स्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही?

०४ नोव्हेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय? तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत.

स्मार्टफोनचा शोध लागला आणि सगळं मोबाईल विश्वच बदलून गेलं. एकाच यंत्रात अनेक वेगवेगळ्या सुविधा देणारा स्मार्टफोन आपल्या रोजच्या जगण्यात फारच भाव खाऊन गेला. तरुणांनी स्मार्टफोन नावाचं नवं तंत्रज्ञान लगेचच स्वीकारलं. आजकाल तर म्हाताऱ्या कोताऱ्यांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांनाच या स्मार्टफोनने आपला लळा लावलाय.

रोज नवंनव्या सुधारणा घेऊन हे स्मार्टफोन लाँच होताहेत. अमक्या कॅमेऱ्याचा, तमक्या टचस्क्रीनचा असे वेगवेगळे प्रकार असतात. आता तर घडी पडणारे, सेल्फी कॅमेरा स्क्रीनच्या आत असणारे अशा जास्तीच्या सुधारणा असणारे स्मार्टफोन मार्केटमधे येतायत. आलेत. 

फीचर फोन म्हणजे नेमकं काय?

आज प्रत्येक घरात एक तरी स्मार्टफोन गुण्यागोविंदानं नांदतोच. असं असलं, तरी हा स्मार्टफोन जुन्या पद्धतीच्या साध्या फीचर फोनची जागा घेऊ शकलेला नाही. स्मार्टफोनच्या जमान्यातही फीचर फोनचा खप तसाच टिकून आहे, असं नुकतंच एका अहवालातून समोर आलंय.

फीचर फोन म्हणजे साध्यासुध्या सुविधा पुरवणारा फोन. कीपॅड असलेला, आकाराने लहान, वापरायला रफ अँड टफ असा हा फोन असतो. एकदम साध्या, बेसिक फोनपेक्षा यात जास्त सुविधा असतात. कॅमेरा, म्युझिक प्लेअर, कॉल, मेसेज करण्याची सुविधा, इंटरनेट असे बेसिक फीचर या फोनमधे असतात. पण स्मार्टफोनसारखे वेगवेगळे एप्स वापरता येतील, असं सॉफ्टवेअर यात वापरलेलं नसतं.

या फीचर फोनची बॅटरी जबरदस्त चालते. याउलट स्मार्टफोनची बॅटरी लगेच उतरते. फीचर फोन आकाराने लहान असल्यामुळे हाताळायलाही सोपे असतात. शिवाय फीचर फोन खिशाला परवडणारे असतात. म्हणून अनेकांना स्मार्टफोनपेक्षा हे फीचर फोनच जवळचे वाटतात.

फीचर फोन देणार १६ अब्ज डॉलर्सचं उत्पन्न

स्मार्टफोनच्या काळातही हे फीचर फोन कसं काय टिकून राहण्यामागे एक कोडं आहे. याविषयी लाइवमिंट या बिझनेस पेपरने एक स्टोरी पब्लिश केलीय. या स्टोरीनुसार, काउंटरपॉइंट रिसर्च या वेबसाइटने मार्चमधे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार पुढच्या तीन वर्षात जगभरात जवळपास अब्जावधी फीचर फोन विकले जातील.

या विक्रीतून फोन निर्मात्या कंपन्यांना जवळपास १६ अब्ज डॉलर्स इतकं घसघशीत उत्पन्न मिळणार आहे. पण ग्राहकांची फीचर फोनला असणारी पसंती पाहता स्मार्टफोन इंडस्ट्रिचं मोठं नुकसान होणार हे नक्की. किंबहुना, ग्रेटनर या संशोधन संस्थेच्या ऑगस्टमधल्या अहवालानुसार भारतातला स्मार्टफोनचा खप गेल्या वर्षीपेक्षा २.३ टक्क्यांनी कमी झालाय. त्यामुळे बॅटरी बॅकअप आणि छोटा आकार यासोबतच आणखी कोणत्या कारणांमुळे ग्राहक फीचर फोनला प्राधान्य देतायत हे शोधायलाच हवं.

हेही वाचा : हिंदी पत्रकारितेनं हिंदी भाषिक प्रदेशांना अंधारात ठेवलंय!

फीचर फोनला पसंतीमागची कारणं

स्मार्टफोनच्या काळातही फीचर फोनचा खप तसाच टिकून राहिलाय. त्यामागं पाच प्रमुख कारणं असल्याचं लाइवमिंटने आपल्या स्टोरीत म्हटलंय.

१. विशेषतः ग्रामीण भागात राहणारे लोक आणि ज्यांना स्मार्टफोन कसा वापरायचा हे माहीत नसतं असे लोक अजूनही फीचर फोन वापरताना दिसतात. अनेकांना स्मार्टफोनचे टचपॅड वापरायची सवय नसते. वयामुळे त्यांना ते कसं वापरायचं हे पटकन कळत नाही. ते लोक फीचर फोनला पसंती देतात. शिवाय अनेकांना कामाच्या निमित्तानं एक जास्तीचा फोन लागतो, असे लोक फीचर फोन विकत घेतात, असं काउंटरपॉइंट रिसर्चमधे काम करणारे संशोधन संचालक तरुण पाठक म्हणतात.

२. सतत फोनचा वापर करणं हे शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठीही धोकादायक असल्याचं वारंवार समोर आलंय. त्यामुळेच सोशल मीडियावरचा वापर कमी करण्यासाठीही लोक स्मार्टफोनच्या जमान्यात फीचर फोनला पसंती देतात.

३. आपल्या मुलांना फार लहान वयात मोबाईलची सवय लागू नये, अशी अनेक पालकांची इच्छा असते. त्यासाठी हे पालक स्मार्टफोनचा वापर टाळून फीचर फोनकडे वळताहेत. स्मार्टफोनपेक्षा फीचर फोनमधे सुविधा कमी असतात. साहजिकच मुलांचं लक्ष त्याकडे पटकन जात नाही.

४. अनेक ग्राहकांच्या गरजाच कमी असतात. ‘काही ग्राहक फोन करण्याव्यतिरिक्त इतर कशासाठीही मोबाईल वापरत नाहीत. डिजिटल युगाबद्दल अनेकांना फारशी कल्पनाच नसते. अनेक ठिकाणी तर स्मार्टफोन चार्ज करायला लागणारी वीजही उपलब्ध नसते. अशावेळी जबरदस्त बॅटरी बॅकअप असणारे फीचर फोन लोकांना जास्त आवडतात,’ असं टेकआर्कचे संस्थापक फैसल कवुसा लक्षात आणून देतात.

५. जिओ फोन २ आणि नोकिया ८११० सारख्या फीचर फोनमधे ४जी इंटरनेट स्पीड आणि वॉट्सऍप सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीय. या फोनमधे केओएस या सिस्टीमचा वापर करण्यात आलाय. ही सिस्टीम वापरायलाही सोपी असते आणि त्यामुळे हे स्मार्ट फीचर फोन कमी किंमतीत उपलब्ध होतात. म्हणूनच गोंधळात टाकणाऱ्या स्मार्टफोनपेक्षा फीचर फोन जास्त खपतात.

हेही वाचा : मायानगरी मुंबईला बुडण्यापासून कसं रोखता येऊ शकतं?

 

स्मार्टफोनमधे खूप प्रगती झालीय. तरीही भारतातले अनेक लोक या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीसाठी तितके तयार झाले नाहीत. स्मार्टफोन विक्रेत्यांनी थोडी क्रिएटीविटी वापरून युजर फ्रेंडली म्हणजेच वापरायला सोपे जातील असे स्मार्टफोन बनवले पाहिजेत. फीचर फोनसारखे सोपे आणि स्वस्त स्मार्टफोन बाजारात आले तर निश्चितच त्यांचा खप वाढेल, असं तज्ञांकडून सांगितलं जातं.

फीचर फोनमधे स्थानिक भाषांचा वापर करता येतो हेही फीचर फोनच्या खपामागचं एक महत्वाचं कारण आहे. स्मार्टफोनमधेही अशी प्रणाली बसवायला हवी. असं झालं तरी, स्मार्टफोनची बॅटरी क्षमता आणि किंमत या गोष्टींमधे सुधारणा करायलाही मोठा वाव आहे.

हेही वाचा : 

हा तर देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत पराभव

तरुण भारतच्या निशाण्यावर संजय राऊत की उद्धव ठाकरे?

सातारकरांनी गादीला मान देत राष्ट्रवादीला मत दिलं, कारण

विधानसभा निकालाने कुणाला पैलवान ठरवलं, कुणाची पाठ लावली?