विश्वविजयी ठरलेल्या युवा भारतीय क्रिकेट टीमचं नेमकं भविष्य काय?

१४ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.

भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने गेल्या शनिवारी फायनलमधे इंग्लंडला नमवून पाचव्यांदा युवा वर्ल्डकप जिंकला. युवा वर्ल्डकप १९८८ला चालू झाला. पण पहिल्याच वर्ल्डकपनंतर पुढची दहा वर्षं स्पर्धा झालीच नाही. १९९८पासून मात्र दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होतेय. ही निव्वळ स्पर्धा नसते तर प्रत्येक देशाला भावी क्रिकेटपटू हेरण्याची संधी यामुळे मिळते. आता तर आयपीएलसाठी खेळाडू शोधायलाही या स्पर्धेकडे सगळ्यांचं बारकाईने लक्ष असतं.

मोहम्मद कैफ, युवराजसिंग पासून पार्थिव पटेल, विराट कोहली ते पृथ्वी शॉपर्यंत अनेक क्रिकेटपटू आपल्याला या युवा वर्ल्डकपने दिलेत. भारताने जरी पाचवेळा हे अजिंक्यपद पटकावलं असलं तरी यंदाचा विजय वेगळा होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत होती. कोरोनाची तिसरी लाट डोकं वर काढत असल्याने कधी काय होईल हे सांगता येत नव्हतं. सराव कुठे होईल, किती वेळ मिळेल, स्पर्धा निर्धोकपणे पार पडेल का अशा सर्वच गोष्टींवर टांगती तलवार होती.

कोरोनाला हरवून गाठली फायनल

भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवून स्पर्धेची सुरुवात तर झकास केली. पण पुढच्या आयर्लंडच्या सामन्याच्या आधी टीममधे कोरोनाने शिरकाव केला. कर्णधार, उपकर्णधारासह पाच खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. वेस्ट इंडिजला बदली खेळाडू पाठवणंही एक कठीण काम होतं. एक तर तिथं जायला थेट विमान नाही, त्यामुळे युरोपातल्या मर्यादित विमानसेवा आणि कोरोना नियम सांभाळत सगळा प्रवास अवलंबून होता.

पण, अशावेळी टीमची आपत्कालीन योजना कार्यान्वित होते. यामधे पडद्यामागच्या कलाकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. आयर्लंडच्या सामन्याआधी आणीबाणीसद़ृश परिस्थिती होती. टीमचा मॅनेजर कोरोनामुळे दुसर्‍या ठिकाणी स्थानबद्ध होता. तो फोनवरूनच सगळ्या सूचना देत होता. टीमचा फिजिओथेरपिस्ट हा टीमचा डॉक्टर तर टीमचा वीडियो अ‍ॅनॅलिस्ट हा मॅनेजर बनला.

टीममधे दहा खेळाडू फिट होते आणि टीम बनवायला जायबंदी असलेला अकरावा खेळाडू घ्यावा लागला. सामन्याच्या अर्धा तास आधी अष्टपैलू निशांत सिंधूवर कर्णधारपदाची धुरा सोपवली तेव्हा आधी त्याचा यावर विश्वासच बसला नाही. अशा ऐनवेळी बांधलेल्या टीमने आयर्लंडला १७४ धावांनी तर पुढच्या सामन्यात युगांडाला तब्बल ३२६ धावांनी धूळ चारली आणि आपला विजयाचा वारू पुढे जो दौडत ठेवला तो अंतिम विजयापर्यंत!

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची त्रिसूत्री

या सगळ्या घडामोडीतून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे बीसीसीआयच्या वेगवेगळ्या योजनांचं हे फळ आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ही तंत्र, तंदुरुस्ती आणि सराव या प्रमुख त्रिसूत्रींवर भर देते. इथं खेळाडू घडवले जात नाहीत पण प्रस्थापित किंवा होतकरू खेळाडूंना सर्वांगीण मदत मिळते. या राष्ट्रीय अकादमीचे प्रमुख वीवीएस लक्ष्मण स्पर्धेच्या सुरुवातीपासून टीमबरोबर होते. जोडीला रणजी क्रिकेट गाजवलेले हृषीकेश कानिटकर आणि साईराज बहुतुलेंसारखे मार्गदर्शक होते.

हे युवा खेळाडू मैदानावर पूर्णपणे व्यावसायिकता दाखवत होते. त्यासाठी लागणारा आत्मविश्वास त्यांच्यात दिसत होता. बीसीसीआयच्या योजना या एका प्रक्रियेत बनवल्या जातात. त्यामुळे प्रशिक्षक किंवा इतर संबंधित व्यक्ती बदलल्या तरी खेळाडूंच्या संस्कारांवर फारसा फरक पडत नाही. बीसीसीआयच्या पाठबळाबरोबरच दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आज कुठल्या भागातून हे खेळाडू येतात यावरही त्यांच्या यशाची भूक ठरते.

हेही वाचा: ख्रिश्चनांच्या पंढरीत अवतरलीय धर्मगुरूंची क्रिकेट टीम

छोट्या गावांतून आलेले खेळाडू

एकेकाळी भारतीय टीममधे मुंबईचे सात-आठ खेळाडू असायचे. पण आता तसं दिसत नाही. संजय मांजरेकरने याच्यामागचं संभाव्य कारण एकदा सांगितलं होतं. जेव्हा भारतीय टीममधे मुंबईच्या खेळाडूंचा भरणा जास्त होता तेव्हा ते बहुतांशी मुंबईच्या मध्यमवर्गातल्या घरातले खेळाडू होते.

मुंबईत जगण्यासाठी धडपड, जीवघेणा लोकलचा प्रवास करून मैदान गाठणे या राहणीमानातून आपोआप त्यांच्यात यशस्वी होण्यासाठीची जिद्द यायची. कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय न मिळण्याचे ते दिवस होते. साहजिकच तुम्ही क्रिकेट खेळायला लागता तेव्हा हे कष्ट खेळात दिसायचे आणि तेच यशाकडे घेऊन जायचे. मुंबईच्या मध्यमवर्गाची व्याख्या हळूहळू बदलत गेली आणि मुंबईच्या खेळाडूंचं भारतीय टीममधलं स्थान घटलं.

याउलट जिथं जिथं छोट्या शहरात क्रिकेट फोफावलं तिथले युवा खेळाडू आपल्या पहिल्या संधीच्या शोधात आणि संधी मिळाल्यावर तिचं रुपांतर यशात करायला अतोनात कष्ट घ्यायला तयार असतात. युवा वर्ल्डकपमधल्या खेळाडूंकडे बघितलं तर हेच दिसून येतं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून इथपर्यंत आले आहेत. प्रत्येक खेळाडूची कहाणी ही प्रेरणादायी आहे.

प्रेरणादायी विश्वविजेत्यांची टीम

कर्णधार यश धूलला सैन्य दलातून निवृत्त झालेल्या त्याच्या आजोबांनी शिस्तीचे धडे दिले आणि या शिस्तीतूनच त्याच्यात कणखरता आली. कोरोनाच्या परिणामांचा त्रास जाणवत असतानाही त्यानं सेमी फायनलमधे शतक ठोकून बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवलं. उपकर्णधार रशीदसाठी तर त्याच्या वडलांनी अपार कष्ट उपसले. जेव्हा त्यांची नोकरी गेली तेव्हा वेळप्रसंगी शहरं बदलत, आपल्या वस्तू विकत त्यांनी गुजराण केली. पण मुलाचं क्रिकेट थांबू दिलं नाही.

विकी ओटस्वाल हा वेंगसरकर अकादमीचा खेळाडू पण एकेकाळी क्रिकेटसाठी तो रोज वडलांबरोबर लोणावळा ते मुंबई प्रवास करायचा. त्याचे प्रशिक्षक मोहन जाधव यांनी कधी विकी नेटवर कधी लवकर तर कधी उशिरा येतो हे बघितल्यावर त्यांनी विकीला कुठून येतोस विचारलं. लोणावळा उत्तर कळल्यावरच जाधव सरांना या मुलाच्या मेहनत घेण्याच्या तयारीची कल्पना आली.

आपल्या महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू म्हणजे राजवर्धन हंगर्गेकर. जून २०२०मधे वडलांचं कोरोनामुळे निधन झाल्यावर तो नैराश्येत गेला होता. पण पीके पेस फाऊंडेशननं त्याला मानसिक स्थैर्य दिलं आणि वर्ल्डकपमधे स्थान मिळवायच्या तयारीनं तो पुन्हा मेहनत करायला लागला. राज बावाला तयार करायला त्याचे वडील सुखविंदर बावांनी प्रचंड मेहनत घडवली. अंगरिक्ष रघुवंशीची कहाणी तर वेगळीच आहे. अकराव्या वर्षीच तो क्रिकेटचे धडे गिरवायला मुंबईला आला.

आज टेनिसपटू असलेल्या त्याच्या भावाला लहानपणी ब्लड कॅन्सर झाला होता. तब्बल पाच वर्षं त्याचे उपचार बघत अंगरिक्षने रुग्णालयात रात्री काढल्या. त्याच्या आईच्या मते, या कालखंडाने अंगरिक्षला अजून कणखर बनवलं. या सगळ्या गोष्टीत एकच सामायिक धागा आहे तो म्हणजे हे सगळे खेळाडू सामान्य कुटुंबातून आलेत आणि त्यामुळेच त्यांना परिस्थितीशी झगडून विजयी बनायचं बाळकडू घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि भारताला वर्ल्डकप मिळवून दिला.

हेही वाचा: भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते

स्पर्धेत तंत्र टिकवण्याचं आव्हान

आता प्रश्न असा आहे की या कोवळ्या मुलांचा पुढचा मार्ग कसा आखायचा हे बीसीसीआयने ठरवलं पाहिजे. युवा वर्ल्डकपमधे चमकलेले सगळेच खेळाडू उच्च स्तरावर पोचू शकले नाहीत किंवा त्यांना त्यांचं स्थान टिकवता आलं नाही हे आपण पाहिलंय. पृथ्वी शॉ हे त्यातलं ताजं उदाहरण. प्रचंड गुणवत्ता असलेला हा खेळाडू जो कुठल्याही गोलंदाजीच्या मार्‍याला सहज सामोरा जाऊ शकला असता. त्याने आपला सलामीचा प्रश्न सुटला असता, पण आज तो निवड समितीच्या रडारवरही नाही.

शुभमन गिल अजून तंत्रात चाचपडतोय. यांच्यासाठी आयपीएलचे दरवाजे उघडले आणि तंत्र घोटायला सवडच मिळाली नाही. मी सरसकट आयपीएलला दोष देत नाही पण ज्या खेळाडूंची परिपक्वता कमी असते ते या विविध फॉर्मॅटच्या भूलभुलैयात होरपळून निघतात. आता आयपीएलच्या लिलावात यांच्यावर बोली लावली जाईल.

कदाचित काहीजण कोट्याधीशही होतील. युवा भारतीय टीममधल्या आठ खेळाडूंना आयपीएलच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालं नाही. कारण नियमाप्रमाणे त्यांनी एकही प्रथम दर्जाचा सामना खेळलेला नाही किंवा लिलावाच्या वेळी त्यांचं वय एकोणीस नाही. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे स्थानिक क्रिकेटच्या संधीच न मिळाल्यानं त्यांना अपवाद म्हणून या यादीत सामील करून घ्यावं असाही एक युक्तिवाद चालू आहे.

निवड समितीवर पूर्ण भिस्त

युवा खेळाडूंच्या हातात परिपक्व होण्याच्या आत पैसा आला आणि त्याला जर ते यश, पैसे, प्रसिद्धी कशी हाताळायची याचं भान नसलं तर गुणवत्ता वाया जाण्याची एक भीती असते. २०१२ साली पंजाब क्रिकेट असोसिएशन त्यांच्याशी संलग्न २१ वर्षांखालील खेळाडूंना आयपीएलसकट कुठलेही टी-२० सामने खेळायला परवानगी देत नव्हती. आजही तो नियम लागू आहे का माहीत नाही, पण जरा विचार केला तर या नियमात तथ्य आहे.

या मर्यादित षटकांच्या क्रिकेटने क्रिकेटपटूंचं लक्ष विचलित होऊ शकतं. तंत्रावर परिणाम होऊ शकतो. आयपीएलच्या अनेक फायद्यांबरोबर हा तोटाही आहे. या खेळाडूंना कमीत कमी एक मोसम स्थानिक क्रिकेट खेळायची सक्ती केली पाहिजे. आयपीएलमधे गाजलेले अनेक खेळाडू देशाकडून खेळताना निष्प्रभ ठरून एक-दोन संधीनंतर कायमचे बाहेर फेकलेले आपण पाहिले आहेत.

भारतासाठी पाचव्यांदा युवा वर्ल्डकप जिंकल्याबद्दल या युवकांचं पुन्हा मन:पूर्वक अभिनंदन पण ही युवा मंडळी म्हणजे बीसीसीआयच्या हातात आलेले मातीचे घडे आहेत. यातल्या घटाघटाचं रूप आगळं आहे. प्रत्येकाचं दैव वेगळं आहे. बीसीसीआय त्यांना क्रिकेटच्या कुठच्या फिरत्या चाकावर बसवून मातीला आकार देईल यावरुनच ‘कुणा मुखी पडते लोणी कुणा मुखी अंगार पडेल’ हे कळेल.

हेही वाचा: 

क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट

महेंद्र सिंग धोनी: वनडेतला ‘ग्रेट फिनिशर’

सचिन, आम्ही तुला हृदयातून रिटायर्ड करू शकत नाही

आरसीबीचा विराट म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार!

क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)