फॅनबॉय दिग्दर्शकांनी बदललं तमिळ सिनेमाचं रुपडं!

१२ जून २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


कमल हासन अभिनित आणि लोकेश कनकराज दिग्दर्शित ‘विक्रम’ हा तमिळ सिनेमा देशभरातल्या थियेटरमधे जोमाने गर्दी खेचून आणतोय. दिग्दर्शक लोकेश हा खरं तर कमल हासनचा डाय-हार्ड फॅन! आपला आदर्श असलेल्या सिनेनायकाला किंवा नायिकेला घेऊन सिनेमा बनवणारे दिग्दर्शक सिनेजगताला काही नवीन नाहीत. अशाच काही फॅनबॉय दिग्दर्शकांनी गेल्या काही वर्षात तमिळ सिनेमाला वेगळीच दिशा मिळवून दिलीय.

बहुधर्मीय भारतीयांना एकत्र आणणारे दोन धर्म म्हणजे सिनेमा आणि क्रिकेट. आता धर्म म्हणला की धर्मस्थळांची आणि संस्कृतीची वैविध्यपूर्ण रेलचेल ही आलीच. हिंदी-मराठी सिनेमांचं बॉलीवूड, कन्नड सिनेमांचं सँडलवूड, तेलुगू सिनेमांचं टॉलीवूड, तमिळ सिनेमांचं कॉलीवूड आणि मल्याळम सिनेमांचं मॉलीवूड ही सिनेजगतातली काही प्रसिद्ध धर्मस्थळं. या सिनेजगताने जन्माला घातलेल्या अनेकानेक संस्कृतींपैकी सगळ्यात मोठी आणि आकर्षक संस्कृती म्हणजे ‘स्टार कल्चर’!

‘स्टार कल्चर’चा प्रभाव

व्यक्तिपूजा हा बहुतांश भारतीयांचा स्वभावधर्म आहे. त्यामुळे अगणित देवतांच्या असंख्य देवळांनी वेढलेल्या भारतात सिनेमातल्या नट-नट्यांचीही मंदिरं आहेत. त्यांचे सिनेमे रिलीज होण्याच्या दिवशी थियेटरबाहेर या कलाकारांचे भव्यदिव्य कटआऊट लावून त्यांना अगदी साग्रसंगीत अभिषेकही घातला जातो. हा सगळा ‘स्टार कल्चर’चाच एक भाग आहे. विशेषतः भारताच्या दक्षिणेकडे या कल्चरने वेगळीच उंची गाठल्याचं पाहायला मिळतं.

आपल्या आवडत्या कलाकारावर आपलं किती प्रेम आहे. हे दाखवण्यासाठी त्यांचे चाहते कुठल्याही थराला जाऊ शकतात. अजितकुमार या तमिळ अभिनेत्याचा ‘वलिमाई’ गेल्या वर्षी रिलीज झाला. प्रथेप्रमाणे त्याच्या कटआऊटला दुग्धाभिषेक घालणं आलंच. तेव्हा दुधाची चोरी थांबावी यासाठी राज्यभरात पोलीस बंदोबस्त ठेवला गेला होता.हे फक्त एक उदाहरण झालं. आपल्या आवडत्या कलाकारावरच्या प्रेमापायी व्यवस्थेला धारेवर धरण्याचे याआधीही बरेच प्रकार तिकडे घडले आहेत.

हे प्रेम दाखवण्याची प्रत्येकाची स्टाईल वेगवेगळी असते. कुणी एकट्यासाठी आख्खा दिवसभर थियेटर बुक करून ठेवतं, कुणी कलाकाराचे फोटो असलेले कपडे शिवतं, कुणी गाणी बनवतं तर कुणी शहरातल्या भिंती रंगवून ठेवतं. तमिळ सिनेसृष्टीतल्या या सगळ्या चाहत्यांच्या भाऊगर्दीत एक नवा गट बनतोय. या गटातले चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी थेट सिनेमाच बनवतायत, आणि तेही सुपरडुपर हिट! हा गट म्हणजे नव्या पिढीतल्या फॅनबॉय दिग्दर्शकांचा गट.

रजनीकांतचा जलवा

एमजीआर, शिवाजी गणेशन् आणि जेमिनी गणेशन् या त्रिमूर्तीने आपल्या स्टारडमच्या जोरावर उभ्या केलेल्या तमिळ सिनेसृष्टीत आज सूर्या, जोसेफ विजय, अजित, धनुष, विजय सेतुपती, कार्ती असे तिसऱ्या पिढीतले अनेक मोठे स्टार आपलं वर्चस्व गाजवताना दिसतात. पण ही तिसरी पिढी घडवण्यात आणि तमिळ सिनेमा देशपातळीवर मोठा करण्यात जी दुसरी पिढी खर्ची पडली, त्यातले दोन खंदे अभिनेते म्हणजे ‘उलकानायकन’ कमल हासन आणि ‘सुपरस्टार’ रजनीकांत.

खलनायक ते नायक असा प्रवास करणारा बसकंडक्टर शिवाजी गायकवाड आपल्या कलागुणांच्या जोरावर पुढे ‘सुपरस्टार’ रजनीकांत बनला. त्याचं हे ‘सुपरस्टार’पद आजतागायत अबाधित आहे. भारताचा क्वेंटन टॅरेन्टीनो म्हणून ओळखला जाणारा तमिळ दिग्दर्शक कार्तिक सुब्बराज हा डायहार्ड रजनी फॅन. आपल्या पहिल्या ‘पिझ्झा’पासून ते आत्ताच्या ‘महान’पर्यंत, प्रत्येक सिनेमात कार्तिक रजनीकांतचे लहानसहान संदर्भ पेरत आलाय.

२०१९मधे त्याने खुद्द रजनीकांतलाच घेऊन ‘पेट्टा’ बनवला, ज्या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत १०० कोटीची कमाई करत, सत्तरीतल्या रजनीकांतला आजही ‘सुपरस्टार’ का म्हणतात या प्रश्नाचं खणखणीत उत्तर दिलं. सिनेमाच्या अगदी सुरवातीलाच ‘आन्नामलाई’चं थीम म्युझिक वाजू लागतं आणि स्क्रीनवर ‘सुपरस्टार रजनीकांत’चं नाव झळकतं. त्यानंतर सहाव्या मिनिटाला रजनीचा अर्धवट चेहरा दिसतो. हा रजनीकांतचा सिग्नेचर इंट्रो सीन आहे.

या सिनेमाची प्रेरणाही रजनीकांतच आहे, सिनेमाचं सादरीकरणही रजनीकांतनेच केलंय आणि सिनेमा समर्पितही रजनीकांतलाच केलाय, हे दिग्दर्शकाने पहिल्या पंधरा सेकंदातच सांगितलंय आणि पुढची १६९ मिनिटं आपल्याला ते कायम जाणवत राहील, याचीही पुरेपूर खबरदारी त्याने घेतलीय. रजनीकांतच्या कारकिर्दीतल्या जवळपास सगळ्याच लोकप्रिय सीन्स, संवाद आणि गाण्यांचा ‘पेट्टा’मधे कार्तिकने अतिशय हुशारीने वापर केला होता.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

‘उलकानायकन’ फॅन्सचा ‘विक्रम’

उलकानायकन म्हणजे सगळ्या जगाचा नायक. कमल हासनला ही पदवी मिळाली ती २०००च्या के. एस. रवीकुमार दिग्दर्शित ‘तेनाली'मधून. ‘तेनाली’च्या सुरवातीला कमल हासनचं अलवारपेटमधलं ऑफिस-चेन्नई शहर-भारत-पृथ्वी अशा क्रमाने कॅमेरा झूम आऊट होत, ती पृथ्वी कमल हासनच्या डोळ्यात दिसू लागते. हेच मोन्ताज पुढे प्रत्येक सिनेमाच्या टायटल क्रेडीटमधलं कमलच्या ‘उलकानायकन’ पदवीचं चित्ररूप ठरलं.

सध्या थियेटर दणाणून सोडणारा ‘विक्रम’ही याच फ्रेमपासून सुरु होतो. विक्रम दिग्दर्शित करणारा लोकेश कनकराज हा कमल हासनच्या असंख्य चाहत्यांपैकी एक. लोकेशला आपल्या लाडक्या अभिनेत्यासोबत एकतरी सिनेमा करायचाच होता आणि त्याची ही इच्छा ‘विक्रम’ने पूर्ण केलीय. ‘२०१९ला लोकेशचा ‘कैदी’ आला, ज्यात कार्ती मुख्य भूमिकेत होता. बहुचर्चित ‘लोकेश सिनेमॅटीक युनिवर्स’चा हा पहिला सिनेमा तर ‘विक्रम’ हा या युनिवर्समधला दुसरा सिनेमा आहे.

याच नावाचा आणखी एक सिनेमा कमलने १९८६मधेच केला होता. या दोन्ही सिनेमातलं प्रमुख साम्यस्थळ म्हणजे, दोन्हीकडे कमलने साकारलेला विक्रम हा माजी लष्करी अधिकारी आणि अंडरकवर एजंटच्या भूमिकेत आहे. दोन्ही सिनेमांमधे दहशतवादी हल्ला किंवा ड्रग रॅकेटसारख्या देशविरोधी घातक कारवाया रोखणे हा कथेचा मध्यबिंदू असला, तरी याला बायको किंवा मुलाच्या खुनानंतर घडणाऱ्या रिवेंज ड्रामाचीही हलकीशी किनार आहेच!

या सिनेमात कमलशिवाय मल्याळम सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता फहाद फाजील आणि तमिळ सिनेस्टारच्या तिसऱ्या पिढीतले सूर्या आणि विजय सेतुपतीही प्रमुख भूमिका साकारताना दिसतात. इतक्या ताकदीचे, प्रतिभासंपन्न, तरुण अभिनेते आजूबाजूला असतानाही सत्तरीतला कमल हासन ज्या पद्धतीने सिनेमाभर जे काही वावरलाय, ते वावरणं कमल हासनचं एक ‘वैश्विक’ हिरो असणं किती चपखल आहे, हे दाखवून देतं.

फॅनबॉय दिग्दर्शकांची क्रेझ

खरं तर, भारतीय सिनेसृष्टीत बराच काळ दिग्दर्शक हा कायम पडद्यामागेच राहिला. अर्थात कालानुरूप याला अपवाद होतेच, पण तेही अगदी बोटावर मोजण्याइतके! आता चित्र बदलतंय. सिनेमात कोणता नट किंवा नटी काम करतेय, हे आजही महत्त्वाचं आहेच; पण तो सिनेमा कोण दिग्दर्शित करतंय या प्रश्नाचंही आता हळूहळू महत्त्व वाढू लागलंय. इथंही तेलुगू-तमिळ-कन्नड सिनेसृष्टीतले दिग्दर्शक बॉलीवूडच्या एक पाऊल पुढेच आहेत.

टॉलीवूडमधे फॅनबॉय दिग्दर्शक तसे कमी आहेत, पण आपल्या आवडत्या कलाकारांना घेऊन जास्तीत जास्त सिनेमे बनवायचं वेड इथल्या दिग्दर्शकांमधे दिसून येतं. पण बऱ्याचदा त्यामागे व्यावसायिक कारणं असतात. हे सिनेमे त्या कलाकाराला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून बनवले जात असले तरी त्यात अभावानेच फॅनबॉय मोमेंट आढळतो. या सिनेमाच्या कमाईसाठी कलाकाराचं नाव कारणीभूत ठरत असलं तरी सिनेमातल्या आशयावर कायम दिग्दर्शकाचाच प्रभाव दिसून येतो.

याउलट, कॉलीवूडमधल्या कमल-लोकेश, रजनीकांत-कार्तिक सुब्बराज, रजनीकांत- पा. रंजित, अजित-विनोद, विजय-अत्ली, अजित-शिवा या जोड्यांनी दिलेल्या सिनेमांना ‘फॅनबॉय’ सिनेमांचं लेबल लावणं सहजशक्य आहे. कारण हे सिनेमे उत्कृष्ट आशयासोबत व्यावसायिक गणितं तर जुळवतातच, त्याचबरोबर यातल्या नायकांच्या स्टारडमलाही पुरेपूर न्याय देतात. त्यामुळे या सिनेमांना चाहत्यांची उसळलेली तोबा गर्दी पाहून उगाच नवल वाटायला नको!

या फॅनबॉय दिग्दर्शकांनी सिनेमे बनवले ते आपल्या आवडत्या सिनेकलाकारावरचं प्रेम जगाला दाखवण्यासाठी! पण या सिनेमांनी प्रेक्षकांना, विशेषतः सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या चाहत्यांना अक्षरशः खेचून थियेटरमधे आणलं. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे विषय फक्त पॅरलल सिनेमात शोभतात, हा गैरसमज खोडून काढला आणि कमर्शियल सिनेमाला नवसंजीवनी मिळवून दिली.

हेही वाचा: 

ओटीटी प्लॅटफॉर्म थेटरचे बाप बनणार का?

ओटीटी प्लॅटफॉर्मना सेन्सॉर असायला हवा?

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

जलिकट्टू : माणसाच्या अंतरंगात लपलेल्या हिंस्र जनावराचं दर्शन देणारा सिनेमा