शाओमीचा ‘एमआय ११’ हा नवा स्मार्टफोन गीकबेंचने केलेल्या चाचण्यांमधे अपयशी ठरलाय. याआधीही सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस मालिकेतले काही फोन गीकबेंचने अपयशी ठरवले होते. गीकबेंचच्या या निर्णयामुळे इतर मोबाईल उत्पादक कंपन्यांनी या चाचण्यांचा आता धसकाच घेतलाय.
स्मार्टफोन घेण्यापूर्वी नेटवर त्याचे सगळे फीचर्स तपासणं, इतर फोनसोबत त्याची तुलना करणं आणि आपल्या ओळखीतल्यांच्या अनुभवाचे बोल ऐकणं हे सगळं आता हळूहळू कालबाह्य होत चाललंय. कोणता फोन घ्यायचा आणि कोणता नाही हे सांगणारे असंख्य वीडियो युट्यूबवर सहज मिळून जातात. बहुतांश युट्यूबर आपल्या वीडियोत एखाद्या फोनबद्दल सांगताना त्या फोनचा ‘गीकबेंच’ स्कोअरही आवर्जून सांगत असतात.
फक्त फोनचाच नाही तर कंप्युटर, लॅपटॉपसारख्या गॅजेटचाही गीकबेंच स्कोअर असतो. अॅप्पलसारख्या मोठमोठ्या कंपन्याही आपल्या गॅजेटचा गीकबेंच स्कोअर किती येतो याकडे विशेष लक्ष देऊन असतात. नुकताच शाओमी या लोकप्रिय चीनी कंपनीचा ‘एमआय ११’ हा नवा स्मार्टफोन गीकबेंचच्या तडाख्यात सापडल्याने गीकबेंच पुन्हा एकदा चर्चेत आलंय.
गीकबेंच हे एक बेंचमार्कींग अॅप आहे. एखाद्या गॅजेटच्या वैधतेची चाचणी करण्याच्या प्रक्रियेला बेंचमार्कींग असं म्हणलं जातं. गीकबेंच हे अॅप कंप्युटर, लॅपटॉप, मॅकबुक, स्मार्टफोनसारख्या गॅजेटच्या प्रोसेसर, ग्राफिक्स आणि मेमरीच्या बेंचमार्कींगसाठी वापरलं जातं. ‘गीक पेट्रोल’ ही वेबसाईट चालवणाऱ्या सॉफ्टवेअर डेवलपर जॉन पूल यांनी हे अॅप बनवलंय.
हे अॅप बाजारात येणाऱ्या प्रत्येक नव्या गॅजेटवर वेगवेगळ्या चाचण्या घडवून आणतं. प्रत्येक नवं गॅजेट हे जुन्या गॅजेटपेक्षा उत्तम असल्याचा दावा करत असतं. त्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे फीचर्स असल्याचं ते सांगत असतं. गीकबेंचच्या चाचण्या या दाव्यांची, फीचर्सची वैधता तपासण्यात मदत करतात. अगदी लहानसहान गोष्टींची या चाचण्यांमधे दखल घेतली जात असल्याने गीकबेंच स्कोअर हा गॅजेटविश्वात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
सध्या बाजारात येणारा प्रत्येक स्मार्टफोन हा हेक्झ-कोअर किंवा ऑक्टा-कोअर प्रोसेसर वापरत असल्याचं सांगतो. प्रोसेसर म्हणजे गॅजेटचा मेंदू तर हेक्झ म्हणजे सहा आणि ऑक्टा म्हणजे आठ. याचा अर्थ स्मार्टफोनमधे सहा किंवा आठ प्रोसेसर असतात, असं नाही. तर एक प्रोसेसर हा सहा किंवा आठ भागांमधे विभागला गेलेला असतो, जेणेकरून मल्टीटास्किंग म्हणजेच एकाचवेळी वेगवेगळे अॅप वापरूनही फोनचा परफॉर्मन्स मंदावू नये.
गीकबेंच प्रामुख्याने या प्रोसेसरच्या वैधतेकडे विशेष लक्ष देतं. त्यासाठी फोनमधे वेगवेगळे अॅप घेऊन खरोखर फोनचा प्रोसेसर सांगितल्याप्रमाणे काम करतो की नाही, हे तपासलं जातं. कोणतं अॅप कितीवेळ वापरल्याने प्रोसेसरच्या, मेमरीच्या कामगिरीत फरक पडतो याची काळजीपूर्वक नोंदी घेतल्या जातात. अशा सर्व चाचण्या आणि नोंदीवरून त्या स्मार्टफोनचा किंवा गॅजेटचा गीकबेंच स्कोअर ठरतो.
हेही वाचा: शुद्ध हवेसाठी, हॅशटॅग ‘शुद्ध हवा हक हमारा’ कॅम्पेन
शाओमीच्या ‘एमआय ११’ या नव्याकोऱ्या स्मार्टफोनचं गीकबेंच टेस्टिंग नुकतंच पार पडलं. या टेस्टिंगबद्दल खुद्द गीकबेंचचे निर्माते जॉन पूल यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून माहिती दिलीय. हा फोन गीकबेंचच्या चाचणीत अपयशी ठरल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमधे सांगितलंय. त्यांच्या मते, या फोनचा सिंगल-कोअर परफॉर्मन्स तीस तर मल्टी-कोअर परफॉर्मन्स पंधरा टक्क्यांनी घटला आहे.
गीकबेंचने जेव्हा फोर्टनाईट ही लोकप्रिय गेम या फोनमधे खेळायला सुरवात केली, तेव्हा अचानक प्रोसेसरच्या कामगिरीत कमालीची तफावत दिसून आली. फोनचा वेग वाढवण्याच्या नावाखाली ग्राहकांच्या गेमिंग एक्सपिरियन्समधे बाधा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचं गीकबेंचचं म्हणणं आहे. असाच निकाल सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस२२ या स्मार्टफोनच्या आणि गॅलॅक्सी एस८ या टॅबच्या गीकबेंच टेस्टिंगमधे आला होता. त्यावेळी गीकबेंचने जेन्शीन इम्पॅक्ट या गेमचा वापर केला होता.
त्यावर फोन गरम होऊ नये आणि बॅटरी लाईफ वाढावी असा आमचा प्रयत्न असल्याची सारवासारव सॅमसंगने केली होती. असमाधानी गीकबेंचने सॅमसंग गॅलक्सी एस मालिकेचे बरेच गॅजेट आपल्या लिस्टमधून बेदखल केले होते. त्यानंतर सॅमसंगचे को-सीईओ जोंग-ही हान यांनी या वादाबद्दल माफीही मागितली होती. आता शाओमीनेही तीच चूक केली असून, कंपनीने यावर मौन बाळगण्याचा पर्याय निवडलाय.
आपल्या गॅजेटचा गीकबेंच स्कोअर काय आहे हे आपणही जाणून घेऊ शकतो. त्यासाठी गॅजेटवर गीकबेंचचं अॅप इंस्टॉल करावं लागतं. त्यासाठी आपला स्मार्टफोन हा कमीतकमी अँड्रॉईड ७ वर्जनचा असणं आवश्यक आहे. आयफोन वापरकर्त्यांसाठी कमीतकमी आयओएस १२ वर्जनची गरज आहे.
१००० हा कोणत्याही गॅजेटचा साधारण गीकबेंच स्कोअर आहे. आपलं गॅजेट १००० पेक्षा कितीही जास्त स्कोअर दाखवत असेल, तरी ते उत्तमच आहे. १००० पेक्षा कमी स्कोअर असलेलं गॅजेट अगदीच धोकादायक नसलं तरी ते अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी उपयोगी नाही, हे खरं!
हेही वाचा:
‘संवर्धन राखीव वनक्षेत्र’ सगळ्यांसाठी फायद्याची का ठरतात?
श्यामकांत मोरे: कम्युनिटी किचनच्या जनकाची जन्मशताब्दी
पाऊस तर जगभर पडतो, पण भारतातला मान्सून जगावेगळा आहे!
नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?