१४ वर्षांच्या भारतीय मुलाने तयार केला गलवान व्हॅलीचा इतिहास

२० जून २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


गलवान व्हॅली प्रकरणावरून भारत चीन सिमेवरचे संबंध ताणले गेलेत. पण या व्हॅलीला गलवान हे नाव मिळालंय तेच मुळी १४ वर्षांच्या एका मुलामुळे. फक्त हा मुलगाच नाही तर त्याचे पुर्वजही भारतीयच असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. गलवान व्हॅलीची जमीन आमची असं म्हणणाऱ्या चीनी सरकारला हा रंजक इतिहास आपण ठणकावून सांगायला हवा.

भारत चीन बॉर्डरवर असलेल्या गलवान व्हॅलीवरून सध्या वातावरण तापलंय. ही जमीन आमचीच असं म्हणत चीनने भारताविरोधात युद्धच पुकारलंय. चीनने केलेल्या हल्ल्यात २० भारतीय सैनिक शहीद झालेत. पण आता कुणीही आपल्या देशाच्या सिमेत घुसलंच नाही असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यामुळे आपण गलवान व्हॅलीचा भाग चीनला देऊन टाकला की काय अशी शंका आता अनेकांना वाटू लागलीय.

खरंतर, पृथ्वीवरच्या कुठल्याही जमिनीवर कुठल्याही देशाचं नाव लिहिलेलं नाही. त्यामुळेच ती जमीन कुणाची हे ठरवण्यासाठी त्या जमिनीवर राहणारे लोक, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती आणि मुख्य म्हणजे तिथल्या इतिहासाचा अभ्यास करायला हवा. गलवान व्हॅलीच्या नावाचा रंजक इतिहासही आपल्याला ही जमीन कुणाची या प्रश्नाचं अगदी ठसठशीत उत्तर देतो.

इंग्रजांचा टुरिस्ट गाईड

व्हॅली म्हणजे दरी. दोन डोंगरांच्या मधे अरूंद आणि लांबच लांब जागा राहते त्याला मराठीत दरी असं म्हणतात. इंग्रजी 'वी' किंवा 'यू' या अक्षरासारखा हा व्हॅलीचा आकार असतो. बहुंताशवेळा अशा अरूंद जागेतून एखादी नदी वाहत जाते. भारताच्या लेह लडाख या भागातही अशीच एक नदी आणि दरी आहे. समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंच अशी ही जागा भारत आणि चीन दोघांनाही संरक्षणासाठी उपयोगी पडते. साधारण २० डिग्री सेल्सिअसपर्यंत इथलं तापमान जातं.

१८७८ मधे जन्मलेल्या गुलाम रसूल गलवान यांच्या नावावरून या व्हॅलीला गलवान व्हॅली असं नावं दिलं गेलंय. रसूल अवघे १२-१३ वर्षांचे असताना  लेहमधले डोंगर चढू लागले. आजच्या भाषेत त्यांना ट्रेकिंग करण्याची आवड होती. वेगवेगळ्या ठिकाणी फिरून नवे डोंगर, नदी, दऱ्या, रस्ते असं शोधून काढायला त्यांना खूप आवडत असे. त्यावेळी भारतात इंग्रजांचं राज्य होतं. भारतातल्या अशा अवघड जागांवरून चालताना इंग्रजांचा मागकाढ्या म्हणजे टुरिस्ट गाईड म्हणूनही त्यांनी काम केलं.

सतत इंग्रजांसोबत राहिल्याने गुलाम रसूल गलवान यांना इंग्रजीसोबत अनेक युरोपियन भाषा येत होत्या. पुढे त्यांनी सर्वंट ऑफ साहिब या नावाचं एक इंग्रजी पुस्तक लिहिलं. हे पुस्तक म्हणजे त्यांचं आत्मचरित्र असल्यासारखं आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध ब्रिटिश प्रवासी सर फ्रान्सिस यंगहसबंड यांची प्रस्तावनाही दिली गेलीय. 

हेही वाचा : चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण

ब्रिटिशांचा जीव वाचवला

या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर असणाऱ्या नदीच्या मूळ स्त्रोताचा शोध लावण्यासाठी एक पथक तैनात केलं गेलं होतं. त्या पथकाचं नेतृत्व गुलाम रसूल करत होते. त्यामुळेच त्यांच्या नावावरून या नदीला गलवान नदी असं नाव पडलं.

एनडीटीवीला दिलेल्या एका मुलाखतीत रसूल गलवान यांचे नातू  मोहम्मद अमीन गलवान आपल्या आजोबांच्या आठणींना उजाळा देत होते. ‘माझे आजोबा १८७८ मधे लेहमधे जन्मले. १२ व्या वर्षी त्यांनी तिबेट, मध्य आशियातल्या पर्वतरांगा आणि विशेषतः काराकोरम पर्वतरांगा या भागातला ब्रिटिशांचा मागकाढ्या म्हणजेच गाईड म्हणून काम करायला सुरवात केली.’

ते ब्रिटिशांसोबत अनेक मोहिमेवर जात असतं. अशाच एका मोहिमेसाठी लॉर्ड डनमोरसारख्या अशा अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबत ते अक्साई चीनच्या दिशेने जात होते. तेव्हा मधेच हवामान खराब झाल्यामुळे ते रस्ता चुकले. ‘तेव्हा माझ्या आजोबांनीच एक रस्ता शोधून काढला आणि सगळ्या साथीदारांसोबत ते नदीजवळ आले. माझ्या आजोबांनी हा रस्ता शोधून काढल्यामुळेच त्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे जीव वाचू शकले.’ असं मोहम्मद गलवान सांगत होते.

'त्यानंतर एवढ्या लोकांचे जीव वाचवल्याबद्दल तुम्हाला काय हवं असं डनमोर यांनी गलवान यांना विचारलं. तेव्हा गलवान यांनी या दरीला माझं नाव देण्यात यावं अशी इच्छा बोलून दाखवली. तेव्हापासून ही दरी गलवान व्हॅली म्हणून ओळखली जाते. तेव्हा ते साधारण १४ वर्षांचे असावेत.'

गलवान म्हणजे घोडे पाळणारा

रसूल गलवान हे लेहमधले मूळ निवासी होते. त्यांनी लिहिलेल्या सर्वंट ऑफ साहिब या पुस्तकात अगदी मोडक्या तोडक्या इंग्रजीत गलवान कुटुंबाचाही इतिहास लिहिला आहे. रसूल गलवान लिहितात, ‘माझी आई मला सांगत असे. अनेक वर्षांपूर्वी काश्मीरच्या पर्वतांवर चरण्यासाठी महाराजाच्या पोनी घोड्याचे कळप यायचे. त्यांच्यासोबत राखण करणारी माणसंही असायची. त्यातला एक राखणदार कारा गलवान हा नंतर चोर किंवा डाकू म्हणवला जाऊ लागला.’

हा गलवान श्रीमंत लोकांना लुबाडून त्यांची संपत्ती गरीबांमधे वाटायचा असं गुलाम रसूल यांनी लिहिलंय. काश्मिरी भाषेत गलवान या शब्दांचा अर्थ घोडा पाळणारा असा होतो. मात्र, नंतर ही संपूर्ण जमात गुन्हेगार, लुटारी जमात म्हणून ओळखली जाऊ लागली.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

किराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो?

गलवानचे पूर्वज काश्मिरी भारतीय

हे गलवान कुटुंबीय आजही लेहमधे राहतात. त्यांनाही आपण भारताचाच भाग आहोत असं वाटतं. एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीत रसूल गलवान यांचे नातू मोहम्मद गलवान यांनीही हेच सांगितलं. ‘१९६२ पासून चीनने ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न चालू केलाय. पण ही जमीन भारताचा भाग होती आणि नेहमी राहील. तेव्हाही आपल्या सैनिकांनी आपले जीव गमावून खिंड लढवली होती आणि आताही ते तसंच करतायत. आम्हाला आमच्या सैनिकांचा खूप अभिमान वाटतो आणि त्यांच्या त्यागासाठी त्यांना सॅल्यूट करतो.’ असं ते म्हणाले.

रसूल गलवान यांचे पूर्वज काश्मिरी होते, असं सर्वंट ऑफ साहिब पुस्तकाच्या प्रस्तावनेत यंगहसबंड यांनीही लिहिलंय. या गलवान व्हॅली भागासोबत सरकारनं तडजोड केली की नाही याचा खुलासा लवकरच होईल. पण गलवान व्हॅली आणि लेहमधे राहणाऱ्या लोकांची संस्कृती, भाषा, आणि त्यांचा इतिहासही हा भाग भारताचा होता आणि नेहमी राहील, हेच सांगतो.

हेही वाचा : 

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय?

मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

लॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत?

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज