ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेणाऱ्या शिक्षकांना ‘नितळी’च म्हणायला हवं

०५ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


पावसाळ्यातलं गढूळ पाणी नितळ करण्याचं काम नितळी हा किडा करत असतो. सध्या कोविड १९ मुळे आपल्या आजूबाजूचं वातावरणंही गढूळ झालंय. अशात उद्याची चांगली पिढी घडवण्यासाठी नांदेडच्या सरकारी शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षणाचा ध्यास घेतलाय. आपल्या मर्यादेच्या बाहेर जाऊन हे शिक्षक मुलांना शिक्षण मिळावं यासाठी झटतायत. आज शिक्षक दिनानिम्मित्त या शिक्षकांची धडपड समजून घ्यायलाच हवी!

संपूर्ण जग कोरोना साथरोगाने ग्रस्त झालंय. जगभर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेय. कोविड १९ आजारापासून बचाव होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातायत. यात जनसंपर्क टाळता यावा यासाठी लॉकडाऊन हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. भारतात मार्चपासून देशभर लॉकडाऊन करण्यात आला. देशातले कारखाने, उद्योग, रेल्वे, बसेस या आणि अशा कित्येक सेवा बंद करण्यात आल्या. उत्पादन क्षेत्राबरोबरच सेवाक्षेत्र, ज्यात प्रामुख्याने शिक्षणाचाही अंतर्भाव होतो, तेही बंद करावे लागले.

आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येतंय. नागरिकांना शारीरिक अंतर ठेवायला सांगितलंय. अशा निर्देशांचं पालन करण्याची अट घालूनच शासनाने देशाचं अर्थचक्र पुन्हा सुरू केलं. पण देशातलं सर्वात महत्त्वाचं संसाधन म्हणजेच प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणारं शिक्षण क्षेत्र मात्र सुरू करता आलं नाही.

शिक्षण क्षेत्र सुरू न करू शकणारी कारणंही तशीच असहाय्य होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी संख्या इतकी जास्त आहे की शारीरिक अंतर ठेवणं अशक्य होतं. स्वच्छतेबाबतीतले नियम लहान मुलांकडून पाळले जात नाहीत. शिवाय लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे पालकही आपल्या मुलाला शाळेत पाठवायला तयार नाहीत. त्यामुळे सुरवातीच्या काळात शाळा आणि पर्यायाने शिक्षण बंद ठेवावं लागलं. विनापरीक्षा विद्यार्थांना पुढच्या वर्गात नेण्याचं ठरवलं. यातच नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली.

हेही वाचा : १ रूपयांची शिक्षा नेमकी कशी ठरली?

ऑफलाईन मुलांच्या अभ्यासाचं काय?

शाळा बंद झाल्या तरी शिक्षण बंद ठेवणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत कायम ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने ‘शाळा बंद पण अभ्यास सुरू’ अशी मोहीम आखली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून शिकवण्यात यावं यासाठी परिपत्रकं, मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या.

यासाठी ऑनलाईन शिक्षणाचं नियोजन सुरू झालं. पण हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी साधनांची पुरेशी उपलब्धता नसल्याचं दिसतंय. ॲक्टिव टीचर्स फोरम म्हणजेच एटीएफच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणातून राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या ३७ टक्के पालकांकडे स्मार्टफोन असून यातल्या अवघ्या २० टक्के पालकांच्या स्मार्टफोनला इंटरनेट सुविधा असल्याचं समोर आलं.

जिल्हा परिषदेसह विविध व्यवस्थापनांच्या एकूण ११८६ शाळांमधल्या शिक्षकांच्या माध्यमातून एक लाख ६७ हजार ६८७ मुलांविषयीची माहिती अभ्यासण्यात आली. यापैकी ४५ टक्के पालकांकडे स्मार्टफोन असले तरी केवळ २७ टक्के पालकांकडे इंटरनेटची जोडणी आहे. त्यामुळे इंटरनेट सुविधा नसलेल्या ‘ऑफलाइन’ मुलांच्या अभ्यासाचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

शहरी मुलांसारखं इंग्रजी शिक्षण हवं

या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून नांदेड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्ह्यातल्या शिक्षकांना ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ ठेवण्यासाठी प्रेरित केलं. याचाच परिपाक म्हणून संपूर्ण नांदेडमधल्या जिल्हा परिषदेच्या आणि काही ठिकाणी खासगी शाळांमधल्या शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर सुरू केला.

यातही नवोपक्रमाची जननी असलेलं वाजेगाव बीट हे गाव आपल्या विशेष प्रयत्नांनी वेगळा ठसा उमटवताना दिसतंय. १ मेला महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचं राज्यातलं पहिलं वेबिनार झालं. त्यानंतर वाजेगाव बीटचे शिक्षणाविषयी आस्था बाळगणारे संवेदनशील अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी ४ मेला बीटमधल्या सगळ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांची वेबिनार बैठक घेतली. शिक्षकांच्या मनातल्या कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षाही आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याशिवाय कुणीच नाही ही भावना अधिक बळकट केली. 

आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही शहरी, इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मिळत असणारं ऑनलाईन शिक्षण मिळावं यासाठी मुख्याध्यापकांची प्रत्यक्ष बैठक घेतली. ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यावं यासाठीचं प्रशिक्षण वजा मार्गदर्शन या बैठकीत शारीरिक अंतर ठेऊन देण्यात आलं. यात केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी मोलाची भूमिका बजावली.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोना पॉझिटिव आलो तरी आम्ही घरीच राहिलो, कारण

कोरोनाच्या काळात जन्मलेल्या मुलाला काय म्हणायचं बरं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाची लागण झालेल्याच्या संपर्कात आल्यावर काय करायचं?

एडवर्ड जेन्नरः देवी संपवणाऱ्या या देवमाणसाने लसीकरण शोधलंय

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

सकारात्मक स्पर्धेचं वातावरण

यातून प्रेरणा घेऊन बीटमधले सगळेच शिक्षक झपाट्याने कामाला लागले. सुट्टीच्या दिवसांतही वाजेगाव बीटमधे लर्निंग फ्रॉम होम सुरू झालं. ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारं टेस्ट, वीडियो, पीडीएफ, डिजिटल शैक्षणिक साहित्य, ब्लॉग, यूट्यूब चॅनल यांची निर्मिती करण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक बालाजी गाढे यांनी शिक्षण अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या सूचनेनुसार तंत्रस्नेही शिक्षकांचा वॉट्सऍप ग्रुप तयार केला.

या तंत्रस्नेही शिक्षकांचंही व्यंकटेश चौधरी यांनी वेबिनार घेतलं. बीटचा ब्लॉग आणि युट्युब चॅनल तयार करण्यात आलं. केंद्रातल्या इतर ज्येष्ठ शिक्षकांनीही त्यांचा आदर्श घेत शिक्षण क्षेत्रातल्या या मूलभूत बदलाशी जुळवून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. बेबिसरोजा परबत, शोभा बकवाड या ज्येष्ठ शिक्षिकांनीही ऑनलाईन टेस्ट तयार करण्याचे कौशल्य आत्मसात केलं.

यानंतर तर बीटमधे जणू काही सकारात्मक स्पर्धेचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येक जण आपापल्या परीने विद्यार्थी शिक्षणासाठी नवनवीन संकल्पना, तंत्रज्ञानाचा वापर करू लागला. सीमा देवरे, रूपाली गोजवडकर, युसुफ पठाण, मुदस्सर अहेमद, गणेश कहाळेकर, रूपाली पांपटवार, रामेश्वर आळंदे, तृप्ती आटीपामलू, संगमनाथ पांचाळ, रूपेश गाडेवाड, अश्विनी गोडीगवार, अरुणा कलेपवार, श्रीराम मोगले, मेघा पोलावार, प्रणिता अकोशे, राजू राठोड, सपना शिंदे, जगजितसिंह ठाकूर, सारंग स्वामी, मीना केंद्रे, सादीया अंजुम, गणपत मुंडकर, धम्मदिना सोनकांबळे, साधना बेंद्रे,अक्षय ढोके इत्यादी शिक्षकांनी अगदी सक्रिय सहभाग घेतला.

वेगवेगळ्या ऑनलाईन टेस्ट, शैक्षणिक वीडियो, फ्लीपबूक, घटकनिहाय कार्टून स्वरूपातील रंजक वीडियो, कोण ठरणार बुद्धिमान? यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण नेण्याचं कार्य अविरत सुरू ठेवलं. बीटच्या तंत्रस्नेही ग्रुपवरील संप्रेषण, मार्गदर्शन आणि विचारमंथन यातून नव्या जोमाने सर्वांनी नवी कौशल्यं आत्मसात केली.

पालकांचाही भरपूर प्रतिसाद 

बीटमधल्या सगळ्या शिक्षकांनी वर्गनिहाय विद्यार्थ्यांच्या पालकांचे वॉटसअँप ग्रुप तयार केले. त्यावर रोजचा अभ्यास देण्याचं नियोजन केलं. तसं मासिक नियोजनच त्यांनी मुख्याध्यापकांना सादर केलं. वेगवेगळ्या ॲपचा वापर करून आपल्या पाल्यांना कसं शिक्षण देता येईल, याची माहिती शिक्षक पालकांना देत आहेत. यातून विद्यार्थ्यांना खूप फायदा होतोय.

कविता, पाठ्यघटक, अभ्यासक्रम समजून घेणं यानं सोपं झालंय. वाजेगाव बीटमधे सर्वांच्या संघटित प्रयत्नांनी ऑनलाईन शिक्षण अगदी प्रभावीपणे राबवण्यात येतंय. सोबतच शासन स्तरावरच्या टीवीवरील टीलिमिलीसारख्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती प्रत्येक पालकांपर्यंत शिक्षक पोचवत आहेत. विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतील याची काळजी घेतली जातेय. पालकांचाही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहेत. डायटचे प्राचार्य मा. डॉ. जयश्री आठवले यांनीही याची नोंद घेतलीय.

तरीही ऑनलाईन शिक्षणाची मर्यादा आणि ग्रामीण पालकांचं स्मार्टफोन विकत घेणं, त्याला नेटचे रिचार्ज करणं यातील अर्थिक असमर्थता लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नव्हतं. अशांसाठीही वाजेगाव बीटमधील शिक्षकांनी निराळी वाट चोखाळली. ऑनलाईन शिक्षणाची मात्रा कामाला येत नाही तिथे तर हे ठिकाणी येथील शिक्षक स्वतः विद्यार्थ्यांच्या घरोघरी जातात.

अनेक विद्यार्थ्यांची घरं तर शेतात, मळ्यात आहेत. तरीही लक्ष्मी गायकवाड, संगीता कदम, शोभा माळवतकर, बालाजी कपाळे, गंगाधर हणमंते, सायलू मंकोड, वैजयंता पाठक, लता शिवाजी, रामराव देशमुख, विश्वनाथ व्होळगे, भारत देशमुख, अजित कदम, विजय गादेवार, दत्तप्रसाद पांडागळे, बाबुराव सूर्यवंशी हे शिक्षक तिथे जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यास देतात, तो तपासतात. 

हेही वाचा : सत्य शोधणारी पॉलिग्राफ टेस्ट स्वतः खरं बोलते?

नितळीच्या भूमिकेतले शिक्षण

लॉकडाउनच्या या अडचणीच्या काळातही संधी शोधणारे पदोन्नत मुख्याध्यापक सटवाजी माचनवार, तुकाराम जाधव तसेच केंद्रातील विद्यार्थी समर्पित मुख्याध्यापक बशीर पठाण यांनी या काळात शाळेचं रुपडंच पालटलंय. शाळा दुरुस्ती, रंगरंगोटी, वृक्षारोपण, शालेय परिसर स्वच्छता यासारखी कामे करून संधीचे सोने केले. बशीर पठाण तर अगदी दिवसरात्र शाळेतच आहेत. गावातल्या तरुण सुशिक्षित मुलांकडून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी ते प्रयत्न करतायत. त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन ही युवक मंडळी करत आहेत. उन्हाळी सुट्टीतही गावकऱ्यांनी शाळेतली बाग हिरवीजर्द ठेवलीय.

एकंदर शाळा नाही पण शिक्षण आहे ही संकल्पना खऱ्या अर्थाने शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे पवित्र कार्य वाजेगाव बीटमधे होताना दिसत आहे.  शिक्षणाधिकारी मा. प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी मा. डॉ. दत्तात्रय मठपती, मा. बंडू आमदूरकर, गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे हेदेखील बीटमधे सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीची वेळोवेळी नोंद घेऊन खूप प्रोत्साहन देत आहेत. मा. शिक्षणाधिकारी यांनी वाजेगाव विभागातील कोरोना काळातील शिक्षकांची धडपड मा. शिक्षण आयुक्तांपर्यंत पोचवली आहे.

पालक वर्गही शिक्षकांच्या या प्रयत्नांवर समाधान व्यक्त करतायत. आमची प्रेरणा शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांचा सतत पाठपुरावा, संवाद, नव्या संकल्पना, हरेक धडपडीला सातत्याने कौतुकानं नोंद घेणं हा या साऱ्या प्रयत्नांचा जणू आत्माच आहे. हे शिक्षक करतायत ते शंभर टक्के बरोबरच आहे किंवा त्यातून शंभर टक्के मुलांचं शिक्षण पूर्ण होतंय हे कदाचित सांगता यायचं नाही. मात्र ते शंभर टक्के प्रामाणिक प्रयत्न करतायत. शिवाय, पावसाळातल्या गढूळ पाणी नितळ करणाऱ्या नितळी किड्यासारखं त्यांचं काम मोलाचं, समाधान देणारं आहे, हे नक्की!

हेही वाचा : 

फेसबुक झालंय 'बुक्ड'!

लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम

पत्रकार पांडुरंग रायकरचा बळी का गेला, हे आपण समजून घ्यायला हवं

पुरूषी वर्चस्व टिकवण्यासाठीच वापरलं जातं बायकांवरच्या विनोदाचं हत्यार

कण्टेम्प्ट ऑफ कोर्टचा कमीत कमी वापर करतात जगभरातल्या न्यायव्यवस्था