या पाच शक्तीशाली महिलांवर अवलंबून आहे कोरोनानंतरचं जग

१७ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं नाव फोर्ब्सच्या १०० शक्तीशाली महिलांच्या यादीत ४१ व्या क्रमांकावर आलंय. सीतारमण यांच्यासोबत यादीत असणारी सगळी नावं महत्त्वाची आहेतच. पण त्यातल्या पहिल्या ५ महिलांवर आपला कोरोना नंतरचा काळ अवलंबून असणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी ही नावं नकळतपणे आपलं भविष्य ठरवतायत. त्यामुळेच त्यांच्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचंय.

गेलं संपूर्ण वर्ष जग कोरोनाच्या आणि या वायरसमुळे निर्माण झालेल्या संकटांशी लढतंय. या संकटातच शक्ती, पॉवर ही किती महत्त्वाची असते याची जाणीव आपल्याला झाली. विशेष म्हणजे ही पॉवर एखाद्या बाईच्या हातात असेल तर आपण कोरोना सारख्या संकटातून लवकर बाहेर पडू शकू हे संपूर्ण जगाने अनुभवलं. आता कोरोना नंतरच्या जगातही आपल्याला या शक्तीशाली महिलांचीच मदत घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच फोर्ब्सची जगातल्या १०० शक्तीशाली महिलांची यादी महत्त्वाची आहे.

अमेरिकेतल्या व्हेल मीडिया इन्वेस्टमेंट आणि फोर्ब्स कुटुंबाकडून चालवलं जाणारं फोर्ब्स हे हे एक जगप्रसिद्ध बिझनेस मॅगझिन आहे. वर्षातून ८ वेळा प्रसिद्ध होणाऱ्या या मॅगझिनमधे आर्थिक, औद्योगिक, गुंतवणूक आणि मार्केंटिंग या सोबतच तंत्रज्ञान, विज्ञान, राजकारण आणि कायदेविषयक लेखही असतात. अमेरिका वगळता आणखी २७ देशात फोर्ब्सच्या आवृत्त्या निघतात.

या मासिकाकडूनच दरवर्षी वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या जातात. जगातल्या १०० श्रीमंत व्यक्तींची नावं, ३० वर्षाखालच्या दर्जेदार काम करणाऱ्या ३० व्यक्ती, अमेरिकेतली १०० श्रीमंत माणसं, सगळ्यात शक्तीशाली माणसं असे अनेक विषय या याद्यामधे असतात. २००४ पासून दरवर्षी ते जगातल्या १०० शक्तीशाली महिलांची यादीही प्रसिद्ध करतात.

यंदा या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं ४१ व्या क्रमांकावर नाव असल्यामुळे भारतात ही यादी यंदा फारच चर्चेत आलीय. सीतारमण यांच्यासोबत भारतातल्या एचसीएल कंपनीच्या प्रमुख रोशनी मल्होत्रा आणि बायोकॉन कंपनीच्या अध्यक्ष किरण मुझूमदार-शॉ यांचंही नाव अनुक्रमे ५५ व्या आणि ६८ व्या क्रमांकावर आहे.

भारतातली ही नावं महत्त्वाची आहेतच. पण फोर्ब्स यादीतल्या पहिल्या ५ महिला या जगभरात सर्वात शक्तीशाली मानल्या जाणारेत. या जगातल्या ५ शक्तीशाली महिलांविषयी फारसं बोललं, लिहिलं जात नाहीय. पण या सत्ता आणि पॉवरच्या खेळात त्यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. जगातल्या या ५ शक्तीशाली महिलांची ही अल्पओळख.

हेही वाचा : साना मारिन: जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान पाच पक्षांचं सरकार चालवतात

अँजेला मार्केल

अँजेला मार्केल म्हणजे जर्मनी या देशाच्या चान्सेलर. २००५ साली त्या जर्मनीच्या प्रमुख पदावर बसल्या. आत्तापर्यंत जर्मनीच्या चान्सेलर म्हणून त्या ४ वेळा निवडून आल्यात. २०१० मधे मिशेल ओबामा जगातल्या सर्वात शक्तीशाली महिला ठरल्या होत्या. हे वर्ष वगळता २००६ पासून फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावरच मार्केल यांचंच नाव कायम राहिलंय.

मार्केल यांनी केमिस्ट्री विषयात पीएचडी मिळवलीय. युरोपमधली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश त्या गेली १५ वर्ष चालवतायत. इतकंच नाही, तर सिरियामधल्या लाखो निर्वासितांना जर्मनीमधे दिलासा देत त्यांनी जगातल्या सगळ्यात शक्तीशाली महासत्तेच्या म्हणजेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशीच पंगा घेतला. २०२० मधे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एका सर्वेक्षणातून १४ युरोपियन देशातल्या ७५ टक्के लोक इतर कोणत्याही लीडरपेक्षा मार्केल यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात. त्यांचे समर्थक त्यांना मुट्टी असं म्हणतात. मुट्टी म्हणजे जर्मन भाषेत आई.

नोव्हेंबर २०१८ मधे मार्केल यांनी ख्रिश्चन डेमोक्रेटिक युनियनच्या लीडर पदावरून माघार घेतली. आता इथून पुढे चान्सेलर होणार नाही, असं त्यांनी जाहीर केलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं जर्मनीला जेरबंद केलंय. असं असताना आता २०२१ मधल्या निवडणुकीत जर्मनीच्या चान्सेलर पदाला आणि कदाचित फोर्ब्सच्या यादीतला नवा चेहरा कोण असा प्रश्न सगळ्या जगालाच पडलाय. 

हेही वाचा : मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय

ख्रिसटिन लगार्डे

लगार्डे यांचं नाव फारसं ऐकण्यात आलेलं नसलं तरी त्यांनी केलेली कामगिरी मात्र ऐतिहासिकच म्हणावी लागेल. २०१९ मधेही फोर्ब्सच्या शक्तीशाली महिलांच्या यादीत त्यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं.  युरोपियन सेंट्रल बँकच्या प्रमुखपदी निवड झालेल्या त्या पहिल्या महिला ठरल्यात. १ नोव्हेंबर २०१९ ला त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्याआधी २०११ पासून त्या इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या प्रमुख होत्या. हे पद भुषवणाऱ्याही त्या पहिल्या महिला होत्या.

कायद्याचं शिक्षण घेतलेल्या लगार्डे या मुळात फ्रान्समधल्या मोठ्या नेत्या आहेत. आयएमएफची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी फ्रान्स मंत्रिमंडळात त्यांनी वाणिज्य, शेती आणि मत्स आणि अर्थ खातंही त्या सांभाळत होत्या. फ्रान्सच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मानही अर्थातच त्यांना मिळालाय.

ग्रीस देश कर्जात बुडाला तेव्हा त्यातून त्याला बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आताही कोरोनामुळे युरोपियन देशांचं आणखी नुकसान होऊ नये यासाठी त्या दिवसरात्र झटतायत.

हेही वाचा : गीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’

कमला हॅरिस

जगाभरात सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचं हे नाव फोर्ब्सच्या यादीत आलं नसतं तरच लोकांच्या भुवया उंचावल्या असत्या. भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक कमला हॅरिस यांनी नुकतीच ज्यो बायडन यांच्यासोबत अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकलीय. पहिल्यांदाच फोर्ब्सच्या यादीत त्यांचं नाव आलेलं असताना सगळ्यांना मागे टाकत त्या थेट जगातली तिसरी शक्तीशाली महिला झाल्यात.

अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष, सिनेट म्हणून निवडून येणाऱ्या पहिल्या इंडो अमेरिकन आणि कॅलिफोर्नियाचं अटर्नी जनरल पद भुषवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत.

अमेरिकेला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी ज्यो आणि कमला ही जोडीच उपयोगी ठरेल असा अनेकांना विश्वास वाटतो. आता कमला यांच्या रूपात अमेरिकेला आपली पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळेल अशीही अनेकांना आशा आहे.

हेही वाचा : समर्पणाचं दुसरं नाव मेधा पाटकर!

अर्सुला व्हॉन देर लेयेन

अर्सुला व्हॉन देर लेयेन यांची युरोपियन युनियनच्या युरोपियन कमिशन या शाखेच्या प्रमुख म्हणून जुलै २०१९ मधे निवड झालीय. फोर्ब्सच्या यादीत त्यांना पहिल्यांदाच स्थान मिळालंय. ७० कोटी युरोपियन लोकांवर परिणाम करणारे कायदे बनवण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे.

लेयेन मुळात डॉक्टर आहेत. सार्वजनिक आरोग्य या विषयातही त्यांनी पदवी घेतलीय.  २००५ ते २०१९ पर्यंत लेयेन यांनी अँजेला मार्केल यांच्या मंत्रिमंडळात काम केलंय. इतकी वर्ष काम करणाऱ्या त्या एकमेव सदस्य आहेत. २०१९ ला हे पद सोडण्याआधी तर त्या जर्मनीच्या संरक्षण मंत्री होत्या. याशिवाय, कामगार आणि सामाजिक कार्य मंत्री, कुटुंब आणि युवा मंत्री अशा जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्यात. आत्ताच सप्टेंबर २०२० मधे पोलंड देशाच्या एलजीबीटीक्यू समुदायाविरोधी धोरणांचा त्यांनी कडाडून निषेध केला होता. त्यांच्या या धडाकेबाज भाषणानंतर त्या फार चर्चेत आल्या होत्या.

हेही वाचा : भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

मेलिंडा गेट्स

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बील गेट्स यांच्या या पत्नी. पण आता एवढीच त्यांची ओळख  नाही. फोर्ब्स यादीतल्या पहिल्या चार सर्वात शक्तीशाली महिला राजकारणात काम करणाऱ्या आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यात काम करणाऱ्या सर्वात शक्तीशाली महिला ही एक ओळख फोर्ब्सने त्यांना दिलीय. गेली अनेक वर्ष सातत्याने फोर्ब्स यादीत पहिल्या पाचात त्यांचा समावेश असतो.

बील अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेच्या त्या प्रमुख आहेत. २००० मधे स्थापन झालेली ही संस्था म्हणजे जगातली सगळ्यात मोठी खासगी चॅरिटेबल संस्था म्हणून ओळखली जाते. आत्तापर्यंत बील आणि मेलिंडा या दोघांनी मिळून संस्थेला ४ हजार कोटी डॉलर एवढी देणगी दिलीय. या एवढ्या पैशातून मिळालेल्या पॉवरचा वापर करून मेलिंडा शिक्षणापासून ते गरिबीपर्यंत सगळे अवघडातले अवघड जागतिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत. 

जगातल्या सगळ्या लोकांना निरोगी, कार्यक्षम आयुष्य जगता यावं हे संस्थेचा मुख्य हेतू. पण संस्थेचं बरचसं काम हे महिल्यांच्या आणि मुलींच्या हक्कांसाठी चालतं. संततिनियमनापासून ते मासिक पाळीतल्या स्वच्छतेपर्यंत सगळे विषय संस्थेकडून हाताळले जातात. मायक्रोसॉफ्ट सारख्या पुरूष प्रधान कम्पुटरच्या क्षेत्रात जास्तीत जास्त महिला याव्यात यासाठीही मेलिंडा प्रयत्न करतात.

२०१५ मधे भारत सरकारकडून बील आणि मेलिंडा या दोघांना मिळून पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आलाय. सध्या कोरोनाची लस शोधणाऱ्या भारत बायोटेक कंपनीत बील अँड मेलिंडा फाऊंडेशनची मोठी गुंतवणूक आहे. २०१६ मधे हिलरी क्लिंटन यांच्यासोबत निवडणूक लढवण्यासाठी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षाच्या पदासाठी त्यांचं नाव येणार असल्याची चर्चाही चालली होती. द मॉमेंट ऑफ लिफ्ट नावाचं त्यांचं एक पुस्तकही फार प्रसिद्ध आहे.

हेही वाचा : 

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

डिसले गुरुजींकडून आपली शिक्षणव्यवस्था काय शिकणार?

साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते!

पुरूषी वर्चस्व टिकवण्यासाठीच वापरलं जातं बायकांवरच्या विनोदाचं हत्यार