घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण

१७ ऑक्टोबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.

आज घटस्थापना. कृषी परंपरेतला हा एक महत्वाचा सण. बाईच्या आणि धरतीच्या सृजनाचा आविष्कार. नवनिर्मितीचा उत्सव. पृथ्वी जशी सृजनशील तशीच बाई! नवनिर्मितीक्षम. घट हे बाईच्या गर्भाशयाचं प्रतीक.

घटस्थापनेपासून नऊ दिवस चालणारा हा लोकोत्सव पाणी जमीन संबंधाचं शास्त्र उलगडून सांगतो आणि रब्बीच्या पेरणीसाठी बीजपरीक्षणही करतो. 

मान्सून परतू लागतो आणि खरीप हंगामातील पिकांचा गर्द हिरवा रंग बदलतो. हिरव्या पिकांना आता पिवळी छटा येऊ लागते. साळीचे पीक लोंबावर आलेले असते. त्याचा घमघमाट सर्वत्र दरवळत असतो. सुगी तोंडावर आलेली असते. आणि अशा सुंदर वेळी हा उत्सव सुरू होतो.

बाईनं लावला शेतीचा शोध

हा उत्सव म्हणजे कष्टकरी, श्रमिकांच्या श्रमातून फुललेल्या सृजनाचा उत्सव. नऊ दिवस घट बसतो. दररोज नव्या फुलांची आणि लोंबांची माळ घटावर चढवून बाईच्या आणि धरतीच्या सृजनाचा सन्मान केला जातो. 

शेतीचा शोध बाईनं लावला आणि बाईचं सृजन अधिकच फुलत गेलं. मातीच्या पोटातून जसं बीज अंकुरतं, तसं आपल्या गर्भातून नवा जीव जन्माला येतो याचं भान तिला आलं. आपलं गर्भाशय हे या महानिर्मिक पृथ्वीचं छोटं रूप आहे, हे ही तिला उमगलं आणि त्याचा उत्सव ती घटाच्या रुपात मांडत गेली.

कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तश्रुंगी, वारजाई, विठलाई, काळूबाई अशा अनेक गणमातांनी ही परंपरा पुढे चालवली.

हेही वाचा : तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई

शेतकऱ्यांच्या श्रमाचा उत्सव

सह्याद्रीच्या दाट झाडीत, जंगलाच्या खोल गर्भात राहणाऱ्या डांगे गवळी धनगर समाजाचा हा सगळ्यात मोठा उत्सव. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळे लोक सजून धजून एका वाड्यावर म्हणजेच धनगर वस्तीवर जमतात. मांड मांडला जातो. रात्रभर गज्जो खेळला जातो. सकाळी पुन्हा गज्जो आणि काला करून उत्सवाची सांगता होते.

धनगर समाजाबरोबर ही परंपरा बहुजन कष्टकरी समाज आजही जपताना दिसतो. तो आपल्या श्रमातून फुललेल्या निर्मितीचा उत्सव साजरा करतो. घरोघरी आणि गाव पांढरीच्या देवळात आज घट बसविला जातो. 

घट म्हणजे वेगळं काही नसतं. कष्टकरी शेतकरी जे जगतो तेच. त्याचं जगणं असं सांस्कृतिक रूप घेऊन प्रकटतं. श्रमातून फुललेल्या सृजनाचं ते प्रतीक असतं.

पाणी वापराचा संदेश देणारा सण

घट बसविताना पळसाची किंवा त्या परिसरात मिळेल त्या पानांची पत्रावळी घेतली जाते. त्यावर मऊ कसदार माती वारूळाची मिळाली तर तिला प्राधान्य अंथरतात. या मातीच्या मधोमध पाण्यानं भरलेला मातीचा घट बसवला जातो. मातीत मका,  हरभरा,  भात,  गहू,  तूर,  मूग असे तृण आणि कडधान्यं पेरली जातात. घटावर आंब्याची डहाळी ठेऊन त्यावर नारळ ठेवला की झाली घटस्थापना!

खरं तर घट या संकल्पनेत पाणी जमीन वापराची एक शास्त्रीय मांडणी आहे. पाण्याचा उत्पादक वापर कसा करावा हे यातून पुढे आणले आहे. एका बाजूला महापूर असताना दुसऱ्या बाजूला अर्धा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. अशावेळी पाण्याच्या उत्पादक वापराचा संदेश घटातून मिळतो.

हेही वाचा : भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

सिंचन पद्धतीचं मूळ घटस्थापनेच्या सणात 

आधुनिक ठिबक सिंचनाचे मूळ या घटात आहे. पिकाला गरजे इतकं पाणी दिलं तर ते तरारून येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे घट.

घटस्थापनेला कोणताही विधी नाही की मंत्रउच्चार नाही. कोणतीही अंधश्रद्धा नाही की कर्मकांड नाही. कष्टकरी श्रमिकांसारखाच साधा सोपा सरळ व्यवहार.

नऊ दिवस घटावर फुलांच्या आणि लोबांच्या माळा चढविल्या जातात आणि दहाव्या दिवशी हा घट शेतात पुरला जातो. त्याच्यापूर्वी घटातून तरारून आलेले कोंब डोक्यावर टोपीत किंवा फेट्यात खोचून पुरुष सीमोल्लंघनाला निघतात. तर बाया केसात कोंब माळतात. 

आपट्याची पानं प्रेम देतात

सीमोल्लंघनानंतर आपट्याची पानं परस्परांना देत गळाभेट घेतात. ‘सोनं घ्या सोन्यासारखं रहा’ असं म्हणत परस्परांना प्रेम वाटतात.

आज धर्म जातीच्या भिंती पुन्हा घट्ट होतायत. माणसं परस्परांच्या विरोधात शत्रू म्हणून उभी राहतायत. अशावेळी कृषी परंपरेतून आलेला,  परस्परांना प्रेम देत जोडणारा बाया आणि मातीच्या सृजनाचा सन्मान करणारा घटाचा हा उत्सव मला महत्वाचा वाटतो.

हेही वाचा :

शिवसेना, भाजप युतीचं नेमकं ठरलंय तरी काय?

माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी

सत्यशोधकीय नियतकालिकेः वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ