अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा!

१३ ऑक्टोबर २०१९

वाचन वेळ : ८ मिनिटं


आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी म्हणजे को जागर्ति? कोण जागं आहे का, असं विचारणारा दिवस. या दिवशी आपण फक्त दूध पिण्यात समाधान मानतो. पण खरी कोजागिरी कशी साजरी करायची, ते आपल्याला शिकवलं गाडगेबाबांनी. म्हणून आज त्यांची आठवण. आपल्याला माणूस जागा करायचा असेल, तर गाडगेबाबांच्या विचारांना पर्याय नाही.

महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या सामाजिक क्रांतीचा स्पर्श झालाय. संतांनी आपल्या वैचारिक आंदोलनातून गेल्या शेकडो वर्षांपासून पडीक असलेल्या इथल्या समाजाच्या मेंदूची मशागत केली. अगदी नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापासून ते संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत ही परंपरा चालत आलीय. त्या त्या काळात या संतांनी लोकांच्या मानसिक गुलामगिरीविरुद्ध वैचारिक बंडाचा झेंडा उभारला. अभंग, कीर्तन यातून ही संत मंडळी लोकांची मानसिक धुलाई करत होती.

संत गाडगेबाबांनी लोक प्रबोधनासाठी कीर्तनाचा अत्यंत प्रभावी वापर केला. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृष्यता, अस्वच्छता यावर कीर्तनातून कोरडे ओढत एक स्वच्छ, निकोप असा समाज निर्माण व्हावा यासाठी धडपड केली. गाडगेबाबांचं कीर्तन म्हणजे मानसिक गुलामगिरीविरुद्ध उभारलेलं आंदोलनच होतं. एखाद्या विद्यापीठाला इतक्या कमी कालावधीत जे शक्य होऊ शकलं नसतं ते त्यांनी कीर्तन आणि कृतीतून शक्य करून दाखवलं. त्यांचे कीर्तन म्हणजे ‘प्रबोधनाचा माईल स्टोन’ आहे.

लोकभाषेतलं मुक्तीचं क्रांतीगीत

प्रबोधनातून सामाजिक परिवर्तन हे मुख्य सूत्र ठेवून संत गाडगेबाबांनी कीर्तनाची कास धरली. दापुरा या मामाच्या गावी गुरं राखत असताना त्या चिंचेच्या बनात आपल्या विविध जातीधर्मातल्या गुराखी मंडळीच्या साक्षीने महादेवाच्या देवळात या कीर्तनाचा त्यांनी वापर केला असावा. दोन दगडांचे टाळ करून याच महादेवाच्या मंदिरासमोर क्रांतीच्या सुरांना बाबांनी जन्म दिला.

पुढे ऋणमोचनच्या यात्रेत १९०५ च्या कालावधीत घर सोडल्यानंतर त्यांनी कीर्तन हेच प्रबोधनाचं प्रमुख अस्त्र वापरलं. भोळ्या भाबड्या जनतेच्या मेंदूवर असलेली विविध प्रकारची जळमटं त्यांनी झाडून टाकली. लोकांच्या भाषेतील हे कीर्तन लोकांना आपल्या ‘मुक्तीचं क्रांतिगीत’ वाटू लागलं. देवधर्माच्या नावावर चालणाऱ्या शोषणाविरुद्ध अत्यंत कडाडून हल्ला केला तरी लोकांचा धर्मगंड दुखावला नाही. उलट यातच आपली मुक्ती आहे असं लोक समजू लागले.

हेही वाचाः गाडगेबाबा जसे दिसले तसे, सांगताहेत त्यांचे ड्रायवर (भाग १)

सामाजिक क्रांतीचा धगधगता अध्याय

आपण लोकांची भाषा बोलतो तेव्हा लोक आपल्याला स्विकारायला लागतात. गाडगेबाबांच्या कीर्तनाचं यश या लोकभाषेतल्या संवाद कौशल्यात दडलंय. म्हणूनच आयुष्यभर ते कीर्तनातून समाजजागृती करू शकले. ऋणमोचन ते बांद्रा पोलिस स्टेशन व्हाया पंढरपूर हा जो संत गाडगेबाबांचा कीर्तन प्रवास आहे तो एका सामाजिक क्रांतीचा धगधगता अध्याय आहे.

कीर्तनातून पेरलेल्या या बीजातूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीला बळ मिळालं. एकाचवेळी जागतिक स्तरावरील बाबासाहेब नावाचा प्रकांडपंडीत आणि गाडगेबाबा नावाचे एक निरक्षर ‘लोक बॅरिस्टर’ आपल्या वाणीने समाजमन स्वच्छ करत होते. संत गाडगेबाबा हे प्रबोधनाच्या चळवळीला पडलेलं आणि प्रत्यक्षात साकारलेलं महाकाय स्वप्न होते. त्यांच्या सबंध सामाजिक आंदोलनात कीर्तनाचा महत्वाचा रोल राहिलाय.

दगडी टाळांचे स्वर

बाबांचं कीर्तन पांडित्यप्रधान नव्हतं. पारंपरिक नव्हतं. या कीर्तनाचा केंद्रबिंदू देव आणि धर्म नव्हता तर केवळ आणि केवळ सामान्य माणूस होता. गेली शेकडो वर्ष ज्या रुढी परंपरांनी माणसं करकचून आवळली गेली होती ते रुढी परंपरेचे दोरखंड कापून टाकून मुक्तीचं एक नवं आकाश बहाल करणारं हे कीर्तन होतं. या कीर्तनात प्रत्येकाच्या मेंदूला झिणझिण्या आणण्याची ताकद होती. एकेका शब्दात वैचारिक ज्वालामुखी दडला होता.

म्हणूनच तर बाबांच्या एका शब्दावर लोक स्वतःला झोकून देत होते. हे कीर्तन लोकांना अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र समजावून सांगत होतं. तब्बल ५० वर्ष हे दगडी टाळांचे स्वर महाराष्ट्राच्या मनोभूमीत गुंजत राहिले. आजच्या या महाराष्ट्राच्या जडणघडणीत संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनाची भूमिका महत्वाची ठरलीय. संत नामदेवांना अभिप्रेत असलेला समाज, फुले, शाहू यांना अपेक्षित असलेला समाज घडवण्याचं मोलाचं कार्य बाबांच्या कीर्तनाने केलंय, ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही.

आज सगळीकडे आपल्याला अध्यात्माचा बाजार मांडलेला दिसतो. बुलेटप्रुफ बुवा, बापू, साध्वी, महाराजांचे ऑनलाईन स्तोम माजवण्यात आलंय. लोकांच्या मेंदूत गुलामगिरीचा वायरस पेरला जातोय. अशा वेळी हे वायरस स्कॅन करण्यासाठी संत गाडगेबाबा यांनी दिलेलं कीर्तनाचं अँटी वायरस सॉफ्टवेअर खूप महत्वाचं आहे.

हेही वाचाः गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

सत्यनारायणाच्या पोथीमागचं वास्तव

संत गाडगेबाबा निरक्षर होते. त्यांनी विज्ञानाची पुस्तकंही वाचली नव्हती. मात्र त्यांच्या मेंदूत वैज्ञानिक दृष्टिकोन ठासून भरलेला होता. कुठल्याही अतार्किक बाबींना ते थारा देत नसायचे. प्रश्न विचारणं हा त्यांचा खास स्थायीभाव. प्रत्येक गोष्टीची ते चिकित्सा करत असत, म्हणूनच त्यांनी कीर्तनातून अनेक अतार्किक गोष्टींची चिरफाड केली. मरीमाय, मातामाय असो की सत्यनारायणाची पोथी असो त्यांनी कशाचीही भीडमुर्वत ठेवली नाही.

बांद्रा पोलिस स्टेशनमधे सत्यनारायणाच्या पोथीच्या निमित्ताने आयोजित कीर्तनात त्यांनी सत्यनारायणाच्या पोथीमागचं वास्तव उघड करून दाखवलं. सत्यनारायणाची पोथीचा कार्यक्रम होता त्याच ठिकाणी सत्यनारायणावर कोरडे ओढणं याला प्रचंड मानसिक ताकद लागते. ती ताकद गाडगेबाबांच्या वाणी आणि कृतीमधे होती.

देवळात देव नसतो, देवळात पुजाऱ्याचं पोट असतं हा धार्मिक शोषणमुक्तीचा विचार त्यांनी आपल्या कीर्तनातून प्रभावीपणे मांडला. ‘देव देव करता शिनले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे’ हा संत तुकोबारायांचा विचार त्यांनी कीर्तनातून पुढे नेला. त्यांचं कीर्तन श्रोत्यांना खाडकन जागं करायचं. लहानपणी मामाच्या गावी आईने जात्यावर म्हटलेल्या ओव्या आणि भजनं बाबांना मुखोद्गत झाली होती.

कीर्तनातून मांडला विज्ञानवाद

संत तुकाराम आणि महात्मा कबीर यांच्या विचारांचा प्रचंड पगडा गाडगेबाबांवर होता. कीर्तनातून अनेकदा ते संत तुकारामांचे अभंग आणि महात्मा कबीर यांच्या दोह्यांचा प्रभावीपणे वापर करत. एकीकडे धर्मभोळा समाज, शोषणात अडकलेला समाज आणि त्यांच्यापुढे हा माणूस कीर्तनातून विज्ञानवाद मांडत होता. तुकोबा आणि कबीर तर कायम त्यांच्यासोबत कीर्तनात असायचे.

जत्रा मे फत्रा बिठाया तिरथ बनाया पानी
दुनिया भई दिवानी पैसे की धूलदानी

असं सांगत त्यांनी लोकांच्या मेंदूला झिणझिण्या आणल्या. ‘तिर्थाले जाणं अन् देवाचा संबंध नाही. पैशाचा नाश, खाना खराब आहे’ अशी स्पष्ट वैज्ञानिक मांडणी ते आपल्या कीर्तनातून करत. ‘कर्ज काढून सण साजरे करू नका,  यात्रेत जाऊ नका’ असं सांगणारा हा प्रबोधनकार स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मानसिक अंधारयात्रेत प्रबोधनाची प्रकाशफुलं वाटत होता. माणसामाणसांमधे जातीच्या नावाखाली चालणाऱ्या शिवाशिवी वर तर त्यांनी कठोर शब्दात प्रहार केलेत.

स्त्री आणि पुरुष याच केवळ दोन जाती आहेत हे ठासून सांगितलं. कीर्तनातून त्यांनी अस्पृश्यतेवर जोरदार हल्ले केले. ‘आपल्या हिंदुस्तानले शिवाशिवीचा डाग आहे, तो डाग धूवून काढायचा प्रयत्न करा.’ एवढं सांगून ते थांबले नाहीत तर गावोगाव त्यांनी स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजित करून अस्पृश्यता निर्मूलनास गती दिली. पंढरपूरच्या यात्रेतील अस्पृश्यांचे हाल पाहून त्यांनी चोखामेळा धर्मशाळा बांधली जी नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे सुपूर्द केली.

शोषण यंत्रणेच्या किल्ल्यांना हादरे

गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून अनेकदा आंबेडकारांचा जय जयकार केला. बाबासाहेबांच्या सामाजिक समतेच्या लढाईस पूरक असं व्यापक जनमानस तयार करण्याचं काम गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनातून केलं. म्हणूनच बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर हा महामानव निःशब्द आणि अस्वस्थ झाला होता. माणुसकीला पारखे झालेल्या, गावकुसाबाहेरील एका समूहावर मायेचे आभाळ पांघरणारा गाडगेबाबा नावाचा माणूस म्हणूनच खर्‍या अर्थाने ’समतादूत’ ठरतो.

एरवी कीर्तन म्हटलं की अध्यात्माचा बाजार मांडला जातो. स्वर्ग नरकाचे कपोलकल्पित दाखले देऊन मानसिक गुलामीचं बीजारोपण केलं जातं. बहुसंख्य लोकांना मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडांनी करकचून आवळून त्यांचं शोषण करणारी एक यंत्रणा या देशात काम करतेय. या यंत्रणेच्या कपट किल्ल्यांना गाडगेबाबांच्या कीर्तनाने  जबरदस्त हादरे दिले.

‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!’ हा संत नामदेवांचा विचार पुढे नेणारं गाडगे महाराजांचं कीर्तन असायचं. हा माणूस शाळेची पायरीही चढला नव्हता मात्र त्यांचं शिक्षण समाजाच्या विद्यापीठात झालं होतं. शिक्षण हा माणसाचा पहिला डोळा आहे हे त्यांनी ओळखलं होतं. आपल्या अवतीभोवतीची माणसं शिक्षणाच्या अभावामुळेच अशी गुलाम झालीत आणि या गुलामीविरुद्ध बंड करण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.

हेही वाचाः गाडगेबाबांच्या शेवटच्या कीर्तनाचा सामाजिक आशय

शिक्षणाचं गाडगेबाबा मिशन

‘विद्येविना मती गेली’ हे शोषणमुक्तीचं सूत्र मांडणारे महात्मा फुले खऱ्या अर्थाने गाडगेबाबांच्या मेंदूत सळसळत असायचे. महात्मा फुले यांनी दिलेला विद्येविना मती गेली हा विचार संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर पुढे नेला. ‘ज्याले विद्या नाही त्याले खटार्‍याचा बैल म्हटलं तरी चालेल’ असा उपरोधिक टोला ते कीर्तनातून हाणायचे. शाळेत जा नाहीतर आयुष्यभर बूटपॉलिश करावं लागेल असं सांगत ते कीर्तनातून विद्येचं महत्त्व पटवून द्यायचे.
 
‘विद्या मोठं धन आहे, जेवणाचं ताट मोडा, बायकोले लुगडं कमी भावाचे द्या, मोडक्या घरात रहा पण मुलाले शिक्षण दिल्याविने सोडू नका.’ हा जो विचार आहे तो एका नव्या लढाईचं संघर्ष गीत आहे. अक्षर ओळख नसलेला पण ज्ञानपिपासू असलेल्या या महामानवाने आयुष्यभर कीर्तनातून ज्ञानज्योती पेटवल्या.

आज शैक्षणिक क्षेत्रात गाडगे महाराज मिशनने जे वैभव उभे केलंय त्या वैभवात या देशातले वंचित विद्यार्थी उजळून निघताहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक क्रांतीत संत गाडगेबाबांच्या कीर्तनाने आणि कृतीने मोलाची भर घातलीय. कीर्तनातून पेटवलेली परिवर्तनाची ज्योत गावखेड्यात जावी म्हणूनच बाबांच्या मार्गदर्शनात संत मीराबाई शिरकर, संत गयाबाई मनमाडकर अशा सिद्धहस्त महिला कीर्तनकार निर्माण झाल्यात.

मानवी कल्याणाचं विद्यापीठ

गाडगेबाबांचं कीर्तन म्हणजे मानवी कल्याणाचं विद्यापीठ होय. बाबांनी कीर्तनातून अर्थशास्त्र साध्यासोप्या भाषेत उलगडून दाखवलं. जमाखर्च व्यवस्थित सांभाळा हा कळवळा त्यांच्या कीर्तनात होता. संसारात काटकसर करत जा तरच तुमचा संसार सुखी होईल हे ते सांगत. मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, भाटे हे जमाखर्च सांभाळतात म्हणूनच तुपाचा शिरा खातात.

मराठे, तेली, माळी, न्हावी, धोबी यांना जमाखर्च समजत नाही. ‘पौनसे रुपये उत्पन्न आणि ऐंशी रुपये खर्च, जानेवारीत मजा करा आणि फेपरवारीत बोंबलत बसा’ अशा पद्धतीने अर्थशास्त्र ते कीर्तनातून उलगडत असायचे. पशुहत्या, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा, हुंडा निर्मूलन, कृषी, जलसंधारण, प्रबोधन यासारखे विविध विषय त्यांच्या कीर्तनाचा केंद्रबिंदू असायचे. या साऱ्या समस्यातून ग्रामीण आणि शहरी समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमाचा वापर केला.

आजच्या बाबाबुवा, बापू, साध्वी यांना म्हणूनच गाडगेबाबांचं नाव उच्चारण्याचा नैतिक हक्क उरत नाही. स्वातंत्र्यपूर्वकाळात गाडगेबाबांचं कीर्तन एक जनआंदोलनाचं रूप धारण करत होतं. गांधी, आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक स्वातंत्र्यलढ्यास पूरक असं वातावरण, जनमानस गाडगेबाबांच्या कीर्तनातून तयार होत होतं.

स्वातंत्र्याचं जनआंदोलन

ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी वांद्र्याचे राम आले का, दादरचे ईठोबा आले का? असा सवाल करत त्यांनी गांधीजींचा कीर्तनातून जयजयकार केला. हजारोंचा जनसमुदाय ‘महात्मा गांधी की जय’ एक सुरात म्हणत होता. ही ताकद होती बाबांच्या कीर्तनात. गाडगेबाबांचं कीर्तन म्हणजे एक जनआंदोलन होतं. इथल्या कर्मठ परंपरांवर त्यांनी प्रचंड हल्ले केले.

सूर्यप्रकाश अडवून धरणाऱ्या परंपरावादी ढगांना त्यांनी दूर सारलं. समाजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात मानसिक स्वातंत्र्याची बीज बाबांच्या कीर्तनातून पेरली गेली. जातीयतेची धर्मनिष्ठ व्यासपीठं त्यांनी पार उद्ध्वस्त करून टाकली. समाज जागृतीच्या या लढ्यात मग सारा महाराष्ट्र सहभागी झाला. आजचा जो निकोप ग्रामीण समाज आपण बघतोय त्याला गाडगेबाबांचं प्रबोधन कारणीभूत आहे.

दोन दगडी टाळांच्या कीर्तनाने समाजाचं टाळकं जाग्यावर आणणाऱ्या गाडगेबाबांच्या कीर्तनाने मानसिक गुलामीत जगणाऱ्या माणसांना स्वातंत्र्याचं मुक्त आकाश बहाल केलंय. ते कीर्तन नव्हतचं तर ते एक जनआंदोलन होतं.

हेही वाचाः 

बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

गाडगेबाबांची दशसुत्री ठाकरे सरकारला झेपेल का?

प्रबोधनकारः महाराष्ट्राला वळण लावणारे विचारवंत

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी विरोधकांना कांशीरामांकडे जावंच लागेल!

(लेखक हे मुक्त पत्रकार असून सामाजिक कार्यकर्ते आहेत.)