यवतमाळच्या आदिवासी पाड्यांवर गाजतोय समुहशेतीचा शिराटोकी पॅटर्न

०५ जून २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. इथंच शिराटोकी नावाचं एक गाव आहे. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची असं इथल्या गावकऱ्यांनी ठरवलं. त्यातून अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय.

खेडूतांना त्यांच्या राहणीमानावरून, भाषेवरून तसंच त्यांची व्यावहारिक समज अशा गोष्टींच्या आधारे कमी लेखणारी शहरी जनता कायमच अवतीभोवती दिसते. त्यात जर हे खेडूत आदिवासी असतील तर मग विचारुच नका. यांना ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, प्रगती, जागतिक स्पर्धा यातलं काही कळतच नाही, असा सार्वत्रिक सूर ऐकायला मिळतो. या गोष्टी किती धादांत खोट्या आहेत याची प्रचिती घ्यायची असेल तर एकदा यवतमाळ जिल्ह्यात या.

विस्तारानं मोठ्या असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येते. मारेगाव, घाटंजी, राळेगाव, कळंब, आर्णी आणि झरीजामणी अशा तालुक्यांमधे आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातही आंध्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या झरीजामणी या आदिवासीबहुल तालुक्यात कोलाम ही आदिम जमात मोठ्या प्रमाणावर आहे. हे लोकं स्वभावानं अगदी गरीब आणि तितकेच प्रामाणिक म्हणून सर्वदूर परिचित आहेत.

छोट्या छोट्या कोलामांच्या वस्त्या म्हणजेच पोड तुम्हाला सगळीकडे दिसतील. ही कोलाम पोडं विकासापासून कोसो दूर आहेत. आता कुठं समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करतायत. मुलं शिक्षणासाठी पुढं यायला लागलीत. हळूहळू बदल घडून येईल. आदिवासी विकास विभाग, जिल्हा प्रशासन, राजकीय नेतृत्व, सामाजिक संस्था आणि आपण सगळे नागरिक यांनी संयुक्तपणे काम केलं तर नक्कीच हा समाज अनेक पातळ्यांवर आपली छाप सोडल्याशिवाय राहणार नाही.

गावबांधणी करणारं शिराटोकी

आता या कोलामांच्या एका धाडसी निर्णयाची तोंडओळख करुन द्यावी म्हणतो. पांढरकवडा ते झरीजामणी रस्त्यावर असंच एक कोलामपोड आहे. त्याला महसुली गावाचा दर्जा नाही. ग्रा. पं. चिखलडोहमधलं शिराटोकी नावाचं हे कोलामपोड येत्या काही वर्षांत महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवर नावलौकीक कमावेल आणि चर्चेत येईल याची मला खात्री आहे.

६८ कोलाम कुटुंबाचं हे पोड. २९८ लोक इथं वास्तव्य करतात. जंगलाला लागून असणाऱ्या पोडावर सगळेच शेती किंवा शेतमजुरी करुन कसातरी आपला उदरनिर्वाह करतायंत. आयुष्यात नवीन असं काही नाही. आदिवासी पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या पोडावर पारंपरिक कोलामी पद्धतीनं सगळे सण उत्सव साजरे करताना ही उत्साही मंडळी आनंदानं जगताना दिसतात.

त्यांचे चेहरे हसरे, प्रफुल्लित करणारे आणि आशावादी आहेत हे कोणालाही कळावं. परंपरेनं चालत आलेली गावबांधणीची प्रथा त्यांनी याही वर्षी पार पाडलीय. गावात पावसाळ्याच्या काळात रोगराई पसरु नये म्हणून चैत्र महिना लागला की ग्रामदेवतांना गावाची जबाबदारी देऊन गावांच्या चारही दिशांना आखणी करुन गावबांधणी केली जाते.

रोगराई गावाबाहेर राहावी म्हणून ग्रामदेवतांना चारही दिशा वाटून दिल्या जातात. एवढं करुन गावात रोगराई आलीच तर गावाच्या मध्यभागी वास्तव्याला असणाऱ्या गाभुडी मातेला साकडं घातलं जातं. प्रथा परंपरेवरून ही लोक भाबडी वाटणाऱ्यांना चकीत करुन सोडावं असा एक धाडसी निर्णय या बांधवांनी घेतलाय.

स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार

गावात ६८ कुटुंब आहेत, त्यापैकी ४० कुटुंब एकत्र आलेत. जिथं भावाभावांचं, मुलाचं आणि बापाचं जमिनीसाठी भांडण होताना आपण सगळीकडेच बघतो तिथं या अशिक्षित, अज्ञानी वाटणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन सामुदायिक शेती करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्यात हा विचार पेरण्याचं आणि धाडस निर्माण करण्याचं काम ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, जळका, ता. मारेगाव या स्वयंसेवी संस्थेनं केलंय.

आजही मोठ्या जिद्दीनं ही संस्था या बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. ही व्यवस्था उभी करण्यासाठी या संस्थेचे डॉ. किशोर मोघे, श्रीकांत लोडम आणि त्यांची टीम अगदी नियोजनबद्धपणे काम करतेय. वेगवेगळे एनजीओ, प्रशासन, जनता वगैरेंचा या लोकांना काय फायदा होईल यासाठी हे लोक अहोरात्र झटतायत. विचार करतायत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मिशन समृद्धी या चेन्नईच्या संस्थेच्या मदतीनं लोकांची क्षमताबांधणी करण्याचं काम ही मंडळी करतायत.

मिशन समृद्धीचे रामचंद्र पप्पू आणि ज्यांची ही संकल्पना आहे असे राघवनजी गावभेटी देऊन सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करताना दिसतायत. सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी वी. गिरीराज या मिशनचे सल्लागार म्हणून काम पाहतायत. त्यांचा जलसंधारण, रोजगार निर्मिती, जलसाक्षरता या विषयात गाढा अभ्यास आणि अनुभव आहे. त्याचा निश्चितच या पोडावरच्या बांधवांना फायदा होणार आहेच.

हेही वाचा: दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाचा ऑन द स्पॉट रिपोर्ट : भाग १

स्वाभिमानी शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता

कोरोनाच्या अगोदर हा विचार पोडावर अंकुरला. कामाला सुरवात व्हायची तर कोरोनामुळे सगळं जग जागेवरच थांबल्यानं हा विचार करपून जातो की काय याची गावकऱ्यांना भिती वाटत होती. पण विचार अस्सल मातीतला. तो काय करपतो? कोरोना गेला आणि हा विचार मातीतून डोकं काढून परत हळूच अंकुरायला लागला. मग सुरू झालं विचारमंथन, बैठका, नियोजन आणि ठरलं की गावानं स्वयंपूर्ण व्हायचं. निसर्गाच्या जवळ नेणारी नैसर्गिक शेती करायची.

बियाणं जमवायला सुरवात झाली. मशागतीची लगबग सुरू झाली. सामुहिक प्रयत्न सुरू झाले. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. चार महिन्याच्या कालावधीत गावानं किती काम करावं? तर, २३२ एकर सामुदायिक शेतीसाठी ७ शेततळी, ४ विहिरी, १५ रिचार्ज पिट, २ शेतरस्ते आणि संपूर्ण २३२ एकर शेतीची बांधबंदिस्ती, अशी सगळी कामं संपलीत. यासाठी पैसा हवा होता. अनेक गोष्टींचा विचार झाला. पैसा उभा होत नव्हता. मिशन समृद्धीनं हात दिला.

पण लागलेला हा सगळा खर्च आम्ही उत्पन्नातून तुम्हाला परत करू असं स्वाभिमानी बांधवांनी मिशन समृद्धीला सांगितलं आणि मोठ्ठं काम उभं झालं. लोकांनी घनजीवामृत, दशपर्णी, जीवामृत, सेंद्रिय खत, गांडूळ खत, पळसफूल संजीवक, मोहफुल संजीवक या सर्व निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आणि या पावसाळ्यासाठी शेतीला लागणारे हे सगळे घटक तयार करुन ठेवले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशील प्रयत्नांनी गावात लगेच मानव विकास मिशनमधून ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर आणि त्यावर चालणारी सर्व यंत्रं गावाला मिळाली. ट्रॅक्टर चालकाचं प्रशिक्षण एका युवकानं पूर्ण केलं. जे जे हवं ते गावात तयार करता यावं, गावकऱ्यांनीच ते करावं, कोणावर विसंबून राहण्याची गरज पडू नये हा विचार या बांधवांचा आहे. यांच्या खोल मनात रुजलेला आणि भिनलेला गांधी मला प्रत्येक चेहऱ्यात दिसला. गावाला समृद्ध करणाच्या या व्रतामधे प्रत्येकजण आपापल्या परीनं झटताना दिसून येतोय.

गांधींच्या स्वप्नातला गाव

बऱ्याच दिवसांपासून मला यांच्या धाडसाला सलाम करायला जायचं होतं. यांच्यातली निसर्गसमज माझ्यात थोडी तरी उतरावी म्हणून यांच्या सहवासात थोडा वेळ घालवायचा होता. मग काय आज सकाळी किशोरभाऊ, श्रीकांत आणि टीम आम्ही सगळे आठ वाजता पोडावर पोचलो. तर लोक शेतात वखरणी करत होते आणि बाया काडीकचरा वेचत होत्या. हसतच सगळ्यांनी स्वागत केलं. एखादा तास गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं. वखर चालवायचा अयशस्वी प्रयत्न केला.

एका सरळ तासानं म्हणजेच रांगेत वखर चालवायला पुस्तकी डिग्री कामी येत नाही, तर मातीत काम करण्याचा सराव लागतो हा धडा शिकता आला. कामानंतर सगळ्यांशी गप्पा झाल्या. खास कोलामी लोकनृत्यावर सगळ्यांनी फेर धरला. केलेली कामं बघितली. पोडावर भेट दिली. पोडावर पाचवीपर्यंत शाळा आहे. ३२ पटसंख्या आहे. एका घरी पाणी आणि काळा चहा घेतला आणि परतीला निघालो.

निघताना विचार करत होतो की यांनी गावबांधणी केली. शेताची बांधबंदिस्ती केली. भविष्याची चिंता न करता आपला वर्तमान दिलखुलासपणे जगणाऱ्या या खेडूतांमधे एवढी समज कुठून येत असेल? निसर्गाच्या विद्यापीठातलं हे शाश्वत ज्ञान विकासाच्या मागं धावणारे, सिमेंटच्या जंगलात अडकलेले आपण शहरी लोक विसरत चाललोय. म्हणूनच थोडं आत्मचिंतन करण्यासाठी या गावी आता परत परत जाईलच.

शिराटोकी नावाची जगात दोनच गावं आहेत. एक जपानमधे आणि एक झरीजामणीमधे असं कोणीतरी सांगितलं. हे गाव स्वतःच्या प्रयत्नांमधून जगाच्या नकाशावर येईलच यात शंका नाही. पण यांच्या धाडसाला आपल्या मदतीची गरज आहे. शिराटोकीला या. लोकांसोबत श्रमदान करुन त्यांचा उत्साह वाढवा आणि काही मदत करण्याची इच्छा असेल तर डॉ. किशोर मोघे -७०२०८०८८३०, ९४२२८६८९४९, श्रीकांत लोडम - ९६८९५९९६७८ यांना संपर्क करा. गांधींच्या स्वप्नातला गाव साकारत असताना बघणं ही मोठी अनोखी अनुभूती असणार आहे.

हेही वाचा: 

आम्ही हिंदूही आणि मुसलमानही!

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

नलिनी पंडितः दलित, बहुजनांच्या वकील

जैतुनबींच्या निमित्ताने महाराष्ट्राचं व्यापक तत्त्वज्ञान भारतभर पोचलं असतं पण?

(लेखक यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी आहेत. त्यांच्या ब्लॉगवरून साभार.)