अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!

२२ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


सारं जग कोरोनाविरोधात लढतंय. लस शोधली जातेय. कोरोनाविरोधातल्या लढ्यात लोकही पुढं येताहेत. लोकांच्या पुढाकारामुळेच कोरोनावरच्या पहिल्या लसीचा प्रयोग शक्य झालाय. दोघांनी आपल्या सगळ्यांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाची पहिली लस टोचून घेतलीय. आता सारं लक्ष या रिझल्ट काय येतो, याकडे लागलंय.

तीन महिने झालं कोरोनाने साऱ्या जगात नुसता धुमाकूळ घातलाय. हजारो लोकांचे जीव घेतलेत. लोकांचं बाहेर जाणंयेणं बंद केलं, प्रवास बंद केला, विमानसेवा बंद केली, शेयर बाजार पाडला, अर्थव्यवस्थेचेही वांदे केले. डोळ्यालाही न दिसणाऱ्या एवढ्याशा वायरसने एवढं नुकसान केल्यावर आता सगळेच या वायरसवर प्रतिबंधात्मक लस कधी येते त्याची वाट पाहतायत.

हेही वाचा : जय शेंडुरे: कोरोना आणि ट्रम्प प्रशासनाला पुरुन उरणारा रांगडा कोल्हापूरकर

स्वतःहून घेतला पुढाकार

कोरोना जगभर पसरल्यावर लगेचच त्यावर संशोधन सुरू झालं. हा वायरस कसा निर्माण झाला, तो माणसाच्या शरीरात काय करतो, त्याचा प्रसार कसा होतो हे कळल्यावर त्याला आवर कसा घालायचा हेही कळलं. संशोधनानंतर या वायरसबद्दल पुरेशी माहिती मिळाल्यावर लगेचच कोरोनावर प्रतिबंधात्मक लस किंवा औषध शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

अखेर आता या प्रयत्नांना यश येताना दिसतंय. पण हे यश म्हणजे या संशोधनातलं पहिलं पाऊल आहे. कोरोनावरच्या प्रतिबंधात्मक लसी सध्या चाचणी सुरू आहे. माकडांवर तपासणी झाल्यावर तिची माणसांवर तपासणी करायचीय. आणि या तपासणीसाठी तिघं तयार झालेत. यात ४३ वर्षांच्या जेनिफर हॉलर, मायक्रोसॉफ्टमधे काम करणारे नील ब्राऊनी आणि वॉशिंग्टन युनिवर्सिटीतल्या ग्लोबल हेल्थ रिसर्च सेंटरमधे काम करणारे २५ वर्षांचे एडिटोरिअल कोऑर्डिनेटर यांचा समावेश आहे.

लस म्हणजे काय?

बीबीसीच्या एका बातमीनुसार, अमेरिकेतल्या सिएटलमधल्या कैसर पर्मनंट रिसर्च सेंटरमधे कोरोनाची लस तयार करण्यात आली होती. या लसीचं नाव एमआरएनए-१२७३ अर्थात mRNA-१२७३ असं आहे. 

रोग झाल्यावर तो बरा व्हावा यासाठी नाही तर रोग होऊच नये यासाठी लस दिली जाते. प्रत्येक लस म्हणजे खुद्द त्या त्या रोगाचे मेलेले किंवा अर्धमेले केलेले जंतूच किंवा त्या जंतूंचा अंश असतो. पोलिओची लस म्हणजे पोलिओचेच मेलेले जंतू. अशी लस शरीरात गेली तर शरीराला जणू काही त्या रोगाची रंगीत तालीमच होते.

लस दिली की त्यातले जंतू शरीरात जातात. पण हे जंतू अर्धमेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे माणसाच्या शरीराला इजा पोचवण्याची शक्ती त्यांच्यात नसते. त्यामुळे माणसाला रोग होत नाही. पण शरीराला त्या रोगजंतूंशी लढण्याचा अनुभव प्राप्त होतो. त्यामुळे पुन्हा कधीही असे जंतू शरीरात आले तर त्याच्याशी कसं लढायचं याची युक्तीच शरीराकडे येते. थोडक्यात, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पण कोरोनाच्या लसीमधे कोरोनाचे मेलेले किंवा अर्धमेलेले विषाणू टाकण्यात आलेले नाहीत. तर, प्रयोगशाळेत या वायरसचा जेनेटिक कोड कॉपी करून त्याचा छोटा भाग तयार करण्यात आला आणि त्यापासून ही लस बनवलीय, असंही बीबीसीच्या बातमीत सांगितलंय.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोनाशी पंगा घेणारी बाईः हॉस्पिटलमधे न जाता कोरोना केला बरा

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव

लॉकडाऊन न करता कोरोनाशी लढणाऱ्या दक्षिण कोरियाचं जगभर होतंय कौतूक

अशी झाली निवड

या लसीचा पहिला प्रयोग जेनिफर हॉलर या ४३ वर्षीय महिलेवर करण्यात आला. जेनिफर या अमेरिकेतल्या सिएटल शहरात राहतात. दोन मुलं आणि नवरा असं त्यांचं छोटसं कुटुंब आहे. त्या सिएटलमधल्याच एका टेक कंपनीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतात.

३ मार्चला फेसबुकच्या माध्यमातून त्यांना वॅक्सिन रिसर्च म्हणजे लसीकरणाच्या संशोधनाबद्दल माहिती मिळाली. हे संशोधन करायला त्यांना ह्युमन मॉडेल हवे होते. त्यासाठी अनेकांची भर्ती चालू केली होती. पुढचा मागचा कसलाही विचार न करता जेनिफर यांनी फॉर्म भरला. दोन दिवसानंतर रिसर्च सेंटरवरून त्यांना फोन करण्यात आला. आणि लसीकरणाच्या प्रयोगासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

त्यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टमधे काम करणाऱ्या ४६ वर्षांच्या नील ब्राऊनिंग यांच्यावर लसीचा प्रयोग करण्यात आला. नील हे वॉशिंग्टनमधल्या बोथेल शहरात राहतात. आपल्या बाबांनी कोरोना लसीच्या संशोधनात भाग घेतलाय हे कळल्यापासून त्यांच्या दोन्ही मुलांची छाती अभिमानानं फुगून गेलीय.

हेही वाचा : कोरोनाने शेअर बाजार पावसासारखा कोसळतोय, १२ वर्षांतला वाईट दिवस

लोकांचा जीव वाचवण्यासाठी केलं

लसीच्या प्रयोगात सहभागी होणं हे जोखमीचं काम असतं. लस फेल गेली तर त्या रोगोचा संसर्ग होण्याची भीती असते. जीवही जाऊ शकतो. याची कल्पना असतानाही जेनिफर आणि नील स्वतःवर प्रयोग करून घेण्यास तयार झाले. कोट्यवधी लोकांचे जीव वाचवण्यासाठी आमचा उपयोग झाला याचं समाधान या दोघांनाही वाटतं. म्हणूनच लस टोचून घेऊन बाहेर आल्यानंतर समाधानाचं छानसं हसू जेनिफर यांच्या चेहऱ्यावर होतं, असं अनेक इंग्रजी बातम्यांत सांगितलंय.

इंजेक्शन दिल्यावर साध्या फ्लूसाठी लस घेतो तेव्हा जितकं दुखतं तितकंच दुखलं असं या दोघांनी सांगितलं. तिघांपैकी एकाला जास्त डोस दिल्याचं अमरउजाला या हिंदी पेपरच्या एका बातमीत सांगण्यात आलंय. असं केल्यानं जास्तीत जास्त किती डोस दिला जाऊ शकतो हे समजेल.

सध्या यांच्यावर लसीचा परिणाम काय होतो याची तपासणी चालू आहे. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात आलंय. २८ दिवसांनंतर पुन्हा एकदा लसीचा प्रयोग त्यांच्यावर केला जाईल. त्यांच्यावर लसीचा कोणता भलताच परिणाम होत नाही ना हेही पाहिलं जाईल.

लस यायला अजून १८ महिने

ब्रिटनमधल्या इंपिरियल कॉलेजच्या साथीच्या रोगांच्या विभागातही कोरोना विषाणूच्या लसीवर काम सुरू आहे. ‘आधी लस तयार करायची म्हटलं तर त्यावर संशोधन करून, चाचणी घेऊन ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देईपर्यंत १० वर्षांहून अधिक काळ लागायचा. पण सध्या आम्ही ज्या तंत्रज्ञानावर काम करतोय ते तंत्रज्ञान आपला वेळ वाचवणारं आहे. आम्ही ज्या पद्धतीने काम करत आहोत त्यानुसार ही लस काही महिन्यांत तयार होऊ शकते,’ अशी माहिती विभागाचे प्राध्यापक रॉबिन शटॉक यांनी बीबीसीला दिली.

पण कितीही लवकर म्हटलं तरी सर्व प्रक्रियेतून जाऊन सर्व परवानग्या मिळालेली लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध व्हायला किमान १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असं संशोधक सांगतात.

हेही वाचा : 

तुम्हाला कोरोना फेक न्यूज रोगाची लागण झालेली नाही ना?

माणसं मारणारा कोरोना वायरस आता अर्थव्यवस्थेलाही मारणार?

कोरोनाः जागतिक आरोग्य आणीबाणी लागू केल्याने काय होणार?

कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं

कोरोना: रँडच्या वधाला कारणीभूत १८९७ चा कायदा पुण्यात पुन्हा लागू