देवदासी समाजातून गानसरस्वती घडण्याचा इतिहास प्रेरणा देतो

१२ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय.

बरं झालं, किशोरी आमोणकरांनी सिनेमात गाणी गायली नाहीत. पडद्यावरची कोणीही मोठी हिरोईन असू दे, नर्गिस, नूतन किंवा मीनाकुमारी. कुणालाच पेलवला नसता त्यांचा स्वर. `अवघा रंग एक जाला`, किशोरीताई गातात तेव्हा डोळ्यासमोर येतात संत सोयराबाई. साडेसातशे वर्षांपूर्वी अस्पृश्यता आणि बाईपणाच्या पलीकडे जाऊन अद्भूत तत्त्वज्ञान लिहिणारी चोखियाची महारी.

त्या `जनी जाय पाणियासी` गातात, तेव्हा तो आवाज असतो वारकरी चळवळीचं नेतृत्व करत पुरोहितशाहीच्या विरोधात लढणाऱ्या संत जनाबाईंचा. किशोरीताई `म्हारो प्रणाम बांके बिहारी` गाताना प्रेमदिवाणी मीरा असतात. त्या ज्ञानेश्वर माऊलींचा आवाज असतात आणि कबिराचाही. आभाळाएवढ्या शब्दांचा आभाळाएवढा आवाज. शब्दांच्या पलीकडे जाताना तो आवाज आभाळाच्याही पलीकडे जातो.

हेही वाचा : वाचकाचा लेखः किशोरीताई आमोणकर भिन्न षड्ज

पुरुषार्थ चळवळीचं अपत्य

किशोरीताई गेल्या. पण त्यांचा आवाज इथेच राहणार आहे, ऐकणारे कान आहेत तोवर. त्यांचं गाणं कित्येक पिढ्यांच्या असंख्य गायकांनी, घराण्यांनी, संगीताने कमावलेलं संचित होतं. त्याचबरोबर एका चळवळीचंही त्या अपत्य होत्या. संगीतातून मिळणाऱ्या वैयक्तिक आनंदाच्या पलीकडे समष्टीच्या भल्यासाठी संघर्ष करणारी ही चळवळ होती.

ही चळवळ देवाधर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाच्या विरुद्ध केलेला विधायक एल्गार होता. एका समाजाच्या उन्नयनाचं संपूर्ण देशात अभावानं आढळणारं ते एक विरळा उदाहरण होतं. ही चळवळ यशस्वी झाली नसती, तर किशोरीताई आपल्याला माहीत नसत्याच बहुतेक. ती होती, गोव्यातल्या देवदासी समाजाची गुलामगिरी संपवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाची पुरुषार्थ चळवळ.

देवदासींच्या शोषणाचा प्राचीन इतिहास

गोव्याचा इतिहास माहीत आहे, तेव्हापासून देवदासी प्रथेचे संदर्भ सापडतात. गोवा, सिंधुदूर्ग, कारवार भागातल्या अनेक मोठ्या देवळांच्या परिसरात देवदासी समाजाची घरं किंवा मुळं आजही आहेत. कलावंत, देवळी, भावीण, पेरणी, बांदे, फर्जंद, चेडवा अशा देवळात सेवा देणाऱ्या पोटजातींच्या समूहाला देवदासी असं नाव मिळालं. महाराष्ट्राच्या इतर भागातल्या मुरळी, जोगतिणींपेक्षा हा समाज अधिक स्थिर होता. तो कधीच भिक्षेकरी नव्हता. या सगळ्या समाजांत बायकांना देवाला वाहण्याचा रिवाज होता.

देवदासी समाजातल्या पोटजातींतही खूप उच्चनीच भेदाभेद होते. या समाजातल्या परिवर्तनाचं पुढारपण करणाऱ्या राजाराम पैंगीणकरांनी त्यांचं आत्मचरित्र `मी कोण?`मधे त्याचे विदारक अनुभव सांगितलेत. या भेदभावांमुळे धर्माच्या नावाने त्यांचं शोषण सोपं होतं. गावातले जमीनदार देवदासींना रखेल म्हणून वागवत. प्रामुख्याने त्या काळात या परिसरात गौंड सारस्वत ब्राह्मण या जातीसमूहातल्या जमीनदारांकडे सर्व सत्ता एकवटली होती.

हेही वाचा : कोकूटनूरच्या यल्लम्मा यात्रेत आजही देवदासी सोडतात का?

स्त्रीशोषणाला कायद्याचाच आधार मिळाला

सणाउत्सवांना देवळात तर लग्नमुंजींच्या निमित्ताने श्रीमंतांच्या घरात कलावंतिणींचं नाचगाणं होत असे. त्यातून सर्रास देहविक्रय होणं स्वाभाविक होतं. खरं तर या प्रथेमुळे ख्रिश्चनांचं नैतिक अधःपतन होत असल्याचा ठपका ठेवत चर्चने मोहीम उघडली होती. त्यामुळे गोव्याच्या वाईसरॉयने सतराव्या शतकाच्या शेवटी कलावंतिणींना गोव्याबाहेर हाकलवण्याचा हुकूमही काढला होता.

नंतर उच्चवर्णीय जमीनदारांनी कार्यक्रमांसाठी गोव्याबाहेरून कलावंतिणी आणण्याची परवानगी मिळवली. पुढच्या शंभर वर्षात या पळवाटेचं मोठं भगदाड झालं. ब्रिटिश भारतात स्त्रीशोषणाला कायद्याने प्रतिबंधांची सुरू होत असताना गोव्यात मात्र देवदासींच्या शोषणाला उपयुक्त ठरेल असे बदल कायद्यात केले गेले. देवदासी ही हिंदूंची धार्मिक प्रथा असून त्यात पोर्तुगीज सरकारने ढवळाढवळ करणं योग्य नाही, असं या जमीनदारांनी पोर्तुगीजांच्या गळी उतरवून शोषणाचा जणू परवानाच मिळवला.

त्यानंतर पुढचं एक शतक देवदासी समाजाचा सर्व स्वाभिमान ठेचून काढण्याचा इतिहास आहे. शारीरिक, मानसिक, लैगिक, आर्थिक, धार्मिक, सामाजिक असं सर्व प्रकारचं दमन करून या समाजाचं सत्त्व संपवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. महिलांच्या शोषणावर कुटुंब जगू लागलं. त्यामुळे कुटुंबांचा, समाजाचा नैतिक आत्मविश्वास संपला होता.

शिवरायांची प्रेरणा मोठी ठरली

अशावेळेस देवसासी समाजात पुरुषार्थ चळवळीला सुरुवात झाली. महिलांना देवाला वाहण्याचा सेषविधी होऊ नये, पुरुषांनी कामधंदा करावा आणि मुलांना शिक्षण द्यावं, यासाठीची जागृती सुरू झाली. सर्वात आधी मराठा गायक समाज या नावाने सर्व पोटजातींमधे ऐक्य घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर त्याचं नाव नाईक मराठा समाज आणि शेवटी गोमंतक मराठा समाज ठरलं.

या आंदोलनात राजाराम पैंगीणकरांसारखे या समाजातले समाजसुधारक होतेच पण भारतकार गो.पु. हेगडे देसाईंसारखे सारस्वतही होते. महात्मा गांधी, प्रबोधनकार ठाकरे यांनी या चळवळीला सक्रीय पाठिंबा दिल्याच्या नोंदी आहेत. गोव्यातल्या काही उच्चवर्णीयांनी आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या काही संस्थांनी देवदासी समाजाला मराठा म्हणवून घेण्याला विरोध केला होता. पण स्त्रीला सन्मान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वसमावेशक प्रेरणा या विरोधापेक्षा कितीतरी मोठी ठरली.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

तैवान कोरोना डायरी ३ : भीतीच्या सावटातही शिस्त विस्कटली नाही

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?

देवदासी समाजातली मुलगी मुख्यमंत्री बनते

दिवंगत पत्रकार वामन राधाकृष्ण यांच्या `पुरुषार्थ` आणि प्रा. पराग परब यांच्या `इंडियाज् फर्स्ट डेमोक्रॅटिक रेवोल्यूशन` या पुस्तकात या चळवळीचा इतिहास वाचता येतो. शिक्षण आणि संघटनेच्या जोरावर गोमंतक मराठा समाजाने स्वतःचा उत्कर्ष घडवून आणला. कोणत्याही वर्णात स्थान नसलेल्या दलितांपेक्षाही अधिक शोषण होणाऱ्या या समाजाने स्वकर्तृत्वाच्या जोरावर सन्मान मिळवला.

त्यात दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनल्याने नवा आदर्श उभा राहिला. त्याच्या कन्या शशिकलाताई काकोडकर पाठोपाठ दुसऱ्या मुख्यमंत्री बनल्या. गोमंतक मराठा समाजातील स्त्री गोव्यातील सर्वोच्च पदावर असणं ही मोठीच क्रांती होती. भाऊसाहेबांमुळे गोव्यातल्या बहुजन समाजाचं नेतृत्व दोन दशकं या समाजाकडे होतं. पण आता नव्या पिढीला या संघर्षाची ओळख नकोय.

अभिजनांच्या मान्यतेसाठी ते अभिमानास्पद असलेला संघर्ष विसरून जायला तयार आहेत. दीर्घकाळ गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख असणाऱ्या आणि बंडामुळे देशभर प्रसिद्धी मिळालेल्या प्रा. सुभाष वेलिंगकरांच्या नेतृत्वात या समाजाच्या नव्या पिढीने बहुजनवादाकडून हिंदुत्वाच्या दिशेने प्रवास केलेला आहे. पन्नास वर्षांपूर्वी आरक्षण नको म्हणून ठराव करणाऱ्या या समाजाने आता ओबीसी म्हणून राखीव जागा मिळवण्याची मागणी केलीय.

कर्तृत्ववान मान्यवरांची मांदियाळी

सर्वच क्षेत्रात मोठं योगदान असणारी कर्तृत्ववान माणसं या समाजातून उभी राहिलीत. नाईक मराठा समाजाचे संस्थापक सत्यशोधक विद्वान गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, मेजर जनरल विक्रम खानोलकर, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, कायदेतज्ज्ञ अधिक शिरोडकर, सुमो कार ज्यांच्या नावातील आद्याक्षरांना अर्पण केलीय ते टाटा उद्योगाचे संचालक सुमंत मूळगावकर, शिक्षणमहर्षी रा.ना. वेलिंगकर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्त्रीरोगतज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. वी.एन. शिरोडकर, देशातले पहिले पॅथोलॉजिस्ट डॉ. वी.आर. खानोलकर, कोकण रेल्वेचे जनक अ.ब. वालावलकर अशी या समाजातल्या मान्यवरांची मोठीच यादी सांगता येईल.

एकोणिसाव्या शतकात गोमंतक मराठा समाजाचं शोषण शिगेला पोहोचलेलं असताना त्यातील अनेक कुटुंबं मुंबईत स्थायिक झाली. त्यांनी पुढे संगीत, नाटक आणि सिनेमात मोठं कर्तृत्व गाजवलं. सूरश्री केसरबाई केसकर, किशोरीताईंच्या आई मोगुबाई कुर्डीकर, पहिल्या महिला नाटककार हिराबाई पेडणेकर, अंजनीबाई मालपेकर, मीनाक्षी शिरोडकर, ज्योत्स्ना भोळे, मास्टर विनायक, मास्टर दत्ताराम, भालजी पेंढारकर, कानन कौशल, आशालता वाबगावकर, शिल्पा शिरोडकर, किमी काटकर अशी या समाजातल्या कलावंतांचीही यादी आहे. हंसा वाडकर यांच्या `सांगत्ये ऐका` या आत्मचरित्रात आणि त्यावर बनवलेल्या `भूमिका` या हिंदी सिनेमात या समाजाचा संघर्ष पाहता येतो. अशा संघर्षात समाजाचे शेकडो कलावंत कोणतीही नोंद न ठेवता कायमचे संपूनही गेलेत.

हेही वाचा : लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

मंगेशकर कुटुंबाचा संघर्ष समजून घ्यावा लागेल

गोमंतक मराठा समाजाचा उल्लेख करताना एक नाव जे टाळून पुढेच जाता येणार नाही, ते आहे दीनानाथ मंगेशकर आणि त्यांची प्रतिभावान मुलं. देवळ्याचा पोर म्हणून गोव्यात दीनानाथांचा खूप अपमान झाला, म्हणून लतादीदींनी गोव्यात कधीच जाहीर कार्यक्रम केला नाही. आशाताई गायल्या त्यादेखील खूप उशिरा, पाचेक वर्षांपूर्वी. लतादीदींना मंगेशी मंदिराच्या देव्हाऱ्यात जाऊ दिलं नव्हतं. त्याचा वाद काही वर्षांपूर्वी गोव्यात गाजला होता.

आज किशोरीताई आमोणकरांना आदरांजली वाहताना त्यांचं गाणं पावित्र्य आणि मांगल्याचा सर्वोच्च आविष्कार म्हणून गौरवलं जातंय. अवघ्या शंभर वर्षापूर्वीच त्या कलेला कलावंतिणीचं पाप म्हणून धिक्कारलं जात होतं. तो धिक्कार सहन करत गोमंतक मराठा समाजाच्या कलाकारांनी शेकडो वर्षं इतरांसाठी पाप असणारी कला ही पूजा म्हणून श्रद्धापूर्वक जोपासली.

या समाजाने पुरुषार्थ चळवळीद्वारे या पापाला साधना म्हणून मान्यता मिळवून दिली. त्या साधनेला किशोरीताईंनी आपल्या प्रयोगांनी नव्या उंचीवर नेलं. त्यामुळेच त्यांना गानसरस्वतीचा सन्मान मिळतो, ही गोष्ट फार मोठी असते.

हेही वाचा : 

काश्मिरी तरुण गिटार हाती घेतात तेव्हा!

प्रा. यशवंत सुमंत: कृतिशील समन्वयी विचारवंत

मोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज

मी ‘अळणी मीठवाली’चा मुलगा होतोः राघवेंद्र भीमसेन जोशी

कोरोनाकाळात सोशल डिस्टसिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय

गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात

(पूर्वप्रसिद्धी आणि आभारः दैनिक दिव्य मराठी)