जॅकी चॅन : जगाला कुंगफू-कराटेचं वेड लावणारा जिगरबाज सुपरहिरो

०७ एप्रिल २०२३

वाचन वेळ : ४ मिनिटं


सुपरहिरोंच्या अचाट करामती आपल्या सगळ्यांनाच आवडतात. पण या सगळ्या करामतींसाठी त्यांची सुपर पॉवर जबाबदार असते. तिच्या जोरावर ते सहीसलामत असले जीवघेणे स्टंट करत असतात. पण आपल्या टाळूपासून पायाच्या नखापर्यंत जखमा झेलूनही गेली साठ वर्षं जॅकी चॅन नावाचा खराखुरा सुपरहिरो प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. आज त्याचा वाढदिवस आहे.

‘हे असले स्टंट करतोस, तुला भीती नाही वाटत?’
‘वाटते की. अरे मी काही सुपरमॅन नाहीय.’

चाहते आणि चॅन काँग-संगमधला टिपिकल संवाद.

हा चॅन काँग-संग म्हणजे जॅकी चॅन. जॅकीचा जन्म ७ एप्रिल १९५४चा. जॅकीचे आई-वडील चीनमधून हाँगकाँगला आश्रित म्हणून स्थायिक झाले होते. तिथं ते फ्रेंच दुतावासासाठी काम करायचे. जॅकीला दोघेही पाओ-पाओ नावाने हाक मारायचे आणि हा त्या नावाला अगदी सार्थ ठरवायचा कारण सतत कुठंनाकुठं स्वारी थडाड करत हुंदडायची, ‘तोफगोळ्या’सारखी.

बिल्डरने दिलं नाव

प्राथमिक शाळेत जॅकी पहिल्याच वर्षी नापास झाला. त्याच वेळी नव्या नोकरीसाठी त्याच्या आईवडलांना ऑस्ट्रेलियाला निघावं लागणार होतं. त्यामुळे त्यांनी त्याची रवानगी पेकिंग शहरातल्या प्रतिष्ठीत ‘चायना ड्रामा ऍकॅडमी’मधे केली. जिथं त्याने मास्टर युन यांच्या हाताखाली पुढची १० वर्षं मार्शल आर्ट आणि ऍक्रोबॅटिक्सचं प्रशिक्षण घेतलं.

यथावकाश तो ‘युन लो’ हे नामाभिधान धारण करून ‘सेवन लिटल फॉर्च्युन्स’ या नाट्यसंस्थेचा भाग बनला ज्यात चायना ड्रामा ऍकॅडमीतल्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा भरणा होता. वयाच्या आठव्या वर्षी जॅकीने ‘बिग ऍण्ड लिटल वाग टीन बार’ या ऍक्शन सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या सिनेमात तैवानची आघाडीची अभिनेत्री ली ली-हुआ जॅकीच्या आईच्या भूमिकेत काम करत होती.

ली ली-हुआनेच पुढे काही काळ जॅकीला आपल्या सिनेमांमधे काम करण्याची संधी दिली. १९७६मधे जॅकीने ऑस्ट्रेलिया गाठलं आणि नावापुरतं कॉलेज लाईफ जगून कन्स्ट्रक्शन साईटवर कामाला लागला. जॅक नावाच्या एका बिल्डरने या तरतरीत छोऱ्याला त्याच्या हाताखाली घेतलं आणि सारे त्याला ‘लिटल जॅक’ म्हणून ओळखू लागले. तेच नाव पुढं शॉर्ट होऊन झालं - जॅकी. जॅकी चॅन!

हेही वाचा: हिंदी सिनेमांच्या नव्या हिंदुस्तानला फेक राष्ट्रवादाचा तडका

‘ब्रूस ली’चा वारसदार?

वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत जॅकीने कैक बारीकसारीक रोल्स केले होते. सतराव्या वर्षी जॅकीला लॉटरी लागली. ही लॉटरी म्हणजे हाँगकाँग सिनेसृष्टीतल्या ऍक्शन सिनेमांना जागतिक स्तरावर नेणाऱ्या ब्रूस लीच्या ‘फिस्ट ऑफ फ्युरी’ आणि ‘एंटर द ड्रॅगन’ या सिनेमांमधे स्टंटमन म्हणून काम करायची संधी होती. जॅकीने त्या संधीचं अक्षरशः सोनं केलं.

त्याच वर्षी त्याला ‘लिटल टायगर ऑफ कॅन्टोन’मधे पहिला लीड रोल मिळाला. सिनेमा जरी यथातथाच चालला असला तरीही जॅकी कित्येकांच्या नजरेत भरला होता. तोवर हाँगकाँग सिनेमाचा बादशहा ब्रूस ली काळाच्या पडद्याआड झाला होता. विली चॅन या निर्मात्याने जॅकीचं काम पाहिलं आणि लो विईसारख्या रत्नपारखी दिग्दर्शकाकडे सोपवला.

लो जॅकीला ‘न्यू फिस्ट ऑफ फ्युरी’मधून प्रेक्षकांकडे घेऊन आला. या सिनेमामधून त्याला जॅकी आणि ब्रूस लीमधलं साधर्म्य दाखवायचं होतं कारण तोवर लोक जॅकीला ब्रूस लीचा वारसदार समजत होते. पण हा सिनेमा फ्लॉप झाला. जॅकी आणि ब्रूस ली दोघांचीही ऍक्शन स्टाईल पुरती वेगळी होती. नंतर १९७८ला आला ‘स्नेक इन द ईगल्स शॅडो’. जॅकीचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा! नंतर जॅकीने मागे वळून पाहिलंच नाही.

जागतिक स्तरावर ओळख

त्यानंतर काही महिन्यांनी आलेली ‘ड्रंकन मास्टर’ सिरीजही हिट झाली. यात जॅकी मध्यवर्ती भूमिकेत होता. १९८०ला आलेल्या त्याच्या ‘द यंग मास्टर’ने ब्रूस लीचेही कैक रेकॉर्ड तोडले. जॅकी हाँगकाँग सिनेमाचा हुकमी एक्का बनला. या यशापयशाच्या खेळात विली चॅन जॅकीच्यासोबतच होता.

जॅकीने साम्मो हंग आणि युंग बाओ या त्याच्या नाट्यसंस्थेतल्या मित्रांसोबत अनेक सिनेमांमधे काम केलं. या त्रिकुटाला ‘थ्री ब्रदर्स’ किंवा ‘थ्री ड्रॅगन्स’ म्हणलं जायचं. १९९०पर्यंत जॅकीने युरोप आणि आशियातला आघाडीचा ऍक्शन स्टार म्हणून बरंच नाव कमावलं होतं पण हॉलीवूडमधे त्याला म्हणावं असं अपेक्षित यश मिळालं नव्हतं.

हॉलीवूडमधे चांगलं काम मिळवण्यासाठी जॅकी सतत प्रयत्न करत होता. सिल्वेस्टर स्टॅलोनने त्याला एक खलनायकी भूमिकाही देऊ केली होती. पण आशियाई अभिनेते म्हणजे खलनायक या साच्यात बसायला जॅकीने नकार दिला. पुढे १९९५नंतर लागोपाठ आलेल्या ‘रम्बल इन द ब्रॉन्क्स’, ‘पोलीस स्टोरी ३’ आणि ‘रश अवर’ने जॅकीला हॉलिवूडमधे एक स्टारपद मिळवून दिलं आणि जॅकी जागतिक स्तरावरचा एक मोठा स्टार बनला.

हेही वाचा: सिनेमांची संख्या कमी होतेय, हे चांगलं की वाईट?

हमखास यशाची त्रिसूत्री

ब्रूस लीची कॉपी करून त्याचा वारसदार न बनता जॅकीने त्याची स्वतःची अशी एक खास ऍक्शन स्टाईल निर्माण केली. त्याची बॅक फ्लिप आणि सिग्नेचर किक टोटल लाजवाब! सोबतीला त्याची सरस विनोदबुद्धीही होतीच. जॅकी नेहमी स्वतःचे स्टंट स्वतःच करायचा हट्ट धरायचा.

जॅकीचे स्टंट इतके जीवघेणे असतात की इन्शुरन्स कंपन्यांनी त्याला आणि त्याच्या टीमला ब्लॅकलिस्टमधे टाकलंय. आपली ऍक्शन स्टाईल, विनोदबुद्धी आणि सुपरहिरोंनाही लाजवतील असे स्टंट या तीन गोष्टींचं एकत्रित सूत्र जॅकीने सिनेमा यशस्वी करण्यासाठी वापरलं आणि ते चपखल लागूही झालं. 

जॅकीने अनेक हिट सिनेमांमधे काम केलं, तसंच फ्लॉप सिनेमांमधेही काम केलं. पण सिनेमा कितीही रटाळ वाटत असला तरी क्लायमॅक्समधले जॅकीचे नवनवीन प्रयोग बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असायचे. सिनेमा संपल्यावर चित्रिकरणाच्या वेळी घडणाऱ्या गमतीजमती, जॅकीने स्टंटसाठी घेतलेली मेहनत दाखवणारे पोस्ट-क्रेडिट सीन म्हणजे सोने पे सुहागा!!

एकमेव ग्लोबल सुपरस्टार

२०१५पासून, शांघाई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमधे जॅकीच्या नावाने ‘जॅकी चॅन ऍक्शन मूवी अवॉर्ड’ हा खास सिनेपुरस्कार दिला जातो. २०१६मधे जॅकीला विशेष ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऑस्करमधे आपलं मनोगत मांडण्यासाठी ११ मिनिटं दिली जातात. पण जॅकीला पुरस्कार मिळाल्यानंतर पुढची ११ मिनिटं तो हॉल आपल्या जागेवर उभा राहून जॅकीसाठी टाळ्याच वाजवत होता!

२००४मधे, एक नामांकित सिनेअभ्यासक, अँड्र्यू विलीसने ‘जॅकी हा कदाचित जगभरातील साऱ्या सिनेरसिकांना परिचित असलेला असा एकमेव स्टार आहे’ असे गौरवोद्गार काढले. जॅकी हे नाव किती मोठं आहे हे सिद्ध करणारं हे एक फाडू स्टेटमेंट. जॅकीनेच म्हणलंय. ‘इतकी वर्षं आशियात काम केल्यानंतर आता मला सिनेमासाठी प्रमोशन करायची गरज भासत नाही. या सिनेमामधे जॅकी चॅन आहे, इतकं कळलं तरी प्रेक्षक गर्दी करतात!’

हेही वाचा: 

ऑस्करच्या आयचा घो!

इफ्फी : देशविदेशांच्या सिनेमांचा कॅलिडोस्कोप

आर्टिकल १५ः डायरेक्टरचा प्रभाव असलेला सिनेमा

#बॉयकॉटदीपिका हॅशटॅगने छपाकचा गल्ला खाल्ला?