अमेरिकेतली एक एचआयवीबाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाली. एचआयवी पॉझिटिवची निगेटिव होणारी जगातली ही पहिली महिला तर एकूण पेशंटमधे तिसरी व्यक्ती ठरली. ही घटना एड्सवरच्या उपचारामधला मैलाचा दगड असली तरी ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही.
गेल्या महिन्यात एचआयवी एड्स संदर्भातल्या एका बातमीने खळबळ उडवून दिली. अमेरिकेतली एक एचआयवी बाधित महिला ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचाराने पूर्ण बरी झाल्याची ही बातमी होती. एचआयवी पॉझिटिवची निगेटिव होणारी जगातली ही पहिली महिला तर एकूण पेशंटमधे तिसरी व्यक्ती ठरली. आधीचे दोन रुग्ण पुरुष होते.
एचआयवी एड्सवरच्या उपचारातला हा मैलाचा दगड असला तरी शास्त्रज्ञांच्या मते, हुरळून जाण्यासारखी ही गोष्ट नाही. कारण ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हा उपचार सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही. आजमितीला दरवर्षी अमेरिकेतल्या केवळ ५० पेशंटना या उपचाराचा फायदा होतो आणि असा उपचार जगभरातल्या चार कोटींच्या संख्येने असणार्या एचआयवी बाधितांना देणं हे प्रत्यक्षात शक्य होणार नाही.
ही बरी झालेली महिला ल्युकेमियाने ग्रस्त होती. ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा एक प्रकारचा कॅन्सर. रक्तपेशी तयार करणार्या हाडाच्या मगजातल्या पेशींमधे या कॅन्सरला सुरवात होते. ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ उपचार हा तिला ल्युकेमियासाठी देण्यात आला होता आणि या उपचारामुळे तिची एचआयवी चाचणी निगेटिव म्हणजे नकारात्मक आली.
सध्या ही महिला गेल्या १४ महिन्यांपासून त्या अर्थाने एचआयवीमुक्त झाली असली, तरी ती तशी भविष्यात कायमस्वरूपी राहणं महत्त्वाचं ठरतं. एचआयवी - एड्स बरा झाल्याची ही काही पहिलीच बातमी नाही. गेल्यावर्षी अर्जेंटिनामधून अशीच एक बातमी आली होती. एक महिला एचआयवीवरच्या कोणत्याही उपचाराशिवाय बरी झाली.
जेव्हा एचआयवी- एड्स विषाणू शरीरात प्रवेश करतो, तेव्हा तो शरीरातल्या पांढर्या पेशींवर आक्रमण करतो आणि रोगप्रतिकारशक्ती निष्प्रभ करून टाकतो. त्यामुळे इतर संधिसाधू जंतू जिवाणू - विषाणू - बुरशी शरीरावर आक्रमण करतात. हळूहळू पेशंट अशक्त होत जातो. वारंवार जंतुसंसर्ग होतात. या स्थितीला एड्स असं म्हटलं जातं.
या नियमाला अपवाद म्हणून या महिलेच्या शरीरातल्या रोगप्रतिकार संस्थेने एचआयवी विषाणूंचा हल्ला परतवून लावून, एचआयवीवर मात केली. खरं तर जगातल्या अशा प्रकारच्या व्यक्तींचा शोध घ्यायला हवा आणि त्यांचा अभ्यास करायला हवा.
हेही वाचा: आपण सारखं चेहऱ्याला हात का लावतो? ही सवय कशी मोडायची?
मूलपेशी प्रत्यारोपणामुळे एचआयवी पेशंट बरा झाल्याच्या घटनेचा विचार करता, ‘टिमोथी रे ब्राऊन’ हे ‘बर्लिन पेशंट’ नावाने ओळखले जाणारे गृहस्थ अशा प्रकारच्या उपचाराने बरे होणारे पहिले पेशंट होते. त्यांनाही ल्युकेमिया होता आणि मूलपेशी प्रत्यारोपणामुळे एचआयव्हीवर त्यांनी मात केली होती. पण २०२०ला वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांना पुन्हा ल्युकेमिया झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पण मूलपेशी प्रत्यारोपणानंतर त्यांना जवळपास दहा ते बारा वर्षांचं चांगलं आयुष्य लाभलं.
मूलपेशी प्रत्यारोपणाद्वारे एचआयवी बरा करण्याचे अनेक अयशस्वी प्रयोग आजपर्यंत झालेले आहेत. अमेरिकेतली बरी झालेली महिला ‘न्यूयॉर्क पेशंट’ म्हणून ओळखली जाते. या महिलेला नाळेतली मूलपेशी आणि प्रौढ मूलपेशी यांच्या मिश्रणाचं प्रत्यारोपण करण्यात आलं. या मूलपेशी शरीरातल्या रोगप्रतिकार संस्थेवर मात करतात. नाळेतल्या या मूल पेशींमधे उत्परिवर्तित पेशी असतात, ज्या आपल्या शरीराचे एचआयवी विषाणूपासून संरक्षण करतात.
यापूर्वीच्या पहिल्या दोन पेशंटमधे प्रौढ मूलपेशी देण्यात आल्या होत्या. एक रक्तातली मूलपेशी, तर दुसर्या हाडाच्या मगजातल्या मूलपेशी होत्या. या दोन्हींमधे एचआयवीपासून संरक्षण करणार्या उत्परिवर्तित पेशी होत्या. या दोन्ही पेशंटमधे नाळेतल्या मूलपेशी दिल्या गेल्या नव्हत्या, ज्या या तिसर्या पेशंटमधे म्हणजे अमेरिकेतल्या महिलेला दिल्या गेल्या. ही महिला मिश्र वंशाची आहे. या महिलेला दिल्याप्रमाणे नाळेतल्या मूलपेशी आणि प्रौढ व्यक्तीतल्या मूलपेशी यांच्या मिश्रणाने ल्युकेमियाग्रस्त एचआयवीवर मात करता येते का, हे येणारा काळ ठरवेल.
खरं तर मूलपेशी प्रत्यारोपण उपचारपद्धती तशी सोपी नाही. मूलपेशीदाता आणि पेशंट यांचं रक्त आणि रक्तपेशी जुळणं फार महत्त्वाचं असतं; नाहीतर त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. पेशंटच्या पेशी आणि मूलपेशी यांच्यात त्या अर्थाने युद्धच होतं आणि मूलपेशी प्रत्यारोपणाचा पेशंटला फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. त्यामुळे मूलपेशी प्रत्यारोपणापूर्वी पेशंट आणि दाता यांची परस्पर जोड होणं किंवा त्यांच्या रक्तपेशी जुळणं हे फार महत्त्वाचं असतं.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या या महिलेचं उदाहरण महत्त्वाचं ठरतं. पहिली गोष्ट म्हणजे पेशंट ही महिला आहे कारण आजपर्यंत ‘मूलपेशी प्रत्यारोपण’ हे अधिकांश प्रमाणात पुरुषांमधे झालेलं आहे. ही महिला मिश्र वंशाची असल्यामुळे तिच्यासाठी योग्य मूलपेशी मिळणं आणि त्याचं प्रत्यारोपण यशस्वी होणं, ही गोष्ट आव्हानात्मक होती म्हणून हे यश महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारे ल्युकेमियाग्रस्त एचआयवी पेशंट मूलपेशी प्रत्यारोपणाद्वारे एचआयवीवर मात करू शकत असले तरी ल्युकेमिया किंवा कॅन्सर नसलेल्या एचआयवी पेशंटचा प्रश्न उरतोच.
अशा पेशंटसाठी अजून तरी नवीन उपचार नाहीत. पण तरीसुद्धा त्यांनी घाबरून जायचं कारण नाही. आज एचआयवी एड्सवर अनेक उत्तमोत्तम औषधोपचार उपलब्ध आहेत. गरज आहे ती, पेशंटनी आपली टेस्ट तातडीने करून घ्यायची आणि आपला उपचार नियमितपणे न चुकता घेण्याची.
हेही वाचा:
टू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट
हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?
(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)