कृतीच त्यांची भाषा होती

०७ नोव्हेंबर २०१८

वाचन वेळ : १० मिनिटं


महात्मा गांधींनी राजकारणाची भाषा बदलली. देशाची भाषा बदलली. आपल्या जगण्याचीच भाषा बदलली. त्यांच्या भाषेने देश घडवला. गांधींची भाषा समजून घेतल्याशिवाय त्यांची थोरवी उमजणं अवघड आहे. ती समजून घेण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे, डॉ. गणेश देवी. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. `आम्ही सारे फाऊंडेशन` आयोजित शिबिरात त्यांचं `गांधीजींची भाषा` या विषयावर झालेल्या भाषणाचं हे शब्दांकन. निमित्त गांधीजींचं १५०वं जयंती वर्ष.

जगाच्या, समाजाच्या आणि देशाच्या आरंभाची मोठी गोष्ट आहे. मुळात या सगळ्या गोष्टींचा एक इतिहास आहे. पण इतिहास ही एक संकल्पना आहे. हे ज्यानं सगळ्यात पहिल्यांदा मांडायला सुरुवात केली, त्याचं नाव हेगेल. त्याने इतिहासाच्या संदर्भात वेगवेगळे सिद्धांत मांडले. मुळात कार्य, त्याचं कारण आणि त्याचा परिणाम या स्वरूपात इतिहास असतो. आधीच्या युगाचा, काळाचा आणि वेळेचा परिणाम म्हणून नवा काळ बनतो. हा काळ आधीच्या काळाच्या विरुद्ध असतो. त्यामुळं आधीचा आणि नवा काळ यांच्यात तत्त्वाच्या अनुषंगानं संघर्ष सुरू होतो. आणि त्यातून एक नवीन काळ जन्माला येतो. वगैरे गोष्टी इतिहासाच्या संदर्भात मांडल्या आहेत.

 

इतिहास या विषयाची रचनाच मुळात एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जर्मनीत झाली. त्या आधारावरच जर्मन लोकांनी त्यांच्या इतिहासाची मांडणी केली. या मांडणीअगोदर जर्मनीचा इतिहास पवेरियाचा, ऑस्ट्रियाचा इतिहास म्हणून ओळखला जात असे. पण या मांडणीच्या अनुषंगाने जर्मनीचा इतिहास पहिल्यांदा लिहिला गेला. पण त्याअगोदर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडचा इतिहास लिहिण्याची कळत नकळत सुवात झाली. त्याचाच परिणाम म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांचा इतिहास दृढ होण्यात झाला.

 

इतिहासाच्या तात्विक पातळीवर दोन प्रमुख विचारधारा सांगितल्या जातात. एक कार्ल मार्क्सची आणि दुसरी डार्विनची. कार्ल मार्क्सनं संपूर्ण समाज, त्याचं अर्थकारण, त्या समाजाची मानसिकता, सामाजिकता, संस्कृती या सगळ्या गोष्टींना इतिहासाची एक चौकट दिली. डार्विननं तर उत्क्रांतीच्या रूपात प्रचंड व्याप्तीचा इतिहास मांडला.

 

भारतात तर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भारतीय भूभागातील कुणी चिंतक मंडळी भारताचा इतिहास मांडत नव्हती. पण विल्यम जोन्स या अभ्यासकानं सगळ्यात पहिल्यांदा तो प्रयत्न केला. ‘मी कमीत कमी अकराव्या शतकापर्यंत भारताच्या साहित्याचा, भाषांचा, वैचारिकतेचा एक सलग इतिहास मांडून दाखवे. त्यानंतरचं काम तुमचं आहे’, अशी भूमिका त्यानं सर्वप्रथम मांडली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बंगाल आणि महाराष्ट्रात भारताचा इतिहास उलगडून दाखवण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झाली.

 

ही प्रक्रिया सुरू असताना महात्मा गांधींच्या काही समकालीन असणाऱ्यांनी इतिहासाची मांडणी केली. त्यात अरविंद घोष हे नाव प्रामुख्यानं घ्यावं लागतं. कारण त्यांनी आपल्या एकूण लिखाणात भारतीय प्राचीन इतिहास, वैचारिकता आणि तत्त्वज्ञान हे विषय हाताळले आहेत. त्यांनी भारताच्या मध्ययुगीन इतिहासासंबंधीही लिखाण केलं. अरविंद घोषांचा काळ म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा काळ. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीवर आयरीश स्वातंत्र्य चळवळीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर झाला. त्यावेळी इतिहासाची कल्पना करून सामाजिक, राजकीय आंदोलनांची आखणी केली जायची.

 

या पार्श्वभूमीवर महात्मा गांधींचा विचार करावा लागतो. महात्मा गांधींनी अतिप्राचीन, प्राचीन, मध्ययुगीन भारताबद्दल काही मतं मांडली आहेत का? किंवा इंडिजियस भारताबद्दल ते काही बोलले आहेत का? असा विचार केला तर त्याचं उत्तरनाहीअसंच आहे. भारताच्या इतिहासासंबंधी ज्यांनी मांडणी केली त्यात पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर ही काही नावं घेतली जातात. नेहरुंनीडिस्करी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा गांधींना लिहिलेली पत्र’, ‘ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीया पुस्तकांमध्ये इतिहासाची मांडणी केली.

 

आंबेडकरांनी मनुवादी इतिहासाची चिकित्सा करून त्याआधारे समाजात काय बदल हवे आहेत, हे सांगितलं. सावरकरांनीही आपल्या पुस्तकांतून इतिहासाच्या अनुषंगानं लिखाण केलं. लोकमान्य टिळकांनी ऐतिहासिक लिखाण केलं नसलं तरीही त्यांच्याओरायननावाच्या पुस्तकात वैश्विक इतिहास म्हणजेच पृथ्वीचा विश्वाशी असलेला संबंध आणि तो भौगोलिक पद्धतीनं कसा बदलत गेला, याविषयी लिखाण आहे.

 

गांधींनी मात्र आपल्या लिखाणातून कोणतंही ऐतिहासिक कथन केलं नाही. हाच त्यांच्या भाषेतचा आत्मा म्हणावा लागेल. त्यांच्या भाषेत ऐतिहासिकता नाही. त्यांच्या भाषेत आहे ती फक्त कृतिशीलता. या कृतिशीलतेतूनच गांधींचा दृष्टिकोन स्पष्ट होत होता. गांधीना भूतकाळवाचक भाषेत अजिबात रस नव्हता. त्यांच्या भाषेत वर्तमानकाळ डोकावतो. कस्तुरबांच्या आणि महादेवभाईंच्या मृत्यूनंतर गांधींनी काढलेले उद्गार हे त्यांच्या जीवनातील सगळ्यात करुणास्पद आणि दुःखद उद्गार आहेत. ‘मी पोरका झालो’, हे त्यांचे उद्गार होते.

 

डॉ. आंबेडकरांनीशूद्र कोण होतेया पुस्तकातून त्यांच्यावर अन्याय कसा होतो आहे याची मांडणी केली आणि नंतर कृती केली. गांधीनी मात्र फक्त कृती केली. राष्ट्रवादाचा इतिहास आयर्लंड, जर्मनी आणि इटलीमधून आला. तो गांधींनी मात्र आपल्या कृतीतून बदलला.

 

अ मॅन विदाउट नॅरॅटिव्हज बिकम अ वर्ल्ड मोस्ट एन्चाटिंग नॅरॅटिव्ह फॉरएव्हर’, हा माझा पहिला मुद्दा. इतिहास हा देखील कथाकथनाचाच प्रकार आहे. ‘ॲज इट वॉज इज नॉट अ हिस्ट्री; हिस्ट्री इज ॲज इट इज टोल्डत्याला आपण इतिहास म्हणतो. ‘हिस्ट्री ॲज इट वॉजहा एक भाग आहे. ‘हिस्ट्री ॲज इट टोल्डम्हणजे इतिहासाची पुस्तकं. इतिहासाच्या वर्णनात कथानक असतं.

 

रामायण आणि महाभारत ही दोन्ही कथानकं आहेत. या दोन्ही ग्रंथांविषयी गांधींना जवळीक वाटत होती. त्यांचे हे प्रिय ग्रंथ होते. त्यातल्या कथानकांवर कधीही ते बोलले नाहीत. पण त्यांनीरामराज्यहा शब्द वापरला. पण रामाच्या जीवनाबाबत ते कधी फारसं बोलले नाहीत. कोणतीही गोष्ट सांगण्याची त्यांची एकमेव पद्धत होती, ती म्हणजे कृती. म्हणूनचतुम्ही तुमच्या जीवनाविषयी काय सांगू शकाल?’ असा प्रश्न विचारल्यावरकृती हाच माझा संदेश आहे. कृती हेच माझं जीवन आहे.’ असं त्यांनी सांगितलं.

 

गांधींच्या विचारात तत्त्वज्ञान होतं. तत्त्वज्ञान हा विषयही त्यांना प्रिय होता. गुजरात विद्यापीठात जाऊन आठवड्यातून एकदा ते तत्त्वज्ञानाचे वर्ग घ्यायचे. उपनिषदं, बुद्धाचं तत्त्वज्ञान, बायबलमधले विचार यावर ते आवडीनं विचार करायचे. गांधीवाद हे तत्त्वज्ञान मी तयार केलेलं नसून ते अहिंसेचं तत्त्वज्ञान आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. गांधींच्या या तत्त्वज्ञानाचं अनुसरण करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यानी गांधी विचाराचं बरंच नुकसानही केलंय.

 

गांधी हा जगातला शेवटचा शब्द नसून तो प्रत्येकात मिसळत जाणारा शब्द आहे. त्यामुळंच गांधींच्या विचारांची पद्धत आचरणात आणखी तर गांधींप्रमाणे किंबहुना गांधींपेक्षाही जास्त सक्षम नेतृत्व कदाचित भविष्यात निर्माण होऊ शकेल. खरंतर गांधींबद्दल कधी कोणाला सांगूही नये. आत्ता हे जे मी गांधींबद्दल सांगतोय, तेही एक प्रकारचं पाप आहे. मग गांधी कुठं हवेत तर ते आपल्या श्वासाश्वासात आणि नसानसात हवेत. आपल्याला गांधी व्हायचं नाही, तर गांधी आत्मसात करायचे आहेत.

 

गांधींची भाषा ही त्यांच्या पुस्तकात शोधणं फार कठीण आहे. जॉन रस्किनची किंवा बायबलमधली इंग्रजी भाषा जशी सोपी आणि सरळ आहे. तशी गांधींची भाषा होती; एवढंच आपण म्हणू शकू. संत साहित्याचाही गांधींना परिचय होता. रोज सकाळी ब्रश करताना आरशावर गीतेचा एक श्लोक चिकटवून तो पाठ करायचा, ही त्यांची सवय होती. गीतेच्या संभाषण संवाद शैलीचा डायलॉगचा उपयोग त्यांनीहिंद स्वराजया पुस्तकात केला आहे. दोन वेगवेगळे विचार तत्त्वज्ञानाच्या पातळीवर संवादाच्या रुपात मांडून दाखवण्याचं काम त्यांनी या पुस्तकातून केलं. प्लेटोच्यारिपब्लिकया ग्रंथाचा अनुवादही गांधींनी याच शैलीत केला. त्यांच्या पुस्तकांकडे आणि त्यातल्या शैलीकडे पाहून गीता, प्लेटो, रस्किन आणि बायबल यांचा प्रभाव त्यांच्या भाषेवर होता, एवढंच आपल्याला म्हणता येतं.

 

गांधींच्या भाषेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नवी राजकीय भाषा शोधून काढली. त्या काळात जी भाषा वापरून राजकारण आणि समाजकारण व्हायचं, ती भाषा बाजूला सारून गांधींनी नवे शब्द रुजवले. त्यांचे गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी जेव्हा ते बोलायचे तेव्हा त्यांच्या संभाषणात बरेच नवे शब्द यायचे. पिटीशन, कमिटी, रिविजन, रिवोकेशन, र्जन, रिसेन्शन असे लॅटिन शब्द ते वापरत. त्यांचे समकालीन असलेले मोतीलाल नेहरू यांच्या भाषेतही वकिलीच्या संदर्भात शब्द यायचे. गांधींच्या राजकारणाची ही भाषा असू शकली असती. पण त्यांनी ती भाषा बाजूला सारली.

 

गांधी काही काळ साऊथ अफ्रिकेत होते. इंग्लंडमधे असताना तर तिथल्या संसदीय राजकारणाशी त्यांचा जवळून परिचय झाला होता. तिथल्या राजकीय पर्यावरणातले शब्द त्यांना सहज इकडं आणता आले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. याउलट त्यांनी स्वतःचे शब्द तयार केले. सत्याग्रह हा त्यातलाच शब्द. हा शब्द राजकारणाच्या कोणत्याही डिक्शनरीत नव्हता. पण तो शब्द गांधींनी तयार केला.

 

राजकारणासाठी असे अनेक शब्द गांधींनी तयार केले. ते भारतीय नेत्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीनं जास्त सर्वसमावेशक होते. सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी हे महत्त्वाचे ठरले. साबरमती आश्रम आणि गुजरात विद्यापीठ या दोन गांधींच्या प्रयोगशाळा होत्या. आश्रमातून नव्या समाजाची जडणघडण करण्याचा तर गुजरात विद्यापीठातून स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेणारे युवक घडवण्याचा त्यांचा हेतू होता. दांडी यात्रेला गांधीजी गेले तेव्हा त्यांनी आश्रमातील माणसं आंदोलनासाठी नेली नव्हती. तर त्यांच्याबरोबर गुजरात विद्यापीठातली माणसं होती. कारण स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यासाठी तयार होणारे युवक हे आश्रमात नव्हते, तर विद्यापीठात होते.

 

गांधींनी आयुष्याच्या अखेरपर्यंत कोणत्या ना कोणत्या क्रियाकलापाशी स्वतःला जोडून घेतलं. त्याविषयी असलेली बांधिलकी त्यांनी शेवटपर्यंत जपली. गुजरात विद्यापीठ हे त्याचंच उदाहरण. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात दरवर्षी केल्या जाणाऱ्या भाषणांमधूनच भारतीय राजकारणासाठीची नवी शब्दावली तयार होत राहिली. या भाषणांत अनेक नवे शब्द, या शब्दांचा अर्थ पुन्हा पुन्हा येत राहिला. या भाषणांचं गुजरात विद्यापीठानंहाऊ गांधी कॉइन्ड हिज लँग्वेजहे पुस्तक प्रकाशित केलं आहे.

 

गांधीनी भारतीय राजकारणासाठीची नवी भाषा अशी तयार केली. त्यांच्या या भाषेचा आपल्या देशाच्या भवितव्यावर काय परिणाम झाला तो समजून घेण्यासारखा आहे. त्यांनी जाणून बुजून अनेक भाषांचा देश ही कल्पना रुजवली. ते स्वतः गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलायचे, लिहायचे आणि वाचायचेही. त्यांनी आपलं सगळं महत्त्वाचं लिखाण गुजराती भाषेत केलं. पण गुजराती भाषेतील विद्वान, त्यांना गुजरातीचे महान लेखक वगैरे मानत नाहीत.

 

असं असलं तरी त्यांचं सर्वांत जास्त प्रभुत्व इंग्रजीवर होतं. याखेरीज ते लॅटिन आणि फ्रेंचही शिकले होते. बंगाली, तमिळ, मराठी, तेलुगू, हिंदी, उर्दू, फ्रेंच, गुजराती, इंग्रजी, लॅटिन या सगळ्या भाषांमध्ये गांधींनी सह्या केलेली किंवा त्यांनी डिक्टेक्ट केलेली कागदपत्रं उपलब्ध आहेत. गांधी ज्या प्रांतात जायचे, तिथलीच भाषा ऐकायचे. शक्य झाल्यास त्या प्रांताची भाषा बोलायचे किंवा तसा प्रयत्न करायचे. त्या त्या प्रांताच्या भाषेला महत्त्व देणं हा त्यांचा स्वभाव होता.

 

१७८० मध्ये विल्यम जोन्सनं एशियाटिक सोसायटीची स्थापना केल्यानंतर त्यानंतरच्या तीस वर्षांत बंगालमध्ये मोठा वाद झाला. भारताची ज्ञानपरंपरा संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमधलीच ज्ञानपरंपरा का मानावी की ती पर्शियनही असावी, हा त्या वादाचा विषय होता. भारतात शिक्षण देताना संस्कृत, पर्शियन की इंग्रजीत द्यायचं, हाही पुढे वादाचा विषय झाला.

 

गांधीजी शिकले आणि वकील झाले. ते साऊथ अफ्रिकेत गेले आणि भारतात परत आले. मुंबई विद्यापीठ निर्माण झाल्यापासून ते गांधी भारतात परत येईपर्यंत इंग्रजी ही भारताची कनेक्टिंग लँग्वेज असणार आहे, असा निर्णय आपल्याकडच्या विद्वानांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मानसिकरित्या पूर्णतः स्वीकारला होता. तो अधिकृतपणे स्वीकारण्याची तेव्हा त्यांना मुभा नव्हती. त्यामुळंच त्यांच्या लिखाणातवाघिणीचं दूधया पद्धतीची इंग्रजीचं कौतुक करणारी वर्णनं येत होती. फक्त गुजराती आणि कानडीतही इंग्रजीच्या कौतुकाचं काही लिहिलं गेलं.

 

इंग्रजी आपल्याला देशपणा देईल आणि भारतीय भाषा देश खंडित ठेवतील, ही भूमिका तोपर्यंत रूढ झाली होती. परंतु गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी सर्व भारतीय भाषांना उत्तेजन द्यायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून १९२६-२७ मध्ये काँग्रेसनं पहिल्यांदाभारत हा बहुभाषिक देश असावा’, असा ठराव केला. ‘भारताची भाषावार प्रांतरचना करण्यात यावी’, असाही ठराव केला. भाषिक देश असावा, या जर्मन-इटालियन राष्ट्रवादाच्या तत्त्वावर आधारित हा ठराव होता.

 

मातृभाषा आणि मातृभूमी हे दोन या राष्ट्रवादाचे घटक होते. गांधींच्या वर्तणुकीमुळं आपल्या देशात, एक भाषा असणारा एक देश हा घटक सोडून देण्यात आला आणिबहुभाषिक देशहे तत्त्व स्वीकारलं गेलं. ‘बहुभाषिक देशहे तत्त्व रवींद्रनाथ टागोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अरविंद घोष यांच्यातही दिसत नाही. त्यांच्यातली ती उणीव आहे, असं मला म्हणायचं नाही. पण हे तत्त्व गांधींच्यात दिसतं, हे प्राधान्यानं सांगायचं आहे. कारण गांधींची भाषा, त्यांचा भाषांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या गोष्टी आपल्या देशाची प्रकृती घडवण्यासाठी पूर्णपणे जबाबदार आहेत.

 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनासमितीची स्थापना झाली. घटनासमितीचं कामकाज सुरू असताना त्यांच्यात भाषेच्या विषयी बरीच चर्चा झाली. देशाची भाषा हिंदी असावी की इंग्रजी, यावरही चर्चा झाली. एकोणिसाव्या शतकातइंग्रजी की पर्शियनहा वादाचा विषय होता. तोइंग्रजी की एखादी भारतीय भाषाअसा बदलला. पण गांधीजींचा प्रभाव त्या काळात असल्यामुळं घटना समितीचं काम पूर्ण होताना राज्यघटनेला भाषेचं परिशिष्ट जोडलं गेलं. त्यात १४ भारतीय भाषांचा समावेश झाला.

 

या भाषा चौदाच का आहेत, यालाअमुक एक संख्येपेक्षा जास्त बोलणारे लोक’, ‘स्वतःची लिपी असणाऱ्या भाषा’, असा कोणताही आधार नाही. पण १४ या आकड्याबाबत अशी समजूत पसरली होती की, गांधी १४ भाषा बोलतात तर देशालाही १४ भाषा असाव्यात. वास्तविक या समजुतीलाही कोणताही पाया नाही. ही केवळ एक मानसिक समजूत आहे. गांधींच्या भाषिक समजुतीचा आपल्या देशावर दूरगामी परिणाम झाला तो असा. गांधींनी राजकारणाला भाषा दिली आणि भाषेलाही राजकारण दिलं.

(शब्दांकनः अभिजीत सोनावणे)