आज कार्तिक वद्य कालाष्टमी. हा दिवस भारतभर काळभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. काळभैरवाच्या प्रमुख स्थानांपैकी एक असलेल्या उज्जैनमधे त्याला ‘बेवडा भैरव’ म्हणतात. इंटरनेटवरही त्याचं हेच रूप प्रसिद्ध आहे. पण महाराष्ट्रात त्याचं माणूसपण साजरं केलं जातं. तो इथं क्षेत्रपाल म्हणून पूजला जातो. आज त्याचं हे वेगळं स्वरूप समजून घ्यायलाच हवं.
लोकदैवतं आणि लोकपरंपरांचा मोठा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्रानं वर्षानुवर्षे जपलाय. खरंतर या लोकदैवतांची धर्मग्रंथ म्हणवल्या जाणाऱ्या वेदांमधे, पोथ्यापुराणांमधे नोंदही नसते. त्यांचा इतिहास मौखिक परंपरा म्हणजेच प्रादेशिक लोकगीतं आणि लोककथांमधून सांगितला जातो. त्यांना कुणी आख्यायिका म्हणतं तर कुणी दंतकथा. पण याच लोककथा लोकजीवनाचा खरा आरसा असतात.
त्यांच्यातून उलगडत जाणारं लोकदैवताचं माहात्म्य म्हणजे बहुतांशी चमत्कारिक कथाच असतात. अंधश्रद्धा म्हणून या कथांना नाकारणं सोपं असतं. पण त्यासोबत बऱ्याचदा समाजातला अलिखित इतिहासही नाकारला जातो. परिणामी, ही लोकदैवतं फक्त दगड बनून राहतात. त्यांचं सांस्कृतिक संघर्षातलं स्थान धूसर होत जातं. असं दुर्लक्ष वाढल्याने साहजिकच सोयीस्कर कथा रचून या दैवतांचं सांस्कृतिक अपहरण केलं जातं.
बिरोबा, खंडोबा, ज्योतिबा, लखाबाई, येडाबाई, वाघजाई, विठोबा, म्हसोबा अशा कित्येक लोकदैवतांची महाराष्ट्रातला बहुजन समाज पूजा करतो. वैदिक पद्धती नाकारून लोकांनी लोकांच्या पद्धतीनं पूजलेली ही लोकदैवतं. यातलंच एक मोठं लोकदैवत म्हणजे भैरोबा. हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी सर्वाधिक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या काशीचा कोतवाल काळभैरवाचं महाराष्ट्रात पूजलं जाणारं स्वरूप म्हणजे भैरोबा किंवा भैरवनाथ.
हेही वाचा: तुकोबांच्या अभंगांना तात्विक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संत बहिणाबाई
भैरवनाथ हा देवाधिदेव महादेवाचा अंश मानला जातो. त्याच्या जन्माची कथा फारच वेगळी आहे. फार वर्षांपूर्वी ब्रम्हदेव आणि विष्णूमधे श्रेष्ठतेवरून वाद झाला. हे भांडण विकोपाला गेल्यावर सर्वांनी त्या दोघांना महादेव श्रेष्ठ आहेत असं समजावलं. हे ऐकून ते दोघे महादेवाकडे गेले. त्याची निंदानालस्ती करू लागले. त्यांचा हा गर्व उतरवण्यासाठी महादेवांनी रौद्ररूप धारण केलं.
रौद्ररूप धारण केल्यावर महादेवांनी आपला उजवा हात झटकला. ज्यातून महाकाय शरीराच्या काळभैरवाची निर्मिती झाली. महादेवांनी विष्णूला भैरवाचा पाय तर ब्रम्हदेवाला भैरवाचं डोकं बघायला पाठवलं. जो यात यशस्वी होईल तो श्रेष्ठ. सात पाताळ शोधूनही भैरवचरण न सापडल्याने विष्णूने पराभव स्वीकारुन शरणागती पत्करली. ब्रम्हदेवाने एकवीस स्वर्ग पालथे घातले, पण त्याला भैरवमुख सापडलं नाही.
पण आपण भैरवमुख बघितल्याचं ब्रम्हदेवाने खोटंच सांगितलं. असत्याची चीड असणाऱ्या भैरवाने करंगळीच्या नखाने लगेच ब्रम्हदेवाचं शीर धडावेगळं केलं. त्यानंतर देवांच्या विनंतीनुसार ब्रम्हाला चार वेदांची चार शीरं बसवली गेली. ब्रम्हहत्येचं पातक म्हणून महादेवाने भैरवाला तीर्थाटन करायला सांगितलं. ते पाप काशीत आल्यावर नष्ट झाल्याने महादेवाने भैरवाला प्रथम दर्शनाचं वरदान देत काशीचा कोतवाल बनवलं.
भैरव ज्या दिवशी जन्मले, तो दिवस म्हणजे कार्तिक वद्य कालाष्टमी. महादेवाच्या शरीरापासून निर्माण झाल्यामुळे असल्यामुळे भैरव हा महादेवाचा पुत्र मानला जातो. काशीचा कोतवाल म्हणजे देवतांचा पोलीसच! त्यामुळे महादेवांच्या महाकाल अवतारात भैरवाला सेनापतीचा मान दिला जातो. महादेवांच्या वरदानामुळे आजही विविध तीर्थक्षेत्रांमधे भैरवाचं दर्शन घेऊन मगच महादेवाचं दर्शन घेतलं जातं.
काळभैरव किंवा काळभैरवनाथ हे भैरवाचं मुख्य नाव. ज्याचा 'रव' म्हणजेच आवाज हा 'काळा'च्या म्हणजेच मृत्यूच्या मनात 'भय' निर्माण करणारा आहे, अशा भयानक आवाजाचा जो 'नाथ' म्हणजेच मालक आहे, तो काळभैरव किंवा काळभैरवनाथ. त्यामुळेच मृत्यूचं भय नसणाऱ्या स्मशानवासी अघोरपंथासाठी काळभैरव हे प्रमुख दैवत मानलं जातं. विविध सिद्धींचा अधिपती असल्याने भैरवाला सिद्धनाथही म्हणलं जातं.
असितांग, रुरू, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाली, भीषण आणि संहार असे भैरवाचे आठ मुख्य प्रकार आहेत. हे आठ दिशांचे संरक्षक भैरव मानले जातात. यातल्या प्रत्येक भैरवाच्या अधिपत्याखाली आणखी आठ भैरव आहेत. या बलाढ्य भैरवसेनेचा प्रमुख हा काळभैरव आहे. यातल्या सर्वांच्याच नावाविषयी भारतभर मतभेद असले तरी त्यांच्यावर भारतीयांची मनापासून श्रद्धा आहे, हेही खरं.
भैरव हे हिंदू धर्मातल्या शाक्त आणि शैव तंत्रोपासकांचं आराध्य दैवत मानलं जातं. महादेवासारखाच स्मशानवासी असलेल्या भैरवाला तंत्रविद्येत महत्त्वाचं स्थान आहे. तंत्रोपासकांकडून भैरव सात्विक, तामसी आणि राजसी रुपात पूजला जातो. त्यापैकी बटुक भैरव हे भैरवाचं सात्विक बाल स्वरूप अग्रक्रमाने पूजलं जातं. पुढे जसजशी उपासना कठोर होते, तसतसं राजसी आणि तामसी भैरवपूजेचं महत्त्व वाढू लागतं.
हेही वाचा: वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन
भैरव हा भटकंती करणारा देव मानला जातो. महादेव-आदिशक्तीच्या आज्ञेला आणि भक्तांच्या विनंतीला मान देऊन तो ठिकठिकाणी फिरलाय आणि राहिलाय. त्यामुळे कैलासावर जन्मलेल्या भैरवाची आज भारतभर ठाणी आहेत. म्हणूनच भैरवाच्या कथा वेगवेगळ्या भागांमधे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात. त्याचसोबत त्याचं जनमानसातलं स्थान, नाव, स्वरूप आणि पूजापद्धतही प्रत्येक भागानुसार बदलत जाते.
भैरवाचं महत्त्व सुरवातीला उत्तर आणि पूर्व भारतात वाढत गेलं. भारतात ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ असलेल्या ठिकाणी त्याची क्षेत्रपाल म्हणून नेमणूक केली गेली. पूर्वेकडे, विशेषतः बंगालमधे शाक्तपंथीयांनी भैरवाला तंत्रविद्येत महत्त्वाचं स्थान दिलं. त्याचं तामसी आणि उग्र रूप इथं रूढ झालं. लढवय्या स्वरूपाचा हा देव उत्तरेकडे मात्र महादेवाचा सेनापती म्हणून पूजला गेला.
उज्जैनमधलं महाकालेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. या मंदिरापासून काही अंतरावर सेनापती काळभैरवाचं मंदिर आहे. इथला तांदळा स्वरुपात पूजला जाणारा भैरव हा त्याला दाखवल्या जाणाऱ्या दारूच्या प्रसादामुळे लोकप्रिय आहे. तांदळ्याला असलेल्या खाचेला भैरवमुख समजून त्यातून दारू आत सोडली जाते. त्याचं पुढे काय होतं, हे संशोधकांना न समजल्याने हा मोठा चमत्कार मानला जातो.
दारूच्या प्रसादामुळे त्याला बेवडा भैरव म्हणलं जातं, अशी एक आठवण लोकपरंपरांचे अभ्यासक अशोक राणा यांनी ‘नशेली भैरव-भैरवी’ या ‘चित्रलेखा’ साप्ताहिकातल्या लेखात सांगितलीय. भैरवाचं हेच तामसी, उग्र आणि गूढ स्वरूप इंटरनेटवर पाहायला मिळतं. त्यामुळे भैरव हे अतिशय उग्र स्वरूपाचं दैवत आहे, त्याची पूजापद्धत ही प्रचंड तामसी स्वरुपाची आहे असे अनेक गैरसमज भारतभर रूढ आहेत.
महाराष्ट्रात मात्र तंत्रमंत्राच्या चौकटी झुगारून भैरवाचं माणूसपण साजरं केलं जातं. महाराष्ट्रात दैत्यांचा उपद्रव वाढल्यानंतर त्रासलेल्या जनतेने महादेवाला साकडं घातलं. महादेवाच्या सांगण्यानुसार भैरवाने दैत्यांचा नाश करत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सोनारी गावात आणि अहमदनगरच्या आगडगावात आपलं प्रमुख ठाणं बसवलं. तिथून भक्तांच्या विनंतीला मान देत भैरव गावोगावी पोचले. तिथले क्षेत्रपाल झाले. सोनारीहून आलेले भैरव म्हणून त्यांना सोनभैरव हे नाव मिळालं.
आपल्या सिद्धीने गावकऱ्यांच्या समस्या दूर करणारे भैरव ‘सिद्धनाथ’ म्हणून प्रसिद्ध झाले. सांगलीतल्या खरसुंडीचा खरसुंडसिद्ध, साताऱ्याच्या म्हसवडचा म्हसवडसिद्ध ही त्यापैकीच काही प्रमुख लोकदैवतं आहेत. महाराष्ट्राच्या गावांमधल्या स्मशानात राहणाऱ्या भैरवाला म्हस्कोबा हे नाव पडलं. पुण्यातला वीरचा म्हस्कोबा हे पुण्यातलं एक प्रमुख लोकदैवत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी म्हातोबा स्वरुपात भैरव पूजले जातात.
कोकणात क्षेत्रपाल म्हणून भैरवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बहिरी, भैरी किंवा देवचार यांना कोकणात क्षेत्रपालाचा मान देऊन पूजा केली जाते. रत्नागिरीच्या बारा वाड्यांचं श्रद्धास्थान असलेला श्री देव भैरी हा रत्नागिरीचं ग्रामदैवत मानला जातो. भूतगणांचा प्रमुख असलेला वेताळ हे कोकणातलं लोकदैवत भैरवाच्या सेवकांपैकी एक मानलं जातं.
उर्वरित भारतात तंत्रविद्येचा अधिपती असलेला भैरव महाराष्ट्रात मात्र क्षेत्रपाल किंवा राखणदाराच्या स्वरुपात गावकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनलाय. अगदी इंग्रजांच्या काळापासून पोलीस दल देवांचा पोलीस असलेल्या भैरवाला मानवंदना देतंय. भैरव महाराष्ट्रात ज्या भक्तिभावाने आणि आदराने पूजला जातो, त्यातून लोकदैवत या संकल्पनेचा खरा अर्थ स्पष्ट होत जातो.
हेही वाचा: गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच
भैरवाचं महाराष्ट्राशी आणखी एक जवळचं नातं मानलं जातं. एका दंतकथेनुसार, भैरव हा महाराष्ट्राचा जावईही ठरतो. भैरवाची पत्नी म्हणून पूजली जाणारी जोगेश्वरी ही पाताळातल्या शेषराजाची मुलगी. तिच्या स्वयंवराचा घाट शेषाने घातला. पण विषारी सापांच्या नगरात जायचं धाडस कुणाला होईना. काशीच्या भैरवाने पार्वतीच्या सांगण्यावरून लग्नाचा विडा उचलला. पण पाताळात जाण्याचा रस्ता त्याला माहीत नव्हता.
तो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला भेटला. तिने त्याला मोकळ्या मैदानात रंकाळं म्हणजेच खड्डा करायचा सल्ला दिला. मोकळ्या मैदानात भैरवाने घोडा नाचवून रंकाळं तयार केलं आणि कोकणातून पाताळाचा रस्ता गाठला. हेच आज रंकाळ्याचं तळं म्हणून ओळखलं जातं. पुढे महालक्ष्मीला मदत म्हणून भैरवाने रंकभैरव स्वरुपात या तळ्याचा आणि महालक्ष्मीच्या शक्तीपीठाचा क्षेत्रपाल बनून तिथं रहिवास केला.
पाताळात गेल्यावर अग्नी आणि सापांचा पहारा मोडून काढत शेषराजासमोर भैरव येऊन थांबला. शेषाने हा शिव अवतार असल्याचं ओळखलं नाही. त्याने भैरवावर विषप्रयोग केला पण भैरवाला काही झालं नाही. शेषाला त्याची चूक कळाली आणि त्याने जोगेश्वरीचं लग्न भैरवाशी लावून दिलं. जोगेश्वरीला पाताळातून अंबेजोगाईला आणून भैरवाने तिच्याशी लग्न केलं अशीही एक कथा प्रचलित आहे.
या कथेवर पुरेसं संशोधन होऊ शकलेलं नाही. बहुतांश अभ्यासकांच्या मते, अंबेजोगाईच्या जोगेश्वरीचा विवाह हा वैजनाथ या ज्योतिर्लिंग स्वरूपातल्या महादेवांशी होणार होता. महाराष्ट्रात मात्र गावागावांमधे आजही काळभैरव-जोगेश्वरी विवाहसोहळा दिमाखात पार पडतो. तेव्हा भैरवाचं वर्णन काशीचा नवरा म्हणूनच केलं जातं आणि जोगेश्वरीला स्थानिक वधूचा मान दिला जातो.
भारतभर उग्र स्वरूपाचा म्हणून मानला जाणारा भैरव महाराष्ट्रात अगदी कौतुकानं पूजला जातो. तिकडे भस्म लावून पूजला जाणारा, मंत्र आणि श्लोकांच्या सान्निध्यात राहणारा भैरव महाराष्ट्रात गुलालात न्हाऊन निघतो, शिंगी, डमरू, संबळाच्या नादावर भराडात रमतो. जसं खंडोबाचं जागरण, विठोबाचं कीर्तन तसं भैरवाचं भराड. त्याला दारू आणि चिलीम इथेही देतात, पण त्याचं प्रमाण कमी आहे.
पाताळात अग्नीशी लढताना भैरवाने त्याला जायबंदी करून चिलीम ओढण्यासाठी वापरलं. विषप्रयोग केलेलं जेवण भैरवाने पोखरलेल्या भोपळ्याच्या पात्रात घेतलं. तेव्हापासून भोपळा कडू झाला. आजही भैरवाला नैवेद्य वाढताना बऱ्याच ठिकाणी भोपळ्याच्या पात्रात वाढला जातो. त्या नैवेद्यात कधी पिठलं-भाकरी, वडे, इमरती असा गोडाधोडाचा बेत असतो, तर कधी त्यात झणझणीत मांसाहाराचं तिखट जेवणही असतं.
महाराष्ट्रात लिंग किंवा तांदळा स्वरुपात भैरवाची पूजा होतेच, पण बहुतांश ठिकाणी चतुर्भुज स्वरुपातही त्याला पूजलं जातं. चतुर्भुज मूर्तीच्या मागच्या डाव्या हातात त्रिशूळ, तर उजव्या हातात डमरू असतो. पुढच्या दोन्ही हातात भैरवाने नाग धरलेला असतो. कंबरेला शैलशिंगी, अंगावर सर्पांची आभूषणे, सोबत वेताळ आणि भूतगणांचा मेळा अशी भैरवमूर्ती जोगेश्वरीच्या बाजूला गाभाऱ्यात उभी असते.
भैरवाच्या उपासकांचा वैदिक ब्राम्हणांशी होत असल्याचा निष्कर्ष अशोक राणा आपल्या लेखात नोंदवतात. त्यासाठी त्यांनी काही ठिकाणी भैरवमूर्तीच्या पुढच्या डाव्या हातात ब्रम्हदेवाचं छाटलेलं नरमुंड पाहिल्याची नोंदही आपल्या लेखात केलीय. अशाच प्रकारे बंगालच्या कालीमातेच्या हातातही ब्राम्हणांची डोकी असल्याचं ते पुढे सांगतात. यावरून शैव-शाक्त पंथीयांचा वैदिक चालीरीती पाळणाऱ्यांशी असलेला सांस्कृतिक संघर्ष अधोरेखित होतो.
हेही वाचा: गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला
गावकऱ्यांचा, गुराढोरांचा आणि अगदी भुताखेतांचाही राखणदार भैरवच असतो. आजही कित्येक गावांमधे कुणाला साप चावला किंवा भूतबाधा झाली, तर त्या व्यक्तीला भैरवाच्या देवळात नेतात. आजच्या काळात यावर वैद्यकीय मदतही उपलब्ध आहे. पण गावकऱ्यांनी आपल्या श्रद्धेला आणि भैरवाने त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, असं सतत ऐकण्यात येतं.
इथला भैरव गावकऱ्यांची गुरं सांभाळणारा गुराखी आणि बालबच्च्यांना कवेत घेणारा नाथबाबा आहे. ‘भैरी माझा बाबा, शेष राजाच्या वाड्या गेला, जोगूबाईसाठी साती इखाची कुंड पेला’ अशा मधाळ ओव्यांचा नायक असलेला भैरव प्रेम, त्याग आणि समर्पणाचं प्रतिक आहे. ‘आडाच्या पाण्या जाया, मला वाटयत भेवु, राजा भैरी बाबा, संग जोगेश्वरी लावु’ असा भैरव इथल्या सासुरवाशिणींचा पाठीराखा आहे.
भैरवाचं हे माणूसपण महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात साजरं केलं जातं खरं, पण त्याचं तंत्रविद्येतलं स्वरूप अजूनही महाराष्ट्रात मोठं मानलं जातं. तो इथल्या कित्येक घराण्यांचा कुळस्वामी आहे. पण आपला कुळस्वामी इतर गावांचा राखणदार असून वेशीवर किंवा स्मशानात राहतो हे स्वीकारणं जड जात असल्याने भैरवाची ही प्रतिमा कायम खंडोबा-ज्योतिबामागे झाकून जाते.
पण याच भैरवाला साकडं घातल्याशिवाय महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या जगदंबेचा गोंधळ शांत होत नाही आणि त्याला बोलावणं धाडल्याशिवाय महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला खंडोबा सदरेवर बसून जागरण करत नाही, हे मात्र आपण सोयीस्कर विसरतो. मोजक्या दिवसांचा उत्सव सोडला तर भैरव नावाच्या देवपणाआड लपलेल्या भैरोबा नावाच्या माणसाकडे कुणाचं लक्षही जात नाही.
खंडोबासारखी भैरवाची लवस्टोरी सांगितली जात नाही. पार्वतीसाठी महादेवाची वाट अडवणाऱ्या गणपतीसारखाच तोही एक राखणदार, पण त्याला मुख्य प्रवाहात स्थान नाही. त्याच्याशिवाय गोंधळ संपत नाही की जागरण सुरु होत नाही, पण त्याला देवघरात स्थान नाही. असं असलं तरी तो आपल्या सगळ्यांचं भरवशाचं कुंपण बनलाय. त्याच्यापासून शेताने अंग चोरण्यात काही अर्थ नाही.
हेही वाचा:
देश का नेता कैसा हो, गणपती बाप्पा जैसा हो!
प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक
वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे
ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव