ऑन ड्युटी ठाण्यात बसून पांडेजी नेमकी कुणाची शिट्टी वाजवतायत?

२० ऑगस्ट २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची तपासणी सीबीआयकडे देण्याची मागणी पूर्ण झालीय. बिहारचे डिजीपी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ही मागणी धरून लावली होती. हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी २००९मधे त्यांनी वीआरएसही घेतली होती. बिहारमधल्या या लोकप्रिय पोलिस अधिकाऱ्याकडे पाहून सलमान खानच्या चुलबूल पांडेचीच आठवण येते.

१८ सप्टेंबर २०१२ ची गोष्ट. बिहारमधल्या मुजफ्फरपूरमधे राहणाऱ्या अतुल्य चक्रवर्ती यांची १२ वर्षांची मुलगी नवरूणा घरातून अचानक गायब झाली. हाताला मेहंदी लावल्यामुळे त्या दिवशी रात्री आई बाबांपासून लांब दुसऱ्या खोलीत ती झोपली होती. तेव्हा अपहरणकर्ते खिडक्या तोडून तिला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी केस नोंदवली गेली. पोलिसांचा तपास सुरू झाला. नोव्हेंबरच्या शेवटी कधी नव्हे ते चक्रवर्तींच्या घराजवळचं गटार साफ करण्यासाठी म्युन्सिपाल्टी मागे लागली. त्या गटारात एक हाडांचा सापळा सापडला. त्या सापळ्याचा डिएनए अतुल्य चक्रवर्तींशी मॅच करत होता. ती नवरूणाच असल्याची खात्री पटली.

जमीन माफियांनी जमीन आणि घराच्या वादातून मुलीचं अपहरण केलंय, असं नवरूणाच्या वडीलांचं म्हणणं आहे. या जमीन माफियांशी त्यावेळचे मुजफ्फरपूरचे इन्सपेक्टर जनरल गुप्तेश्वर पांडे यांचे चांगले संबंध होते. थोडक्यात नवरूणाच्या अपहरणात गुप्तेश्वर पांडे यांचा हात असल्याचा आरोप अतुल्य चक्रवर्ती यांनी केला. हे गुप्तेश्वर कुमार आत्ता बिहारचे डिजीपी म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरण सीबीआयकडे सुपूर्त करण्यात यावं यासाठी त्यांनी जोरदार मागणी केली होती.

हेही वाचा : अर्णब सोनिया गांधींवर टीका करत होते, तेव्हा माझं काळीज रडत होतं

प्रभाव पाडणारी डायलॉगबाजी

हे गुप्तेश्वर पांडे म्हणजे फारच भन्नाट प्रकरण मानलं जातं. जवळपास सगळा भारत त्यांना दबंग सिनेमातल्या चुलबूल पांडेची उपमा देतो. या सिमेमातल्या ‘पांडेजी सिटी’ गाण्यातले बोल ‘करते है कहते है जो मर्जी; सुनते नही है किसकी अर्जी’ त्यांना खरोखरच लागू होतात. चुलबूलप्रमाणेच त्यांच्या बोलण्यात नेहमी शेर-शायरी, डायलॉगबाजी असते. आत्ताही संजय राऊत यांनी सामनामधून केलेल्या टिपण्णीला उत्तर म्हणून त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक शेयर टाकला होता. इर्शाद,

सफ़र में मुश्किलें आएँ, तो जुर्रत और बढ़ती है!
अगर रास्ता कोई रोके, तो हिम्मत और बढ़ती है!!
अगर दुश्मन समझ कर, मुझको कोई गाली देता है!
सच कहूँ उससे मुहब्बत और बढ़ती है!!

वाह पांडेजी! त्यांचं भाषण एकदम धडाकेबाज असतं. सुशांतचे मारेकरी पाताळात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू हा डायलॉग ते आजकाल नेहमी मारतात. विकास दुबे वाघ असेल तर तो एकदा सापडू देत मग वाघाची शिकार कशी केली जाते, हे मी त्याला दाखवतो हाही त्यांचा एक गाजलेला डायलॉग. अशा डायलॉगबाजीमुळे कुणाच्याही मनावर चटकन त्यांचा प्रभाव पडतो.

लोकप्रेमी पोलिस असावा तर असाच!

पाटणा युनिवर्सिटीतून त्यांनी संस्कृत विषयात पदवी घेतली. त्यानंतर १९८७ मधे त्यांनी  संस्कृतमधूनच युपीएससीची परीक्षा दिली आणि लगेचच बिहार कॅडरमधे त्यांची नेमणूक झाली. गेली ३१ वर्ष ते पोलिस सेवेत कार्यरत आहेत. या वर्षांत त्यांनी २६ जिल्ह्यांमधे एएसपी, एसपी, आजी, एडीजी अशी अनेक पदांवर काम केलं. 

२०१२ ला मुजफ्फरपूरमधे इन्सपेक्टर म्हणून ते काम करत होते तेव्हा पोलिस आणि लोकांच्यातला सलोखा वाढवण्यासाठी त्यांनी एक कॅम्पेन चालू केलं होतं. पोलिसांना नागरिकांची साथ मिळाली तरच आपण गुन्हेगारांना आळा घालू शकतो हे ते वारंवार सांगत असतात.

नोव्हेंबर २०१५ मधे बिहार सरकारने दारूबंदी केली. तेव्हा गुप्तेश्वर पांडे स्वतः सगळ्या राज्यभर फिरले होते. दारूबंदीच्या कॅम्पेनला पाठिंबा देत होते. बिहारमधल्या जवळपास सगळ्याच स्त्रियांचा या कॅम्पेनमुळे त्यांना पाठिंबा मिळाला. लोकप्रेमी किंवा पीपल फ्रेण्डली पोलिस म्हणून ते ओळखले जातात. ते लोकांना मदत करतात, गरीबांना न्याय मिळवून देतात, त्यांची विचारपूस करतात आणि आपल्या हाताखाली काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनाही लोकांना मदत करायची शिकवण देतात असं त्यांचे फॅन्स खूप कौतूकाने सांगतात. २०१९ ला नितिश कुमार सरकारने बिहारचे डीजीपी म्हणून त्यांची निवड केली.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कुछ वायरस अच्छे होते है!

हात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर?

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

सुपर स्प्रेडर म्हणजे काय? ते मुद्दाम कोरोना पसरवतात का?

कोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे?

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

आदिवासी बाईच्या हातची भाकरी

त्याच्या कामाची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला ते अचानक फोन करतात आणि त्याच्या घरच्यांची चौकशी करतात. त्याला चांगलं काम करायला हुरूप देतात. मागे तर एका लहान मुलाच्या हत्येचा शोध घ्यायला ते स्वतः नदीत उतरले होते. गुन्हा कसा घडला असेल याचा अंदाज संपूर्ण नदीत उतरून ते लावत होते. त्या मुलाचे आई वडील, लहान बहीण यांच्यासोबतचा हा वीडियो युट्यूबवर खूप गाजलाय.

बिहारमधल्या कटोरवा गावातल्या पोलिस स्टेशनमधे स्वातंत्र्यापासून एकाही गुन्ह्याची नोंद पोलिस स्टेशनमधे झालेली नाही. या गावात आपले पांडेजी गेले होते. त्यांचा हा दौरा  स्थानिक न्यूज चॅनेलने कवर केलाय. या गावात अगदी साध्या वेषात ते फिरले. लोकांशी बोलले. तंटे होऊ नयेत म्हणून लोक करतात ते समजून घेतलं. रस्त्यावर बसून एका आदिवासी बाईकडून मीठ भाकरी खाल्ली. तिच्या घरी दळणही दळलंय. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा वीडियो उपलब्ध आहे.

तुमच्या कामातून बोला

मेरा नाम मेरी पर्सनॅलिटीके उपर बहुत जचता है, असं चुलबुल पांडे म्हणतो. पण गुप्तेश्वर हे नाव या पांडेजींना अजिबात सूट होत नाही. ते खूप आवेगाने बोलतात. गुन्हेगाराला चांगली अद्दल घडवायची भाषा करतात. त्यांची सोशल मीडियावर अकाऊंटं तर अगदी पाहण्यासारखी आहेत. त्यांच्या फेसबूक पेजला ७ लाख ८४ हजार फॉलोअर आहेत. एप्रिल २०२०ला त्यांनी ट्वीटर अकाऊंट उघडलं. फक्त एकाच महिन्यात त्यांनी ७० हजार फॉलोअर जमवले होते. सध्या ट्वीटरवर त्यांचे १ लाख १९ हजार फॉलोवर असले तरी गुप्तेश्वर पांडे स्वतः फक्त भारतीय पंतप्रधान, गृहमंत्री आणि नितिश कुमार या तिघांनाच फॉलो करतात.

पांडेंच्या सोशल मीडियावर फार भारी भारी वीडियो असतात. एकदम डॅशिंग पद्धतीने डायलॉगबाजी करत ते आपलं म्हणणं या वीडियोमधून मांडत असतात. कोरोनाच्या काळात नागरिकांनी काय करायचं, कोणती काळजी घ्यायची याचेच वीडियो त्यांच्या अकाऊंटवर गेल्या अनेक दिवसांपासून दिसतायत. त्या वीडियोला काही हजारात लाईक्स असतात. ‘सर, मी यूपीएससी करतो. तुम्ही माझी प्रेरणा आहात,’ अशा आशयाच्या हजारो कमेंट्सही असतात. तरूणांच्यात आणि बिहारी लोकांच्यात हे डीजीपी फारच फेमस आहेत. फेसबूकवर फॅन्स ऑफ गुप्तेश्वर पांडे नावाचं पेजही आहे.

आपली सगळी पदकं छातीवर लावलेला त्यांचा एक मस्त फोटो सोशल मीडियावर आहे. ते सोशल मीडियावर इतका वेळ घालवतात, इतके वीडियो, पोस्ट टाकतात की डीजीपी म्हणून त्यांची नियुक्ती करताना मुख्यमंत्री नितिश कुमार यांना सोशल मीडियावर वेळ घालवू नका हे आवर्जून सांगावं लागलं. ’मीडिया अकाऊंटवरून नको तर केलेल्या कामातून तुम्ही बोला,’ असं नितिश कुमार म्हणाले होते.

हेही वाचा : मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

पोलिसाच्या तोंडून नेत्याचं भाषण 

अलिकडेच विकास दुबे प्रकरणापासून ते टीवी मीडियावरही दिसू लागलेत. विकास दुबे एन्काऊंटरनंतर गुन्हेगारी संस्कृतीला कशा प्रकारे खतपाणी मिळतं याविषयी ते झी न्यूजवर संपूर्ण साडे तीन मिनिटं बोलले. सुशांत सिंग केसवरून अर्णब गोस्वामीने घेतलेली त्यांची स्वतंत्र मुलाखतही युट्यूबवर उपलब्ध आहे. शिवाय, रिपब्लिक टीवीवरही त्यांना सुशांत सिंग प्रकरणाबद्दल बोलण्यासाठी आमंत्रित केलं होतं. सुशांत हा बिहारचा मुलगा आहे, त्याच्या मृत्यूशी लोकांच्या भावना जोडल्यात, असं ते या वीडियोत म्हणालेत. त्यावरून हे एका पोलिस अधिकाऱ्याचं नाही तर नेत्याचंच भाषण वाटतंय, अशी टीकाही त्यांच्यावर झाली.

राष्ट्रीय दर्जाच्या न्यूज चॅनेलवर स्थानिक पोलिस अधिकाऱ्याला बोलावणं ही गोष्ट फार दुर्मिळ आणि खास म्हणायला हवी. त्यांचं हे सुशांत सिंग केस संदर्भातलं प्रेम पाहून अगदी बिहारच्या लोकांनाही धक्का बसला असेल. कारण बिहारमधल्या त्यांनी हाती घेतलेल्या अनेक गुन्हेगारी केसचा अजूनही निकाल लागलेला नाही. त्यांच्यावर आरोप झालेत त्या नवरूणा चक्रवर्ती केसचाही निकाल आजवर लागलेला नाही. नवरूणा प्रकरणाचा निकाल त्यांनी हट्टाने सीबीआयकडे सोपवल्याचा आरोप नवरूणाचे वडील करतात. आता सुशांत सिंग राजपूतचं प्रकरणही सीबीआयकडे देण्यात यावं, असा आग्रह पांडेंनी धरला होता. कमाल करते हो पांडेजी!

एखाद्या नेत्यासारखं आपलं सामाजिक व्यक्तिमत्व लोकांसमोर उभं करण्यात त्यांना फार रस असतो. तसं पहायला गेलं तर ही नेतागिरी त्यांच्या रक्तातच आहे, असं द प्रिंटच्याच एका लेखात त्यांचे पाटणा युनिवर्सिटीतले मित्र नलिन वर्मा सांगतात. ‘कॉलेजच्या दिवसातही सार्वजनिक व्यासपिठांवर ते बोलत. बक्सर शहरातल्या के. के. तिवारी या काँग्रेस आमदारांशी आपलं नाव जोडायला त्यांना आवडत असे. ते कधीही विद्यार्थी राजकारणात सक्रीय नव्हते. पण राजकीय घडामोडींमधे त्यांना फार रस होता,’ असं वर्मा यांनी सांगितलंय.

शिट्टी वाजवण्याची सवय चांगली नाही

गंमत म्हणजे, बक्सर जिल्ह्यातल्याच एका गावात पांडेजींचा जन्म झाला होता आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या बक्सरमधूनच भाजपचं तिकिट मिळवण्यासाठी त्यांनी पोलिस सेवेतून वीआरएस म्हणजे स्वतःहून सेवानिवृत्ती घेतली होती. वीआरएसचा अर्जही त्यांनी राज्य सरकारकडे सुपूर्त केला होता.

लालमणी चौबे हे भाजपमधलं बडप्रस्थ म्हणून ओळखलं जातं. २००४ मधे बक्सर मतदारसंघातून चौबे उभे राहिले होते. २००९ च्या निवडणुकीसाठी बक्सर मतदार संघातून पांडेंना तिकीट दिलं जाईल असा शब्द भाजपच्या बड्या नेत्याने दिल्याचं बोललं जातं. यावरून लालमणी चौबेंनी बंड केलं. तेव्हा आयत्यावेळी गुप्तेश्वर पांडेंचं नाव काढून पुन्हा चौबेंनाच तिकीट देण्यात आलं. पांडेजींचा राजीनामा फुकट गेला. पण परतीचा मार्ग त्यांनी शोधून काढला. आपल्या राजकीय संबंधाचा वापर करून त्यांनी वीआरएस मागे घेतली आणि ते परत कामावर रूजू झाले. बिहारमधले अनेक अधिकारी या गोष्टीला नियमांचं उल्लंघन मानतात.

माणूस एकदा राजकारणी होण्याची अपेक्षा धरत असेल तर ती कायम त्याच्या मनात असते, असं म्हटलं जातं. पांडेंजींचं राजकारण प्रेम काही कमी झालेलं दिसत नाही. आत्ताही बिहारची निवडणूक जवळ आली. त्या निवडणुकीचा आणि सुशांत सिंग राजपूतचं खापर आदित्य ठाकरेंवर फोडण्याचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. ‘थाना मै बैठे ऑन ड्यूटी बजावे है पांडेजी सिटी’ असं गाणं दंबंग सिनेमात आहे. पांडेजी खरंच कुणाची शिट्टी वाजवत असतीलच तर ही सवय नसपीती म्हणजे उचापात्या करणारी आहे, हे लक्षात ठेवायला हवं.

हेही वाचा : 

कोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं?

जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग

महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं

बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

२६ व्या वर्षी सर्वांत तरुण अब्जाधीश बनणाऱ्या रितेशची भन्नाट कहाण

पंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज