वेळेत उपाय केले नाही तर पुण्याची मुंबई होईल

२७ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय. बुधवारी पुण्यात झालेल्या पूरपरिस्थितीने हे सिद्ध केलंय.

पुण्यात सलग तीन दिवस सोमवारी, मंगळवार आणि बुधवार २३ ते २५ सप्टेंबर असे तीन दिवस वादळी पाऊस पडला. अजूनही पावसाचं वातावरण निवळलेलं नाही. बुधवारच्या पावसाने पुणे शहराला पार गुडग्यावर आणलं. शहराच्या नियोजनावरचा पडदा वर केला. आणि पुण्याच्या नागड्या आणि ओंगळ चित्राचं दर्शन झालं. आता हे का घडलं याच्या खोलात जायला हवं.

पुण्यातलं बुधवार रात्रीचं चित्र

पुणे शहरातल्या बहुतांश रस्त्यांवर बुधवारी रात्री १० च्या सुमारास आणि त्यानंतर मध्यरात्र ओलांडली तरी पावसाचा हाहाकार सुरू होता. सिंहगड रस्ता, कर्वे पुतळा ते वारजे दरम्यानचा कर्वे रस्ता, बावधन-पाषाण रस्ता, बाणेर रस्ता यांचा काही भाग आणि अनेक छोटे रस्ते. या भागातील बहुतांश रस्त्यावर ही परिस्थिती होती. धो धो कोसळणारा पाऊस, रस्त्यांवर साचत जाणारं पाणी, चौकांमधे येणारे पाण्याचे लोंढे, वाहनांच्या धूर सोडणाऱ्या एक्झॉस्ट पाईपपर्यंत पाणी पोचण्याची धास्ती.

या गदारोळात अडकलेले हजारो पुणेकर, कुठे जायचं, काय करायचं हे समजत नसल्याने भांबावले. त्यामुळे इकडे तिकडे घुसून समस्येत भर घातली. एक वाहन बंद पडलं की मागचं सारं ठप्प. अनेक दुचाकीस्वारांनी गाड्या ढकलत काढल्या. पुढे काय होणार सारं ‘रामभरोसे’ होतं. इतरत्र ओढेनाले जागे झाले होते. अनेक सोसायट्यांचं पार्किंग पाण्यात होतं. या साऱ्यात प्रकर्षाने दिसलं, ते म्हणजे पाणी वाहून जायला वाटच नव्हती.

हेही वाचा: सांगली, कोल्हापुरातल्या महापुरापासून आपण काय धडा घेणार?

आयुक्तांची मॉडेल कॉलनी पाण्यात

पुण्यात यंदा सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. सोमवार ते बुधवार या तीन दिवसांमधे पुणे शहरात सुमारे २०० मिलिमीटर पाऊस पडला. ही नोंद शिवाजीनगरमधल्या हवामान विभागाच्या वेधशाळेत झालीय. उपनगरांमधे तो किती झाला हे कळायला मात्र मार्ग नाही.

इतका जास्त पाऊस हे यंदाचं वेगळेपण आहेच. पण दरवर्षीच मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी आणि तो माघारी परतताना वादळी पाऊस पडतो. सर्वाधिक हानी होते ती याच पावसामुळे. २००९ आणि ४ ऑक्टोबर २०१० ला पडलेल्या १८१.६ मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाने पुण्याला लोळवलं. त्याचं उदाहरण म्हणजे महापालिका आयुक्तांचं मॉडेल कॉलनीमधलं घर पाच फूट पाण्यात होती. पुण्यात असा पाऊस पूर्वीही पडत होता, यापुढेही पडणार. आता हवामान बदलाचा संदर्भ वाढत असल्याने त्याची तीव्रता अधिक वाढण्याचा धोका आहे.

हेही वाचा: पुरामुळे वाहन खराब झाल्यास बेसिक विमा काही कामाचा नाही

सिंहगड रस्त्याचं काय झालं?

पुण्यातले बहुतांश लहान ओढे, नाले बुजवले गेलेत. मोठ्यांवर अतिक्रमणं झालीत. विशेषत: उपनगरांमधे पाणी वाहून जाणारे मार्ग उरलेच नाहीत. ते कशासाठी हवेत हे अशा वादळी पावसाच्यावेळी समजतं. सिंहगड रस्त्याचं उदाहरण द्यायचं तर या रस्त्याच्या दक्षिणेला टेकडीवजा उंच प्रदेश आहे. तिथे पडणारं पाणी वाहून नदीच्या दिशेने जातं. ते जाताना सिंहगड रस्त्याला छेदून जातं. ते वाहून जाण्यासाठी पूर्वी नैसर्गिक प्रवाह होते. ते पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी फारसे वाहत नव्हते. पण त्यांच्यामुळे पाण्याला वाहून जाण्यासाठी मार्ग मिळायचे.

आता मात्र हे सर्व मार्ग अडवलेत. तिथे इमारती, वस्त्या किंवा इतर बांधकामं झाली आहेत. जमिनीचं काँक्रिटीकरणही मोठ्या प्रमाणात झालंय. सिंहगड रस्त्याप्रमाणेच पुण्याच्या सर्व इतर उपनगरीय भागातही अगदी असेच बदल झालेत. या आपत्तीत सर्वाधिक नुकसान ओढ्या, नाल्यांच्या जवळ झालंय.

हेही वाचा: गेल्या दहा दिवसात पुराने कोल्हापूरला कसं वेढलं?

आपली पावलं उलटी पडतायत

या आपत्तीचं सर्वात प्रमुख कारण होतं, पावसाचं पडणारं पाणी सामावून घेण्याची व्यवस्था नसणं. म्हणजे ते वाहून नेण्याचे मार्ग नसणं. हा शहराच्या नियोजनातला अक्षम्य आणि धक्कादायक दोष. पुण्यातल्या बहुतांश रस्त्यांवर पडणारं पाणी वाहून नेण्यासाठी काहीच व्यवस्था नाही.

बुधवारच्या हाहाकारानंतर सिंहगड रस्त्याची मुद्दाम प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावर पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी उघडे किंवा भुयारी असे मार्गच नाहीत. हीच स्थिती बहुतेक रस्त्यांवर आहे. पूर्वी हा पुण्याच्या रस्त्यांचा अविभाज्य भाग होता. पुणे काय, कुठेही तो असावाच लागतो. पण एकीकडे सिंमेटचे रस्ते होत गेले आणि या छोट्या, पण महत्वाच्या गोष्टी मागे पडल्या.

अगदी साडेतीन चार हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृतीतल्या धोलाविरासारख्या नगरात पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था होती. आता ही मूलभूत गरज आपण दुर्लक्षित करत असू तर आपली पावलं उलटी पडत असल्याचंच दिसतंय.

काही वर्षात पुण्याची वाताहत

हे प्रश्न खूपच गुंतागुंतीचे आहेत. कारण अतिक्रमण झालेल्या प्रत्येक बांधकामाचा फटका सनदशीर मार्गाने बांधलेल्या बांधकामाला बसतो. बुधवारच्या पावसात ज्या सोसायट्यांचं नुकसान झालं त्यात असे लोकही भरडले असणारच. पुण्याचे कारभारी, नियोजनकर्ते या प्रश्नांना मुळापासून भिडत नाहीत तोवर हा गुंता आणखीच वाढण्याचा धोका आहे.

दशक-दीड दशकापूर्वी पुण्यातली नैसर्गिक प्रवाहांचं सर्वेक्षण झालं. त्याचा अहवालही वाजतगाजत बाहेर आला, पण पुढे काय झालं? बेकायदेशीरपणे वाढलेल्या आणि वाढणाऱ्या उपनगरांना असंच आवरावं लागणार आहे. नाहीतर पुण्याची आणखी वाताहत व्हायला पुढील काही वर्षे पुरतील.

यावर कारभाऱ्यांनी काही केलं नाही तर आपण नागरिक म्हणून या गोष्टींसाठी दबाव टाकला पाहिजे. आणि निवडणुकीच्या काळात हे मुद्दे पुढे आणलेच पाहिजेत. नाहीतर पुण्याची मुंबई व्हायला फार वेळ लागणार नाही.

साभारः भवताल फेसबूक पेज. पाणी-पर्यावरणाच्या मुद्द्यांबाबत सखोल माहितीसाठी, विविध उपक्रमांसाठी भेट द्या, भवताल फेसबुक पेज / @bhavatal

हेही वाचा: 

डॉन को पकडना चापलुसों को मुमकीन नही!

ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?

पीएमसी बँकेपुढे अडीच हजार कोटी रुपये उभे करण्याचं टार्गेट

हायडेगरला नाझीवादी म्हणून बाजूला सारणं आपल्याला परवडणारं नाही!

पावसाळ्यात पुण्या-मुंबईतल्या इमारती पत्त्याच्या डावासारख्या का कोसळतात?

(लेखक हे ‘भवताल’ या नियतकालिकाचे संपादक आहेत.)