१७२ वर्षांपूर्वी आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं

२२ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोनामुळे आपल्याला हात धुण्याबद्दल नीट माहीत झालं. पाण्याशिवाय हात कसं धुणार? पण १७२ वर्षांपूर्वीपर्यंत आपल्याला हात धुणंच माहीत नव्हतं. म्हणजे संसर्गजन्य आजार हा सारा पापपुण्याचा खेळ असल्याच्या समजुतीत आपण जगत होते. १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला आणि आपल्याला रोगराईचा हा सारा खेळ हात धुण्याशी संबंधित असल्याचं विज्ञानानं सांगितलं.

टीवीवर अनेकदा एक जाहिरात लागते. एक छोटा मुलगा त्यात साबणाने आपले हात धुवत असतो. सोबत ‘धोते जाओ धोते जाओ’ असं म्हणत असतो. तेवढ्यात एक मुलगी त्याला चिडवून तिकडून जाते. ‘ए बंटी तेरा साबुन स्लो है क्या?’ असं विचारते. जाहिरातीतले सगळे खळखळून हसतात. कुठल्यातरी हॅण्डवॉशची ती जाहिरात असते.

या जाहिरातीवर नंतर अनेकदा जोक आणि मीम्सही तयार झाले. तेही अनेकांनी शेअर केले. एकूणच हॅण्डवॉश प्रकरणाची आपण मजा घेतली. पण हॅण्डवॉश वापरण्याची कृती काही प्रत्यक्षात आणली नाही. आता कोरोना वायरसचा प्रसार वाढल्यापासून एका रात्रीत या हॅण्डवॉश आणि हॅण्ड सॅनिटाझरला स्टारडम मिळालं. जेवणापूर्वी हात धुण्याचं महत्त्व कोरोनामुळे तळागळातल्या लोकांपासून हात न धुता चमच्यानं जेवण करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना कळू लागलंय. पण कोरोनाच नाही तर इतर अनेक प्रकारचे जंतू आपल्या हातावर असतात. त्यांच्यापासून वाचण्यासाठी कोरोना नसतानाही पाणी आणि हॅण्डवॉश वापरून हात धुणं अत्यंत गरजेचं असतं.

आज २२ मार्च. जागतिक जल दिन आहे. त्यानिमित्ताने युनायडेट नेशन्स अर्थात यूएनने पाणी आणि हॅण्डवॉशचं महत्त्व पटवून देण्याचा उपक्रम हाती घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे, शुद्ध पाणी आणि स्वच्छ वातावरण मिळणं हादेखील माणसाचा मुलभूत अधिकार असल्याचंही यूएननं म्हटलंय. यूएनचं सांगणं अखिल मानवजातीसाठी आहे. आपण तर बांधावरच्या पाण्यावरूनच भांडतोय. तर विषय खोल आहे.

हेही वाचा : कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

हॅण्डवॉशचा शोध कुणी लावला?

हात धुतल्यानं एवढं मोठं काय होणार आहे, असं अनेकदा आपल्याला वाटतं. बाहेरून, कामावरून आल्यावर आपल्याला कडकडून भूक लागलेली असते. मग साधं हात धुवायचं भानही आपल्याला राहत नाही. पण खरंतर, या साध्याशा हात धुण्याच्या सवयीने लाखो लोकांचे जीव वाचू शकतात. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोलयुक्त हॅण्डवॉश वापरल्यानं हातावर बसलेले जंतू मरतात आणि संसर्गजन्य आजार पसरण्यापासून वाचतो.

साधारण १७० वर्षांपूर्वी संसर्गजन्य आजार म्हणजे आपण केलेल्या वाईट कृत्यांचं फळ आहे, असा समज होता. फार फार तर प्रदुषणामुळे किंवा दुषित हवेमुळे जंतू एकमेकांच्या शरीरात जातात असं वाटायचं. पण १९ व्या शतकाच्या मध्यात नवा शोध लागला.

मिलिटरी मेडिकलमधे काम करणाऱ्या फ्लोरेन्स नाईटॅन्गल ही रूग्णसेविका म्हणजेच नर्स आणि इगनाझ सिमेलविस ही डॉक्टर या दोघांनी मिळून जंतू हातातून तोंडात, नाकात किंवा डोळ्यात जातात आणि तिथून शरीरात प्रवेश करतात हे शोधून काढलं. सोबतच साबणानं हात धुतले तर या जंतूंची संख्या झपाट्याने कमी होते आणि भयंकर रोगापासून आपलं रक्षण होतं हेही त्यांनी सांगितलं.

या शोधानंतर साबण, हॅण्डवॉश अशा वेगवेगळ्या हायजिन इंडस्ट्री जन्माला आल्या. दिवसेंदिवस हात धुण्याची गरजही वाढू लागली. पण आजही अनेक देशात याबद्दल पुरेशी जाणीवजागृती नाही. जगातल्या ४० टक्के म्हणजे ३ बिलियन लोकांना या मुलभूत सोयीपासून दूर राहावं लागतं. हॅण्डवॉशिंग हा एक जागतिक पातळीवर प्रश्न आहे, असं यूएनचं म्हणणं आहे.

हेही वाचा : अरे, या दोघांनी जीव धोक्यात घालून पहिली लस टोचून घेतली ना, टाळ्या तरी वाजवा!

अशुद्ध पाण्यामुळे दररोज ८०० मृत्यू

सुरक्षित पाणी, स्वच्छता म्हणजे सॅनिटेशन आणि स्वच्छ वातावरण म्हणजेच हायजिन या तीन गोष्टींना मिळून यूएनने वॉश असं नाव दिलंय. संसर्गजन्य रोगाचा प्रसार वाढला तर हे वॉश माणसासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं, असंही यूएन सांगतं. या तीन गोष्टींसोबत शुद्ध पर्यावरण आणि शाळा, घरं, ऑफिसं, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी व्यवस्थित कचरा व्यवस्थापन होत असेल तर संसर्गजन्य आजार उद्भवणारंच नाहीत, अशी शंभर नंबरी खात्री यूएन देतं.

यूएननंच दिलेल्या माहितीनुसार, जगातली ५ वर्षांखालची २,९७,००० मुलं म्हणजेच रोज कमीतकमी ८०० मुलं अतिसाराच्या रोगानं म्हणजेच जुलाब, हगवण लागून मरतात. याचं एकच कारण असतं. वापरायला चांगलं पाणी आणि स्वच्छतेच्या बेसिक सुविधा त्यांना मिळत नाहीत. शिवाय, गर्भार बायका आणि भ्रुण यांच्या वाढत्या मृत्यूदराचंही हेच कारण आहे. स्वच्छ बाथरूम, वाहतं पाणी, चांगला संडास, साबण या सगळ्या गोष्टींचा अभाव यामुळे शाळा, कॉलेजात जाणाऱ्या मुली आणि बायका पाळीमधेही बाथरूमचा वापर करत नाहीत. त्यातूनही वेगवेगळे इन्फेक्शन्स होतात.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोरोना वायरसः १० शंकांची WHO नं दिलेली १० साधीसोप्पी उत्तरं

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

२४ तास पाणी कसं मिळेल?

हॅण्डवॉश करायचा म्हणजे घरातल्या नळाला सतत पाणी हवं. नळ उघडला की पाणी यायला पाहिजे. पण अनेक गावात आज पाणी नाही. एकीकडे पाण्याचे महापूर येतात तर दुसरीकडे हिवाळ्याच्या तोंडावर दुष्काळ पडलेला असतो. पाणी आणण्यासाठी कोस कोस दूर जावं लागतं. इतक्या लांब गेल्यावरही थोडंसंच पाणी पदरात पडतं. मग त्या पाण्यातून तहान भागवायची की हात धुवायचे हे ठरवणं म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहिर अशी अवस्था असल्यासारखं आहे. त्यामुळेच बदलतं हवामान आणि पाणी यांचाही निकटचा संबंध आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

युरोपियन देशात डब्लूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने यूएनने एक चांगला उपक्रम राबवला. डब्ल्यूएचओनं युरोपियन देशांकडून पाण्याची जागतिक पातळीवर बचत करण्याचं वचन घेतलंय. पाण्याचं योग्य व्यवस्थापन, पाण्यावर चालणाऱ्या जैवव्यवस्थेचं संरक्षण आणि पाण्यामुळे होणारे आजार आटोक्यात आणून संपवणं यासाठी ते काम करतात. त्यामुळे तिथल्या बहुतेक सगळ्या देशांतल्या सगळ्या घरात २४ तास वाहत पाणी असतं.

यंदाच्या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने युरोपचं हे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो. हात धुवून कोरोनासोबत इतर संसर्गजन्य रोगांचा प्रसार थांबवणं आणि आपल्याप्रमाणेच इतरांनाही हात धुण्यासाठी पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्यच आहे.

हेही वाचा : 

पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!

काकडधरा गावानं वॉटरकप स्पर्धा जिंकली पण

नदी नसलेले हे देश आपल्याला माहीत आहेत?

कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?

तेलंगणाने गोदावरीवर कसं उभारली जगातली सर्वांत मोठी पाणीउपसा योजना?