शामची आई सिनेमातल्या एका दृशावर आधारलेल्या एका टेम्प्लेटवरचे अनेक मीम सोशल मीडियावर नेहमी वायरल होत असतात. यातल्या एका मीममुळे नवा वाद सुरू झालाय. शामच्या आईवर मीम बनवून त्या पात्रांचा अपमान केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं सांगून या मीमविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार केलीय. दोन पिढ्यांमधल्या संघर्षाचं प्रतिक ठरलेल्या या मीमवादातल्या दोन्ही बाजु उलट सुलट तपासून घ्यायला हव्यात.
मीम ही आजच्या तरूणांची भाषा. विनोद किंवा उपरोधाचा वापर करत एखादा मोठा दृष्टीकोन किंवा विचार मोजक्याच शब्दात लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आजच्या पिढीतली तरूण मुलं मुली या मीमचा वापर करतात. या मीमची तरूणांत इतकी क्रेझ आहे की तरूणांनी बनवलेल्या मीमच्या प्रसिद्धीसाठी फेसबुकवर मराठी मीम मॉक्स नावाचा एक ग्रुपही सुरू केलाय. वेगवेगळ्या टेम्प्लेटचा वापर करून अत्यंत सृजनशीलपणे बनवलेले अनेक मीम्स दररोज या ग्रुपमधे पडत असतात.
साने गुरूजींच्या शामची आई या पुस्तकावर बनवलेल्या सिनेमातला एका दृशाचाही मीम बनवण्यासाठी वापर केला जात होता. लहानगा शाम, त्याची आई आणि त्याचा एक मित्र यांच्यातल्या संवाद दाखवणारं हे टेम्प्लेट राजकीय टोमण्यांपासून ते समाजातल्या दांभिकता दाखवण्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या आशयासाठी वापरलं जातं. अशातच गटारी अमावस्येच्या निमित्ताने दारूविषयीचा एक संवाद या तिघांच्या तोंडी दाखवला गेला आणि त्यामुळे वादाला तोंड फुटलं.
शामची आई या पुस्तकाने अनेक पिढ्यांवर नैतिकतेचे संस्कार केले आहेत. त्यातील पात्रांच्या तोंडी असा संवाद दाखवणे म्हणजे या पात्रांचा अपमान आहे. त्यामुळेच असा मीम बनवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी करणारा एक ईमेल लेखक हेरंब कुलकर्णी यांनी गृहमंत्र्यांना पाठवला. त्यानंतर राष्ट्रसेवा दलाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुलकर्णी यांच्या बाजुने उभे राहिले. तर मीम ही प्रत्येकाची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे आणि नैतिकतेच्या संकल्पना सतत बदलत असताना त्यावरून एखाद्यावर कारवाई करायला सांगणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणं असं मीमच्या बाजुने उभं राहणाऱ्यांचं म्हणणं होतं. काहींनी कुलकर्णी यांच्या जातीवरूनही टीका करायला सुरूवात केली. तर असे मीम बनवल्याबद्दल धमक्या येत असल्याचा आरोप मीम बनवण्याऱ्यांनी केले. अशातच हा वाद आणखी चिघळला.
मीमला पाठिंबा देण्याऱ्यांच्यात बहुतेक तरूणांचा समावेश आहे. तर बहुतांश वयस्कर माणसं मीमला विरोध करतायत. या मीमच्या बाजुने आणि विरोधात असणाऱ्या अनेकांनी त्याविषयी फेसबूकवर पोस्ट करून आपापली बाजु मांडलीय. या वादाकडे नेमकं कसं पहायचं हे ठरवण्यासाठी या पोस्टींचा उपयोग होऊ शकतो. म्हणूनच वादाच्या वेगवेगळ्या पैलुंचा वेध घेणाऱ्या फेसबूक पोस्टच्या संकलन इथं देत आहोत.
हेही वाचा : सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय?
साने गुरुजी हे महाराष्ट्रातील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व आहे. त्यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई' या पुस्तकाने गेली ८५ वर्षे महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांवर संस्कार केले आहेत. श्याम आणि त्याची आई यांचा एकमेकांशी असलेला संवाद अनेक पिढ्यांना जीवन जगण्याची दिशा देतो आहे. यावर 'आचार्य अत्रे' यांनी चित्रपट काढला. या चित्रपटातील श्याम आणि त्याची आई यांचे चित्र महाराष्ट्रात अनेक जण श्रद्धेने बघतात. त्यापासून प्रेरणा घेतात आपल्या मुलांना 'श्यामची आई' हे पुस्तक वाचायला देतात. अशा पार्श्वभूमीवर श्याम व त्याची आई यांचा फोटो हा फोटो शॉप करून त्यावर अत्यंत विकृत मजकूर लिहिलेला फेसबुक वर फिरतो आहे. त्यात बायकोला दारूचा वास येऊ नये आणि कोरोना होऊ नये म्हणून काय वापरशील? यावर श्याम 'मास्क' असे उत्तर देतो.
यामधे संपूर्ण समाजामधे श्यामची एक सालस संस्कारित प्रतिमेचा आदर्श निर्माण झालेला असताना बायकोला दारूचा वास येऊ नये म्हणून काय वापरशील? हा प्रश्न शाम दारू पितो हे अधोरेखित करून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या शाम आणि त्याचा जनक असलेल्या साने गुरुजींवरील श्रद्धेला तडा देण्याचे काम केले आहे. राज्यातील तमाम जनतेच्या भावना दुखवण्याचे काम करण्यात आलेले आहे. त्यामुळे ही पोस्ट तयार करणारे व ती फॉरवर्ड करणारे यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी आणि अशाने समाजस्वास्थ्य बिघडून कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतील म्हणून अशा दृष्ट प्रवृत्तीविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
ज्या श्याम आणि त्याच्या आईच्या संवादातून नैतिक प्रेरणा मिळतात. त्याच्या विरोधी व त्या नात्याची विटंबना करणारे लिहून आमच्या भावना दुखवणारे आहे लिहिले आहे. त्याचबरोबर कोरोना च्या काळात मास्क घालणे हे अत्यंत आवश्यक असताना त्याचे गांभीर्य घालवणे. त्याचा संबंध दारुशी जोडणे व त्याची खिल्ली उडवणे हे मास्क घालण्याच्या मोहिमेचे गांभीर्य कमी करणारे आहे. या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन सोशल मीडियावर असे फोटो कुठून फिरणे सुरू झाले ? याचा आपण शोध घ्यावा व याबाबत सायबर गुन्हा नोंदवावा ही विनंती.
- हेरंब कुलकर्णी
‘श्यामच्या आई’वरुन मीम्स बनवले जातायत त्यावर हेरंब कुलकरर्णी सरांनी आक्षेप घेतला आणि रीतसर तक्रार केली. मीम बनवणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धरून आहे, तसेच त्यावर जर कुणाला आक्षेप असेल तर त्यावर तक्रार करणेही व्यक्तीस्वातंत्र्याला धरून आहे. त्या तक्रारीला कायदा किती गृहीत धरतो अथवा नाही हा नंतरचा भाग आहे. सर्वात महत्त्वाचा लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की हेरंब कुलकर्णीनी कुणाचे नाक-कान कापू किंवा घरात घुसून मारू वगैरे धमकी कुठल्या तरी संघटनेच्या किंवा पक्षाच्या आडोशाने कुणाला दिलेली नाहीये, तर एक साधी तक्रार केलीये.
मला स्वतःला सानेगुरुजींबद्दल प्रचंड आदर आहे. एक अत्यंत संवेदनशील शिक्षक आणि समाजसुधारक म्हणून त्यांनी माझ्या आधीच्या दोन पिढ्यात खूप लोकांना प्रेरणा दिली आणि घडवलेसुद्धा. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांना खुले करण्यासाठी सानेगुरुजींनी आमरण उपोषण पंढरपूरमधे केले. हे त्यांचे धाडस आणि कर्तृत्व कुणीच नाकारू शकत नाही. त्याचवेळेस मी स्वतः "श्यामच्या आई" या पुस्तकाला आजच्या जगाच्या मानाने अतिसंवेदनशील म्हणून कालबाह्य मानतो, हेही माझे वैयक्तिक मत आहे.
हेरंब कुलकर्णी सर हे व्यक्ती म्हणून खूपच आदरणीय आहेत, आणि त्यांच्या मीम्सना विरोध करण्याचे मी समर्थन करत नाही. पण त्यांचा विरोध करण्याचा हक्कही मी नाकारत नाही. त्यांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांना वैयक्तिकरित्या ट्रोल करण्यात सगळेचजण सहभागी झाले. काहींनी ते कुलकर्णी आहेत हे मनात धरून ब्राह्मणांवर निशाणे लावले, उजव्या धारेच्या लोकांनी ते समाजवादी आहेत म्हणून समाजवादावर निशाणे लावले आणि काहींनी वैयक्तिक त्यांच्यावर निशाणे लावले.
वास्तविक आयुष्यात हेरंब कुलकर्णी स्वतः जातीव्यवस्थेतून बाहेर पडून स्वतंत्रपणे माणूस म्हणून जगत आहेत. ब्राम्हण असण्याचे सगळे सामाजिक privilege, गणगोत यांना त्यांनी बाजूला ठेवून स्वतःचे सामाजिक कार्य केले आहे. भटक्या विमुक्तांच्यावर झालेले अन्याय असोत, आदिवासींचे प्रश्न असोत की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने का होत नाहीत यासारखे सामाजिक प्रश्न असोत, हा माणूस जमिनीवर जाऊन त्यांचा अभ्यास करतो आणि त्यावर प्रामाणिकपणे मत व्यक्त करतो. त्यांच्या अभ्यासाला, लिखाणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आदराने पाहिले जाते.
हेरंब कुलकर्णींच्या मुलाचे नाव त्यांनी चार्वाक ठेवले आहे आणि त्याला कुठलेही ब्राम्हणी किंवा धार्मिक संस्कार त्यांनी केलेले नाहीत. एखादा दलित जेव्हा जातीव्यवस्थेला नाकारतो तेव्हा त्याला बाकीचे दलित जितका त्रास देत नाहीत तितका त्रास प्रतिगामी ब्राम्हण एका ब्राम्हण समाजात जन्मलेल्या व्यक्तीस देतात जेव्हा तो ती जात सोडतो. असे लोक दुहेरी कात्रीत सापडलेले असतात, कारण स्वतःची तथाकथित उच्च जात त्यांना वेगळं करते आणि तथाकथित खालच्या जाती त्यांना सतत संशयाने पाहतात. त्यांच्या स्वतःच्या पोस्टमधे त्यांनी सानेगुरुजींच्या आत्महत्येच्या मुळाशी हे द्वंद्व आणि त्यातून येणाऱ्या फोलपणाची जाणीव असू शकते असा अंदाज वर्तवलाय, जो कदाचित सत्याच्या जवळ असेल.
तुम्ही ‘श्यामच्या आई’वर भन्नाट मीम्स बनवा, सोबत अजून कुठले महापुरुष, नेते, पौराणिक पात्रे वगैरे असतील तर त्यावरही मीम्स बनवा. हेरंब कुलकर्णी किंवा इतर कुणाला त्यावर सनदशीर मार्गाने विरोध करायचा असेल तर तोही करू द्या. त्या विरोधावर अजून मीम्स बनवायचे असतील तर तेही बनवा. पण कुणा व्यक्तीला मूळ मुद्दा सोडून त्याच्या जातीवरून आणि वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टींवरून कधीही ट्रोल करू नका. संघटित ट्रोलिंग हे एखाद्या संवेदनशील आणि चांगल्या माणसाला सामाजिक कार्यातून आणि आयुष्यातून उठवू शकते.
- डॉ. विनय काटे
हे कोरोना स्पेशलही वाचा :
ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?
साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!
दोन पिढ्यांमधला वैचारिक फरक आहेच. मीम्सच्या माध्यमातून होणारी अभिव्यक्ती मान्यच आहे. तरूण पिढीची ती भाषा आहे. आमच्या पिढीला ही भाषा कळवूनही घेतली पाहिजे आणि त्या भाषेचं कौतुकही केलं पाहिजे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेच्या १९व्या कलमानुसार आहेच. ते येतं वाजवी बंधनांसह. With reasonable restrictions. ती बंधनं कायदेशीर देखील आहेत आणि नैतिक देखील असावीत असं कोणत्याही मानवी मूल्य सांभाळणार्या समाजात अभिप्रेत आहेच.
आमचे अतिशय व्यासंगी मित्र उत्पल व.बा. यांची श्यामच्या आई वरची मीम्स मालिका गाजली. मी त्यातील प्रत्येक मीम शेअर केलं. पण ज्या मीमवरून वाद चालू आहे ते आणि उत्पलची मालिका यात जमीनअस्मानचा फरक आहे. उत्पल गांधीवादी कुटुंबात वाढलेला संवेदनशील लेखक आहे. त्यामुळे त्यानं प्रत्येक मीम विनोदी तर होईल पण साने गुरूजींच्या कोणत्याही विचाराला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली होती. विनोदी अभिव्यक्ती चांगली तेव्हाच होते जेव्हा ती कोणाच्याही अंगावर ओरखडे न उठवता फक्त खोडकर पण निष्पाप विनोद करते. निखळ विनोदाची निर्मिती करते.
साने गुरूजी गांधीजींप्रमाणेच दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांच्या एका व्यक्तिरेखेला दारूशी जोडण्यात खरंच अर्थ नव्हता.
एका दारू कंपनीबाबत मागे वाद झाला होता. दारूच्या बाटलीवर गांधी नसावेत असं अनेकांना वाटत होतं. गांधी दारू पीत नसत म्हणल्यावर मुद्दाम त्यांना दारूच्या बाटलीवर दाखवणं कदाचित कायद्यानुसार गैर नसेलही पण व्यक्ती म्हणून गांधींवर मरणोत्तर अन्याय करण्यासारखंच होतं. म्हणजे असा विचार करा की गांधीजी जिवंत असतांना या कंपनीनं त्यांची लेखी परवानगी मागितली असती 'तुमचा फोटो बाटलीवर छापायला परवानगी द्या' म्हणून तर गांधीजींनी दिली असती का? नक्कीच नाही. मग तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे पण मृत झालेली व्यक्ती नंतर कोणत्याच कोर्टात दावा करू शकत नाही म्हणून त्या व्यक्तीला कधीच न आवडणार्या गोष्टींशी त्या व्यक्तीला जोडायचं का? ते करणं नैतिकदृष्ट्या योग्य आहे का? आता ही वस्तुस्थिती आहे की गांधी कोणाचेच राहिलेले नाहीत पण समजा ज्या राष्ट्रनेत्यांचे जातसमूह मजबूत आहेत त्या एखाद्या राष्ट्रनेत्याचा फोटो दारूच्या बाटलीवर आला असता तर काय झालं असतं? सगळा देश पेटला असता!
मला एवढंच सांगायचं आहे तरूण मित्रांना की तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहरत राहो, ते टिकावं म्हणून मी लढेन तुमच्या सोबत पण फक्त त्या अभिव्यक्तीला reasonable restrictions असू द्या. तेच समाजाच्या हिताचं आहे. गांधीजी दारूच्या बाटलीवर पाहणं हा जर कोणाचा हक्क असेल तर गांधीजींना असं न पहावं वाटणं हाही हक्क असू शकतो.
आता हा वाद थांबवा असं माझं सगळ्यांना आवाहन आहे. पोलीस केस वगैरे गोष्टी होऊ नयेत. तरूण मुलं आहेत, कधीतरी चुकीचं व्यक्त होऊ शकतात. समजावून सांगून सामोपचारानं पुढे जाऊ.
तरूण मित्रांनाही माझं सांगणं हेच आहे की Freedom of Expression is not an absolute freedom, It is subject to reasonable restrictions.
झालं गेलं सगळ्यांनी विसरून जा आणि विषय संपवा, इतकंच.
- विश्वंभर चौधरी
लहानपणी शामची आई पुस्तक वाचले आहे, टिवीवर सिनेमा पाहीला आहे. पण शामची आई मला कनेक्ट झाली नाही. ती माझ्या आईसारखी ना दिसायची, ना बोलायची, ना मारायची, ना शिव्या द्यायची, ना माझ्या धारावीतल्या झोपडीसारख्या घरात राहायची, ना तीची भाषा मला त्या वयात कळली, ना शामची भाषा कळली.
परत मोठं झाल्यानंतर मी साने गुरूजींबाबत खुप वाचले. ते जरूर मनाला भिडले. पण माझ्यापुढे माझा संघर्ष होता. आणि भारत नुकताच १९९२-९३ च्या दंगलीने जखमी झाला होता. सांगायचा मुद्दा, शामची आई चांगलं पुस्तक आहे. साने गुरूजी ग्रेट होते.
पण आम्ही वेगळ्या जगात वाढलो आहोत. तुमच्यासारखे संस्कार माझ्यावर झालेले नाही. आजच्या पिढीचं तर सोडून द्या. आज अतिशय वेगवान जगात जगणारी, परदेशी मीम्स पाहणारी, जागतीक पातळीवरच्या घटना आणि चळवळी पाहणारी तरूण मंडळी आहेत. विषमतेवर, सामाजिक विराधाभासावर, जातीयतेवर, लौंगिकतेवर, स्त्रीयांच्या प्रश्नांवर मोकळेपणाने स्वत:ला व्यक्त करणारे तरूण शामच्या आईशी कनेक्ट होत नसतील तर त्यांना जेलात धाडणार काय तुम्ही?
संस्कार आणि नीतिमत्ता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
संस्कार परंपरेतून येतात. त्यात सगळं चांगलंच असतं असं नाही. नीतिमत्ता ही सतत बदलत जाते. पूर्वी गुलामी आणि जातीयता कायदेशीर, नीतिला धरून होती, आता नाही. पण संस्कार हे खोलवर रुजवले जातात. ते कधी ना कधी तरी उफाळून येतात तेव्हा तर्काचा बळी गेलेला असतो.
त्यामुळे असे रुजलेले संस्कारी लोक एका छोट्याश्या मीमवर डायरेक्ट गृहमंत्री आणि सायबर सेल पर्यंत गेले. आता त्या तरूणांना काय बेड्या ठोकायच्या काय? हे सगळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. नीट विचारून पाहीलं तर हे मीम बनवणारेही तळागळातील समाजातून येणारी कार्यकर्तेच आहेत. ही मुलं काही आयटी सेलची नाहीत. नेहरू, गांधीबाबत कुजबुज कॅम्पेन ही दशकाहून अधिक चाललेली आहे.. त्यांचा आणि एखाद्या मीमचा संबंध जोडणं अतिशय चूक आहे.
मग इथे सरळ सरळ दोन पिढ्यांमधला विसंवाद दिसतोय. वरून वैचारिक, जातीय आणि राजकीय मतभेदही दिसतायत. नवीन पिढींशी संवाद साधा. तुम्ही काही शाखेतून आलेले नाहीत. चला, तुमचे संस्कार बाजूला ठेवा आणि मराठी मीम मॉंक्सवर जा. बोलते व्हा. बदललेल्या मॉडर्न नैतिक व्यवस्था आणि नवीन प्रकारच्या एक्सप्रेशन्सचा उत्सव करू या!
- सुनील गजाकोष
हेही वाचा : लॉकडाऊनमधे पॉर्न पहातच आहात; तर त्याआधी हे वाचा
लहानपणी मीही श्यामची आई आणि त्यांच्या गोड गोष्टींच्या दहा भागांची पारायणं केलीत. 'बेबी सरोजा', 'घामाची फुले', मनूला लिहिलेली पत्रं हे सगळं वाचताना रडलेली मी माझ्यात कायम जपून ठेवलीय. ते लिखाण कायमच माझ्या नॉस्टॅल्जीयाचा भाग असेल. मात्र विकृत-सुसंस्कृत, श्लील-अश्लील, नैतिक-अनैतिक या सगळ्या निसरड्या आणि स्थल-काल -व्यक्तीसापेक्ष गोष्टी आहेत. कशाला कोणी कसं पाहावं-पाहू नये हे आपण इतरांसाठी ठरवायला नको. कारण इतरांनी ते आपल्यासाठी ठरवणं ही अन्याय्य गोष्ट असते.
साने गुरुजी आणि त्यांच्या लेखनाच्या मनामेंदूतल्या इम्प्रेशन्सला मीमसारखी सरकॅस्टिक गोष्ट डॅमेज करू शकत नाही. मात्र 'साने गुरुजी वाचलेली रोमँटिक मी आणि आजच्या काळात जन्मून जात-धर्म-जेंडर भेदाचे कुठकुठले सामाजिक सांस्कृतिक धक्के पचवत निबर-रियलिस्टिक होत राहिलेली मी' यांच्यात निर्माण झालेल्या निर्वात पोकळीचं, घुसमटीचं काय करायचं? या पोकळीवर या जनरेशननं शोधलेलं एक कॅथर्सीस आहे - मीम.
'आमच्या आयकॉन्सवर कसे बोलता, जरा त्यांच्यावाल्या आयकॉन्सवर बोलून दाखवा बरं,' हा खूप टिपिकल युक्तिवाद झाला. उजवे म्हणतात तसं, 'हिंदू धर्मावर कसे टीका करता, जरा मुसलमानांवर बोला बरं, बघतो आम्ही!' सारखं वाटतंय ते. विविध मीम्सच्या निमित्ताने आपण आपापल्या 'सहिष्णूतेची इम्युनिटी टेस्ट' करून घेउत. झालंच एखादवेळी मला-तुम्हाला 'भावनिक इन्फेक्शन' तर पुढच्या निर्दय काळासाठी अँटीबॉडी डेव्हलप होतील, नै क्या?
शिवाय आजचा काळ हा इतका चिरफाळलेला, बहुपदरी आहे, की एकाच एका इझमच्या किंवा भावनिकतेच्या चष्म्यातून तुम्हाला त्याचं समग्र दर्शन होणं, त्यातले विरोधाभास पचवता येणं अशक्यच आहे. हे मीम आणि मीमर्स या केऑटिक काळाचं प्रॉडक्ट आहेत. त्यांना जज न करता निरखायची रिलेवंट नजर जरा डेव्हलप केली पाहिजे. असहमतीचा आवाज दाबला जाण्याच्या काळात मीमर्स अनेकदा 'राजा नागडा असल्याचं' हिमतीनं सांगतात तेव्हा ते लोकशाहीलाच मजबूत करत असतात. तेव्हा लोकशाहीच्या बाजूने असलेल्यांनी शत्रू-मित्र-विवेक विसरायला नको, असं वाटतं. 'जे जे लोकप्रिय ते सुमार' असा तुच्छतावादही मीम्स, फेसबुक, टिकटॉक, यांच्याबाबत काही लोक दाखवतात. तो बरा नसतो. त्यातून आपणच वर्तमान काळाला समजून घेण्यात कमी पडतो. इसमें तेरा घाटा!
एरवीच समाजमन मरत चाललंय, त्याची विनोदबुद्धी गंजत चाललीय. विनोद, उपरोध, संवाद, तार्किकतेची म्हातारी तशीही मरायलाच टेकलीय. सोकावत चाललेल्या काळात लोकशाही, संवाद यांच्या बाजूने असणाऱ्यांनी कशाला तिला अजून मारहाण करायची?
आणि हो, हेरंब कुलकर्णी यांची जात काढून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा मी निषेध करते!
- शर्मिष्ठा भोसले
श्यामच्या आईचे कवित्व काही संपता संपेना! माझ्यामते प्रश्न दोन्ही भूमिकांचा कालसुसंगत मध्यबिंदू सांधण्याचा आहे. काळाच्या एका टप्प्यावर पुलाखालून जातवर्गीय सांस्कृतिक चर्चेचे खूप पाणी वाहून गेल्यावर त्या पार्श्वभूमीवर तरूण पिढीची व्यक्त होण्याची साधने समजून घेण्याचा आहे.
माझंच उदाहरण सांगते. माझी आई सानेगुरूजींच्या सोबत बोर्डीच्या शाळेत १-२ वर्ष शिकवायला राहिली आहे. किंबहुना तिच्या ताराबाई मोडकांच्या सोबत साकारलेल्या 'शिशूविहार चळवळीचे' बोर्डीच्या शाळेशी अभेद्य संबंध आहेत. झर्यायतून पुस्तकं पहायला लावणार्याव बालवयीन संस्कार प्रणालीशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे माझ्यावरही सानेगुरूजींच्या 'भावूक संवेदनशील जीवनदृष्टीचे' अफाट संस्कार आहेत. त्यांची सगळी पुस्तके आणि 'मंदीर प्रवेश' यासारख्या कृती माझ्यासाठी खूप क्रांतिकारक आहेत. पण, तरीही माझ्या भावना अजिबात दुखावल्या नाहीत.
एखाद्या गोष्टीकडे किंवा अभिव्यक्तीकडे भावूकतेने किंवा अपार श्रध्देतून पाहणे वेगळे आणि दुसर्या् बाजुने, सध्याच्या काळाच्या टप्प्यावर जात वर्गीय वास्तवाच्या परिप्रेक्षातून तरूण पिढीची प्रतिक्रीया समजून घेणे यात फरक आहे. सानेगुरूजी असते तर नक्कीच त्यांनी हे प्रेमळपणे समजून घेण्याचा पर्याय स्वीकारला असता. ना की आपल्या भावना दुखावल्या म्हणून पोलिस स्टेशन गाठले असते.
बालवयात असलेली माझी सानेगुरूजींवरची श्रध्दा तरूणपणी माफुआकडे वळल्यावर मला जमिनी, कटु वास्तवाकडे घेऊन आली. मार्क्सवादी चळवळीत माझ्या अशा सानेगुरूजी टाईप भावूक असण्याची आणि भीषण वास्तव समजू न शकण्याची थट्टा काही कॉम्रेडसकडून उडवली गेल्यावर मला काळाच्या टप्प्यावर भानावर यावेच लागले. आपली श्रध्दास्थानं बाजुला ठेवून पहायला हवे असे वाटू लागले. माफुआ भूमिकेतून पाहिल्यास एखाद्या जातीय आणि वर्गीय पार्श्वभुमीतून मीम्स करणार्याा तरूण व्यक्तीचे वागणे बोलणे समजून घ्यायला हवे. असे मला वाटते. आपण जातपात मानतच नसू तर इतके का बरं दुखावले जावे आणि पोलिस स्टेशन गाठावे?
सचीन गरूड यांनी लिहीलेली ही छोटीशी प्रतिक्रिया मला म्हणूनच महत्वाची वाटते -
‘श्यामच्या आईचे एक वर्गजातीचरित्र आहे. ते मध्यमवर्गीय व ब्राहमणी उदारमतवादी जाणीवांचे प्रतिनिधित्व करते. नारायण सूर्वे यांच्या एका कवितेतील 'वेश्या 'आई आहे आणि तिच्या मुलाच्या शाळाप्रवेशाच्या समयी ती मास्तराला बापाच्या जागी तुमचंच नाव लिहा सांगत आहे. ही कोणत्या आईची प्रतिमा आहे आणि श्यामच्या आईशी तिचे काय नाते आहे?दलित भटके आदिवासींची मातृप्रतिमा अधिक परिवर्तनकारी आहे. भारतमातेच्या चित्र व शिल्पप्रतिमेत एक सुंदर नाजुक गोरी पुरंध्री चितारली गेलीय. ती गांधीवादाच्या प्रभावात श्यामच्या आईसारख्याच आर्किटाइपमधेही चित्रित करण्यात आली आहे. काळया रंगाची, ओबडधोबड कष्टकरी अंगपिंडाची दलितस्त्री भारतमातेचे रुपक होवू शकत नाही का? असा चित्रकार-शिल्पकारांच्या मनात विचारही आला नाही का?’
- डॉ. कुंदा प्रमिला निलकंठ
हेही वाचा :
कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?
कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?
सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?