गोवा मुक्ती दिन : स्वातंत्र्यवीरांची आठवण करण्याचा दिवस

१९ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा गोव्यातली जनता पारतंत्र्याच्या होती. गोमंतकीय बांधवांना मुक्ती देण्यासाठी भारतातली स्वाभिमानी तरुणाई पुढे सरसावली. अनेक स्वातंत्र्यवीरांनी गोवामुक्तीसाठी हौतात्म पत्करलं. शेवटी १९ डिसेंबर १९६१ ला गोव्याचा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र होऊन भारतात समावेश झाला. आज गोवा मुक्ती संग्रामाला ६० वर्ष पूर्ण होतायंत. त्यानिमित्त आज त्या स्वातंत्र्यवीरांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

भारतातल्या पोर्तुगीज राज्याच्या सशस्त्र दलाचा ‘कमांडर इन चीफ’ जनरल मानुयल आं तोनिया व्हासालु इ सिल्वा यांनी १९ डिसेंबर १९६१ ला रात्री साडेआठ वाजता बिनशर्त शरणागती पत्करली. लेफ्टनंट जनरल के. पी. कँडेच आणि भारतीय सैन्यदल अधिकाऱ्यांच्या आणि सैनिकांच्या शौर्यामुळे पोर्तुगिजांच्या गुलामीत खितपत पडलेल्या गोवा, दमण आणि दीव भागातल्या जनतेला स्वातंत्र्य मिळालं आणि हा भाग भारतात समाविष्ट झाला.

दोनशे वर्षांचा अन्याय

भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या संदेशात म्हटलंय की, ‘विदेशी सत्ता दूर झाल्यामुळे आमच्या भूमीवरचं वसाहतवादाचं हे शेवटचं चिन्ह नष्ट झालं. चौदा वर्षांच्या दीर्घ मुदतीत समस्त भारतीय स्वातंत्र्याची शुभफळं चाखत होते. त्यावेळी आमचे गोमंतकीय बांधव एका विदेशी सत्तेच्या अधीन होते आणि त्यांच्या शासनव्यवस्थेखाली होणारे जुलूम, अपमान सहन करत होते. या गोष्टीचं आम्हाला दुःख होत होतं.’

१९ डिसेंबर हा दिवस गेल्या ६० वर्षांपासून गोव्याचा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. गोवाभर भारतीय सार्वभौमत्व आणि अस्मितेचा मानदंड म्हणून तिरंगा ध्वज फडकवून हा दिवस उत्साहाने साजरा केला जातोI.

१५१० मधे पोर्तुगिजांनी तिसवाडीचा महाल म्हणजे प्रांत जिंकून घेतला. त्यानंतर बार्देश आणि सासष्टीवरती आपली सत्ता प्रस्थापित केली, त्यावेळी या तीन प्रांतांच्या जुन्या काबिजादीत गुलामगिरी  बरोबर धर्मांधतेनं गोमंतकीयांना त्रस्त केलं. जुन्या काबिजादीत साडेतीनशे तर त्यानंतर पोर्तुगीजांनी ताब्यात घेतलेल्या नव्या काबिजादीत दीड-दोनशे वर्षांपर्यंत स्थानिकांना पोर्तुगिजांच्या अन्याय, अत्याचाराला सामोरं जावं लागलं. सत्तरीतल्या कष्टकरी जनतेनं राणे, सरदेसाईंच्या नेतृत्वात २५ पेक्षा जास्त वेळा बंडांची निशाणं उभारून, पोर्तुगीज साम्राज्याला आव्हान दिलं. कुंकळ्ळीतल्या जनतेने स्वधर्म आणि भारतीय संस्कृतीच्या  रक्षणासाठी त्याग केला.

हेही वाचा : प्रभाकर सिनारीः गोव्यात क्रांतीला मुक्तीकडे नेणारा नायक

गोमंतकीय साहित्याचा वाटा

संपादक 'भारत'कार गोविंद पुंडलिक हेगडे-देसाई यांनी आपल्या लेखणीनं पोर्तुगीज सरकारची नाराजी पत्करून स्वतःवर ५० खटले घेतले. त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. त्यांच्या ‘भारत’ या वृत्तपत्राच्या पोर्तुगीज भाषिक पानांसाठी त्यावेळी राष्ट्रीय बाण्याचे मिनेझिस स ब्रागांझा, डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा, तेलू मास्कारेन्हास यांच्यासारखे झुंजार गोमंतकीय लिखाण करत होते.

तेलू मास्कारेन्हास यांच्या ‘देवतांचा मृत्यू’ या भारतामधे पोर्तुगीज आणि मराठी भाषेत प्रसिद्ध झालेल्या लेखासाठी पोर्तुगीज सरकारने खटला दाखल केला. पणजीतल्या न्यायालयाने ‘भारत’कारांना सजा फर्मावली. पण त्यामुळे न डमगमता आपला लढा त्यांनी कायम ठेवला.

मृत्यूचा आनंदाने स्वीकार

पोर्तुगिजांच्या जोखडातून गोव्याला मुक्त करण्यासाठी स्वाभिमानी गोमंतकीयांनी धर्म, भाषा, जात यांची बंधनं झुगारून लढा उभारला. राष्ट्रीय गोवा काँग्रेसच्या नेतृत्वात डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्हा, पीटर अल्वारिस यांच्यासारखी मंडळी गोमंत भूमीवरच्या असीम प्रेमापायी एकत्र आली. महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह चळवळीत सामील होत अनेक जण पोर्तुगिजांच्या झोटिंगशाहीविरुद्ध उभे राहीले.

डॉ. पुंडलिक गायतोंडे, गोपाळ आप्पा कामत, अॅड. पांडुरंग मुळगावकर यांच्यासारखे उच्चविद्याविभूषित  चळवळीत सहभागी झाले. अस्नोड्यात पार नदी आहे. तिच्या उजव्या तीरावर असलेल्या मयेत गावातल्या बाळा राया मापारी गोवामुक्ती संग्रामासाठी पहिला हुतात्मा झाला. त्यानंतर बाळकृष्ण भोसले, कामिल परेरा, सोमा मळीक, बापू गवससारख्या तरुणांनी गोव्यासाठी मृत्यू आनंदाने स्वीकारला.

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण, गोव्यातली जनता पारतंत्र्यानं त्रस्त होती. त्यासाठी भारतातून स्वाभिमानी तरुणाई पुढे आली. बाबुराव केशव थोरात, नित्यानंद सहा, पन्नालाल यादव यासारख्या भारतभरातून आलेल्या स्वातंत्र्यवीरांनी गोवामुक्तीसाठी हौतात्म पत्करलं. डॉ. राम मनोहर लोहियांनी १८ जून १९४६ रोजी क्रांतीची मशाल पेटवली. निद्रिस्त गोमंतकीयांना अंतिम लढ्यासाठी प्रेरित केलं.

गोवा निःसंशय भारताचा भाग

बॅरिस्टर तेलू मास्कारेन्हास यांना लिस्बनच्या सैनिकी न्यायालयानं वयाची साठी गाठलेली असतानाही शिक्षा केली. १९७० पर्यंत काशियशच्या तुरुंगात डांबलं. तुरुंगात जाण्यापूर्वी स्वतःचा बचाव करण्यासाठी न्यायालयात त्यांनी ठणकावून सांगितलं, 'गोवा निःसंशय भौगोलिक, ऐतिहासिक, वांशिक आणि सांस्कृतिक दृष्टीने भारताचा भाग आहे. सालझारने एकाहून अधिकवेळा आपल्या भाषणातून हे मान्य केलंय.'  
'याचमुळे आम्ही गोमंतकीय भारत भूमीला पूज्य मानतो. तिला ‘भारतमाता’ म्हणतो आणि आम्ही ‘जयहिंद’ म्हणून तिला सलाम करतो. ‘जयहिंद’ याचा अर्थ भारताला आणि त्याच्या शांतता, बंधुत्वाच्या कार्याला यश मिळो असा आहे.'

तेलू मास्कारेन्हास यांच्यासारख्या स्वातंत्र्यसेनानींनी गोव्याला भारतभूमीचा अविभाज्य घटक मानलंय. पण मुक्त गोव्यात आजही गोवा हे स्वतंत्र राष्ट्र व्हावं किंवा गोवा पोर्तुगीज साम्राज्याचा भाग आहे, अशा मानसिकतेची व्यक्तिमत्त्वंही आहेत.

हेही वाचा : विष्णू सूर्या वाघः जखमांचे चर्च बांधणारा आनंदभोगी

भारताच्या संस्कृतीची नाळ

अपघाताने गोवा पोर्तुगालच्या वसाहतीचा भाग बनला. पण, आजही भाषिक, धार्मिक आणि सामाजिकददृष्ट्या इथल्या लोकमानसाची नाळ भारतीय माती आणि संस्कृतीशी अतूट आहे. पश्चिम किनारपट्टीवर वसलेला गोवा शेकडो वर्षांपासून नानाविध जाती, धर्माच्या, विविधांगी संस्कृतीच्या प्रवाहांना सामोरा गेलाय. त्यामुळे गोव्याला आगळावेगळा चेहरा मिळाला. तिथल्या भूमीचं सौंदर्य विलोभनीय ठरलं. असं असलं तरी इथल्या सर्वसामान्यांचं हृदय मात्र भारताशी कायम जोडलेलं राहिलं.

गोवा मुक्ती दिनामुळे भारताशी असलेलं नातं पुन्हा एकदा जुळलं. शतकानंतर आलेल्या दिवशी गोवा भारताचा अविभाज्य भाग आहे. आज मुक्तीदिन अभिमानाने साजरा करताना राष्ट्रीय बाणा आणि भारतीय संस्कृतीशी घट्ट जोडण्याची नितांत आवश्यकता आहे. 

गोवामुक्ती दिनाची आठवण आमच्यासाठी कायम मंगलमय स्फूर्तिदायी व्हावी. यासाठी मुक्तिसंग्रामात झुंजारपणे मरणाची तमा न बाळगता सहभागी झालेल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

विकास साध्य केला का?

यंदा जगच कोरोना साथीच्या संकटात आहे. गोवामुक्ती दिनाच्या वर्धापन दिनाचं आगमन झालंय. १९६१ नंतर दमण आणि दीव यांच्यासह केंद्रशासित प्रदेश म्हणून आणि नंतर  १९८७ला गोवा राज्याची निर्मिती झाल्यापासून १९ डिसेंबर २०२० पर्यंत गोव्याने प्रगतीचे वेगवेगळे टप्पे गाठले. समजून घ्यायची गरज आहे. रस्त्यांचं जाळं, विजेची, पिण्याच्या पाण्याची, दूरसंचार सुविधांची सोय गावोगावी पोचली. आपण विकास साध्य केला का? याविषयी चिंतन, मनन होणं गरजेचंय.

जंगल, जलस्रोत आणि जैविक संपत्ती यांचे हाल करून जीवन सुखी होणार का? उष्णकटिबंध प्रदेशातला स्वर्ग असा लौकिक मिरवणारं आपलं राज्य मद्यपान, अमली पदार्थ, गुन्हेगारी यांच्या ताणाखाली संकटग्रस्त झालाय. शेती, बागायती, पशुपालन, पारंपरिक उद्योगधंदे, पर्यावरणीय पर्यटन आपल्याला अपेक्षित शाश्वत विकास करण्यासाठी मदत करेल का? यावर गोव्याचं वर्तमान आणि भविष्य अवलंबून असेल.

हेही वाचा : 

मनोहर पर्रीकरः शून्यातून विश्व उभं करणारा नेता

गोव्याला जाण्याआधी निवडा आपल्या आवडीचा बीच

गोमंतकीय साहित्याचा ओला दुष्काळ आता दूर करायला हवा!

रेडीचा गणपतीः महाराष्ट्रातल्या एकमेव द्विभुज गणेशाचा 'स्वयंभू' महिमा

(साभार दैनिक पुढारी)