटला. तो म्हणाला, इथल्या पावसात जलधारा एवढ्या जोरानं जमिनीवर आणि छतावर आदळतात की त्यांच्या आवाजात आपलं बोलणं बुडून जातं. समोरचं काही दिसत नाही. त्यामुळे वाहन चालवणं अशक्य होतं. 

इथले आदिवासी कसे राहतात हे बघायला मिळालं. नापो नदीच्या जवळच एक बेट होतं. त्यामुळे तिथल्या लोकांची बाहेरच्या जगाशी नाळ तुटली होती. तिथले आदिवासी लोक साध्या दोन मजली घरात रहात होते. पण खालचा मजला रिकामा आणि मोकळा. वरच्या मजल्यावर कुटुंब संसार करीत. ही राहण्याची व्यवस्था हेतूपूर्वक करण्यात आली होती. दरवर्षी एकदा तरी नदीला पूर येऊन खालचा मजला पुराच्या पाण्याने भरतो. अशा पुराचं इथली मंडळी स्वागतच करतात. कारण त्यातल्या गाळामुळे जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.  

पाण्याची पातळी वाढत असल्याचं कळताच हे लोक पहिल्या मजल्यावर वाळत घातलेलं धुणं आणि स्वच्छंदपणे खेळणार्‍या कोंबड्या वरच्या मजल्यावर आणून ठेवतात. जलवाहतूक बंद झाल्यामुळे शाळा आणि इतर व्यवहार ठप्प. या लोकांना पुराची मुळीच भीती वाटत नाही.

हेही वाचा: शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय

घरात दिवसभर शेकोटी सुरू  

तिथली मुख्य शेती फळझाडांची आणि त्यांची काही फळं अगदी वेगळी. एकाचं नाव कोको. आपल्या पपईच्या आकाराच्या फळात ८० ते १०० बिया असतात. प्रत्येक बी भोवती असलेला गोड गर खाण्यात मजा वाटली. त्या बियांपासून चॉकलेट तयार होतं. हे कोको फळ आम्ही पेरूमधे बघितलेल्या कोका पानापेक्षा वेगळं होतं. तिथलं एक कंदमूळही वेगळं. ते आपल्या रताळ्याच्या आकारासारखं. पण त्यापेक्षा मोठं. त्याला युका म्हणतात. अर्थातच त्याचं पीठ करून भाकरी तयार करता येईल. पण हे लोक त्याचा उपयोग फर्मेंटेशन करून मद्ययुक्‍त पेय बनवतात. ते आम्हाला चवीसाठी दिलं. काहींनी त्याची चव घेतली आणि ती चांगली आहे म्हणून जाहीर केलं.

मग दुसर्‍या मजल्यावर गेलो. तिथलं एक विशेष म्हणजे एका कोपर्‍यात शेकोटी होती. ती रात्रंदिवस सुरू असते. तिचा उपयोग पदार्थ भाजण्यासाठी होतो. विषववृत्तावर नेहमी गरमी असते. मग शेकोटी वापरणं म्हणजे उत्तरधृवावर एसी वापरण्यासारखं नव्हतं काय? पण इथे तशी परंपराच विकसित झाली. त्यापासून निघालेला धूर गवती छतात घुसून तो ते घर जिवाणूमुक्‍त ठेवतो असं सांगण्यात आलं. नाहीतर ते कीटक छताला भोकं पाडून पावसाला आत बोलावतात. अमेरिकेत त्यासाठी फवारे सोडून पर्यावरण प्रदूषण करण्यात येतं. त्यापेक्षा ही पारंपरिक पण पर्यावरणस्नेही पद्धती बरी. 

शिकार कशी करतात?

मी त्या आदिवासी गृहिणीला आपण संध्याकाळी जेवायला काय करणार म्हणून विचारलं. केळीच्या पानात मासे गुंडाळून ती भाजणार होती. सर्वांना तिचा बेत आवडला. कुठे फोडणी देण्याची जरुरीच नव्हती. इथे पाण्याचा सुकाळ असूनही त्याचा दुष्काळ होता. नदीचं पाणी गाळ असल्यामुळे पिण्यायोग्य नव्हतं. म्हणून हे लोक नेहमी पडणार्‍या पावसाचं पाणी गोळा करून ते वापरतात. हे लोक बाजारात मिळणारं प्रक्रिया केलेलं अन्‍न खात नाहीत. आपली आधुनिकतेची व्याख्या त्यांना पटत नाही. शेकडो किंवा हजारो वर्षांपासून वापरण्यात आलेली ही प्राचीन विद्या फार आगळी होती.

घराबाहेर आम्हाला शिकार कशी करतात याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. बांबूच्या नळकांड्यात ते एक विषधारी बाण ठेवतात. जंगलातल्या वनस्पतीपासून तयार केलेलं ते रसायन प्राण्याला तात्पुरतं लुळं करतं. तो बाण एकलव्यासारखा धनुष्यावर न चढवता नळकांड्यात ठेवून ते तोंडानं फुंकून मारतात. अर्थातच त्याला बलशाली फफ्फुसं, एकाग्रता आणि सराव लागतो. ते कौशल्य या लोकांत आहे. आता ते हळूहळू कालबाह्य होत आहे कारण सरकारनं त्यांना बंदुका आणि  वीज दिली. तरी अफाट अमेझॉन जंगलाच्या आतल्या भागात जुन्या प्रथाच अद्याप कायम आहेत असं कळलं.

काही जमातींना बाहेर आधुनिक जग आहे याची कल्पनासुद्धा नाही. इथलं सरकार आदिवासी लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करतं. मुलं अर्थातच होडीत बसून जलमार्गे शाळेत जातात. तिथे घरची भाषा सोडून पोर्तुगीज शिकतात. मग ते नोकरीसाठी किटोसारख्या शहरात जातात. परंतु शहरी जीवनशैली त्यांना आवडत नाही. म्हणून ९०% मुलंमुली घरी परतून आईवडलांचं पारंपरिक जीवन स्वीकारतात. म्हणजे मुलांना शेती आणि शिकार करावी लागते.

इथे मका होतो पण गहू पिकत नाही. तांदूळ समुद्रकिनार्‍यावरील पट्टीत होतो. कापूस म्हणजे काय हे या लोकांना ठाऊक नाही. मात्र विविध प्रकारच्या फळांमधले ते राजे आहेत. आदिवासींना भेटून लॉजवर परत जाण्याची वेळ आली. पावसामुळे रस्त्यात चिखल झाला होता. अमेरिकेत लोक या मातीच्या प्रकारापासून वंचित राहतात. भारतात पावसाळा म्हणजे चिखल असं आपण गृहीत धरतो. पुन्हा त्या नापो नदीच्या काठी आलो आणि त्या होडीत बसून खोलीवर परतलो. आता नदीत जलविहार करण्याची आम्हाला सवय झाली होती.

हेही वाचा: 

फाईव जीचा पाळणा कोण हलवणार?

सोन्याचांदीच्या किंमती वरखाली का होत आहेत?

ऑनलाईन रिव्यू वाचून फिरायला चाललात, मग सांभाळून

आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट