महाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे

०५ मे २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


तोवर पवित्र असलेली राजेशाही फ्रान्समधल्या शेतकऱ्यांनी उलथून टाकली आणि मानवी स्वातंत्र्याचा उद्घोष केला, तो आजचा ५ मेचा दिवस. महाडच्या चवदार तळ्यात अशाच पवित्र मानलेल्या अस्पृश्यतेला भीमटोला देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ५ मेचा उल्लेख केला. या ५ मेच्या मानवमुक्तीच्या लढ्यातल्या योगदानावरचं एक मुक्तचिंतन.

आज पाच मे. काल चार मेच्या रात्री वाचत असताना लक्षात आली ती आजची तारीख. जगातली अख्खी मनुष्य जमात एक विषाणूमुळे बंदी बनलेल्या लॉकडाऊनच्या काळात ‘पाच मे’चं स्मरण खरंतर विरोधाभास ठरलंय.

हेही वाचा : खरंच, बाबासाहेबांना महाड सत्याग्रहापर्यंत फुले परिचित नव्हते?

बाबासाहेबांनी सांगितलाय ५ मेचा संदर्भ

कोरोनाच्या लॉकडाऊनमधे बाबासाहेब वाचतोय. हजारो वर्ष सोशल डिस्टन्सिंग आणि खरोखरच्या लॉकडाऊनमधेच घालवलेल्या माझ्या पूर्वजांच्या इतिहासाचं रिवाईंडिंग सुरू आहे. काल नेमका बाबासाहेबांच्या धनंजय कीरलिखित चरित्रातल्या महाडच्या सत्याग्रहात होतो आणि तिथं बाबासाहेबांनी मला ५ मेचा संदर्भ दिलाय.

२० मार्चला बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्यावर देशातलं पहिलं मानवमुक्तीचं आंदोलन केले. जिथे जनावरांना पाणी प्यायला मुभा होती, पण दलितांना नव्हती. अशा तळ्याचं पाणी विटाळाच्या भ्रामक कल्पना तोडत त्यांनी आपल्या लोकांसाठी खुलं केलं. आंदोलनानंतर दंगल झाली. दलितांना मार सहन करावा लागलाच पण तलाव परत ‘शुद्ध’ करून स्थानिकांनी काही दिवसांनी पुन्हा ठराव करून त्यांना पाणीबंदी केली. बाबासाहेबांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देत महाडला २५ डिसेंबरला ते केले. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण आणि त्यातला संदर्भ म्हणजे ५ मे.

बाबासाहेब आंबेडकरांनी देशात मानवमुक्ती घडवून आणली. तशीच जगात मानवमुक्ती घडवून आणली ती फ्रेंच राज्यक्रांतीने. बाबासाहेबांनी महाडच्या आंदोलनातल्या भाषणात या क्रांतीचाच संदर्भ दिला होता. त्यांनी त्यात या तारखेसह फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख मी वाचत होतो. पहाटेचे दीड वाजले होते. तारीखही पाच मेच होती.

हेही वाचा : नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

या दिवसाने जगाचा इतिहास पालटून टाकला

मला फ्रान्स आठवला. पॅरिस दौऱ्यात भेट दिलेला वर्सायचा किल्ला. मी पुन्हा मनाने किल्ल्यात पोचलो. १३ मे २०१७ ला हा भव्य पॅलेस पाहिला होता. फ्रेच राज्यक्रांतीच्या वेळचं काय असेल ते चित्र? या राज्यक्रांतीने आधुनिक जगाचं सामाजिक आणि राजकीय चित्र फक्त बदललं नाही, तर पालटून टाकलं.

आधुनिक जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्यं मानवी इतिहासात पहिल्यांदा दिली आणि तिच्या ठिणगीतून जगात विविध देशांत, विविध समाजांत सर्व प्रकारच्या गुलामगिरीचं जोखड फेकून माणूस म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण होण्याचा वणवा पेटला. ही ठिणगी पडली, ती तारीख म्हणजे ५ मे १७८९.

मानव सर्वत्र समान सांगणारा दिवस

त्याआधी अमेरिका मुक्त झाली होती. पण तो मानवमुक्तीचा लढा नाही. प्रॉपर्टीच्या भांडणातून विभक्त झालेल्या कुटुंबासारखा अमेरिकेचा मुक्ती लढा होता. त्यामुळे तो मानवी इतिहासाला कलाटणी देणारा ठरला नाही. मानवी इतिहास खऱ्या अर्थाने बदलला तो फ्रेंच राज्यक्रांतीने. म्हणून त्याला असाधारण महत्त्व.

५ मे १७८९ या दिवशी सोळाव्या लुईने फ्रान्समधे कर वाढवायला प्रतिनिधीसभा बोलावली. आधीच पिचलेल्या आणि अमीर उमरावांच्या छानछौकीने पिडलेल्या शेतकरी, मजूर आणि श्रमिकांच्या प्रतिनिंधींनी उठाव केला. शेकडो वर्षे जुनी आणि तथाकथित पवित्र राजेशाही. जी त्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नव्हती, ती उखडून फेकण्याचा ठराव केला. आजच्या दिवशी तिथल्या टेनिस कोर्टावर तो ठराव झाला. म्हणून ५ मे हा दिवस `मानव सर्वत्र समान` असं मानणाऱ्यांसाठी खरा पवित्र ठरला.

हे कोरोना स्पेशलही वाचाः 

कोरोनाचा प्रादुर्भाव ही माणसाचीच चूक आहे!

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

भारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं

कोरोनाः बिल गेट्सनी २०१५ मधेच दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय

अमेरिकेचे जेफरसन फ्रेंच राज्यक्रांतीत कसे?

यात मजेशीर संदर्भ म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेचे शिल्पकार थॉमस जेफरसन यांनी फ्रेंच राज्यक्रांतीच्या या पहिल्या दिवसाच्या ठरावाची रचना करण्यात मदत केल्याचं सांगितलं जातं. जेफरसन इथं कुठं पोचले, हे मी शोधत असताना वेगळेच संदर्भ हाती लागले. अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यात फिलाडेल्फियात झालेल्या बैठकीचे. मला मी भेट दिलेली फिलाडेल्फियाही आठवली. तिथल्या ठरावाचं आणि घटना तयार करण्यात जेफरसन यांचं योगदान सगळ्यांना माहीत असू शकतं. पण फ्रेंच राज्यक्रांतीतही जेफरसन यांचा संदर्भ आल्याने मला जो ट्रॅक सापडला तो मजेशीर आहे.

थॉमस जेफरसन अमेरिकेचे अध्यक्षही होते. पण ते अमेरिकेचे पहिले परराष्ट्रमंत्रीही होते. त्याशिवाय बेंजामिन फ्रॅंकलिन यांच्यानंतर अमेरिकेचे फ्रान्समधले म्हणजे वर्सायच्या राजदरबारात मंत्रीही होते. त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांती होत असताना जेफरसन पॅरिसमधेच अमेरिकेचे मंत्री म्हणून १७८५ ते १७८९ या काळात काम करत होते.

फ्रेंच राज्यक्रांतीच्या या ५ मे या पहिल्या दिवशी मानवी हक्क आणि नागरिकांच्या स्वातंत्र्याचा जो ठराव झाला तो तयार केला, ॲबे सियां आणि मार्किस डी लाफायत यांनी. हे लाफायत जेफरसन यांचे जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या मदतीने लाफायत यांच्याकडून हा ठराव आकाराला आला.

मानवी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. ती ठरली ५ मेला. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर महाड चवदार तळ्याच्या काठावर उभे राहून भाषणात हा संदर्भ देत होते. युरोपात आत्मज्ञानाची चळवळ म्हणजे एन्लाइटमेंट मूवमेंट झाली. तिचा प्रभाव या ठरावावर आहे. आत्मज्ञानाची आंबेडकरांनाही जी जाणीव झाली, तिचा प्रभाव त्यांच्या चळवळीवर आहे. म्हणून हे आहे एक पूर्ण वर्तुळ!

हेही वाचा : गणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कूळकथा

ही तत्त्वं तर याच मातीतली

फ्रान्स आणि तिच्या वसाहतींचा सम्राट असलेल्या राजा लुईच्या या महालाचं वैभव मी माझ्या पॅरिसभेटीत निरखून पाहात होतो. इतिहासाच्या खुणा फ्रेंचांच्या सौंदर्यदृष्टीने जपून ठेवल्या आहेत. मोठे दिवाणखाने, सर्वत्र राजेशाही थाट, छतांपासून भिंतीपर्यंत सुंदर पेंटिंग, नक्षीकाम, राजाचा बेड, राणी मेरी अन्त्वानेतचा कक्ष आणि वस्तू यांसारख्या लक्झरियस गोष्टींची रेलचेल मला वर्सायच्या पॅलेसमधे पाहायला मिळाली. तिथेच दिसला तो ‘थर्ड इस्टेट’ म्हणजे पिचलेल्यांच्या पहिल्या जागतिक घोषणेचा साक्षीदार राजदरबार.

व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, समता आणि बंधुता ही मूल्यं मूलत: भारतातलीच आहे. भगवान गोतम बुद्धाने त्याचा सर्वात आधी त्याचा उद्गार केला. त्याचा प्रभाव बाबासाहेब आंबेडकरांवर होता. महाड आंदोलनात त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख केला.

पण महार समाजाचे पहिले मॅट्रिक उत्तीर्ण विद्यार्थी म्हणून केळुस्कर गुरुजींनी स्वत: लिहिलेवं बुद्धचरित्र बाबासाहेबांना भेट दिलं होतं. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावरचा प्रभाव म्हणून त्यांनी आपल्या राज्यघटनेत ही तत्त्वं समाविष्ट केली. काही जण त्यांनी ही तत्त्वं फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतल्याचं सांगतात. पण ते निराधार आहे.

बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीतच याचा बिनतोड प्रतिवाद करत ही तत्त्वे याच मातीतली असल्याची जाणीव करून दिली आहे. पण काही लोकांना या मातीतल्या गोष्टी बाहेरच्यांनी पुन्हा सांगितल्यावरच आपल्या वाटतात. त्याला काय करणार?

हेही वाचा : 

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र

बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती तीनवेळा का जाळली?

‘युगानयूगे तूच’: समग्र बाबासाहेबांकडे घेऊन जाणारी कविता

महाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून

राहुल कुलकर्णींना कोर्टानं वांद्रे गोंधळासाठी जबाबदार का धरलं?

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी विनाशकारी ठरेलः रघुराम राजन

चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया

बाबासाहेबांनी कधी न दिलेली फेक मुलाखत मराठी पेपरात छापून येते तेव्हा

मराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं?

(लेखक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)